शुक्रवार, ३० मे, २०२५

1927. माणूसकी

 संध्याकाळचा फेरफटका मारून गोपाळराव घरी परतले. ते घरात शिरताच सावित्रीबाईंची तुफान एक्सप्रेस सुरू झाली.......
थोड्या वेळापूर्वी वकील साहेब घरी आले होते . त्यांनी हे ॲप्लिकेशन दिले आहे आणि हे ॲप्लिकेशन कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. अॅप्लीकेशन सबमिट करताना आपल्याला चार डॉक्युमेंट्सचे ओरिजिनल लावावे लागेल आणि कलेक्टर ऑफिसमध्ये रोज फक्त दहा लोकांनाच अपॉइंटमेंट मिळते म्हणजेच थोडक्यात उद्यालाच तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तेही लवकर जावे लागेल.
सावित्री, आपल्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे माझा कलेक्टर ऑफिसला जाऊन काहीच उपयोग होणार नाही. 
अहो जाऊन तर बघा, कधी कधी कामं होऊन जातात. ठीक आहे बाईसाहेब, जसे तुम्ही म्हणता आहात तसेच मी करतो गोपाळराव म्हणाले.
सकाळी गोपाळराव लवकरच उठले आणि झटपट तयारी करून बस स्टॉप कडे जायला निघाले. जलद चालण्याच्या नादात त्यांच्या चपलेचा अंगठा तुटला आणि साहजिकच त्यांच्या चालण्याचा वेग मंदावला. 
गोपाळराव बस स्टॉपवर पोहोचण्या आधीच बस  सुटली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी समोरून येणाऱ्या बसला हात दिला आणि काय ते सुदैव! बस चक्क त्यांच्या जवळ येऊन थांबली. ड्रायव्हरचे आभार मानत गोपाळराव पुढच्या दरवाजानेच बसमध्ये चढले.
त्यांनी मागितलेले कलेक्टर ऑफिसचे तिकीट कंडक्टरने दिले. पैसे देण्यासाठी म्हणून गोपाळरावांनी खिशात हात घातला. निघण्याच्या घाई गडबडीत पैशाचे पाकीट घ्यायला ते विसरले होते. 
साहेब तिकिटाचे पैसे लवकर द्या, कंडक्टर जरा चिडूनच म्हणाला. कंडक्टर साहेब मी पैशांचे पाकीट घरीच विसरलो म्हणत त्यांनी कंडक्टरकडे केविलवाणी नजर टाकली. पैसे नाही तर बसमधून उतरा, कंडक्टर रागावून म्हणाला आणि त्याच क्षणी जवळच बसलेल्या एका मुलाने गोपाळरावांना शंभर रुपयांची नोट देत सांगितले काका, मी वरद तुमच्या सोसायटीच्या मागच्या चाळीत राहतो. हे पैसे असू द्या, परत येताना पण लागतील तुम्हाला. थँक्स बेटा म्हणणाऱ्या गोपाळरावांना वरदने स्वतः उभे राहत त्याची जागा दिली. काका मी पुढच्या स्टॉप वर उतरणार आहे, बसा तुम्ही.
वयाची साठी पार केलेल्या गोपाळरावांचा सीटवर बसताच डोळा लागला. काका, कलेक्टर ऑफिस आले, तुम्हाला उतरायचं ना असे म्हणत कंडक्टरने त्यांना जागे केले. कंडक्टरचे आभार मानत गोपाळराव कलेक्टर ऑफिस मध्ये शिरले तेव्हा अपॉइंटमेंटचे ९ टोकन्स दिले गेले होते आणि शेवटचे एक टोकन बाकी होते. या धावपळीचे चीज होणार म्हणून त्यांना मनापासून आनंद झाला. रिसेप्शन काउंटर आता फक्त वीस-पंचवीस फुटांवर होता. तेवढ्यात मागून एक तरुणी लगबगीने त्यांच्या पुढे गेली, फक्त दोन-तीन सेकंदांचा फरक. सर, हे शेवटचे टोकन मी या ताईला देतेय, ती तुमच्या आधी पोहोचली, रिसेप्शनिस्ट म्हणाली. 
भरभर चालल्यामुळे गोपाळरावांना धाप लागली होती. ते काही बोलणार तेवढ्यात ती तरुणी म्हणाली, काका टोकन तुम्ही घ्या, तुम्ही माझ्यापुढे होतात, हे टोकन मी तुम्हाला देतेय. थँक्स बेटा म्हणताना गोपाळरावांचे मन भरून आले. 
आजचा दिवस त्यांचा होता. प्रथम बस ड्रायव्हरने, नंतर वरदने, त्यानंतर कंडक्टरने आणि आता या तरुणीने त्यांना सुखद धक्का दिला होता. जगात माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय आज त्यांना जागोजागी आला होता. 
त्यानंतर पाच मिनिटांत कलेक्टर साहेबांचे आगमन झाले. केबिनकडे जाताना त्यांचे लक्ष त्यांच्या भेटीसाठी आलेल्या उपस्थितांकडे गेले. साहेब केबिनमध्ये गेल्यानंतर दोन मिनिटांनी साहेबांचा सेक्रेटरी बाहेर आला आणि त्याने सांगितले की आजच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल करायला लागताहेत कारण साहेबांना आज मिनिस्टर साहेबांबरोबर मिटींग आहे. तुम्हाला उद्या परत अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आजच्या अपॉइंटमेंट्स उद्याला चालतील. आपल्यात गोपाळराव जोशी कोण आहेत? साहेबांनी त्यांना आत बोलावलं आहे. 
आपलं नांव पुकारलेलं बघून गोपाळराव आश्चर्यचकित झाले. ते साहेबांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा साहेबांनी उठून उभे राहत त्यांना नमस्कार केला. परत एकदा आश्चर्याचा सुखद धक्का त्यांना बसला.
काका ओळखलंत का मला? मी राज,  राज मराठे, शंकर मराठेंचा मुलगा. 
गोपाळराव क्षणात भूतकाळात शिरलेत. त्यांचा मित्र शंकर सांगत होता, गोपाळ अरे हा माझा मुलगा राज. याला अमेरिकेत एका चांगल्या युनिव्हर्सिटीत अॅडमिशन मिळतेय. पुढच्या महिन्यात त्याचा व्हिसा इंटरव्यू आहे. व्हिसा मिळण्यासाठी मला तगडा बँक बॅलन्स दाखवावा लागेल. त्यासाठी मला तुझ्याकडून पाच लाख रुपये मिळतील का, साधारणतः एक ते सव्वा महिन्यासाठी.
शंकर, अरे तू फक्त सांग, कधी पैसे पाहिजेत तुला, गोपाळराव म्हणालेत. मला पैसे पुढच्या आठवड्यात लागतील, शंकर म्हणाला. 
दुसऱ्याच दिवशी शंकर मराठेंच्या मृत्यूची बातमी आली. हार्ट अॅटॅकमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दहा दिवस झाल्यानंतर शंकर मराठेंचा मुलगा, राज गोपाळरावांकडे पैसे मागायला आला. राज, तू उद्या ये, मी तुला पैसे देईन गोपाळराव म्हणाले. दुसऱ्या दिवशी राज गोपाळरावांकडे पैसे मागायला गेला परंतु गोपाळराव बाहेर गेले होते. सावित्रीबाईंनी राजला पुढच्या दिवशी यायला सांगितले. राज परत दुसऱ्या दिवशी गोपाळरावांकडे गेला परंतु गोपाळराव बाहेरगावी निघून गेले होते दोन ते तीन आठवड्यांसाठी. राजचा अमेरिकेत शिक्षण घेण्याचा प्लॅन पूर्णपणे उध्वस्त झाला होता, गोपाळरावांनी माणूसकी न दाखविल्याने आणि दिलेला शब्द न पाळल्यामुळे. 
त्यानंतर गोपाळरावांनी राजची कधीही चौकशी केली नाही आणि राज देखील त्यांच्याकडे कोणतीही मदत मागण्यासाठी कधीही फिरकला नाही. गोपाळरावांनी शंकर बरोबरच्या अतुट मैत्रीचे नाते, शंकर जाताच निर्दयपणे तोडले होते, माणूसकीला तडा देत.
काका चहा घ्या ना, चहा गार होतोय. राजच्या बोलण्याने गोपाळराव भानावर आलेत.
काका माझ्या ऑफिसला तुम्ही का आलात? काय काम आहे तुमचे? राजने विचारले. 
राज या अॅप्लीकेशन वर मला तुझे अॅप्रुव्हल हवे आहे. खरंतर यासाठी चार डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते परंतु माझ्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत. दोन डॉक्युमेंट्स माझ्याकडे घरी नक्कीच असतील परंतु मला ती येथे आणता आली नाहीत. गोपाळरावांच्या अॅप्लीकेशनवर "अॅप्रूव्ह्ड"असे लिहून त्याखाली स्टॅम्प मारताना राज म्हणाला, काका त्या न आणलेल्या डॉक्युमेंट्स पेक्षा तुमच्या शब्दांवर माझा जास्त विश्वास आहे. राजचे ते शब्द ऐकून गोपाळराव मनोमनी शरमले. आज राजने गोपारावांच्या त्याच्या वडिलांबरोबरच्या मैत्रीचा मान ठेवला होता आणि म्हणूनच अगदी अशक्यप्राय असणारे गोपाळरावांचे काम एका क्षणात झाले होते. 
राजला बाय करून गोपाळराव जायला निघालेत आणि तेवढ्यात राजचे लक्ष्य गोपाळरावांच्या तुटलेल्या चपलेकडे गेले. काका तुम्ही दोन मिनिटं थांबा. मला तुमच्या घराकडच्याच भागात जायचे आहे मी तुम्हाला घरी सोडतो. राजने त्याच्या आलिशान गाडीतून गोपाळरावांना घरी सोडताना त्यांना सांगितले, काका यापुढे कोणतेही काम असेल तर तुम्ही येण्याची गरज नाही, मी स्वतः येईल किंवा माझ्या सेक्रेटरीला पाठवीन. राज खूप मोठ्या पदावर होता पण तरीही हवेत गेला नव्हता आणि माणूसकी विसरला नव्हता.
काम झाल्याचा आनंद होता पण तरीही गोपाळराव मनोमनी खजील झाले होते. सावित्रीबाईंना सर्व वृत्तांत सांगताना काही वर्षांपूर्वी त्यांनी माणूसकी विसरत केलेल्या अक्षम्य चुकीच्या पश्चातापामुळे त्यांचे डोळे पाणावलेत.

-दिलीप कजगांवकर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...