शुक्रवार, १६ मे, २०२५

1906. आई, मी परत आलोय !

 रात्री जेवताना अश्विनने विचारले, "आई, माझा एक क्लासमेट संदीप आहे ना, तो मला 'गणपतीसाठी कोकणात चल' असं म्हणतोय. जाऊ का मी ?"
कोकणात शब्द ऐकून आई थोडीशी दचकली. स्वतःला सावरत तिने विचारलं, "कोकणात कुठे ?"
तो म्हणाला, "चिपळूणच्या पुढे कुठं तरी त्याचं गाव आहे. त्याला आजच हो की नाही ते सांगावं लागेल, तो उद्या तिकिटे काढणार आहे."
चार दिवसांनी अश्विन संदीपबरोबर त्याच्या गावी गेला. दुस-या दिवशी गणपती आले व विराजमान झाले. तिथे खूप उत्साहाचं वातावरण होतं. त्या वातावरणाने अश्विन खूप भारावला होता. संध्याकाळी तो संदीप व त्याच्या मित्रांबरोबर गावातल्या दहा बारा घरी आरतीला गेला. सगळ्या घरी आरतीचा उत्साह प्रचंड होता.
दुस-या दिवशी संध्याकाळी तो काहीसा थकला होता. तो संदीपला म्हणाला, "आज मला थोडासा थकवा वाटतोय. मी नाही येत आरतीला."
संदीप म्हणाला, "ठीक आहे. तू माझ्या आत्याकडे आराम कर. तिच्याकडे ती गणपती बसवत नाही त्यामुळे तिथे निवांत आहे. रात्री तू तिथेच झोप."
दोघे संदीपच्या आत्याकडे गेले. त्याला पाहाताच आत्या काहीशी भाववश होत लगबगीने पुढे आली आणि एका हाताने अश्विनच्या कमरेला विळखा घालून म्हणाली, "ये, कोण आहेस तू ? तुला पाहाताच मला तुझी खूप ओढ वाटली. तू परका आहेस असं मला वाटलंच नाही."
संदीपने ओळख करुन दिली आणि येण्याचं कारण सांगितलं. आत्या म्हणाली, "तू याला माझ्याकडे घेऊन आलास हे तू चांगलं केलंस. तू काळजी करू नकोस. हा रात्री इथंच जेवण करेल आणि इथंच झोपेल."
अश्विनसुद्धा आत्याला पाहून नकळत भारावला होता. आपल्याला आत्याची इतकी ओढ का वाटायला लागली, तिच्या स्पर्शात एक वेगळीच संवेदना आपल्याला का जाणवली, ही आपली आई आहे असं आपल्याला का वाटायला लागलं, आत्यासुद्धा आपल्याशी इतक्या आत्मियतेने आईसारखीच का वागते बोलतेय हे प्रश्न त्याला पडले होते.
संदीप गेल्यावर आत्या म्हणाली, "चल, तुला तुझं घर दाखवते."
"तुझं घर दाखवते", माझं घर ? अश्विन विचारात पडला.
एक एक खोल्या दाखवत एका खोलीत शिरून ती म्हणाली, "ही तुझी खोली. आता तू इथं आहेस तोपर्यंत माझ्याकडेच राहायचं."
रात्री जेवल्यावर आतल्या खोलीतल्या मोठ्या पलंगावर आत्या त्याच्या शेजारी पहुडली आणि त्याच्याशी गप्पा मारु लागली. तिने त्याची सगळी चौकशी केली. नंतर ती म्हणाली, "अश्विन, लहाणपणचं तुला काहीच आठवत नाही का ?"
तो म्हणाला, "सगळं आठवत नाही पण जे आठवतं, ते तर सगळंच सांगितलं तुला !"
ती म्हणाली, "अश्विन, माझ्यासाठी आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. तू अचानक आलास. तुला पाहून माझं भान हरपलं. जवळजवळ बारा वर्षांनी माझा मुलगाच मला भेटायला आला अशी तीव्र अनुभूती मला जाणवली."
अश्विन नकळत बोलून गेला, "हो आई, तू माझी आई आहेस अशी संवेदना माझ्याही हृदयात उमटली. आपण पहिल्यांदा भेटतोय तरी मलाही तुझी खूप ओढ जाणवली ! आई, आपलं हे कोणतं नातं आहे ?"
आत्या म्हणाली, "बाळा, तुझ्या घरी तुला तुझी आई आहे तरी मी तुझी आई आहे अशी संवेदना तुझ्या हृदयात उमटली आणि तूसुद्धा माझा मुलगा आहेस याची तीव्र जाणीव मलाही झाली यात आपले पूर्वजन्माचे काही तरी ऋणानुबंध नक्कीच असतील पण माझ्या भावनेमागे अजून एक कार्यकारणभावसुद्धा आहे. थांब, मी तुला एक फोटो आल्बम दाखवते."
आत्याने बाजूच्या कपाटातला एक फोटोचा आल्बम काढून त्याला दिला. एका लहान मुलाचे साठ सत्तर फोटो त्यात होते. प्रत्येक फोटोवर तारीख लिहिलेली होती. ते फोटो पाहात असताना क्षणभर त्याला स्वतःचाच भास झाला. सगळे फोटो पाहून तो म्हणाला, "आई, कुणाचे आहेत हे फोटो ? आणि फक्त आठ वर्षे वयापर्यंतच आहेत. पुढचे फोटो कुठे आहेत ?"
आत्या म्हणाली, "हे माझ्या मुलाचे फोटो आहेत. तो आठ वर्षाचा असताना आम्ही मुंबईला गेलो होतो. तिथे लोकलच्या गर्दीत तो हरवला. आम्ही खूप शोध घेतला पण तो आम्हाला सापडला नाही. बारा वर्षे झाली या गोष्टीला ! नंतर पाचच दिवसांनी गणपतीचा सण आला पण मुलगा हरवला या दुःखात मी गणपती बसवणं बंद केलं. आता तू भेटलास ना, मग पुढच्या वर्षापासून मी गणपती बसवत जाईन."
नकळत त्याने आत्याला मिठी मारली आणि रुद्ध आवाजात म्हणाला, "आई, इतकं मोठं दुःख कसं गं पेललं असशील तू ?"
आत्यानेही त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाली, "खूप अवघड होतं ते दुःख पेलणं पण मला अजून एक मुलगा मंदार आहे. तो इंग्लंडला शिकायला गेलाय. आठ दहा महिन्यांनी तो परत येईल. त्याच्याकडे पाहून माझा धाकटा मुलगा हरवल्याचे माझं दुःख हळुहळू कमी होत गेलं. ते माझं प्राक्तन होतं. आज तू मला भेटलास तेव्हा माझा मुलगाच परत आला अशी माझी भावना झाली हेसुद्धा माझं प्राक्तनच आहे."
तीन दिवस अश्विन जास्तीत जास्त वेळ आत्याकडेच असायचा. दोघांमध्ये खूप जवळीक, आत्मियता निर्माण झाली होती. आत्याच्या मनात मायेची ऊर्मी दाटून आली की ती त्याला जवळ घ्यायची तेव्हा तिच्या स्पर्शाने तो अपार सुखावायचा ! कधी तिच्या डोळ्यांत अश्रू तरळायचे. त्यावेळी त्याच्याही डोळ्यांत अश्रू यायचे.
तिथून निघते वेळी तो संदीपबरोबर आत्याकडे गेला. आत्याचा निरोप घेताना नकळत तो भाववश झाला आणि त्याने पुढे होऊन आत्याला मिठी मारली. आत्यानेही त्याला मिठीत घेतले. दोघांचेही डोळे पाझरायला लागले होते. हलकासा हुंदका देत आत्या म्हणाली, "येत जा अधूनमधून मला भेटायला."
तो म्हणाला, "हो आई, तुला भेटायला नक्की येत जाईन मी. मला तुझी उणीव भासत राहील."
आत्या आणि अश्विनला एकमेकांच्या मिठीत पाहून आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहून संदीप चकित झाला होता. अश्विन आत्याला आई संबोधतोय हे पाहून संदीपला नवल वाटलं होतं.
अश्विन घरी परतला. आईला समोर पाहून तो काहीसा उदास झाला. त्याच्या डोळ्यांसमोर संदीपच्या आत्याची, आईची छबी उभी राहिली. आई त्याला निरखत होती. त्याच्या चेह-यावरून तो काहीसा हरवलेलाच आहे हे आईच्या नजरेने पटकन टिपलं. ती विचारात पडली. काही विपरीत तर झालं नसेल ना या शंकेने तिचं काळीज थरथरलं. तिने ब-याच गप्पा मारल्या पण तो अगदी मोजकं व त्रोटक बोलत होता. तो बराचसा अलिप्त वाटत होता म्हणून आई खूप काळजीत पडली होती.
दोन दिवसांनी आई त्याच्या खोलीत गेली. त्याच्याजवळ बसत ती म्हणाली, "अश्विन, कोकणातून आल्यापासून तू खूप बदलला आहेस असं मला जाणवतंय. तिकडे काय झालं ते सांग मला ! असा आतल्या आत कुढत बसू नकोस."
अश्विन म्हणाला, "नाही गं आई, काहीच झालं नाही."
आई म्हणाली, "काहीच कसं झालं नाही ? तू परत आल्यापासून मी बघतेय, तू कुठे तरी हरवला आहेस. माझ्यापासून दूर गेला आहेस. तू आलास तेव्हा मला पाहून तुझ्या चेह-यावर मला आनंद, खुशी दिसली नव्हती. तू माझ्या जवळही आला नव्हतास. तेव्हा आणि आताही मला तुझ्या वागण्यात परकेपणा जाणवतोय. काय घडलंय असं ?"
त्या आईच्या आठवणीने अश्विन भाववश, व्याकूळ झाला आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्याला जवळ घेऊन आई म्हणाली, "तुला रडावंसं वाटतंय ना, मग मनसोक्त रडून घे. मग तुझं मन मोकळं कर. तुला हलकं वाटेल. सांग मला, तिकडे काय घडलंय ते ! असा आतल्या आत घुसमटत राहू नकोस."
आईला सांगावं की सांगू नये अशा द्विधा मनःस्थितीत अश्विन सापडला होता. तिला आपल्या भावभावनेसह सगळं सांगितल्यावर तिला खूप दुःख होईल याची कल्पना त्याला आली होती. पण त्याच्या लक्षात हेही आलं होतं की आपली मनोवस्था अशी झालीय की आपण आईपासून हे फार काळ लपवून ठेवू शकणार नाही. आई खनपटीला बसून आपल्या बोलायला भाग पाडेल. आपली मनःस्थिती, आपल्या भावना आईला सांगाव्या लागणार आहे. बराच वेळ गप्प राहून तो म्हणाला, "आई, मला समजत नाही असं खूप काही घडलंय, तुला कसं सांगू ते मलाच कळत नाही."
आई काहीशी व्याकूळ होत म्हणाली, "मोकळेपणानं जसं जमेल तसं सांग मला सगळं ! मला सांगितलंस तर तुझं मन हलकं होईल."
थोडं अडखळत तीन दिवस आत्याकडे काय काय घडलं ते सांगून तो म्हणाला, "ती माझी आई आहे अशीच भावना माझ्या अंतःकरणात उमटलीय."
आईच्या मनाचा क्षोभ झाला. ती तीव्रतेने म्हणाली, "मग मी कोण आहे तुझी ? वीस वर्षे झाली, तुला मी जन्म देऊन ! मी तुझी आई आहे हे तुला माहीत आहे. तरी ती तुझी आई आहे अशी भावना झालीय तुझी ?"
आईच्या आवाजातला रोष पाहून त्याने आपली मान खाली घातली तशी ती रोषानंच म्हणाली, "मग तू कशाला आलास इथे परत माझ्याकडे ? तुझ्या त्या आईकडेच राहायचं असतंस ना !"
तो रडत रडत म्हणाला, "आई, मला काहीच समजेनासं झालंय गं !"
त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती उठली आणि रागानेच म्हणाली, "हे तुझ्या बाबांना समजू देऊ नकोस, असला पोरकटपणा त्यांना सहन होणार नाही, समजलं?" असं रोषानंच बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली.
रात्री बाबांच्या कुशीत शिरून भाववश होऊन आई रडायला लागली. बाबा चकित झाले पण त्यांना अंदाज आला होता की अश्विन कोकणातून परत घरी आल्यापासून काही तरी विचित्र घडतंय पण ते आईला काही बोलले नव्हते.
आई रडायला लागली हे पाहून ते तिच्या केसांवरून हात फिरवायला लागले तशी ती अजूनच जास्त रडायला लागली.
थोड्या वेळाने तिचा भावनेचा भर काहीसा ओसरला तसं बाबा म्हणाले, "शांत झालीस ना, मग सांग मला, काय घडलंय ते !"
अश्विन घरी परतल्यापासून काय काय घडलं, अश्विनची भावना, त्याचं वागणं बोलणं, तिची प्रतिक्रिया हे सगळं बाबांना सांगून आई म्हणाली, "मी त्याची आई आहे हे तो जाणतो तरी तो तिला आई समजायला, मानायला लागलाय, आई म्हणून माझं अस्तित्व अपरोक्षपणे नाकारायला लागलाय हा आघात मी पेलू शकणार नाही. तो माझ्यापासून दूर गेला हा विचारही मी सहन करू शकत नाही."
बाबा म्हणाले, "हे खूप धक्कादायक आहे. अशी मनोवस्था झाली त्याची ?तुझी मनःस्थिती कशी झाली असेल याची कल्पना मला आली. थोडे दिवस जाऊ दे, सगळं ठीक होईल पण आपल्याला आपलाच विचार करता येणार नाही. आपल्याला अश्विनच्या मनाचा, भावनेचाही विचार करावा लागेल. त्याच्या कलाने समजून घ्यावं लागेल आणि त्यालाही समजावून सांगावं लागेल. त्रागा करून चालणार नाही. अत्यंत नाजूक अवस्थेत तो तिच्यासाठी स्वतःशीच घुटमटत राहील. अगं, नुकतंच त्याला विसावं वर्ष लागलंय. त्याचं मन अजून खूप कोवळं आहे. तुला खूप विचारपूर्वक व संयमाने वागावं लागेल."
आई म्हणाली, "पण अचानक माझं आईपण नाकारून तो तिला आपली आई समजायला, मानायला लागलाय हे मला सहन होत नाहीये. क्षणोक्षणी ती वेदना सहन करतेय मी !"
बाबा म्हणाले, "ते मला समजतंय, आई आहेस तू त्याची ! पण तू त्याच्याशी अलिप्तपणानं, रोषाने वागायला लागलीस हेसुद्धा चुकीचं आहे. तसं करत राहिलीस तर तो तुझ्यापासून अजून लांब जाईल. तुला त्याच्या कलानेच वागावं लागेल. तो खूप नाजूक अवस्थेतून जात आहे. ती त्याची आई आहे अशी त्याची भावना तीव्र झालीय. त्याला जवळ घेऊन, आंजारून, गोंजारून, तिच्याबद्दल त्याच्याशी चेष्टेवारीनं बोलून त्याला त्या भावनेतून मुक्त करावं लागणार आहे. मला नाही वाटत, तिच्याबद्दलच्या भावना फार काळ त्याच्या मनात टिकून राहातील. त्याची आई म्हणून तूच त्याच्यासमोर वावरत राहाणार आहेस ना ? त्याला जाणीव होईलच की तूच त्याची आई आहेस !"
बाबांचं बोलणं तिला पटलं पण तिच्या मनातलं दुःख आणि त्यापायी आलेला रोष कमी झाला नव्हता. तीन दिवस तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याशी बोलणंही बंद केलं. त्याचा सकाळचा नाष्टा चहा, कालेजला जाताना त्याचा डबा, काॅलेजातून आल्यावर त्याचं जेवण ती टेबलावर ठेवायची. त्याच्यासमोर जातही नव्हती. आईचा अलिप्तपणा त्याला जाणवत होता. तो चारदा स्वयंपाकघरात जायचा पण आई त्याची दखल घेत नव्हती. आईचं परकेपणाचं वागणं आणि आत्या आपली आई आहे अशी आपली भावना का झाली या विचारात अडकून तो बेचैन झाला होता. आपल्याला उत्तर सापडत नाही म्हणून त्याची घुसमट अजून वाढली होती.
चौथ्या दिवशी तो काॅलेजातून घरी आला.  आजही आईने आपलं जेवण टेबलावर ठेवून ती तिच्या खोलीत गेलेली पाहून तो कासावीस झाला. काहीसा उन्मन होऊन तो आईच्या खोलीत शिरला. आईसमोर काही क्षण उभं राहून तो कासावीस झाला. अचानक उन्मन होत पुढे होऊन त्याने तिला मिठी मारली आणि तो रडू लागला. आई नकळत त्याच्या केसावरुन हात फिरवू लागली.
तो रडतच म्हणाला, "आई, मला काहीच समजेनासं झालंय गं ! तू माझी आई आहेस तरीही माझी आई तीच आहे अशी माझी भावना इतकी तीव्र कशी होत गेली हेसुद्धा मला कळत नाहीये. ती माझ्यापासून लांब आहे या विचाराने माझी घुसमट होतेय तरीही माझ्यापासून तू अलिप्त झालीस हेसुद्धा मला सहन होत नाहीये त्यामुळेही माझी घुसमट वाढलीय. आई, काय करू गं मी ?" असं म्हणून तो रडायला लागला.
आईला बाबांचं बोलणं आठवलं. थोडा विचार करून आपल्या पदराने त्याचे डोळे पुसत ती म्हणाली, "रडू नकोस. कधी कधी होतं असं अचानक ! मनात काय येईल, कशा भावना उमटतील हे परमेश्वराला सांगता येणार नाही. अशा आभासी, भ्रामक भावना चार आठ दिवस आपल्या मनात आवेगाने उमटत असतात. ते सत्य नसतं म्हणून नंतर त्या भावना हळुहळू निमावत जातात. तू विचार करत बसू नकोस, तुझ्या मनातली ही भावना फार दिवस टिकणार नाही. सगळं ठीक होईल."
तो पटकन बोलून गेला, "नाही आई, ती माझी आई आहे ही माझ्या मनात तिच्याबद्दल उमटलेली भावना क्षणिक नाहीये. माझं मन तिच्याकडे झेपावतंय. तिची मला खूप ओढ वाटतेय. आई, मी काय करू तेच मला समजत नाहीये."
आईचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. ती रुद्ध स्वरात म्हणाली, "नको रे असं बोलूस. माझ्या मनाला खूप दुःख, यातना होतात."
बराच वेळ तो गप्प बसलेला पाहून उसनं हसू आणत आई म्हणाली, "मलाही बघू दे ना तुझी आई कशी आहे ते ! तुझ्या मोबाइलमध्ये तिचे फोटो असतीलच ना !"
त्याने आपल्या मोबाइलमधले तिचे आठ दहा फोटो आणि तिच्याबरोबर काढलेले तीन सेल्फी फोटो दाखवले. त्या तीन सेल्फी फोटोत दोघांच्या चेह-यावरची खुशी, आनंद पाहून आई खंतावली तशी तिला त्याच्या आईबद्दल असूयाही वाटली. आपला मुलगा आपल्यापासून दूर गेला या विचारानं तिचं मन दुःखी झालं पण आपलं दुःख उघड न करता आई म्हणाली, "छान आहे रे तुझी आई ! आवडली मला ! आता काय, तुला तुझी आई मिळाली. तुला माझी आठवणही येणार नाही."
तो म्हणाला, "आई, असं बोलू नकोस गं ! तुला दुःख होतंय याची मला जाणीव आहे. त्याचं मला खूप वाईट वाटतं, अपराध्यासारखं वाटतं."
आई हसत म्हणाली, "मी खोटं बोलतेय का ? ती तुझी आई आहे असंच तुला वाटायला लागलंय ना ? ठीक आहे, तीच तुझी आहे ! तुझी आई तुला अचानक भेटली, तू खुश झालास ना त्यातच मी समाधानी आहे. तुझ्या आईचं नाव काय आहे रे ?"
तो पटकन म्हणाला, "अश्विनी."
ती म्हणाली, "अरे वा ! ती अश्विनी आणि तू अश्विन ! हा खूप मोठा योगायोग आहे."
आईने आपला पवित्रा बदलला. त्याच्या कलाने वागायचं असं तिनं ठरवलं आणि ती तशीच वागू लागली तसं अश्विनचं मन बरंचसं स्थिरावत गेलं.
दोन दिवसांनी संदीपने विचारलं तसं त्याने आत्याकडे काय काय घडलं आणि त्याची व आत्याची काय भावना झाली हे संदीपला सांगितलं. आत्याने पहिल्याच भेटीत अश्विनला जवळ घेतलं होतं, निरोप घेताना अश्विनने तिला मिठी मारली होती, आत्यानेही त्याला मिठीत घेतलं होतं, अश्विन तिला 'आई' म्हणाला होता हे संदीपने पाहिलं होतं पण असं काही घडलं असेल याची त्याला पुसटशीही कल्पना आली नव्हती. तो चकित झाला होता. थोडा विचार करून तो म्हणाला, "घरात तुझी आई आहे तरी माझी आत्या तुझी आई आहे अशी तुझी भावना व्हावी आणि तू तिचा मुलगा आहेस अशी भावना तिच्याही मनात उमडून यावी हे सगळं कल्पनेपलिकडचं आहे. असंभवनीय आहे हे ! पण असं घडलंय हे खूप चकित करणारं आहे."
अश्विन म्हणाला, "तिचा बारा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा मीच असेन म्हणून आमच्या मनात रक्ताची ओढ तर निर्माण झाली नसेल ना ?"
संदीप म्हणाला, "अरे, घरात तुझी आई आहे तरी असा विचार करण्याइतपत तुझी भावना व्हावी याचा एक अर्थ तुझ्या लक्षात येतो का ? तू तुझ्या आईचं ती तुझी आई म्हणून असलेलं अस्तित्व नाकारतो आहेस."
अश्विन गोंधळला मग सावकाश म्हणाला, "हो, तसंच काहीसं आहे हे ! तुझी आत्याच माझी आई आहे अशी तीव्र भावना माझ्या अंतःकरणात उमटत राहाते."
थोडा विचार करून संदीप म्हणाला, "आपल्या काॅलेजात सायकाॅलाॅजीचे वाणी सर आहेत ना, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू या का ? ते काही तरी सांगतीलच !"
अश्विन म्हणाला, "हो चालेल. माझी खूप घुसमट होतेय ती तरी कमी होईल."
अचानक संदीप म्हणाला, "सत्य पडताळून पाहाण्याचा अजून एक मार्ग आहे. आत्याचा मुलगा बारा वर्षांपूर्वी हरवला. तो तूच आहेस असं मानलं तर घरात तुझ्या जन्माचा दाखला नसणार. तसंच तुझं दहावीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरून तुला शाळेत पाचव्या सहाव्या वर्षी शाळेत टाकलं का की तू आठ वर्षाचा असताना टाकलं हे पडताळून पाहाता येईल. त्यावरूनही काही अंदाज बांधता येतील."
अश्विन म्हणाला, "हो, हा चांगला मार्ग आहे. माझ्या कागदपत्राची एक फाईल आहे, ती मी शोधून तुला दाखवतो. मग बोलू आपण !"
अश्विन घरी आला आणि तो हाॅलमध्ये कपाटात त्याची फाईल शोधू लागला. तेवढ्यात आई तिथे आली आणि तिने विचारलं, "काय शोधतोयंस ?"
तो दचकला आणि चाचरत म्हणाला, "अगं, माझ्या एका प्रोजेक्टची फाईल दिसत नाहीये, ती शोधतोय."
त्याच्या चेह-यावर बदललेले हावभाव पाहून आईला शंका आली की तो वेगळंच काही तरी शोधतोय हे तिच्या लक्षात आलं. त्याच्या प्रोजेक्टची फाईल हाॅलमधल्या कपाटात कशाला तो ठेवेल ?  पण ती काही बोलली नाही. तिथेच बसून त्याने कुठली फाईल शोधली, आणि त्याने ती फाईल आपल्या काॅलेजच्या सॅकमध्ये टाकली हे तिने पाहून घेतलं.
थोड्या वेळाने तो बाथरुममध्ये गेल्यावर आईने ती फाईल बघितली तेव्हा अश्विन नेमकं काय शोधतोय याचा तिला अंदाज आला. तशी ती धास्तावली. तिच्या काळजात धस्स झालं आणि तिची काळजातली वेदना अश्रूरुपाने डोळ्यांतून ओघळू लागली.
अश्विन बाथरुममधून परत आल्यावर त्याने बघितलं की आई रडतेय. पाच मिनिटात काय घडलं याचा विचार करत त्याने विचारलं, "काय झालं तुला रडायला, आई ?"
आईचे हुंदके वाढले. कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली, "कसं सांगू रे तुला ? तू माझ्यापासून दूर जातोयंस या विचाराने मला खूप दुःख होतंय. तीच तुझी आई आहे ही तुझी भावना झालीय. त्यामुळे मीच तुझी आई आहे हे मी तुला समजावू शकत नाही. मग रडण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का माझ्याकडे ?"
आईच्या जीवाची घालमेल त्याला समजत होती. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले पण तो गप्प बसला.
रात्री पलंगावर आडवी झाल्यावर बाबांच्या कुशीत शिरत आई मुसमुसत रडू
लागली. बाबांनी ओळखलं की अश्विनच्या वागण्याने ती दुखावली गेलीय.    तिला जवळ घेत ते म्हणाले, "मनसोक्त रडून घे. मग सांग, आज काय झाले ?"
आपलं रडणं आवरून आईने काय घडलं ते बाबांना सांगितलं तसे ते म्हणाले, "अश्विन एका नाजूक मानसिक अवस्थेतून जातोय. तीच त्याची आई आहे अशी त्याची भावना तीव्र होत चालली आहे म्हणून तो सत्य शोधायचा प्रयत्न करतोय. आपण त्याच्या कलाने वागायला हवं. त्याच्या सत्य शोधण्यातून ती त्याची आई नाही तर तूच त्याची आहेस हे त्याला उमगून येईल आणि सगळं पूर्ववत होईल. तू धीराने घे. आता उद्या त्याच्याबरोबर काय बोलायचं ते मी तुला सांगतो."
बाबा बराच वेळ बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून आईचं मन खूप सैलावलं आणि ती शांत झोपी गेली.
दुस-या दिवशी अश्विनने त्याच्या कागदपत्रांची फाईल संदीपला दाखवली. दोघांच्या लक्षात एक विसंगती आली. अश्विनच्या शंकेला बळकटी मिळत होती पण त्याचा जन्म दाखला पाहून दोघंही गोंधळात पडले होते.
काॅलेजातून तो घरी आला. तो टेबलावर जेवायला बसला. त्याच्या अभ्यासाबद्दल तिने थोडी चौकशी केली. त्याचं जेवण झाल्यावर ती म्हणाली, "अश्विन, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. चल, आपण तुझ्या खोलीत बसून बोलू."
खोलीत गेल्यावर आईने त्याच्या सॅकमधून ती फाईल बाहेर काढली आणि म्हणाली, "अश्विन, काल तू नेमकी कुठली फाईल शोधलीस ते मी पाहिलं होतं. मला कल्पना आलीय की अश्विनी तुझी आई आहे का हे द्वंद्व तुझ्या मनात आहे म्हणून तुझी खूप घालमेल होतेय. याचा एक अर्थ तुझ्या लक्षात येतोय का की मी तुझी आई आहे हे माझं अस्तित्व तू नाकारतो आहेस. याचा मला खूप मोठा धक्का बसून मला खूप दुःख झालंय पण आता मी खूप सावरलेय. अश्विनीच तुझी आई आहे असं तू म्हटलंस तर माझ्या मनाला यातना होतील पण तू द्विधा मनःस्थितीतून बाहेर येऊन शांत झालास तर त्याचं मला समाधान वाटेल."
तो म्हणाला, "आई, तुला दुःख होतंय याची मला जाणीव आहे व त्याबद्दल मला अपराधीपणासुद्धा वाटतोय पण मी काय करू गं ? तू माझी आई आहेस तरीही ती माझी आई आहे आणि मी तिच्यापासून दूर आहे या भावनेनं माझी खूप घुसमट होतेय." असं म्हणून तो रडायला लागला.
त्याला जवळ घेत आई म्हणाली, "शांत हो, तीच तुझी आई आहे हे तू मानलंस तर तुझी घुसमट कमी होईल. पण अश्विन ...."
फाईलमधलं त्याचा जन्म दाखला त्याला दाखवत ती म्हणाली, "या तुझ्या जन्म दाखल्यावर तुझी जन्म तारीख आहे आणि आईचं नाव संगिता पाटील असं म्हणजे माझं नाव आहे आणि वडिलांचं नाव महेश पाटील असं तुझ्या बाबांचं नाव लिहिलंय. यावरून मी आणि तुझे बाबा तुझे आई वडील आहोत हे स्पष्ट होतं. आता हे तुझं शाळा सोडल्याचा दाखला बघ. याबद्दल तुझ्या मनात शंका येईल. त्याचाही खुलासा मी करते. तुला तिस-या इयत्तेत शाळेत टाकलं कारण तू पहिली दुसरीत ज्या शाळेत होतास त्या शाळेला मान्यता नसल्यामुळे ती शाळा बंद पडली म्हणून तुला दुस-या शाळेत टाकावं लागलं. तिथे त्यांनी तुझी परीक्षा घेऊन तुला तिसरीत प्रवेश दिला. त्याच शाळेत तू दहावी झालास आणि आता तू काॅलेजला आहेस. मग मला सांग, तुझी आई मी आहे की अश्विनी ?"
तो म्हणाला, "हो गं आई, तू म्हणतेस ते मला पटतं पण ती माझी आई आहे असा तीव्र आवेग माझ्या मनात का उफाळून येतो हे मला समजत नाही. मी तसं का समजतो याचंही आकलन मला होत नाही. आई, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत माझी घालमेल आणि घुसमट होतंच राहाणार आहे. मी शांतपणाने जगू शकणार नाही."
आई काकुळतीला येऊन म्हणाली, "मग कृष्णाला देवकीनं जन्म दिला पण त्याचं पालनपोषण यशोदेनं केलं तसं अश्विनी तुला जन्म देणारी देवकी आहे आणि तुझं पालन पोषण करणारी मी यशोदा आहे हे स्वीकार आणि तुझ्या घुसमटीतून बाहेर ये. मला अगदीच नाकारू नकोस. माझ्यासाठी हे खूप वेदनादायी आहे रे !"
आईची हतबलता त्याला जाणवत होती पण आईच्या बोलण्यावरून त्याला वाटलं की अश्विनीच आपली आई हे आई स्वीकारतेय अशी भावना त्याच्या मनात उभरून आली.
दिवसातून चारदा तरी अश्विनीबरोबर तो फोनवर बोलत असतो तरी तिला भेटायला त्याची घुसमट हळुहळू वाढत होती हे आईच्या लक्षात येत गेलं होतं. रात्री बाबांच्या कुशीत शिरून रडल्याशिवाय ती शांत होत नसे.
एकदा बाबा तिला म्हणाले, "अश्विनची अस्वस्थता, बेचैनी वाढतच चाललीय, त्याची खूप घुसमट होतेय हे तुझ्या लक्षात आलं असेलच आणि हे सगळं पाहून, अनुभवून त्याची आई म्हणून तूसुद्धा ताणतणाव सहन करते आहेस. आपल्याला निश्चित पावलं उचलून हे कुठे तरी थांबवावं लागेल. नाही तर अश्विन त्याचं मानसिक संतुलन हरवून बसेल."
आई म्हणाली, "मी कसं सहन करत असेल हा विचार नाही येत का तुमच्या मनात ?"
बाबा म्हणाले, "येतो ना ! पण या अवस्थेतून आपल्याला बाहेर पडावं तर लागणारच आहे ना ? एकदा तुझ्या मनाची तयारी केलीस तर तूसुद्धा या ताणतणावातून मुक्त होईल. तू अश्विनला अश्विनीकडे जाऊ दे. तोसुद्धा शांत होईल."
आई म्हणाली, "काय बोलताय तुम्ही हे ? अश्विनला माझ्यापासून मीच दूर करू ? मी जगू शकेन का त्याच्याशिवाय ?"
बाबा म्हणाले, "मग दुसरा काही पर्याय आहे का ? आपल्याला हे दुःख पेलावंच लागेल. मी त्याच्याशी या नाजूक विषयावर काही बोलू शकणार नाही. पुरुषांमध्ये संयम नसतो. मी एक घाव दोन तुकडे करून मोकळा होईन. पण  अश्विन ज्या मानसिक अवस्थेतून जातोय ते त्याच्यासाठी खूप अपायकारक आहे. तो मानसिकदृष्ट्या कोलमडून पडेल, त्याचं मानसिक संतुलन ढळेल याचा विचार तुला करावाच लागेल."
नंतर बाबा बराच वेळ आईशी बोलत होते. आईला समजत होतं की बाबा बोलताहेत तेच योग्य आहे व तसं केल्याशिवाय अश्विनला त्याच्या नाजूक मानसिक अवस्थेतून बाहेर काढता येणार नाही. आपण फक्त आपली भावना, आई म्हणून असलेला आपला अधिकार कुरवाळत बसून चालणार नाही. त्याचं मानसिक संतुलन ढळणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
आई म्हणाली, "तुम्ही म्हणता ते योग्य आहे व मला तसंच करावं लागेल. अश्विनला या नाजूक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचं मानसिक संतुलन जपण्यासाठी दुसरा पर्यायही नाहीये. आता मलाच आईच्या मायेला आवर घालावा लागेल. तुम्ही म्हणता तसंच आपण करू या. माझ्या नशिबातलं हे दुःखही मला पेलावं लागेल."
चार दिवसांनी रात्री जेवताना आई म्हणाली, "अश्विन, दिवाळीचा सण जवळ येतोय. इतकी वर्षे तू दिवाळीचा सण आमच्याबरोबर साजरा करत आलास. आता यावर्षी दिवाळीचा सण तू तुझ्या आईबरोबर साजरा कर. तुला खूप बरं वाटेल, समाधान वाटेल. तिच्याबरोबर राहिलास तर तुझी घुसमट कमी होईल. दिवाळीच्या सणाला तिचा मुलगा तिच्याजवळ आहे याचा तिलाही आनंद होईल."
आई असा विचार करेल असं त्याला वाटलं नव्हतं. तो काही बोलला नाही. तशी आई म्हणाली, "उद्या काॅलेजातून येताना संदीपला बरोबर घेऊन ये. तो करील तुझ्या जाण्याची सोय ! कदाचित तोसुद्धा तुझ्याबरोबर येईल."
अश्विन मनातून खुश झाला होता तरी तो कसंबसं "बरं !" म्हणाला.
दुस-या दिवशी संदीपला आई म्हणाली, "दिवाळी सणासाठी तुम्ही दोघे बरोबर जा. अश्विनला तुझ्या आत्याकडे सोड. याला तिच्याकडे राहायचं तितके दिवस राहू दे. हवं तर तू एकटा परत ये. याला परत केव्हा यायचं हे याला ठरवू दे."
संदीप म्हणाला, "ठीक आहे मावशी ! मला याच्या मनातल्या घालमेलीची कल्पना आहे. आमचं यावर बोलणं झालंय. उद्या शनिवार. आम्ही पुढच्या शुक्रवारी रात्री निघू. अश्विनला मी माझ्या आत्याकडेच सोडेन."
गुरुवारी रात्री जेवताना आई म्हणाली, "अश्विन तू उद्या रात्री तुझ्या आईकडे जातोयंस. तिच्याकडे राहून तिच्याबरोबर दिवाळीचा सण आनंदाने साजरा कर. तुला यायचं तेव्हा तू परत ये. तू फक्त खुश, आनंदी राहा यातच मला समाधान आहे."
अश्विन "बरं !" म्हणाला तशी ती म्हणाली, "उद्या रात्री तू निघशील तेव्हा तुला निरोप द्यायला मी मात्र नसेन. मी उद्या सकाळी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहे."
तो म्हणाला, "गाडी घेऊन जाणार असशील तर गाडी सावकाश चालव. कधी कधी तू खूप रफ ड्राईव्ह करतेस. मला भीती वाटत राहाते."
आई हसत म्हणाली, "अरे, रस्ता मोकळा असला तर माझा पाय आपोआप अॅक्सिलेटरवर दाबला जातो. मला आवडतं असं रफ ड्रायव्हिंग ! मजा येते ड्राईव्हिंग करताना ! पण तू काळजी करू नकोस. मी सावधपणे गाडी चालवेन."
त्याने विचारलं, "मला फोन करशील ना ?"
आई म्हणाली, "बघते, मैत्रिणीसोबत असले की काळ वेळेचं भान राहात नाही."
तो नाराजीने म्हणाला, "ठीक आहे, तुला माझी आठवण आली तर कर मला फोन."
दुस-या दिवशी सकाळी आई निघाली तेव्हा अश्विन म्हणाला, "सावकाश जपून ड्राईव्ह कर. काळजी घे."
सहा तास ड्राईव्ह करून आई अश्विनीकडे गेली. तिला पाहाताच अश्विनी धावत पुढे आली आणि तिने संगिताला मिठी मारली. संगितानेही तिला आपल्या मिठीत घेतलं.
अश्विनी म्हणाली, "बारा वर्षांनी अशी अचानक मला भेटायला आलीस, मला खूप आनंद झाला."
संगिता म्हणाली, "इतक्या वर्षांनी तुला पाहून मलाही खूप आनंद झाला. तू बरी आहेस ना ? तू बरीच असशील हे मी जाणून आहे."
अश्विनीने विचारलं, "आडवळणाने तू काही सूचित करते आहेस पण अशी अचानक कशी आलीस तू ?"
संगिता म्हणाली, "बारा वर्षांनी मला तुझ्याकडे येणं भाग पडलं."
अश्विनी म्हणाली, "मुलावर हक्क सांगायला आलीस की माझ्याकडे त्याची भीक मागायला आलीस ?"
संगिता म्हणाली, "नको त्या भ्रमात राहू नकोस. मी त्याच्यावर हक्क गाजवणार नाही आणि त्याची भीकही मी तुझ्याकडे मागणार नाही. माझ्या मुलाची तुला खूप ओढ वाटते ना ? तू त्याची आई आहेस असंच तुला वाटतं ना ? आणि त्यालाही तू त्याची आई आहेस असंच वाटतं ना, तुझ्यासाठी त्याची खूप घुसमट आहे ना, म्हणून मी माझ्या मुलाला तुझ्या हवाली करायला आलेय."
अश्विनी म्हणाली, "म्हणजे ?"
संगिता म्हणाली, "तो आज रात्रीच्या बसने तुझ्याकडे यायला निघतोय. सकाळी तो इथं येईल. माझ्या मुलाला तुझ्या हवाली सुपूर्द करून मी लगेच इथून निघेन. आयुष्यभर कवटाळत बस माझ्या मुलाला !"
अश्विनी म्हणाली, "अशी रागावू नकोस. जे घडत गेलं ते अभावितपणे, नैसर्गिक भावनेनं ! आम्ही दोघे एकमेकांना पाहाता क्षणी असे एकाच भावनिक पातळीवर पोहोचू असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू त्याची आई आहेस म्हणून माझ्यासाठी होणारी त्याची घुसमट तुला पाहावली गेली नाही. त्या घुसमटीतून तो मोकळा व्हावा म्हणून तू त्याला माझ्या हवाली करायचा निर्णय घेतलास. खरी आई शोभतेस तू ! पण तू घाबरू नकोस, तुझा मुलगा माझ्याकडे कायमचा राहाणार नाही. तो तुझ्याकडेच परत येईल."
संगिता म्हणाली, "त्याला कुठेही राहू दे पण शांत, समाधानी राहू दे. तुझ्यासाठी त्याचं क्षणोक्षणी असं घुसमटत जगणं मला पाहावत नाहीये. माझा मुलगा दुस-या बाईला आपली आई समजतोय हे अनुभवून मीसुद्धा खूप घुसमटतच जगतेय तरीही एकदा त्याला तुझ्या स्वाधीन केलं की माझी घुसमट तरी संपेल. तू आईच्या मायेनं त्याची काळजी घेशील हे मी जाणून आहे."
अश्विनी म्हणाली, "तुझ्या नव-याला मान्य आहे हे ?"
संगिता म्हणाली, "आपला मुलगा क्षणोक्षणी असं घुसमटत जगतोय हे तोसुद्धा पाहू शकत नाही. त्याने पर्याय शोधला, हृदयावर धोंडा ठेवून मीसुद्धा त्याचा हा पर्याय स्वीकारला. यात आम्ही दोघे समाधानी आहोत."
अश्विनी म्हणाली, "तुम्ही दोघेही ग्रेट आहात. मुलाच्या सुखासाठी तुम्ही त्यालाच तुमच्यापासून दूर करता आहात."
संगिता म्हणाली, "मला तुझा हेवा वाटतो आणि रागही येतो. तुला एक मुलगा मंदार आहे ना, तरीही माझ्या मुलाला तू आईच्या मायेची भूरळ का घातलीस ? त्याला माझ्यापासून का तोडलंस ? मी त्याच्याशिवाय कशी जगेन हा विचार नाही करता आला तुला ?"
अश्विनी म्हणाली, "मला दोष देऊ नकोस. आमच्या पहिल्या भेटीपासून जे घडत गेलं ते अभावितपणे, नैसर्गिक प्रेरणेने ! मी लाख त्याला आईच्या मायेची भूरळ घातली असेल पण तोसुद्धा मला पाहताक्षणी माझ्या आईच्या मायेला भुरळलाच ना ! मीच त्याची आई आहे ही भावना त्याच्या हृदयात का उमटली ? नुसती उमटली नाही तर त्या भावनेला तो घट्ट कवटाळून बसलाय."
संगिता म्हणाली, "त्याला तूच जबाबदार आहेस. तू भान ठेवलं नाहीस, परिणामाचा विचार केला नाहीस."
अश्विनी म्हणाली, "तुझी आईची माया कुठे तरी कमी पडली हे तू का स्वीकारत नाहीस !"
संगिता म्हणाली, "ते मी स्वीकारलंय म्हणूनच त्याला तुझ्या हवाली सुपूर्द करायला आले ना मी ? आता तू जप माझ्या मुलाला !"
अश्विनी म्हणाली, "संगिता, तू मुलाशिवाय स्वस्थ जगू शकणार नाहीस याची मला जाणीव आहे. मला माफ कर."
संगिता म्हणाली, "माफी मागायचं नाटक करू नकोस. तू मुद्दाम हे घडवून आणलंस."
अश्विनी म्हणाली, "असा दोष मला देऊ नकोस आणि काळजी करू नकोस. तुझा मुलगा परत तुझ्याकडे येईल असं मला वाटतं आणि तसं घडलं नाही तरी काळ उलटत जाईल आणि मुलाशिवाय जगणं तुझ्या अंगवळणी पडत जाईल."
संगिता म्हणाली, "तू म्हणतेस ते लवकर घडू दे."
रात्री दोघी एकाच पलंगावर आडव्या झाल्या. जुन्या आठवणी जागवत आणि गेल्या बारा वर्षात काय काय घडलं हे एकमेकींना सांगत त्यांनी बरीच रात्र जागवली.
दुस-या दिवशी आपलं सगळं आवरून अश्विनी व संगिता तयार होत्या. रस्त्यात जेवण घ्यायचं नाही असा विचार करून संगितानं भरपेट नाष्टा केला होता. अश्विन आल्यावर त्याला अश्विनीच्या हवाली करून ती तिथून निघणार होती. अश्विनी तिला दोन दिवस थांबायचा आग्रह केला तेव्हा ती म्हणाली, "नको. त्याला तुझ्या स्वाधीन केल्यावर इथं थांबणं मला किती अवघड होईल याचा विचार कर ना !"
अश्विन आल्याची चाहूल लागताच संगिता पुढच्या खोलीच्या कोप-यावर मागे जाऊन उभी राहिली. अश्विन घरात शिरताच त्याने समोर उभ्या असलेल्या अश्विनीला मिठी मारली. त्याच्या आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला लागले.
त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत रडताना पाहून संगिताला वैषम्य वाटलं. तिला अश्विनीची असूया वाटली. त्याचबरोबर त्यांची एकमेकांबद्दलची उत्कट ओढ पाहून तिला काहीसं समाधानही वाटलं. तो आता अश्विनीकडे घुसमटत जगणार तरी नाही हा दिलासाही तिला मिळाला.
अचानक अश्विनचं लक्ष आईकडे गेलं आणि त्याने चकित होत अश्विनीला आपल्या मिठीतून दूर केलं आणि विचारलं, "आई, तू इथं कशी ? तू तर तुझ्या मैत्रिणीकडे जाणार होतीस ना ?"
आई म्हणाली, "हो, तुझी आई अश्विनी ही माझी जिवलग मैत्रिण आहे. ही तुझी आई आहे अशा भावनेनं तुला हिच्याबद्दल वाटणारी ओढ आणि तिच्यापासून तू लांब आहेस म्हणून तुझी होणारी तडफड, तुझी घुसमट मला पाहावली नाही. मग मी तुझ्या बाबांबरोबर बोलून, त्यांच्याच सांगण्यानुसार तुला अश्विनीच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मी इथे आले. आता कायमचा तू तुझ्या आईबरोबर राहा. चल, निघते मी !"
असं म्हणून तिने आपली बॅग उचलली आहे बाहेर आली.
आईचा निर्णय ऐकून अश्विनला खूप मोठा धक्का बसला होता. सगळं अचानक अनपेक्षित, धक्कादायक घडलं होतं. त्याची मति बधिर झाली होती.
तो भानावर आला. क्षणात त्याच्या मनात काही प्रश्न उभे राहिले. त्याने बाहेर बघितलं. त्या दोघी आणि त्याचे वडील कारजवळ त्याची वाट पाहात उभे होते. तो काहीसा धावतच त्यांच्या जवळ आला. आपल्या आईच्या डोळ्यांत एकटक पाहात त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, "मला हिच्या सुपुर्द करण्याचा निर्णय घेऊन तू इथं आली होतीस ?"
आई म्हणाली, "हो. तुझी क्षणोक्षणी होणारी घुसमट पाहून मी हा निर्णय घेतला. तू सुखात, समाधानात जगावंस एवढीच माझी इच्छा आहे आणि मला खात्री आहे की अश्विनी तुला आईच्या मायेनं खूप सुख देईल आणि समाधानात ठेवेल. तुझ्या बाबांनीच मला असा निर्णय घ्यायला बळ दिलं, साथ दिली. अश्विनी तुझी आई आहे या तुझ्या भावनेला त्यांनीही स्वीकारलंय."
तो म्हणाला, "आई, जे असंभव आहे ते तू घडवून आणते आहेस. बाबांनीही तुला साथ आणि बळ का दिलं हे माझ्या समजत नाहीये. मी पहिल्यांदा तुला हिच्याबद्दलच्या माझ्या भावना सांगितल्या तेव्हा तुला खूप राग आला होता. चार दिवस तू माझ्याशी खूप रोषात वागत होतीस. माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत होतीस. आपल्या मुलाने दुस-या बाईला आई मानावं हे तुला सहन झालं नव्हतं. मग आता इतका मोठा निर्णय तू कसा घेतलास ? मला कायमचं हिच्या हवाली करायला निघाली आहेस तू ? आई, हे काय आहे ?"
आई म्हणाली, "तुझी होत असलेली घुसमट मला आणि तुझ्या बाबांनाही पाहावली गेली नाही. मग मला आणि तुझ्या बाबांना जे सुचलं ते मी केलं."
तो म्हणाला, "नाही आई, आपल्या मुलाला दुस-या बाईला सुपूर्द करायला कोणतीही आई तयार होणार नाही. आणि ही नेमकी तुझी जिवलग मैत्रिण कशी निघाली ? काय परस्पर संबंध आहे या सगळ्यांचा ?"
आई रोषानेच म्हणाली, "आता तुझ्या आईचं डोकं खा ना ! मला त्रास देऊ नकोस !"
तो म्हणाला, "आई, तू जो जगावेगळा निर्णय घेतलास त्यामागे निश्चितच काही तरी ठोस असं कारण दडलंय हे निश्चित आहे. ही नेमकी तुझी जिवलग मैत्रीण असावी हा केवळ योगायोग नाहीये. तुम्ही दोघी माझ्यापासून काही तरी लपवताय. आई, मला सत्य जाणून घ्यायचंय."
आई म्हणाली, "आम्ही तुझ्यापासून काहीही दडवत नाहीये. तुला तुझी आई मिळाली ना, मग शंका कुशंका घेत बसू नकोस आणि काही प्रश्न तुला पडले असतील तर तुझ्या आईलाच विचार."
तो म्हणाला, "नाही आई, मी शंका कुशंका घेत नाही तर तुम्ही दोघी माझ्यापासून काही तरी दडवता आहात असंच मला ठामपणाने वाटतंय. तुझ्या मायेवर मोठा दगड ठेवून तू जो निर्णय घेतलास त्यामागे काही कार्यकारणभाव असलाच पाहिजे. इतकं सहजासहजी तू आपल्या मुलाला हिचा मुलगा म्हणून हिच्या स्वाधीन करायला कशी तयार झालीस या मागचं सत्य मला जाणून घ्यायचंय. आई, सांग मला. तुला माझी शपथ आहे."
आई रोषानंच म्हणाली, "शपथ नको घालूस. शपथच घालायची तर तू तुझ्या आईला झालं. विचार तिला, तुला पाहाता क्षणी तिच्या मनात आईची भावना कशी उफाळून आली ते आणि तिने तुला आईच्या मायेची भूरळ कशी घातली ते !मी निघते. आता तुझ्या या आईचं डोकं खात बस."
अश्विनी म्हणाली, "संगिता, याने तुला शपथ घातलीय तेव्हा ती शपथ मोडू नकोस. काय ते तूच सांग याला. तुझा निर्णय मला पसंत नाही. तू काय केलंस ? मला न सांगता, मला विश्वासात न घेता याला माझ्या स्वाधीन करण्याचा तू निर्णय घेतलास ना, मग तू आता याला काय सांगायचं ते तूच बघ."
कारचा दरवाजा उघडून आई कारमध्ये बसली. अश्विन म्हणाला, "आई, माझ्या शपथेचं ओझं तुझ्या मनावर घेऊन जाऊ नकोस. मला सत्य काय आहे ते सांगून जा."
आई कारच्या बाहेर आली आणि म्हणाली, "ठीक आहे. तुला सत्य जाणून घ्यायचंय ना, मग अश्विनी हीच तुझी जन्मदाती आई आहे हे वास्तव आहे. तिला आणि तुलाही एकमेकांची आई मुलगा म्हणून तीव्र ओढ वाटली म्हणून मी तुला हिच्या स्वाधीन करायचा निर्णय घेतला. ही तुझी आई आहे आणि गेली बारा वर्षे मी यशोदा म्हणून तुझा सांभाळ केलाय."
तो म्हणाला, "इतकं सत्य सहज सांगितलंस तर मी मुंबईला हरवलो होतो तो मी तुला सापडलो होतो का ? आणि तुला कसं माहीत झालं होतं की मी हिचा मुलगा आहे म्हणून ? ते सगळं सत्य मला सांग. मला आयुष्यभर प्रश्नांच्या भोव-यात गटांगळ्या खात एकटा सोडू नकोस."
आई म्हणाली, "ठीक आहे. तुलाही सगळं सत्य समजायला हवं. बारा वर्षांपूर्वी माझा आठ वर्षाचा मुलगा संकेत पोहोण्याचा तलावात बुडून मरण पावला. मी खूप दुःखात होते. चिंता करावी अशी माझी मनःस्थिती झाली होती. तुझी आई अश्विनी ही माझी बालपणापासूनची जिवलग मैत्रीण होती. आमची शरीरे दोन आहेत पण आमचा आत्मा एक आहे असं आमचं नातं होतं. माझा संकेत गेल्यावर एका अनामिक ओढीने ही तुझी आई दुस-याच दिवशी तुझ्या वडिलांबरोबर हिच्या दोन मुलांना घेऊन माझ्याकडे आली होती. माझा एकुलता एक मुलगा असा कोवळ्या वयात गेला याचा हिला मोठा धक्का बसला होता. माझा मुलगा गेल्यामुळे माझी झालेली विकल मनोवस्था हिला पाहावली गेली नाही. मी संकेतच्या जाण्याने वेडी होईन असं हिला वाटलं. म्हणून हिने तुझ्या वडिलांबरोबर चर्चा, सल्लामसलत करून हिचा धाकटा मुलगा म्हणजे तुला माझ्या ओटीत टाकलं. मी मनाच्या उन्मन स्थितीत तुझा स्वीकार केला. हे सत्य तुला कधीच समजू नये म्हणून तुझे आई वडील आणि मी व तुझे बाबा, असे आम्ही चौघांनी निर्णय घेतला होता की आम्ही चौघांनी एकमेकांना कधीच भेटायचं नाही पण तसं घडायचं नव्हतं. बारा वर्षांनी नियतीने तुमची पुनर्भेट घडवून आणून तुमच्यातली रक्ताची ओढ जागवली. रक्ताच्या ओढीने तूसुद्धा हिला तुझी आई समजलास. दैवगती प्रबळ ठरली. आता आयुष्यभर तू तुझ्या आई वडिलांबरोबर सुखात, समाधानाने राहा."
गाडीत बसून गाडी चालू करत ती म्हणाली, "अश्विन, अश्विनी येते मी ! भाऊजी, तुमच्या मुलाची काळजी घ्या, त्याला छान जपा !"
अश्विनी म्हणाली, "तुझं मन शांत, स्थिर आहे ना ? गाडी व्यवस्थित चालवू शकशील ना ? पोहोचल्यावर मला फोन कर. तोपर्यंत मी तुझी काळजी करत बसेन." 
आई म्हणाली, "हो, माझं मन स्थिर आहे. माझ्या मनाची चलबिलता संपलीय. तू माझी काही काळजी करू नकोस."
आईची गाडी वळणावर दिसेनाशी झाली तसा अश्विन कासावीस झाला. आपलं खूप काही हरवतंय अशी भावना त्याच्या मनात उभरून आली आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. दुस-याच क्षणी विकल होत त्याने आईला मिठी मारली आणि तो रडू लागला.
अश्विनीला त्याची मनोवस्था जाणवली तसे तिचेही डोळे भरून आले. अवरुद्ध स्वरात ती म्हणाली, "रडू नकोस. ती काही तुझ्यापासून कायमची दूर गेलेली नाहीये. आपण तिला भेटायला जात जाऊ."
तो म्हणाला, "आई, मी तुला प्रथम भेटलो तेव्हा तूच माझी आई आहेस अशी तीव्र भावना माझ्या अंतःकरणात उफाळून आली होती पण तू मला त्याच वेळी मी तुझा मुलगा आहे हे ओळखलं होतंस ना ?"
अश्विनी म्हणाली, "हो अश्विन, कोणतीही आई तिची रक्ताची ओढ, माया कधी विसरेल का? मी पाहता क्षणीच तुला ओळखलं होतं आणि माझी हृदयातली माया उफाळून आली होती. संदीपबरोबर तू बारा वर्षांनंतर अचानक आपल्या घरात आलास याचा मला खूप आनंद झाला होता !"
तो म्हणाला, "आई, ...."
त्याचे वडील म्हणाले, "अश्विन, आपल्या गप्पा संपणार नाहीत. आपल्याकडे खूप वेळ आहे गप्पा मारायला. बसमध्ये तुझी नीट झोप झाली नसणार. तू आधी आंघोळ करून घे, नाष्टा कर आणि थोडीशी झोप घेऊन ताजातवाणा हो. मग आपण दिवाळीचा सण आनंदाने साजरा केल्यावर बोलू आपण !"
अश्विनी म्हणाली, "हो अश्विन, तू दिवाळीला घरात आलास म्हणून आपण आधी आनंदाने, खुशीने हा सण साजरा करू. आपण नंतर सावकाश बोलू."
आपल्या घराजवळ पोहोचल्यावर आता या घरात अश्विनशिवाय राहायचं या विचाराने आई कासावीस झाली. नकळत तिचे डोळे अश्रूंनी डबडबले. बराच वेळ ती गाडीत बसून अश्रू ढाळत राहिली. नंतर तिने विचार केला की अश्विनला त्याच्या आईच्या सुपूर्द करायचा निर्णय आपलाच होता. तो निर्णय आपण स्वीकारलाय मग त्याबद्दल आता खंत, खेद बाळगायची आवश्यकता नाही. या विचारासरशी तिचं मन बरंच शांत झालं.
ती घरात शिरताच बाबांनी विचारलं, "तू ठीक आहेस ना ?"
ती हसत म्हणाली, "दोनशे पंचाऐंशी किलोमिटर अंतर एकटीने सहा तास ड्राईव्ह करून सुखरुप आले तरी विचारताय, मी ठीक आहे ना म्हणून? मी ठीक आहे. आपण घेतलेला निर्णय मी स्वीकारला त्याचं मला दुःख करण्याला काही अर्थ नाही हे मी स्वीकारलंय !"
बाबा पुढे झाले. त्यांनी आईला जवळ घेऊन सोफ्यावर बसवलं आणि म्हणाले, "तू दमली असशील. तू आराम कर. मग फ्रेश हो. मी चहा आणि खायला गरमागरम काही तरी बनवतो. मग तू एक छानशी झोप काढ, मग बोलू आपण."
रात्री बाबांच्या कुशीत शिरून तिने त्यांना तिकडे काय काय घडलं ते बारीकसारीक तपशिलासह सगळं सांगितलं. शेवटी ती म्हणाली, "मी ठरवलंय, या वर्षी आपण दिवाळीला फराळाचं काहीही बनवायचं नाही, गोड खायचं नाही. आपण यापुढे कधीच दिवाळी मनावायची नाही."
बाबा म्हणाले, "ठीक आहे. आपल्या मनाचा एक कोपरा अश्विनसाठी रिकामाच राहील."
तिकडे त्या तिघांचे दिवाळीचे चार दिवस खूप आनंदात गेले. तिघंही खूप खुश होते. 
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अश्विन व अश्विनीने चार पाच वेळा अश्विनीला फोन केले पण आईने त्यांचं नाव पाहून फोन घेतला नाही. तो उदास होत होता.
भाऊबिजेच्या दिवशी सकाळी येऊन संदीप म्हणाला, "अश्विन, मी रात्रीच्या बसने निघणार आहे."
अश्विनी म्हणाली, "संदीप, केव्हा जायचं ते अश्विनचं अजून काही ठरलं नाही. तू एकटा नीघ."
संदीपच्या लक्षात आलं की अश्विनची आई अश्विनच्या भावनेप्रमाणे वागली ! तिने अश्विनला आपल्या आत्याच्या हवाली सुपूर्द केलंय.
दिवाळीचा सण होऊन आठ दिवस उलटले. अश्विनीच्या लक्षात आलं होतं की तो गप्पा मारतो तेव्हा त्याच्या बोलण्यात फक्त संगिताचाच विषय असतो. जुन्या जुन्या आठवणी काढून तो संगिताबद्दलच बोलत असतो.
एकदा अश्विन बाहेर गेल्यावर अश्विनी नव-याला म्हणाली, "गेल्या आठ दहा दिवसांपासून अश्विनच्या बोलण्यात गप्पांचे विषय काय असतात हे तुमच्या लक्षात आले का ?"
अश्विनचे वडील म्हणाले, "हो, तो संगिताबद्दल म्हणजे त्याच्या आईबद्दलच बोलत असतो. त्याच्या मनात काय चाललंय आणि त्याच्या विचाराचा कल कुठल्या दिशेने जातो हे आपल्याला आठ दहा दिवसांतच दिसून येईल. आपण फक्त त्याच्या विचाराला साथ द्यायची, त्याच्या भावनेला जपायचं !"
अजून आठ दिवसानंतर अश्विनी म्हणाली, "अश्विन, तुझ्या काॅलेजसाठी तुझे वडील रत्नागिरीला चौकशी करायला जायचं म्हणत होते."
तो म्हणाला, "आई, गेल्या आठ दिवसांपासून मी तोच विचार करतोय. मला दोन टर्म्समध्ये इकडे अॅडमिशन मिळेल असं मला वाटत नाही. मी थोडासा गोंधळलेलो आहे."
ती म्हणाली, "अश्विन, तुझ्या मनात काय चाललंय याचा मला बराच अंदाज आलाय. तू घेशील त्या निर्णयाला मी आणि तुझे वडील साथ देऊ."
तो म्हणाला, "आई, तू कशाबद्दल बोलते आहेस ?"
ती म्हणाली, "गेल्या पंधरा दिवसांपासून मी तुला, तुझ्या वागण्या-बोलण्याला चांगलं न्याहाळतेय. तू तुझ्या आईला दिवसांतून पाच सहा वेळा तरी फोन करतोस आणि ती तुझा फोन घेत नाही म्हणून तू काहीसा उदास होतोस. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून तू ज्या गप्पा मारतोस, जुन्या आठवणीला उजाळा देतोस त्या प्रत्येक आठवणीत तुझी आई असतेच ! तिच्याबद्दलच तू सतत बोलत असतोस. काय चाललंय तुझ्या मनात ?"
तो गप्प बसला तशी ती म्हणाली, "अश्विन, तू मला प्रथम भेटलास, त्यानंतर माझ्याबद्दलच्या ओढीने तुझ्या मनात विचाराची वेगवेगळी आवर्तने उमटायची.  आपलं नेमकं नातं काय हे समजून घेण्यासाठी तुझी खूप तडफड, घुसमट व्हायची. तुझी ती तडफड, घुसमट दूर व्हावी म्हणून आपल्या मनावर खूप मोठा धोंडा ठेवून तुझ्या आईने सत्य उघड केलं. इतकंच नाही तर तुला माझ्या सुपूर्द करून ती निघून गेली. अश्विन, आपण भेटलो तेव्हापासून तुझी माझ्यासाठी घुसमट व्हायला लागली. तशीच तुझी घुसमट आज तुझ्या आईसाठी होतेय का ? मनमोकळेपणाने बोल माझ्याशी !"
बराच वेळ गप्प राहून तो म्हणाला, "तू मला चांगलं पारखते आहेस हे माझ्या लक्षात आलं. आई, आज बावीस दिवस झाले. ती माझा फोन घेत नाही, माझ्याशी बोलत नाही म्हणून मी घुसमटतोय, मला जाणवायला लागलंय की सत्य जाणून घेण्याच्या नादात मी तिला गमावून बसलोय. ती मला तिच्यापासून कायमची दूर करेल की काय अशी मला भीती वाटायला लागलीय. आई, माझ्या भीतीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे ती आणि बाबा माझ्याशिवाय कसे जगत असतील ? मला गमावून ती सतत रडत तर बसत नसेल ना ? आई, ती मला म्हणाली होती की तू माझी आई देवकी आहेस आणि ती माझी यशोदा आहे. आई, मला दोघींनाही गमावायचं नाहीये. मी काय करू गं ?" असं म्हणून तो रडायला लागला.
त्याचे अश्रू पुसत ती म्हणाली, "अश्विन, तसा तू लहान आहेस तरीही हा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. मी आणि तुझे वडील तुझ्या निर्णयाला साथ देऊ. तू घुसमटत जगावंस हे तुझ्या आईला आणि मलाही मान्य नाही. तुझ्या शिक्षणाबद्दल बोलते. इथे चांगली इंजिनियरींग काॅलेज नाहीत म्हणून आम्ही मंदारला इंजिनियरींगसाठी पुण्याला होस्टेलमध्ये ठेवलं होतं. इंजिनियरींग करून तो एम.एस. करण्यासाठी इंग्लंडला गेलाय. तुलाही शिक्षण घ्यावंच लागेल. त्यासाठी तुलाही आम्ही पुण्याला पाठवू."
अश्विन पटकन म्हणाला, "म्हणजे तुझ्यापासून लांब राहावं लागेल, असंच ना ? मी इंजिनियरींग करतो आहेच मग मी आईकडेच राहातो ना !"
ती हसत म्हणाली, "आईकडे जाण्याचा तुझा विचार खूप चांगला आहे. तिने कठोर होऊन तुझ्याशी संपर्क संपवलाय पण ती तुझ्यासाठी घुसमटत असणार, तुझ्या आठवणीने अश्रू ढाळत असणार. अरे, बारा वर्ष तिने आईच्या मायेनं तुला सांभाळलंय. तू तिच्याकडे गेलास तर तुझी, तिची भावनिक पातळीवरची कोंडी फुटेल. तुला तिला गमावावं लागणार नाही. तू तिच्याकडे गेलास तर आपण दररोज फोनवर एकदा दोनदा बोलत जाऊ. महिन्या दोन महिन्यांतून एक दोन दिवस तू मला भेटायला येत जाशील, कधी मी तुला भेटायला येत जाईन. आपल्या आई मुलाच्या नात्यात अंतर येणार नाही आणि बारा वर्षांपूर्वी मी जो त्याग केलाय तोसुद्धा सार्थकी लागेल. तेवढ्या समाधानावर मी सुखानं जगेन."
दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले होते. शेवटी ती म्हणाली, "फोन करून तिला तुझा निर्णय सांग. आज अनुभव घे, ती तुझा फोन घेईल. तुझ्याशी बोलेल. तुझी संवेदना तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल ! तुझी आई आहे ती !
त्याने आईला फोन लावला. आईने 'हॅलो' म्हटल्यावर तो म्हणाला, "आई, कशी आहेस तू ? बाबा कसे आहेत ?"
ती म्हणाली, "आम्ही दोघेही मजेत आहोत. तू तुझ्या आईकडे खुश आहेस ना ? ती पण खूप खुश असेल ! दोघं असेच खुश राहा."
तो म्हणाला, "तू माझा फोन का घेत नाहीस ? माझ्या आईचेही फोन तू घेत नाहीस."
ती म्हणाली, "अरे, फोन इकडे तिकडे पडलेला असतो. कधी कधी आवाज म्युट असतो." 
तो म्हणाला, "आई, तू काहीच बोलणार नाहीस का ?"
ती म्हणाली, "अरे, काय बोलू मी ? सगळं ठीक आहे इकडे. तू तुझ्या आईबरोबर खुश राहा. चल, ठेवते फोन !"
फोन बंद झाल्यावर अश्विनी म्हणाली, "बघितलंस, तिचा आवाज किती उदास होता ते ! ती अगदी मोजकं बोलली आणि तिने फोन बंद करण्याची किती घाई केली. किती विकल अवस्था झाली असेल तिची ! कशी जगत असेल रे ती तुझ्याशिवाय ! आताचा तुझा निर्णय योग्य आहे हे तुझ्या लक्षात आलं असेल ना ? पण तुझा निर्णय तिला का सांगितला नाहीस?"
एका हाताने आईला जवळ घेत तो म्हणाला, "माझा निर्णय समक्ष ऐकल्यावर तिचा आनंदाने फुललेला चेहरा मला पाहायचाय. तिच्या मिठीतल्या ऊबेची अनुभूति मला अनुभवायचीय म्हणून !"
दोन दिवसांनी सकाळी नऊ वाजता त्याने आपल्या घराच्या दारावरची बेल वाजवली.
इतक्या सकाळी कोण आलं हा विचार करत आईनं दार उघडून ते आत घेतलं तसं दाराबरोबर ती मागे सरकली. बाहेर अश्विनला बघून ती त्याला मिठीत घ्यायला आतुर झाली पण दुस-याच क्षणी तिचे पाय जागीच थबकले व अजून दोन पावलं ती मागे सरकली.
आईच्या हालचालीवरून तिची द्विधा मनःस्थिती लक्षात आल्यावर त्याला थोडं वाईट वाटलं पण क्षणात त्याचा चेहरा खुशीने फुलला आणि लगबगीने आत शिरून त्याने आईला मिठी मारली.
आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले होते. तिनेही त्याला आपल्या मिठीत घेतले. एका बोटाने तिच्या डोळ्यांतले अश्रू पुसत तो म्हणाला, "आई, मी परत आलोय !"
क्षणभर तिला अश्विनच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही पण त्याचं बोलणं आकलन होताच तिने त्याच्या भोवतीची कव आणखी घट्ट केली !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...