१ मे १९९८ ची निवांत सकाळ उजाडलेली. उन्हाळयाच्या सुट्टीचा तो पहिला दिवस. आता महिनाभर तरी मला कॉलेजला व लेकाला शाळेत जायचं नाही याचा आनंद. दारावरील बेल वाजली मी दार उघडले तर माझ्या कॉलेजातील मोरगावकर मॅडम दारात उभ्या. त्यांच्या चेहऱ्यावर ताण व संताप. त्या आत येवून त्या बसल्या आणि सांगू लागल्या
"अग आपल्या कॉलेजातल्या प्राध्यापक जाधवांची पत्नी सिव्हील हॉस्पीटला ॲडमीट आहे. आज पहाटे चार वाजता ती स्टोहवर पाणी तापवायला गेली. स्टोहचा भडका उडाला त्यात ती बरीच जळाली आहे."
"स्टोह? आपल्या घरात सुद्धा आता गॅस आहे. कित्येक वर्षापूर्वीच स्टोह वापरणे आपण बंद केलं आहे आणि हे जाधव सर तर बागायतदार शेतकरी. पुन्हा त्यांची दोन-चार दुकानं, कॉलेजातून मिळणारा पगार म्हणजे त्यांचा पॉकेट मनी. त्यांच्या घरात का स्टोह असेल? आणि हे महाशय कधीही कॉलेजमध्ये साडेसातला आलेले नाहीत .कायम नऊ वाजता डूलत डूलत येणार प्रिन्सिपॉलचे पेल्यातील खास मित्र त्यामुळे त्यांना सर्वच सूट. मग सुट्टीच्या दिवशी एवढ्या पहाटे उठून त्यांची बायको पाणी तापवायला का गेली असेल ?
"वेडी आहेस का तू? अग जाळलं त्यांनी आपल्या बायकोला आणि त्यांचा बाल बाका होणार नाही. कारण आपल्या प्रिन्सिपॉलच्या राजकारणी पोलीस सगळीकडे उत्तम ओळखी आहेत. दाबून टाकेल बघ तो हे मित्राचं प्रकरण. पेपर मध्ये एका ओळीची बातमी येणार नाही ."
दुर्दैवाने सर्व काही तसेच घडलं. अर्धवट जळालेल्या त्या स्त्रीने पोलिसांना 'माझी मीच स्टोचा भडका उडून जळाले' असा जवाब दिला .तिची माहेरची परिस्थिती गरिबीची होती गावावरून तिचे म्हातारे आई बाप लेकीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा त्यांनीच तिला समजावले की नवऱ्याच्या विरुद्ध काही पोलीसांना बोलू नको. कारण तुझ्या पाठीमागे तुझा एक पाच -सहा वर्षाचा मुलगा आहे. त्याचा सांभाळ तुझा नवराच करणार आहे."
'आता नवरा तुरुंगात जाऊन बसला आणि आपण मरून गेलो तर लेकराचं काय?' असा विचार त्या माऊलीने पण केला. सारं अंग जळून गेलेल्या अवस्थेत कशीबशी तिने दोन-तीन दिवस तग धरली आणि मग ती चुपचाप मरून गेली. बायकोच्या मृत्यूनंतर महिनाभराच्या आत जाधव सराच जिच्याशी प्रेमप्रकरण होतं तिच्याशी लग्न लावून तो उजळ माथ्याने नवी नवरी घेऊन घरी घेऊन आला. १५ जूनला कॉलेज सुरू झालं तेव्हा जाधव सरांच्या पाठीमागे स्टाफरूममधे या साऱ्या रसभरीत चर्चा रंगल्या. एक दिवस मधल्या सुट्टीत स्टाफरूम मधे चहा घेवून प्राध्यापकांशी गप्पा मारायला म्हणून प्रिन्सिपॉल महोदय दाखल झाले आणि त्यांनी जाधव सरांचे नवीन लग्न केल्याबद्दल अभिनंदन केले .
"आता जे दुर्दैवाने घडलं ते घडलं पण लेकराला आई नको का ? बर झालं जाधव सर तुम्ही लग्न केलं.आता आम्हाला लग्नाच जेवण द्या बरं साऱ्यांना ! "असं प्रिन्सिपॉलने म्हटल्यावर जाधव बुवाने आनंदाने होकार दिला.
मी अवाक् होऊन सारं काही पहात होते .जाधव यांना पाठीमागे जे नावं ठेवत होते त्या तमाम मास्तर मास्तरणींनी त्यांना भरभरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी कॉलेज इमारतीच्या गच्चीवर सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन पंगती करून जाधवाने जेवण दिलं. जेवणानंतर सर्वांना आईसक्रीम वाटपही झालं. मी सोडून मोरगावकर बाईंसह सर्व मास्तर आणि मास्तरणी भोजनाला उपस्थित होते. मोरगावकर बाई मला म्हणाल्या ,
"अगं साहेबाच्या घरच्या कुत्र्याला पण सलाम करावा लागतो. हा तर साहेबांचा मित्र. जेवणाचं निमंत्रण नाकारलं आणि प्राचार्य महोदयांनी करून टाकली कुठेतरी लांब खेड्यापाड्यात बदली तर काय करणार? तू आली नाहीस ना जेवायला आता बघ तुला त्रास होईल." आणि झालं पण तसंच. कुठलीतरी खुसपट काढून दोन-चार प्रेमपत्र ( मेमो ) मला प्रिन्सिपॉलने. देऊ केली. मी नसताना
"या बाई इतरांच्या घरच्या कार्यक्रमाला येत नाहीत. उद्या यांच्या घरी कोणी मेल तरी दारावर कुत्रं जायचं नाही." अशी भविष्यवाणीही केल्याचे माझ्या कानावर आले. यथावकाश जाधव सरांचा संसार बहरला. त्यांच्या संसार वेलीवर अजून एक फुल फुलले म्हणजे त्यांच्या नवीन पत्नीला एक मुलगा झाला. नंतर दोन्ही मुलांना घेऊन बस स्टॉप वर शाळेच्या बसची वाट पाहताना अनेकदा मी त्यांच्या नूतन पत्नीला पाहिलं होतं.
त्या सुमारास पाचवा वेतन आयोग लागू झाल्याने मी जरा स्वतःचं घर घ्यावं असा विचार करू लागले होते . आमच्या ज्युनियर कॉलेजातील एक प्राध्यापक कुठल्याही स्वार्थाशिवाय इतरांना घर प्लॉट शेती प्रॉपर्टी घेण्यासाठी मदत करायचे. मी आत्ता जेथे राहते आहे तेही घर त्यांनीच मला बघून दिलेलं आहे. आमच्या कॉलेजतील बहुतेक जणांची घर त्यांच्यामुळे झालीत. तर हे गृहस्थ मला एका रो हाऊसच्या कॉलनीत घेऊन गेले. फक्त दहा टुमदार रो हाऊसची ती कॉलनी होती. दहाव्या नंबरचं रो हाऊस रिकामं होतं. जागा अगदी मोक्याची आणि अत्यंत प्रतिष्ठित वस्तीत होती .मी ते घर घेण्याचा विचार करत असताना ते सर म्हणाले
"अहो येथील पहिल्या नंबरचं रो हाऊस आपल्या कॉलेजातील जाधव सरांनी घेतलं आहे. यां ना आपण बघूया. अजून ते रहायला आलेले नाहीत. पण किती हौशनी सजवत आहेत ते नवं घर ..पहा तरी !"
मी निमुटपणे त्या रो हाउसमधे शिरले. कोरी करकरीत वास्तु, सारीकडे रंगाचा वास, स्वयंपाक घरामध्ये हौसेने केलेल्या ग्रॅनाईटच्या ओट्यामागे फळांच्या चित्राच्या टाइल्स बसवलेल्या. संगमरवरी जीन्याने वरती गेल्यावर ती मास्टर्स बेडरूम. तेथील नु कताच तयार झालेला मोठ्ठा लाकडी बेड, वॉडरोब्स. बेडच्या मागेच अगदी अर्धी भिंत व्यापून टाकणारे जाधवांचे आपल्या नवपरिणीत पत्नीसहचे हसरे पोट्रेट. मी कधीही न पाहिलेल्या आणि जळून तडफडून मरून गेलेल्या जाधव सरांच्या प्रथम पत्नीच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं. जणू कधीच काही घडलंच नाही इतक्या आनंदाने राजा राणीचा नवा कोरा संसार सजवला जात होता. मी एवढेच म्हटलं ,
"सर मला नको इथे घर .कॉलेजमधील कोणी आसपास रहात नसेल अशा ठीकाणी मला शोधून द्या घर ! "
कितीतरी वर्ष या घटनेला उलटून गेली आहेत. तरी प्रत्येक एक मे ला मला हे सारं आठवतं आणि या घटनेबद्दल माझ्यासकट कोणीही ब्र न उच्चारता किती आनंदाने या बायकोचा खून करणाऱ्या माणसाला आपल्यात आपल्या स्वार्थासाठी सामावून घेतलं आहे याबद्दल शरम वाटते.
(इथे नावं काल्पनिक वापरली असली तरीही यातील व्यक्ती, घटना आणि वास्तव यात काही साम्य आढळल्यास अजिबात योगायोग समजू नये )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा