शुक्रवार, १६ मे, २०२५

1904. घालमेल

आज तब्बल दोन महिन्यांनी office ला जायचं होतं. दवाखान्यात तब्बल एक महिना अन घरी विश्रांतीसाठी एक महीना काढल्यानंतर आजपासुन परत कामावर जायचं होतं. दवाखान्याची काही बिलं जमा करायची होती म्हणून फाईल उघडली तशी एक चिठ्ठी खाली पडली. त्यात लिहिलं होतं. 
"बाळा, जगातली कुठलीच आई तिच्या लेकरांना कधीच विसरत नसते" "काळजी घे". 
अंगावर सरसरून काटा आला. आईला तर लिहायला अन वाचायला येत न्हवतं मग अशी चिठ्ठी कोणी अन का ठेवली असेल. काहीच समजेना क्षणाक्षणाला मनाची घालमेल वाढायला लागली. अन मन अचानक सहा महिने मागं गेलं. गेल्यावर्षी वडीलांचं निधन झाल्यामुळे गावी आई एकटीच असायची तिलाही एकटं एकटं नको वाटायला अन आम्हालाही मुलांकडे पहायला तिची मदत होईल असं वाटलं कारण आम्ही दोघेही नोकरीला जायचो. 
खुप विनंत्या केल्यानं तिची इच्छा नसताना ती इकडे शहरात यायला तयार झाली. ती म्हणायची बाळा मला नाही जमणार शहरात नाही करमणार पण माझ्या हट्टापुढे शेवटी ती तयार झाली. सुरुवातीचे काही दिवस अगदी उत्तम गेले पण नंतर बायकोच्या कुरबुरीमुळं घरातलं वातावरण बिघडायला लागलं. कधी मुलांवरून तर कधी आईच्या सवयीमुळे बायको तिच्यावर कधी चिडचिड तर कधी ओरडुही लागली. सुरूवातीला मी बायकोला सांगायचो अगं जाऊदे ती गावावरुन आलिय वेळ लागेल इथं जमवून घ्यायला जरा समजून घे. 
पण गावच्या मातीशी जुळलेली तिची नाळ इथं माञ जुळेनाशी झाली. सुरूवातीला गप्प बसणारा मी नंतर बायकोच्या आहारी गेलो अन नंतर मीही आईवर किरकोळ गोष्टींवरुनही ओरडू लागलो. कधीकधी इतकं रागवू लागलो की बिचारी उपाशीच झोपून जायची अन मी दगडाच्या काळजासारखा नुसतं बघत रहायचो. 
तो दिवस मला चांगलाच आठवतोय. बायकोचा वाढदिवस होता म्हणून आम्ही बाहेरून जेवन मागवलेलं. आईकडुन चुकून भाजीचं भांडं सांडलं अन थोडी भाजी सांडली तसा बायकोचा संयम सुटला. 
"तुम्हाला येतच नाही तर हातच लावता कशाला ह्याव त्याव. खुप बडबड केली तिनं थोडा मीही बोललो तशी ती म्हणाली "बाळा मुद्दाम नाही सांडलं रे धक्का लागला रे". पण मी तिचं काहीही न ऎकता नुसतं तिला ओरडत राहिलो. ती जेवायला न बसता तिच्या खोलीमध्ये गेली आम्हीही जेवलो अन झोपी गेलो. 
पावसाचे दिवस होते अचानक अंगावर वाऱ्याची झुळूक आली तशी जाग आली बघतो तर दार उघडं दिसलं अरेच्चा दरवाजा उघडा कसा काय राहिला बाहेरचा सेफ्टी दरवाजा माञ लावलेला. दरवाजा लावताना अचानक पायाखाली काहीतरी जाणवलं वाकून नीट पाहिलं तर ती आईची कमरेला लावायची पैशाची पिशवी होती पण ही इथं कशी काय. असा विचार करत असतानाच आईच्या खोलीचा दरवाजाही उघडा दिसला म्हणून पुढे होऊन आई आई म्हणून हाका मारल्या पण आतुन काहीच उत्तर आलं नाही म्हणून आत डोकावलं तर खोलीत आई न्हवतीच. सगळं घर पालथं घातलं कुठेच दिसेना. अचानक लक्ष तिच्या कपड्यांच्या ट्रंकेकडं गेलं जी उघडीच होती पण त्यात आईचं कसलच साहित्य न्हवतं. 
अचानक काळजात धस्स झालं आई घर सोडून तर गेली नाही ना. तसाच पळत बाहेर आलो अगदी चौकापर्यंत बघून आलो पण कुठवर दिसली नाही मग जड पावलांनी तसाच परत फिरलो. आज येईल उद्या येईल या आशेवर वाट बघत राहिलो पै पाहुण्यांना निरोप पाठवले अन शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नेहमीप्रमानं कळवू असं उत्तर घेऊन घरी आलो. 
हळूहळू जसे दिवस पुढे सरकू लागले तसं जाणवायला लागलं कि उगीच आपण बोललो आईला इतके दिवस बायको बोलायची अन मग आपणही. स्वतःला स्वतःची लाज वाटायला लागली. दिवसां मागून दिवस जाऊ लागले. मी हि नेहमींप्रमाणं ऑफिस ला जाऊ लागलो. 
एक दिवस अचानक माझी तब्बेत बिघडली अचानक पोटात खूप दुखायला लागलं. काहीच समजेना काय होतंय शेजाऱ्यांनी कसबसं दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या अन सांगितलं कि माझ्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेतं होईल इतक्या लवकर त्या बदलाव्या लागतील याला काही पर्याय नाही. खर्च खूप आहेच पण सर्वात महत्वाचं किडनी दाता भेटला पाहिजे तरच आम्ही तुला वाचवू शकतो. 
जाहिराती दिल्या गेल्या पै पाहुण्यांना निरोप पाठवले. जे जे करता येईल ते सगळं करत राहिलो. आठ दिवस पंधरा दिवस गेले. जवळपास महिना व्हायला आला पण कोणी किडनी दाता मिळेनाच. सगळं हवालदिल झालं अगदी. कुणी कुणाचं नसतं नसतात नातेवाईकही आपले त्यावेळी माञ जाणवलच. आता मात्र मला समोर मरण दिसू लागलं. अन ज्या आईला आपण त्रास दिला अन ज्यामुळं ती घर सोडून गेली त्या आईचा तर हा शाप नाही ना सारखं असं वाटायला लागलं. अचानक डोळ्यांसमोर अंधार भरून आला. अन काय समजायच्या आताच मला चक्कर आली अन माझी शुद्ध हरपली. 
जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला माझं शरीर जरा जाड वाटत होतं. नीट पाहिलं तर माझं ऑपेरेशन झालेलं होतं. काहीच समजेना कास श्यक्य झालं नेमके डॉक्टर राऊंडला आलेले त्यांना विचारण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात त्यांनी बोटानंच खुणावलं. बोलू नको नंतर सांगतो सगळं म्हणाले. एक आठ दिवसांनी जरा बरं वाटायला लागल्यावर डॉक्टरांनी डिस्चार्ज करायचं ठरवलं. म्हणून बिल देण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर आता तरी मला सांगतात का मला कोणी किडनी दिली ते ? डॉक्टर म्हणाले समजेल तुला नंतर कधीतरी आता तू बारा झाल्यास हे महात्वाचं. जा अन काळजी घ. डॉक्टर सांगा ना प्लीज प्लीज.... नो सॉरी त्यांचं उत्तर. मग मात्र त्यांना धन्यवाद देऊन मी घरी आलो. पण रोज खिडकीतून बाहेर निर्विकारपणे बघताना मात्र एक प्रश्न मला रोज छळायचा मला किडनी देणारा माणूस कोण असेल अन मला डॉक्टरांनी त्याच नाव का नाही सांगितलं.... कोण असेल ती व्यक्ती.... त्या व्यक्तीनंच नाव न सांगण्याची अट घातली असेल कि काय.... असे अनेक प्रश्न मनात वादळे उठवीत राहिले. 
सगळं चित्र डोळ्यांसमोरून जाताना अचानक भानावर आलो ते हातातल्या काकडावरल्या ओळींमुळे.... "बाळा जगातली कुठलीच आई तिच्या लेकरांना कधीच विसरत नसते, काळजी घे". डोळ्यातून खळ्ळकन पाणी आलं. पडलेले अश्रू त्या ओळींवर पडले अन त्या ओळीहि थोड्या धूसर झाल्या जशी आई माझ्या आयुष्यातून अचानक धूसर झाली. दुसऱ्याच क्षणाला डॉक्टरांना फोने केला डॉक्टरांनी फोन उचलताच फक्त "तुझ्या आईनंच तुला वाचवलंय" एवढच वाक्य उच्चारलं अन क्षणात सगळं अवसान गळालं अन क्षणात गुढग्यांवर बसलो. डॉक्टर ती कुठय.... अन ती चिठठी कुणी लिहिलीय तिला तर लिहिता वाचता येत न्हवतं. मग तो कागद कसा आला फाईल मध्ये. माझा प्रश्न. अरे तीनच कुणाकडून तरी लिहून आणलेला तुझं कळालं अन तुला डोळे भरून पाहता येईल अन तुला अजून खूप जगता यावं म्हणून धावत आलेली रे. माझं मेलीच आयुष्यच आता असं किती उरलंय असं म्हणत होती. तीनच नाव न सांगण्याच्या अटीवर तुला किडनी दिली. अन जाताना तुला डोळे भरून पाहताना तिच्या डोळ्यातले ओघळलेले अश्रूही तिनं तिच्या ओंजळीत अलगद झेलले अन ती जी निघून गेली ती आम्हालाही दिसली नाही. 
आई… आई.... एक आर्त किंकाळी कधी निघाली मलाही कळलं नाही डॉक्टर हॅलो हॅलो करत राहिले अन फोन कानापासून कधीच दूर पडलेला. आई कुठं गेलीस तू ? आई आई कुठय तू ? आई ये ना परत. तिच्या जाण्याची घालमेल मनाला खाऊन गेली अगदी. कपाटावर समोरच पडलेल्या तिचा पैश्याच्या पिशिवीकडे पाहताना अजूनच भरून आलं. ती असताना मला तीच महत्व नाही समजलं. ती गेली परत आली अन परत न येण्यासाठी जी गेली ती पुन्हा कधीही परतली नाही. . मी मात्र तिच्या येण्याच्या वाटेवर आस लाऊन बसलोय रोज तिच्या पिशवीकडे पाहून तिला आठवतो. आयुष्याची घालमेल होतेय.... तिच्या आयुष्याची किती घालमेल झाली असेल.... 
देवा माझ्या आईला परत पाठव माझी घालमेल संपव एकदाची. एकदा मला तिला पाहू दे तिची माफी मागू दे. रोज देवाला मागणं मागतोय पण आई नावाचं पान नात्यांच्या वादळात कुठं हरवलं ते अजूनही कळलं नाही . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...