मुंबईहून ठाण्याला जाणारी लोकल सुरू झाली . गर्दी फारशी नव्हतीच, चक्क विन्डो सीट मिळाली म्हणजे बघा ना. मी छान निवांत खिडकीबाहेर बघत होतो.
तेवढ्यात एक उंच, रुबाबदार, रुंद खांद्यांचा तरुण माझ्या शेजारी येऊन बसला. चेहऱ्यावर टवटवीत तेज होतं, पण तरीही तो शांत होता. अगदी स्थिर.
काही न बोलताही त्याच्या उपस्थितीत काहीतरी वेगळं जाणवत होतं.
एक सुसंस्कृत, सुसंवादू शांतता. एक आकर्षण, जे शब्दांमधून नव्हे, तर अस्तित्वातून जाणवत होतं. आणखीन एक गोष्ट मी मार्क केली होती, सुरवाती पासून तो ताठ बसला होता, अगदी 90 औंश मोजून घ्यावेत असा.
अचानक त्याचा फोन वाजला.
"मी तास-दीड तासात पोहोचतोय. साडेसहा वाजेपर्यंत घरी असेन. साडेआठला विवा सोबत जेवायला जाईन . आणि शार्प १०:३० ला मला बाहेर पडायचंय. सगळ्यांनी वेळेचं काटेकोर पालन करावं. आय एम सो सॉरी – यावेळी एक्स्ट्रा वेळ नाही."
शब्द स्पष्ट, आदेशात्मक. संवाद संक्षिप्त आणि ठाम.
"ओके ओके, ओव्हर अँड आऊट."
मी चकीत झालो… मोबाईलवर असा संवाद कोण करतो?
मी नकळत विचारलं,
"तुम्ही…?"
त्याने शांतपणे उत्तर दिलं,
"मी निरंजन. १६ बटालियन. काश्मीरला अर्जंट पोस्टिंग आहे. उद्या सकाळी रिपोर्टिंग. फक्त दोन-तीन तास मिळाले भेटीसाठी, म्हणून ठाण्याला आई आणि बायकोला भेटायला चाललोय."
त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला. काय बोलायचे कळलंच नाही.
मी काही न बोलता उठलो आणि त्याला खिडकीजवळ बसायला सांगितलं.
मग गप्पा चालू झाल्या. रेडिओ टेक्निशिअन आहे, एवढंच बोलला. किस्से आणि गोष्टींचे भांडार होते निरंजन म्हणजे.
ठाणा स्टेशन जवळ आले तेव्हा फ्रेंड्स? असं म्हणून त्याने हसत हसत हात पुढे केला. माझा अर्थात तो बहुमान होता.
एवढ्या कमी वेळात मैत्री केलीस, कसं काय जमतं तुम्हा लोकांना? मी सहज विचारलं.
"कारण आमचं आयुष्य इतकं अस्थिर आहे, की कधी काय होईल सांगता येत नाही. आमच्याकडे शत्रुत्व करायलाही वेळ नाही - मैत्रीसाठी वेळ दवडत बसायचा का?"
त्या एका वाक्यात त्याने आयुष्याचं सार सांगितलं.
गंभीरपणा आणि साधेपणा यांचा इतका सुंदर संगम मी फार कमी लोकांमध्ये पाहिलाय.
त्याला घरी न्यायची खूप इच्छा होती.
"एका कॉफीसाठी तरी ये. आणि लगेच निघ "
तो हसला.
"माझं शेड्युल ऐकलंच आहेस ना? तरीही? "
मी गप्प झालो. तोच पुढे म्हणाला, चल नाराज नको होऊस, खाली उतरलो कि कॉफ़ी पिऊ आणि मग मी पुढे जातो.
स्टेशनला लागून असलेले कुठले तरी त्यातल्या त्यात पॉश वगैरे असलेले हॉटेल मीच निवडलं. त्याच्या पोस्टिंगबद्दल, लढाईबद्दल, काश्मीरबद्दल. कितीतरी प्रश्न मी विचारत होतो. सतत, एका मागून एक.
तो प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे, थोड्या मोजक्या शब्दात हसून उत्तर देत राहिला.
मग जेव्हा बिल मागितलं, तेव्हा अजून एक सुखद धक्का मिळाला.
वेटरने नम्र पणे सांगितलं -
"या साहेबांकडून पैसे नकोत. हे आमच्यासाठी खूप करतात. ह्यांच्या कडून पैसे घेणे पाप. थोडं पुण्य आम्ही पण कमावतो ."
त्या क्षणी निरंजनचा चेहरा पाहण्यासारखा होता.
त्या एक वाक्याने त्याच्या चेहऱ्यावर मान आणि नम्रता दोन्ही उमटली होती.
त्याच्या डोळ्यात एक चमक होती. अभिमानाची, पण त्याचसोबत एक लपवलेलं दु:खही.
तो उठला.
"लेट्स गो," म्हणाला.
वेटर ला हात मिळवला.
बाहेर आलो. निरंजन तू निघ - मीच भरल्या आवाजात म्हणालो.
खरी गोष्ट अशी होती कि त्याच्या कडे पाठ करून जायची इच्छा होत नव्हती.
त्याला कदाचित कळलं असावं.
"लेट्स मूव्ह अहेड," असं म्हणत जायला लागला.
मी त्याच्याकडे पाहत राहिलो. शून्य नजरेने आणि तुटक्या काळजाने
अचानक काहीतरी आठवलं. "निरंजन! थांब!"
मी मागून धावत गेलो.
"तुझ्यासाठी काही करू शकत नाही, पण हे घे. हे आमच्या कुलदेवाचा अंगारा. ही आमची श्रद्धा. तुझ्याकडं ठेव. आमचं काही तरी तुझ्याबरोबर जावं वाटतं."
त्याने काही न बोलता ती माझ्या पाकिटातून काढलेली बारीकशी पुडी, कपाळाला लावली, आणि म्हणाला —
"आज तू माझ्यासाठी प्रार्थना करतोयस... हीच प्रार्थना आमच्या अख्या युनिटसाठी कर. परवा माझ्या युनिट मधला एक जवान शाहिद झाला.
प्रार्थना… कदाचित आम्हाला अधिक बळ देईल."
...आणि ‘जय हिंद!’ म्हणत, वेगाने, मागे वळून न बघता वेगाने पावलं टाकीत निघून गेला.
धाडस म्हणजे काय असतं,
सेवा म्हणजे काय असते,
देशासाठी झिजणं म्हणजे काय असतं,
ते प्रत्यक्ष अनुभवलं. हा ठसा ठेवून स्वतःची छाप सोडून, निरंजन फक्त चार-पाच तासासाठी आई आणि बायकोच्याभेटीला गेला होता. धन्य तो निरंजन आणि त्यासारखे लाखो जवान.
पण तो गेलेला नाही... तो कायम एक आठवण सोडून गेला आहे.
"ओव्हर अँड आऊट… आणि जय हिंद!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा