गुरुवार, १ मे, २०२५

1887. पहलगाम हल्ला

 काल सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना - शहीद फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्या आई, अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनच्या विश्वस्त, जीत एरोस्पेस इंन्स्टिट्यूटच्या फॉर्मर डायरेक्टर - कविता गाडगीळ यांचं मूळ इंग्रजी पत्र वाचायला मिळालं. 
जे जे चांगलं वाचायला मिळेल ते मराठीत असावं आणि आपण ते करावं या भावनेतून या पत्राचा अनुवाद केला आहे. पत्र लांबलचक आहे पण महत्त्वाचं आहे. वाचा, शेअर करा, विचार करा. 
फोटो - कविता गाडगीळ यांच्या मूळ पत्रातून साभार. 
---
माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार ! 
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता... पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.  कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही. पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं. 
२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली. त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय. 
एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भिषण असते. भुतकाळातली सुखदुःख, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी. ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत. 
      मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२ चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.  आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या किती तरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्ध आम्ही दोघांनी एकत्र पाहिली. १९७१ चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्स मधून बघितलेला नाही तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय. 
     ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे. युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच. युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.  युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहाणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहाणं. परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला किती तरी वर्ष जावी लागतात. किती तरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो. 
     अण्वस्त्र सज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भिषणता, गांभिर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत. तुम्हाला माहितीये? ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे.
       उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला? सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.  आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी. पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे. 
       पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही तर सहानुभूतीने नेतृत्व कराल अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. 
खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज ! 
आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते. 
बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.  पण काश्मीरकडे पाठ फिरवणं हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची.  दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता तर त्यांना बळ देत असता हे लक्षात असुदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे. 
      काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमिन हवी, निसर्ग हवा पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?  अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते हा इतिहास आहे. १९४७ ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का? 
     अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही. काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरुन टाका. त्यांची सफरचंद, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊदेत. धरणं, पूल उभे राहु देत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या !
ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. 
युद्धापेक्षा हे बरंच नाही का? 
काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र… 
काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील ! बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू. पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.  काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा. 
 लक्षात ठेवा, युद्ध सुरु करणं सोपं पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत. न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका. 
निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.  
माझ्या बोलण्याचा विचार करा.
दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी

अभिजितची आई 
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ! 
 
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ 
अनुवाद - भक्ती बिसुरे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...