“आज तरी धुवून देशील का माझे" सासुबाई वैतागाने तिला विचारतात. वय वर्ष ८०. हार्ट प्रॉब्लेम, दम लागणं, धाप लागणं, रात्रीची जागरणं, झोप नसल्यानं अजूनच तब्येत खराब, पोट बिघडणं आणि मग या सगळ्याला वैतागून त्यांची चिडचिड... तिला साहवत नाही, बघवत नाही. पण सकाळी सगळे आपापल्या कामाला निघुन गेले की त्यांच्या या अवस्थेत तीच काय ती त्यांच्या अखंड सहवासात! कुठे बाहेर येणंजाणं नाही, कोणाशी फारसा संपर्क नाही कि काही मनोरंजन नाही. नुकत्याच आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांचा धास्तावलेला चेहरा पहावत नव्हता. हॉस्पिटलमध्ये तर नाकातोंडात आणि हातांमध्ये लावलेल्या असंख्य नळ्या आणि विविध मशिन्सचे भेसूर भासणारे आवाज अशा अवस्थेत त्यांना पाहून तिचं मन भरून येत असे. 'देव आहे कि नाही जगात आणि असेल तर या वेळेस तो कुठे जातो?'
हॉस्पिटलमधून आल्यापासून ती फक्त स्पंजिंग करून देत होती त्यांना. त्यांच्या अशक्त देहाला तेवढंच मानवत होतं. पण आता त्या केस धुवून दे म्हणून हट्ट करत करतायत. ‘बाहेर खूप थंडी पडलीय, काल तर आभाळंच भरून आलं होतं अचानक.. कसं न्हायला घालू यांना?’ ती द्विधा मन:स्थितीत !
या सगळ्यांत तिची तक्रार कुठेच नसते. त्या लवकर बऱ्या होतील हा आशावाद सतत बाळगून ती औषधे आणि पथ्यपाणी सांभाळत असते. पण त्रास होतो तो बाहेरच्यांचा! ‘तू असं का वागत नाहीस? तसं कशाला करतेस? त्यांना हे का देत नाहीस? त्यांना हे आवडत नसणार!’ असंख्य सल्ले, चौकशा आणि तिच्या वागण्याची मिमांसा! आपुलकीने मदत करणारे, पाठीवर हात ठेवणारे फार थोडे. बाकी बहुसंख्य लोक सेवा करणार्यांना बिनडोक समजणारे! आपुलकीने मदत न करता किंवा स्वत:च्या रुटीनमध्ये जरासुद्धा अडचण न येऊ देता, लांबूनच जेंव्हा लोक तिच्या वागण्यावर ताशेरे ओढतात तेंव्हा तिला हे सगळं सोडून दूर कुठेतरी पळून जावसं वाटतं! ‘देव अशा वेळेस मला सोडून कुठे जातो?’ ती निराश होते.
“आज मला भजी करून दे .. मिरची घालून कर चांगल्या तिखट” सासुबाई पलंगावर पडल्यापडल्या म्हणतात. तिला त्यानंतर होणारे त्यांचे हाल माहिती असतात. “ अहो आई, पण डॉक्टरांनी तुम्हाला तेलकट, तिखट खायचं नाही म्हणून सांगितलंय ना, त्रास होतो तुम्हाला. थोडं बरं वाटलं कि देईन करुन.” ती समजावते पण त्या चिडतात, वैतागतात. स्वत:शीच काहीतरी पुटपुटत रहातात. तिला खूप वाईट वाटतं. रोज सकाळी जॉगिंगला जाणारी, स्वतःचा व्यवसाय चालवणारी, कलाकार मनाची हरहुन्नरी ती आज सगळं काही सोडून घरात बसलीय. तिच्या मनात एकदम दु:ख आणि स्वतःबद्दल कीव दाटून येते. डोळ्यात पाणी येतं. त्या तिच्यावर रुसतात. ती देवावर रुसते.
बेल वाजते. सकाळचे साडेआठ वाजलेत. शबिना खालमानेनं येते. भांडी घासायला सुरुवात करते. चेहरा सुजलेला. “आज परत मारलं का गं त्यानं दारू पिऊन? सोडून दे त्याला. नाहीतरी घर तूच चालवतेस.” ती कळवळून शबिनाला म्हणते. शबिना भांडी घासता घासता कसनुसं हसते. तीन मुलींची आई शबिना. फक्त २१ वर्षांची ! अतिशय स्वच्छ आणि निरागस मनाची ! हिच्या नशिबात असा नवरा का असावा? रोज शबिनाला पाहिलं कि मन मायेनं भरून येतं. हिचा अल्लाह हिला का वाचवत नाही? हिचा किती विश्वास आहे त्याच्यावर !
पुन्हा बेल वाजली म्हणून बघते तर तिची मैत्रीण प्रिया दारात ! ” अगं, इतक्या सकाळी सकाळी कशी काय? ये ये, किती दिवसांनी दिसतीयेस !”
“ म्हटलं भेटावं तुला आज. खूप दिवसापासून आठवण येत होती. कशी आहेस? किती सुकलाय गं चेहरा ! ए. . आता एक काम कर. हे हेडफोन्स लाव कानात, शूज घाल आणि मस्त फिरून ये अर्धा पाऊण तास कुठेतरी. मी बसते काकूच्या जवळ !
“काही तरी काय अगं... बैस तू .. मी मस्त कॉफी ..”
“आजिबात नाही.. तू नीघ आधी” प्रिया तिला घरातून जवळ जवळ हाकलूनच देते.
किती दिवसांनी ती अशी निवांत घराबाहेर पडलीय. सगळी जुनी ओळखीची झाडं आता मोठी दिसायला लागलीयेत. तिच्याकडे पाहून ओळखीचं हसतायत. इटुकली फुलं डोकी उंच करुन तिच्याकडे बघतायत. कुंपणावरचा सरडा स्तब्ध होऊन तिच्याकडे आश्चर्याने पाहतोय. चिमण्यांचा चिवचिवाट किती सुखद वाटतोय कानाला ! थोड्यावेळ निवांत चालून मग ती एका बाकावर बसते. आभाळ भरून आलंय ! किती सुंदर वातावरण आहे ! ती हेडफोन्स कानाला लावते.
‘अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम है
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है “
जगजीत तिच्या कानांतून मनात आणि मनातून डोळ्यांत झिरपत जातो. सासूबाईंची आठवण येते. त्यांना केवढी हौस फिरायची, पानाफुलांची..! ती उठते. झाडाने अंगावर इवल्या इवल्या फुलांची बरसात केलेली असते. किती प्रेम करतो निसर्ग आपल्यावर. ती स्वतःशीच हसते.
प्रिया उत्साहानं दार उघडते, “ व्वा! आता बघ कशी फ्रेश दिसतीयेस.. भारी वाटलं ना? असं म्हणत तिला मिठीत घेते. “चल निघते मी, कॉफी घ्यायला परत येईन उद्या! काळजी घे गं स्वतःची !” तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे ती भारावून पाहत रहाते. पाठमोऱ्या प्रियाकडे पहाताना तिला देवाचा भास होतो !
ती प्रसन्न मनाने स्वयंपाकघरात जाते. कांदा चिरते. भजीचं पीठ भिजवते. चहाचं आधण ठेवते. शबिनाला चहा-भजी देते. तिचे निरागस डोळे आनंदानं चमकतात. कालपासून हिने काहीही खाल्लेलं नसणार, हे तिला माहिती असतं. ती गरमगरम भजींची प्लेट सासूबाईंच्या हातात देते. त्या उत्साहाने उठून बसतात. त्यांना अंगारा लावत ती म्हणते,” आई, पट्कन भजी खाऊन चहा घ्या हं ! आज मी तुम्हाला छान तेल लावून न्हायला घालणार आहे.” आणि काय आश्चर्य ! सासूबाईंच्या डोळ्यांतून देव चक्कं तिच्याकडे पाहून हसतो !
-निरुपमा महाजन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा