एका लहानशा घरासमोर एक टेबल टाकलं होतं. डुगडुगणारं टेबल त्याच्या एका पायाखाली दगड लावून स्थिर केलं होतं. त्यावर एक कागद पुठ्याच्या आधाराने उभा केला होता.
त्या कागदावर “लेमोनेड फॅार स्माईल्स” असं लिहलं होतं. खाली “आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” असं वाक्य लिहलं होतं. दहा बारा वर्षाचं मुल फुलांचा गुच्छ जसा बनवेल तसे रानफुलांचे काही गुच्छ विकायला ठेवले होते. बारा वर्षांची तरतरीत मुलगी जाणाऱ्या येणाऱ्यांना हाक मारून लेमोनेड हवंय का, फुलं हवी का विचारत होती.
शीला रोज कामाला जाताना ही मुलगी बघायची. का कोण जाणे पण त्या मुलीशी बोलावं, लेमोनेड घ्यावं असं नेहमी वाटायचं. एक दिवस ती लेमोनेड स्टॅंड जवळ थांबली.
“कुणी केलं ग लेमोनेड? छान झालंय अगदी!”
“मी केलं. आजीनं जसं शिकवलय अगदी तस्सं करते मी!आजीचं लेमोनेड सर्वांना खूप आवडतं!” तिच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता.
“आणि फुलांचे गुच्छ?”
“मागच्या अंगणात रानफुलं येतात त्याचे हे मी गुच्छ बनवलेत!”कपाळावरच्या बटा मागे सारत ती बोलली.
“नाव काय तुझं? तुझे बाबा काय करतात?”
“माया...आई बाबा गावी गेलेत. मी शाळेला सुट्टी लागताच हा बिझनेस सुरू केलाय.”
शीला तो छोटासा बिझनेस कौतुकाने बघत होती.
“सध्या मी एखादी हातगाडी मिळवायला बघतेय. ती मिळाली तर कोपऱ्यावरच्या स्टार मार्केटमध्ये जाऊन मला लेमोनेड विकता येईल!”
“घरात कोण कोण आहे?” शीलाचं कुतूहल वाढलं होतं.
“आजी आहे. लहान भाऊ आहे. आजी ८० वर्षांची आहे.भाऊ सहा वर्षाचा आहे. तो लिंबं धुवून देतो आणि बाकीची लहान लहान कामं करतो! मी लेमोनेड बनवते..बिझनेस सध्या जोरात नाहीये पण एकदा लेमोनेड प्यायलं की माणूस नक्की परत येईल याची मला खात्री आहे!
शीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. पाच लेमोनेडवर एक गुच्छ फुकट आहे म्हणाली. शीलाला भरून आलं. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल मायाने उभं केलं होते. आजीची रेसिपी, सुंदर नाव, उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच वर एक गुच्छ फुकट! कुठं शिकली हे? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते.
कामावर लोकांना लेमोनेड आवडलं. पण त्यापेक्षा बारा वर्षांच्या मुलीची धडपड बघून त्यांना फार कौतुक वाटलं. दुसरे दिवशी एकदम गिऱ्हाईक वाढलं होतं. मायाची धावपळ बघून आजी व भाऊ मदतीला आले होते. मायाच्या लेमोनेड वर वर्तमानपत्रात आलेला सुंदर लेख तिला कुणीतरी दाखवला! काल आलेली बाई पत्रकार होती हे मायाला कळलं. आता गिऱ्हाईक झपाट्याने वाढू लागले. एकांनी हातगाडी दिली. आता स्टार मार्केटमधे “लेमोनेड फॅार स्माईल्स” ही गाडी शोधत लोक येऊ लागले. कोण आहे ही माया यांचं कुतूहल तर होतचं.
उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू होणार होती. एवढ्या जोरात चाललेल्या लेमोनेडच्या बिझनेसचं काय करायचं या चिंतेत माया होती. बराच विचार करून ती शीलाला भेटायला गेली.
“मॅडम, अल्फा कोल्ड-ड्रिंक कंपनी आजीची रेसिपी वापरून केलेलं आमचं लेमोनेड बाटल्यात भरून विकेल का? तुम्ही त्यांना फोन कराल का? माझी शाळा सुरू होईल आता. खरं म्हणजे आजीची खास रेसिपी मात्र कुणाला द्यावीशी वाटत नाही पण मला शाळा व बिझनेस मला कसा जमणार?”
आपण एका उत्कृष्ट बिझनेस वुमन कडे बघत आहोत हे शीलाला परत जाणवलं.
“तुझे आई बाबा परत आले असले तर ते चालवू शकतील का तुझा बिझनेस?” माया काही बोलली नाही.
शीला मायाच्या आजीला भेटायला गेली.
“तुमचा मुलगा- सून “लेमोनेड फॅार स्माईल्स” चालवतील का? कधी परत येणार आहेत ते?”
आजी हळू आवाजात म्हणाली, “नाही हो ! गेलेली माणसं कधी परत येतात का? ते गेले असं माया म्हणूच देत नाही. दुसऱ्या गावी आहेत म्हणते. माणसं जात नसतात. वेगळ्या रूपात ती आपल्या जवळ असतात असं काहीतरी म्हणते. मुलांच्या तोंडून देव बोलतो बघा ! फार गुणी आहे बघा मुलगी ! मी काय आज आहे उद्या नाही ! केव्हा बोलावणं येईल सांगता येत नाही. मुलांची फार काळजी वाटते.” आजीनं हुंदका दिला.
शीलाचे डोळे भरून आले होते. ”आजी, तू काळजी करू नको. परमेश्वराने मला मुलबाळ का दिलं नाही त्याचं कारण मला आज कळलं. मी तुझ्या मुलांना दत्तक घेईन ! किंबहुना ही माझीच मुलं आहेत म्हणून तर एवढी ओढ वाटत आली आहे. नाहीतर का वाटेल ओढ कुणाबद्दल?“ आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते..
शीलाने नवा लेख लिहला. “मायाची शाळा सुरू झाली आहे. आपल्याला उत्तम लेमोनेड देणारे “लेमोनेड फॅार स्माईल्स”सकाळी आम्ही आमच्या ॲाफिसच्या लॅाबीमधून चालू ठेवत आहोत व संध्याकाळी दोन तास माया नेहमीच्या ठिकाणी स्टार मार्केट मधे लेमोनेड विकेल.”
चार दिवसात एका रात्री आजी गेली. मुलांचे हाल होणार नाहीत याची खात्री पटताच ते शिणलेले डोळे मिटले ! शीलाने मुलांना दत्तक घेण्याचे पेपर्स भरून दिले होते. मुलांना दु:खातही सुख लाभले होतं. परत एकदा आई मिळाली होती.
लेमोनेड फॅार स्माईल्सने शीला व मुलांच्या चेहऱ्यावर खरेखुरे स्माईल आणलं होतं. आजीचं लेमोनेड कित्येक आयुष्यातील गोडी वाढवत होतं. शीलाला तिची मुलं भेटली होती आणि गावी गेलेली मायाची आई शीलाच्या रूपात परत आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा