“काय गं कांचन? आज घरी बाबांची चौकशी करायला फोन नाही केलास तो?” नेत्रा कांचनला विचारत होती.
एकाच क्युबिकलमध्ये दोघी बसत असल्याने नेत्राच्या ते लक्षात आलं होतं. कांचन रोज साडेदहाला बाबांना ऑफिसातून फोन करायची. ‘आंघोळ झाली का?’ ‘दुसरा चहा प्यायलात का?’ ‘दरवाजा नीट लावून घ्या’ वगैरे वगैरे. कांचनची आई जाऊन जवळजवळ पाच वर्षं झाली होती. आई गेल्यापासून कांचन आपल्या भावाची व वडिलांची आईच झाली होती जणू.
बँकेत क्लार्क म्हणून लागलेली कांचन आता क्लास वन ऑफिसर होती. खरं तर तिला पाच वर्षांपूर्वी पुढचं ब्रँच मॅनेजरचं प्रमोशनही मिळालं होतं. तिची बदली नाशिकला होणार होती. त्याच वेळेस तिची आई अचानक हार्ट अटॅकने गेली होती. नाशिकला जाण्यासाठी पूर्ण तयारी, अगदी बॅगसुद्धा भरून झाली होती तिची.
नेत्राला कांचनची सर्व कहाणी माहीत होती. आई असताना कितीतरी वर्षं ती कांचनच्या लग्नाचं पहात होती. पण कुठलेतरी आडमुठे ग्रह आड येत होते नि एवढ्या हुशार, सुस्वभावी मुलीचं दिसायला चांगली असूनही जमत नव्हतं. आई गेल्यानंतर तिच्या लग्नाचे प्रयत्नही बंद झाले होते. कांचनचे वडील थोडे स्वार्थी असावेत आणि भाऊ कार्तिक स्वतःच्या विश्वात रमणारा असावा, असा नेत्राचा कयास होता. पण कांचनचं त्याच्यावरचं प्रेम पाहून नेत्राने तिला असं कधी बोलून दाखवलं नव्हतं.
नाही म्हणायला तिने कांचनाच्या मागे लग्न कर असा धोशा मात्र लावला होता. खरं तर ऑफिसातल्या सामंतनं तिला लग्नासाठी विचारलंही होतं. तिने त्याला नकार दिला होता. ह्या नकारामागे घरच्यांसाठीचा त्याग होता की त्याचं तिच्यासारखं क्लास वन नसणं नव्हतं हे तिचं तिलाच माहित होतं. नेत्रा मात्र तिला समजावून थकली होती. तरीही तिने आशा सोडली नव्हती.
पुढे कार्तिक इंजिनिअर बनून त्याला छानशी नोकरीही मिळाली होती. वर्षभरात त्याने आपली जीवनसाथीही निवडली होती. स्वतः लग्न ठरल्यावर त्याला कांचनच्या लग्नाची आठवण झाली होती. तीही बहुधा बायकोनेच करून दिली असावी. पण एव्हाना पस्तीस वर्षांच्या कांचनचा लग्नातला रसच गेला होता.
“कांचन, का लग्न करत नाहीयेस तू? जरा आजूबाजूला पहा. जो तो आपल्या सुखी संसारात रमलाय.” पूर्वी एकदा नेत्राने तिला विचारलं होतं.
“तू म्हण ‘सुखी संसार’ वगैरे. पण चक्क तडजोड आहे ती. मी पाहिलाय ना माझ्या आईबाबांचा संसार. कायम कष्ट करणारी आई आणि पत्त्यांच्या व्यसनात बुडालेले बाबा. लहानपणी रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंत त्यांची वाट बघत बसणाऱ्या आईच्या डोळ्यांतील पाणी अजून विसरता येत नाहीये मला.”
“अजूनही खेळतात का गं पत्ते?”
“छे गं! आता कसले खेळताहेत? निवृत्त झाल्यानंतर तब्येत साथ देईना, मग सोडले. नंतर मग सारखे घरात असायचे. मग प्रत्येक गोष्टीवर आईवर अवलंबून. आता शेवटी शेवटी आईला त्यांचा थोडा तरी सहवास मिळाला होता. जरा कुठे सुख-समाधान तिच्या वाट्याला येत होतं आणि तेवढ्यातच..”
“हो, माहीत आहे मला. तुमची चाळ पाडून टॉवर झाला. तुम्हाला छानपैकी वन बीएचके फ्लॅट मिळाला. आणि तुझं सर्व सेव्हिंग खर्च करून तू तो आईच्या आवडीप्रमाणे सजवून घेतलास ते. खरंच अजून थोडी वर्षं तरी आई हवी होती गं तुझी. तुझं लग्न, तुझा संसार पाहिला असता तर…”
“आलीस परत माझ्या लग्नावर? चल, हात धुवायला. लंच टाइम संपलाय आता.”
अशा प्रकारे प्रत्येक वेळेस कांचन लग्नाचा विषय उडवून लावत होती. आई असेपर्यंत ती निदान सांगून आलेले मुलगे बघत तरी होती. पण आई गेल्यापासून मात्र तिने आपल्या मनाचा तो कप्पा बहुधा पूर्ण बंद केला होता. अर्थात, घरून कोणी तिच्या लग्नाच्या बाबतीत फार उत्साही नव्हतं ही गोष्ट वेगळीच. नेत्रा कांचनच्या सर्व सुखदुःखाची साक्षीदार होती. म्हणूनच अलीकडे कार्तिकचं लग्न झाल्यापासून बदललेली कांचन तिला जाणवत होती.
कार्तिकच्या लग्नानंतर कांचनबरोबरच तिच्या वहिनीचा, गार्गीचाही हात किचनमध्ये वावरू लागला होता. एकाच घरात राहणाऱ्या दोन स्त्रियांमध्ये जर काही वादविवाद असतील तर त्याचं मोठं कारण ‘किचन’ हेच असतं हे नेत्राला चांगलंच माहीत होतं.
असाच एक दिवस ऑफिसात पार्टीचा बेत चालला होता. व्हेज किती, नॉनव्हेज किती मोजणं चालू होतं. नेत्राने कांचनचं नाव नॉनव्हेजमध्ये दिलं तेव्हा कांचननं ते बदलायला लावलं.
“काय गं ? चिकन, मटणाची एवढी भोक्ती तू आणि आज काय झालं?” नेत्राने विचारलं.
“उबग आलाय गं. हल्ली घरी जवळजवळ रोज नॉनव्हेज असतं. गार्गीला आवडतं म्हणून. तिच्याबरोबरीने घरातले सगळेच खातात. गुरुवार म्हणू नको, मंगळवार म्हणू नको, संकष्टी म्हणू नको. सारखे जिभेचे चोचले.”
“तिला सवय असेल गं माहेरी. लग्न झालं तरी पटकन सवयी बदलत नाहीत. जड जातं जरा. आणि तू कधीपासून एवढी ओरॅथोडॉक्स झालीस? तू काही देवाधर्माचं अवडंबर माजवणारी नाहीस.”
“देवाधर्मासाठी नको, पण आपल्या तब्येतीसाठी तरी आपण ही बंधनं पाळली पाहिजेत ना? रोज तेलकट, मसालेदार चांगलं आहे का तूच सांग.”
खरंच होतं कांचनचं. बाबाना बीपी, डायबेटीस आहे म्हणून ती नेहमी पौष्टिक पण चविष्ट स्वयंपाक करीत असे. सूप्स, सॅलड्स, ज्युसेस, फळं, पालेभाज्या सारं आहारात असेल ह्याची ती काळजी घेत असे.
“जाऊदे गं. समजेल तिला हळूहळू.”
“काही समजत नाही. लग्नानंतर दोघांचंही वजन चांगलं सात आठ किलोंनी वाढलं आहे. लोक कौतुक करतात. “वा! लग्न चांगलं मानवलंय हं! आणि ही दोघं खुश होतात.” कांचन चांगलीच वैतागली होती.
“जाऊदे कांचन. त्या नवराबायकोना त्यांचं काय ते बघून घेऊ दे. तू तुला आणि बाबांना काय हवं ते बनव म्हणजे प्रश्नच मिटला.” नेत्राने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
“तिथेच तर घोडं पेंड खातंय ना? आता त्या दिवशी तुमची भटांची आंबटगोड अळूची भाजी बाबांना आवडते म्हणून मुद्दाम तुझ्याकडून रेसिपि घेऊन केली. पण गार्गीने आदल्या दिवशीचं चिकन गरम केलं तर ह्यांना चिकनपुढे ती भाजी नकोशी झाली. अळू आणा, साफ करा, भाजी करा माझे कष्ट वाया गेले गं. आणि कष्टापेक्षाही जास्त मला डावललं जातंय म्हणून वाईट वाटलं गं.” कांचनचे डोळे ओलावले होते.
नेत्रालाही कांचनचं आता वाईट वाटत होतं. तिनं आई गेल्यापासून किती जपलं होतं दोघांना. वडिलांची मोठी आजारपणं रजा घेऊन काढली होती. कार्तिकच्या शिक्षणाला हातभार लावला होता, त्याच्या आवडी निवडी सांभाळल्या होत्या. त्यांच्यासाठी स्वतःचं प्रमोशन, लग्न ह्या महत्त्वाच्या गोष्टीही बाजूला ठेवल्या होत्या तिनं. आणि आता त्यांना असलेली हिची गरज संपली होती. म्हणूनच सारं बदलत होतं का?
कार्तिकचं लग्न ठरलं तेव्हा आधी खूप खुश असलेली कांचन हल्ली मात्र नाराज दिसत होती. लग्न झाल्याझाल्या पहिली कुऱ्हाड आली ती तिच्या बेडरूमवर. एकमेव बेडरूम लग्न झालेल्या भावाला खाली करून देणं आवश्यकच होतं. त्याच्या लग्नाआधी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पहायचा असतो म्हणून बाबा आणि कार्तिकला उशीर होतो म्हणून तो असे दोघेही बाहेर हॉल मध्ये झोपत असत. शिवाय सकाळी लवकर उठून कांचन बेडरूममध्ये सतारीवर रियाजही करत असे. आता ती हॉलमध्ये झोपायला लागल्यापासून बाबांना सकाळी जाग येईल म्हणून तिला रियाज सुद्धा बंद करावा लागला होता. तिचं कपाट तिला हॉल मध्ये आणावं लागलं होतं. तिचं वाचन, गाणं, सातारवादन. व्यायाम साऱ्याच्या वेळांवर बंधनं आली होती. जोडप्याला प्रायव्हसी लागते तशी एकट्या माणसालाही लागतेच ना?
बेडरूम कब्जात घेऊन झाल्यावर गार्गीने आपला मोर्चा किचनकडे वळवला होता. कार्तिक तर तिच्या ताब्यात गेलाच होता पण आता बाबांनाही सुनेचं अप्रूप वाटू लागलं होतं. ती त्यांच्या जिभेचे सारे लाड पुरवत होती ना! त्यामुळे कांचनची आहाराची बंधनं त्यांना डाचत होती. ह्या सर्व गोष्टींचा कांचनला त्रास होत होता. पण ह्यात खरं तर गार्गीची काही चूक नाही आहे हे कांचनला समजावण्याचा नेत्राने प्रयत्न केला होता.
नेत्रा तिच्या नणंदेशी जशी प्रेमाने वागते तशी गार्गी आपल्याशी का वागू शकत नाही हा प्रश्न कांचनला पडला होता. पण सातआठ दिवस माहेरपणाला आलेल्या नणंदेची सरबराई करणं वेगळं आणि आपल्या संसारात कायमस्वरुपी असलेल्या नणंदेचं मन सांभाळणं वेगळं हे कांचनला समजावणं नेत्राला अलीकडे गरजेचं वाटू लागलं होतं.
दर दहा पंधरा दिवसांनी काहीतरी व्हायचं तसं परवाही झालं. कार्तिकचा वाढदिवस म्हणून दरवर्षीप्रमाणे कांचन ऑफिसातून लवकर निघाली. जाताजाता त्याच्या आवडीचं श्रीखंड आणि बर्डीज चा केक घेऊन गेली. गेल्यागेल्या तिनं झटपट पुलाव, छोले, अळूवड्या असा सगळा कार्तिकच्या आवडीचा मेनू तयार केला. जेवायच्या वेळेस गरमगरम पुऱ्या तळायच्या ठरवून ती हॉलमध्ये टीव्हीसमोर येऊन बसली.
तेवढ्यातच बाबाही देवळातून आले म्हणून चहा बनवण्यासाठी ती उठली. मनातल्या मनात गार्गीचं आश्चर्य करत होती. नेहमी सहा वाजता येते. आता सात वाजून गेले तरी पत्ता नाही मॅडमचा. लग्नानंतरचा नवऱ्याचा पहिला वाढदिवस. सकाळी एक ऑफिसची घाई असते, पण संध्याकाळी तरी वेळेवर यायचं. नवऱ्याच्या आवडीचं काही बनवायचं. काय म्हणावं हिला?
नेहमीप्रमाणे गार्गीला नावं ठेवण्याचं काम कांचनचं मन मनापासून करत होतं. मध्येच आपण गार्गीत उगाचच खोटं काढतोय असंही तिला जाणवत होतं. पण परत काहीना काही सबब काढून आपलंच कसं बरोबर हे ती मनाला पटवत होती.
मनाचं असं आंदोलन चालू असतानाच फोन खणखणला.
“हॅलो ताई, अगं कधीपासून फोन लावतोय. नीट ठेवला नव्हता का? आणि पर्समधला मोबाईल बाहेर काढून ठेवायचा असतो म्हंटलं घरी आल्यावर. बरं, ते जाऊदे. ऐक, आज आम्हाला उशीर होईल घरी यायला. हॉटेलात जातोय आम्ही. तुम्ही दोघं जेऊन घ्या. लॅचची किल्ली आहे माझ्याकडे. तुम्ही झोपलात तरी चालेल.”
“अरे, सगळा स्वयंपाक तयार आहे पण…”
“प्लिज गं ताई, आता पण नको आणि परंतु नको,” आणि मग अगदी हलक्या आवाजात पुढे म्हणाला, “आता गार्गीच्या माहेरचे आहेत आमच्याबरोबर. नंतर बोलू आपण. चल, गुडनाईट.” कांचनच्या बोलण्याची वाटही न पहाता त्याने फोन ठेऊन दिला.
कांचन आता चांगलीच वैतागली. बाजूलाच बसलेल्या बाबांना म्हणाली, “पाहिलंत बाबा, मी एवढी दमले असतानाही खपून ह्याच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि हा हॉटेलात जेवतोय बायकोबरोबर.”
“कांचन, आता लग्न झालंय त्याचं. तो आता बायकोबरोबरच जाणार. साहजिकच आहे ते. तू त्याला आधी विचारलं होतंस का रात्रीच्या जेवणाचं?”
बाबा नेहमी त्यांची बाजू का घेतात? स्वतः कधी बायकोबरोबर गेले का? कधी फिरायला जाणं नाही. कधी सिनेमा, नाटक नाही. बायकोचा वाढदिवस तर दूरच पण पत्त्यांच्या व्यसनापायी कधी मुलांच्या वाढदिवसालाही हजर नसायचे. आणि आता नवरा-बायकोच्या नात्याच्या गोष्टी करताहेत! सून आल्यावर ह्यांची सगळी मतं बदलली? आपण इतके कष्ट घेऊन सगळं जेवण बनवलं, त्याचं ह्यांना काहीच वाटत नाही?
मन खूप आक्रन्दू लागलं तेव्हा तिने नेत्राच्या दृष्टीने विचार करायचं ठरवलं. नेत्रा नक्की म्हणाली असती, “अगं, हल्ली वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला हॉटेलात जायचीच पद्धत आहे. तू बघतेस ना ऑफिसात सर्वजण तसाच साजरा करतात वाढदिवस. तू कशाला मनाला लावून घेतेस?” आणि मग पुढे कोपरखळी मारली असती, “उद्या तू आणि सामंत तेच करणार आहात.”
सामंतचा विचार मनात आला आणि कांचनला एकदम वेगळीच जाणीव झाली. आपण आणि सामंत… ह्या वर्षी सामंतचं प्रमोशन ड्यू आहे. तोही कष्टाळू आहे. त्याला प्रमोशन मिळेलच. मग तोही आपल्यासारखा क्लास वन ऑफिसर होईल. तिच्या मनात वेगळ्या दिशेने वारे वाहू लागले.
“काय गं कांचन, तू मागे प्रमोशन नाकारलंस म्हणून आता तुला प्रमोशन देणारच नाही का तुझी बँक?” बाबा विचारत होते.
“नाही हो. देईल ना. पण परत मुंबईच्या बाहेरच होईल पोस्टिंग.”
“मग होऊ दे की. क्वार्टर्स मिळतात ना? जायचं पुढेपुढे आयुष्यात. थांबायचं नाही एका जागी.” तिचा अदमास घेत बाबा म्हणाले.
बाबांचं हे मत ऐकून कांचन अवाक झाली. मागच्या प्रमोशनच्या वेळी विरोध करणारे हेच का ते बाबा? आई गेली तेव्हा नाशिकला कुठे जाऊ दिलं ह्यांनी आपल्याला? म्हणताना म्हणाले, “बायकांची नोकरी म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर वाजवली नाही तर फेकून दिली.” पण खरं कारण तर वेगळंच होतं. तेव्हा घरात करतंसवरतं कुणी नव्हतं. स्वयंपाकपाणी, भाजी आणणं, बाहेरची कामं कोण करणार होतं सारं? म्हणून… म्हणून अडवलं ह्यांनी आपल्याला तेव्हा? तेव्हा नाही म्हणाले ते “पुढे पुढे जायचं आयुष्यात.”
कांचनला परत एकदा गहिवरून आलं. स्वतःचीच कीव आली. म्हणजे आपण मूर्ख ठरलो. आपला गैरफायदा घेतला ह्या दोघांनी. इतके वर्षात आपल्यासाठी स्थळंही पाहिली नाहीत. आणि आता कार्तिक मुलांवर मुलं सुचवतोय ते माझ्या ब्याद जावी म्हणून? त्याचं जाऊदे. तो गार्गीचा नवरा आधी आहे आणि मग आपला भाऊ हे तर सिद्ध झालंच आहे. पण बाबा… आता ते सुद्धा आपले राहिले नाहीत? त्यांनाही मी इथे राहू नये असं वाटतंय? की माझ्या आणि गार्गीच्या मतभेदांची भीती वाटतेय त्यांना? प्रत्येक नात्याला एक आयुष्य असतं हेच खरं, ह्यांच्यातलं आणि आपल्यातलं नातं आता वृद्ध होत चाललंय का?
विचाराच्या शृंखलेत कांचन अडकत चालली होती. तेवढ्यात बाबांनी टीव्ही लावला. मधमाश्यांवर माहिती देणारी कुठलीतरी फिल्म चालली होती. माहिती देणारा सांगत होता.
“ही पहा ह्या पोळ्यातील राणीमाशी. ही राणीमाशी ह्या पोळ्याची मालकीण. इथे हिचंच राज्य, पण पुढे कधीतरी ह्याच पोळ्यातील इतर कामकरी आणि नरमाश्याना दुसऱ्या राणीमाशीची गरज भासेल तेव्हा ते नवीन राणीमाशी शोधतील. मग ह्या दोन राणीमाश्यांमध्ये तुंबळ युद्ध होईल. युद्धात जी जिंकेल ती ह्या पोळ्याची मालकीण बनेल. नवीन राणीमाशी जर जिंकली तर ही निरुपयोगी झालेली राणीमाशी हे पोळं सोडून निघून जाईल. एका नव्या पोळ्याच्या शोधार्थ. ज्याची मालकीण फक्त तीच असेल. कारण एका पोळ्यात दोन राणीमाशा कधीच राहू शकत नाहीत.”
कांचन आश्चर्यचकित होऊन ही माहिती ऐकत होती आणि विचार करत होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसात शिरताच नेत्राने तिला बातमी दिली,
“कांचन, गुड न्युज. तुझं प्रमोशन झालं. अभिनंदन. आणि अजून एक गुड न्यूज. सामंतचंही प्रमोशन झालं. आणि तिसरी आणि महत्त्वाची गुड न्युज म्हणजे तुम्हा दोघांचंही पोस्टिंग पुण्यात झालंय. आता आम्हाला प्रमोशनचेही पेढे मिळणार आणि लग्नाचे लाडूही. होय ना? बोल ना कांचन, पुण्याला जायची तयारी आता करणार ना?”
“करायलाच हवी नेत्रा. दुसरं पोळं बांधायलाच हवं गं. कारण एका पोळ्यात दोन राणीमाशा कधीच राहू शकत नाहीत.” खिडकीतून दिसणाऱ्या वडाच्या झाडावरच्या मधमाश्यांच्या पोळ्याकडे बघत कांचन म्हणाली आणि तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून नेत्रा फक्त तिच्याकडे पहात राहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा