शनिवार, २४ मे, २०२५

1922. लग्न झालेल्या कांहीं मुलींच्या व्यथा

     लग्न मोडून, नवऱ्याशी सासरशी संबंध तोडून आईवडिलांकडे परतू इच्छिणाऱ्या विवाहित मुलींना माहेरचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत असा सूर  मागील काही दिवसांत अनेकांनी व्यक्त केलाय. हे म्हणणे अगदी बरोबर आहे, मी याच्याशी शतप्रतिशत सहमत आहे. ही गोष्ट मी वैयक्तिक जीवनात अनुभवलीय आणि या भूमिकेस पाठिंबाही दिला आहे. मात्र ह्या म्हणण्यामागची दुसरी एक बाजू आहे त्याविषयीचे दोन शब्द.
    माझ्या ओळखीतल्या मुलीची सॅाल्व केलेली एक केस. मुलगी अहमदनगरमधली. नवरा व सासरचे लोक छळू लागले म्हणून आई वडिलांनी तिला माहेरी ठेवून घेतले. काही महिन्यांनी तिच्या सासरच्या लोकांनी ती बदचलन असल्याची वावडी उठवली. सगळीकडे त्या मुलीच्या बदफैल असण्याची खमंग चर्चा होऊ लागली. लोक त्यात मीठमसाला घालून वाढून चढवून सांगू लागले. मुलीच्या आईवडिलांनी घरी कोंडून घेतले. त्या मुलीच्या धाकट्या बहिणीचे आधीच ठरलेले लग्न मोडले. नांदायचं सोडून माहेरी आलेल्या थोरल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले, धाकट्या मुलीचे लग्न मोडले परिणामी मुलीच्या आईला शॅाक बसला. तिचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वडील दारूच्या आहारी गेले. मुलीच्या मामाने कुठून तरी धाकट्या मुलीचे लग्न जमवले. धाकट्या बहिणीचे लग्न व्हावे म्हणून मोठ्या मुलीने घर सोडले. पुण्याबाहेरील एका  आश्रमात तिने आसरा घेतला. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले मात्र तिथेही तिचे शोषण झाले. तिच्या शोषणाच्या क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल झाल्या. तिला तिथून जावे लागले. ज्यांनी तिला सुरक्षित आसरा देण्याचे आमिष दाखवले त्यांनीच फसवले. पिंपरी चिंचवडनजीक एका अपार्टमेंटमध्ये ती सेक्सवर्किंगच्या दलदलीत रूतली. 
      या मुलीविषयीची माहिती कळल्यावर तिच्या मामाशी आणि आता संसार करत असलेल्या धाकट्या बहिणीशी संपर्क साधला. त्यांनी तिला दरवाजे बंद केलेले. आई तिच्यामुळेच गेली नि दरम्यानच्या काळात तिचे वडीलही मरण पावले. अशा अपसमजामुळे धाकट्या मुलीच्या मनावर आघात झाला. थोरल्या मुलीला या सर्व गोष्टी कळाल्या तेव्हा ती उन्मळून पडली. आता ती स्वेच्छेने धंदा करते. ती स्वतःवर सूड उगवते असे मला राहून राहून वाटते. या मुलीच्या केसमध्ये ॲडव्होकेट सावंत यांची मदत झाली होती. तिचे कौन्सिलिंग करण्यात आले तरीही तिने निर्णय बदलला नाही. आजही स्वतःला अपराधी मानतो कारण तिचे वडील हयात नाहीत हे सत्य तिला माझ्यामुळेच कळाले आणि धाकटी बहीण तिचा तिरस्कार करते हे देखील तिला अकारण कळाले. आता या गोष्टींचे ओझे घेऊन ती हयातभर स्वतःला कोसत राहणार या विचाराने कासावीस व्हायला होतं.       
       सर्व प्रश्न, सर्व समस्या एकरेषीय उत्तरात आपण ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीस अनेक कंगोरे असतात, त्यातही बहुतांश करून सामाजिक संरचनेशी संबंधित असतात. हलकी समजली जाणारी कामे जसे की आचारीकाम वा केटरर्सकडे काम करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, रोजंदारीवरच्या महिला, बांधकामाच्या साईटवरच्या एकल स्त्रिया, ही यादी मोठी आहे, या महिलांकडे त्याच क्षेत्रातले पुरूष एक भोगवस्तू म्हणून पाहत असतात हे वास्तव आहे. सासर सोडून घरी परतलेल्या मुलींनाही समाज नावे ठेवतो. अशा मुलींच्या आईवडिलांना किती दिव्यातून सामोरे जावे लागते हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! सासर कायमचे सोडून परतलेल्या मुलीच्या डोक्यात हजार प्रश्न असतात. भाऊ, भावाची बायको यांच्याशी ती कसे जुळवून घेणार? उरलेल्या आयुष्यात स्वावलंबी कशी होणार?  'आईवडील हयात असेपर्यंत मुलींचे माहेर असते' हे जुने लोक सांगत असत, त्यात अपवाद वगळता काहीच बदल झालेला नाही हे समाजाने खळखळ न करता मान्य केले पाहिजे. मुलींच्या ठायी स्वावलंबी होण्याची धमक असली पाहिजे. कुटुंबानेही त्यांना सपोर्ट केले पाहिजे.              
       'समाजाला फाट्यावर मारून जगता आले पाहिजे' असे तर मीही म्हणतो, मात्र प्रत्यक्षात ज्या मुलीला आणि तिच्या माहेरच्या लोकांना हे करायचे असते त्यांची भंबेरी उडते हे वास्तव आहे. त्यासाठी आधी तिच्या संपूर्ण कुटुंबातील लोकांनी मुलीला आणि तिच्या आईवडिलांना भक्कम आधार दिला पाहिजे. कुटुंब एकसंध होऊन त्यांच्यामागे उभे राहिले की समाजाची कोल्हेकुई फार काळ राहत नाही. या मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन जोवर बदलत नाही तोवर माहेरचे लोक अगदी खुलेपणाने त्यांच्यासाठी दारे खुली ठेवणार नाहीत. ही दारे आपण सर्वांनी मिळून किलकिली केली आहेत, ती सताड उघडी राहावीत म्हणून आपल्या दृष्टिकोनात आधी बदल व्हायला हवा ! अशा घटना घडल्या की वैयक्तिक पातळीवर बोलताना आपण सारेच प्रबोधनपर उपदेश देऊ लागतो, असे केले पाहिजे तसे केले पाहिजे, हे योग्य नि ते अयोग्य असे सांगू लागतो, मात्र समाजाचा घटक म्हणून जगताना आपली भूमिका तशीच आणि तीच असली पाहिजे यासाठी अपवाद वगळता आपण दक्ष नसतो ही आपली शोकांतिका आहे. असो. 
      पोस्टच्या सुरुवातीला ज्या मुलीचा उल्लेख केला आहे, तिला समजून घेणारा अनुरूप जोडीदार मिळाला आहे. दिवाळीत ते दोनाचे एक होतील. हे सुख दलदलीत रुतलेल्या हरेक जिवास मिळत नाही. कारण बहुतांश जीव पायदळी तुडवून आणि आतल्या आत घुसमटून कुढून संपून जातात. समाजात बदल होण्यासाठी आपण जे वक्तव्य करतो वा ज्या अपेक्षा मांडतो त्या  आपल्या सर्वांच्या शब्दांना कृतीची जोड लाभावी हीच मनोकामना. मग अनेक कळ्यांना नीट फुलता येईल !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...