गुरुवार, १ मे, २०२५

1884. काटा आणि चटका

 लहानपणाीच्या काही आठवणी मनाच्या पडद्यावरून हटता हटत नाहीत. त्यातलीच ही गुळाच्या चटक्याची...
आम्ही लहान असताना दर दोनचार दिवसाआड हा कार्यक्रम ठरलेलाच असायचा…चिंचेखाली, बोरीखाली… काट्याकुट्यात खेळण्यातच पोरांचा दिवस सरायचा.
बोरी तिथं बाभळी पण असायच्याच. बाभळीचं झाड, दिवस दिवस खेळण्याचं मटेरिअल पुरवायचं. त्याची पिवळी धम्मक फुलं, कर्णफुलं बनून मुलींच्या कानांवर सजायची. बाभळीच्या पिकलेल्या शेंगा खूपच चविष्ट लागत असाव्यात, मला आता त्याची चव आठवत नाही पण त्या तोडण्यासाठी केलेला आटापिटा आठवतो अजूनही. बाभळीचा, शेवग्याचा, कडूनिबाचा डिंक पण तेव्हा ‘खाऊ’ असायचा.
पण… बाभळीचा काटा पायात मोडला की अंगावर काटा यायचा. बाकी चुबुक काटे वगैरे किरकोळ असायचे. नुसते नखांनी टोकरलं तरी निघून जायचे… पण बाभळीचं काम महा बेक्कार! आठआठ दिवस ते दुखणं पुरवायचं…
चप्पल ही वस्तू अगदी विशेष प्रसंगी, म्हणजे मोठ्यांबरोबर ‘गुणी बाळं’ बनून कुठे जायचा योग आला तरच पायाला लागायची. बाकी इतर वेळी पायाला भिंगरी लागल्यासारखी आमची वावटळ गावभर अनवाणीच भिरभिरत असायची. त्यामुळे खूप क्षार चढलेलं एखादं मडकं फुटल्यावर त्याचं खापर जसं दिसेल तशी पायांना रया आलेली असायची...
काटे भरणं, ‘कुरूप’ होणं हे प्रकार तर तेव्हा फारच कॉमन होते. नंतर नंतर त्या कॉर्न कॅप निघाल्या. सात आठ दिवस ती पट्टी लावून ठेवली, की कुरूप नरम पडून आतला काटा निघून यायचा.
हिवाळ्यात तर पाय इतके उललेले असायचे की धप्पकन उडी मारावी तर पावलांवर रक्ताचे बारीक थेंब यायचे. तळपायाची कातडी तर एकदम कडक. सुई पण शिरू नये अशी!
अशा त्या पायात काटा मोडल्यावर आधी पाय घमेल्यातल्या पाण्यात ठेऊन स्वच्छ करावा लागायचा. पाय जेवढा जास्त पाण्यात राहील, तेवढी कातडी जरा मऊ पडायची.
मग भिंतीला टेकून बसायचं आणि पाय डोळ्यांशी आणून तो काटा सुईने टोकरून टोकरून काढायचं काम सुरू व्हायचं.
असं त्रिकोणासनात बसून तासनतास हे काम चालायचं… तोपर्यंत नरम पडलेली कातडी पुन्हा वाळून कडक…! महत्प्रयासानं कसाबसा तो काटा निघायचा. पण तरी त्याची सल जाता जायची नाही.
…मग त्यावर उपाय म्हणजे गुळाचा चटका !
चटक्याची पूर्वतयारी म्हणजे…
छोटासा गुळाचा खडा, मेणबत्ती आणि काडेपेटी… 
कार्यस्थळ : पुढच्या किंवा मागच्या ओसरीचा एखादा कोपरा.
वेळ : बहुधा संध्याकाळची.
उपचारानंतर रडाडरड झाली तरी तोपर्यंत झोपायची वेळ व्हायची. आणि झोपेतून उठेपर्यंत चटक्याची भीषण आठवण पुसट होऊन जायची.
ही तयारी चालू असताना चटक्याचा मानकरी हवालदील होऊन जायचा. बाकीची वानरसेना मात्र फूल उत्साहात असायची. एखादं मंगल कार्य निघाल्यासारखा सगळ्यांचा उत्साह फसफसायचा.
त्याच उत्साहात मानकर्‍याला पाचारण केलं जायचं. धांदल धांदल करत ती मेणबत्ती पेटवली जायची. मानकरी किती छोटा/मोठा आहे, त्याचप्रमाणं तो गोंधळ घालायचा.
कधी कधी दोन-तीन पण मानकरी असायचे… मानकरी लहान असेल तर पळापळ, रडारड बरीच व्हायची. त्याला पकडून आणून, दाबून ठेवायला मोठी मुलं आघाडीवर असत. तो हातपाय झाडतच राही.
मोठ्या माणसांपैकी कोणीतरी मग गुळाचा खडा पेटत्या मेणबत्तीवर धरी. इकडे पाय झाडणं, सुटण्यासाठी पकडलेल्यांना चावे घेणं चालूच असायचं…
गूळ वितळून खड्यावर पाक तयार झाला की त्या हलणार्‍या पायावर, काट्याची जागा शोधावी लागे… त्यात कधी गूळ गार होऊन जाई, कधी चटका भलतीकडेच दिला जाई, तर कधी चटका देणार्‍याला किंवा धरून बसणार्‍यालाच चटक्याचा प्रसाद मिळे… मग तर खूपच जोर लावून मानकर्‍याचं मुटकं वळलं जाई.
मोठी मुलं मात्र स्वत:हून ‘चटक्या’ला बसत. स्वत:च गूळ गरम बिरम करत. काट्याची जागा स्वत:च हेरत. कोरलेलंच असल्यामुळं त्याबाबतीत काही शंका नसे, पण पायावर टेकवताना, त्यांचाही धीर होत नसे… ‘टेकवू की नको… टेकवू की नको’ करत.
मग बाकीची मुलं पट्कन त्याचा हात त्याच्या पायावर टेकवत… अशा तर्‍हेनं ‘चटका विधी’ संपन्न होत असे.
त्यानंतर मग पाय धरून लंगडी घालत मिनिटभर कोंबडीनृत्याचा प्रायोजित कार्यक्रम… बाकीचे टाळ्या पिटून आनंद घेणार.
हा ‘गुळाचा चटका’ म्हणजे तेव्हा उपचार तर होताच पण मनोरंजनाचाही एक भाग होता. तासनतास हा कार्यक्रम चालायचा. मोठी मंडळी पण ह्यात हिरीरीनं सहभागी व्हायची.
आता हा विधी जवळ जवळ नामशेषच झालाय… कारण मुलांना चप्पल-बूट घातल्याशिवाय उंबराच ओलांडू दिला जात नाही. त्यामुळं काट्याचा आणि त्यांच्या पावलांचा दुरान्वयानेही संबंध येत नाही.
बोरी-बाभळीखाली हिंडून ‘माकडमेवा’ गोळा करण्याची गरजही राहिली नाही. आता मुलं असल्या गोष्टींना तोंडही लावत नाही. त्यामुळं काटे भरणं, ते टोकरून काढणं, आणि गुळाचा चटका देणं जवळपास बंदच झालंय. आता मुलांना सांगूनही त्यातली गंमत कळणार नाही.
हं... आता काटे मनात मात्र भरतात. कधी चुकून, कधी कुणी विघ्नसंतोषी लोक मुद्दामही भरवूनही देतात. पण कधी वाटतं, मनात सलणारे काटे तसेच वागवत राहून मन कुरूप करून घेण्यापेक्षा, पायातल्या काट्यांसारखे असेच वेळच्यावेळी बोलून काढावेत. आणि जमलंच तर चांगला कडकडीत भांडणाचा चटका देऊन तो सल कायमचा मिटवून टाकावा !

— नीलिमा क्षत्रिय
……🪷 ●┈┉❀꧁꧂❀┉┈● 🪷……

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...