सोमवार, २९ एप्रिल, २०२४

1096. थोडा वाईटपणा घेण्यासाठी

     काही दिवसांपूर्वी घराजवळ असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात गेलो होतो. नेहमीच्या प्लंबरचा नंबर बंद येत असल्यामुळे दुकानदार कोणी प्लंबर देऊ शकेल का? हे बघायचं होतं. सकाळची वेळ होती, दुकानाबाहेर काही लोक आपापल्या दुचाक्यांवर मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. मी माझी गरज दुकानाच्या मालकाला सांगितल्यावर त्याने जोरात दोन जणांना हाका मारल्या. पण त्यातल्या कोणीही त्याला उत्तर दिलं नाही. शेवटी संतापून तो बाहेर आला आणि गाड्यांवर बसलेल्या लोकांना ओरडून म्हणाला, "काम नकोय का तुम्हाला?" इतकं होऊनही आपल्या मोबाईलबाहेर‌ डोकं न काढता एक जण म्हणाला, "पत्ता घेऊन ठेवा... दुपारनंतर येईन म्हणून सांगा." वैतागलेला दुकानदार मला म्हणाला, "यांना रमी खेळण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. माझ्या ओळखीचा आणखी एक प्लंबर आहे. त्याच्याशी बोलून तुम्हाला कळवतो" 
सकाळी सकाळी रमीत असे गुंगलेले‌ लोकं बघणं माझ्यासाठी नवीन होतं. तेवढ्यात त्या लोकांमधला संवाद सुरू झाला. कोण किती जिंकलं? ह्याचं बोलणं ऐकल्यावर हेही समजलं की त्यातल्या एकाला आणखी खेळण्यासाठी कर्ज हवं होतं. त्यासाठी तो ऑनलाइन इन्स्टंट कर्ज देणारी कंपनी शोधत होता. अगोदरच त्याच्या नावावर तशी दोन कर्ज होती. पण खेळण्याची... थोडक्यात एक दिवस जॅकपॉट लागून 'मालामाल' होण्याची त्याची हौस फिटत नव्हती. गेमिंगच्या इतक्या थराला आहारी गेलेले लोक आणि त्यांना आयडी व्हेरिफिकेशनवर पटकन कर्ज देणाऱ्या कंपन्या पाहून अंगावर काटा आला. 24 फेब्रुवारीला बिझनेस टुडेमध्ये आलेली एक बातमी डोळ्यासमोर उभी राहिली: 
Indians remain poor because they are generating lower returns than inflation: Nilesh Shah, Kotak Mahindra AMC. Sharing his views on investment trends, Shah shared that around 10 crore individuals are losing money while playing fantasy games, nearly 2 crore Indians have lost more than Rs 2 lakh crore in Ponzi schemes.
मी अजून तिथेच आहे, हे पाहून दुकानदाराने मला आणखी एकाचा नंबर दिला आणि बोलता बोलता माझ्या नेहमीच्या प्लंबरचा उद्धार करत म्हणाला, "या रमीच्या नादात कंपन्यांची कर्ज करून तो गावी पळून गेलाय, त्यामुळे माझाही खोळंबा झालाय. शिवाय माझ्याकडून जे कर्ज घेतलं आहे ते वेगळंच.”  हे ऐकल्यावर काय बोलावं? हे मला समजेना. त्या प्लंबरला नुकतीच शाळेत जायला लागलेली दोन लहान मुलं आहेत, हे मला माहिती आहे. त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही याचीही कल्पना आहे.  ऑनलाइन गेमिंग, त्यामुळे होणारी कर्ज आणि उद्ध्वस्त होणारी माणसं हे मी कधीही थेट न अनुभवल्यामुळे मला हा किती गंभीर प्रश्न आहे... याची पहिल्यांदा जाणीव झाली. थोडं संशोधन केल्यावर हे लक्षात आलं की हा प्रश्न कोणत्याही ठराविक आर्थिक वर्गापुरता, प्रदेशापुरता, भाषेपुरता मर्यादित नाही. 'मालामाल' होण्याच्या आमिषाने असंख्य लोकांना आपल्या कवेत घेतलं आहे... पछाडलेलं आहे. इंजिनीअर होऊन उत्तम पगारावर काम करणारे, चांगला व्यवसाय करणारे लोकही याचे बळी ठरले आहेत.  हे लिहिण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे – आपल्या ओळखीत कोणीही कोणत्याही फॅन्टसी गेमचे एप्लीकेशन डाउनलोड केले असेल आणि 'एकदाच खेळून बघतो', 'आज खेळतो उद्या खेळणार नाही', 'नेहमी खेळत नाही... कंटाळा आला तरच खेळतो', 'मला आजपर्यंत कुठलंही व्यसन लागलेलं नाही तेव्हा हेही लागणार नाही' असं काहीही कारण देऊन खेळत असेल, तर त्याला वेळीच सावध करा (यात क्रिकेटचची टीम बनवणारेही आलेच). अर्थात सावध केल्यामुळे आपल्यालाच वाईटपणा येऊ शकतो. पण कर्जाच्या बोजामुळे भविष्यात काही भयंकर‌ घडणार असेल... कोणाचं आयुष्य कायमंच उद्ध्वस्त होणार असेल आणि त्याची बोच आयुष्यभर आपल्याला राहणार असेल - तर थोडा वाईटपणा घेऊन, पण अशा व्यक्तीशी संवाद साधायला हवा. किमान तसा प्रयत्न तरी करायलाच हवा.

@योगेश शेजवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...