तब्बल सहा वर्षांनी अनिकेत तीन-चार दिवसांपूर्वी भारतात आला होता, आई-वडिलांकडे. अमेरिकेतील एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये तो चांगल्या मोठ्या पोस्टवर होता. गेले बारा-पंधरा वर्षे तो अमेरिकेतच होता. आणि चार वर्षांपूर्वी त्याला ग्रीन कार्ड ही मिळाले होते. सुरुवातीला शिक्षणासाठी गेला. नंतर तिथेच नोकरी मिळाली. मग मुलगीही तिकडेच शोधली. तशी होती मूळची भारतीय, म्हणजे अगदी पुणेरी महाराष्ट्रीयन फॅमिली. पण ती बरेच दिवसांपासून तिथे अमेरिकेतच रीतसर स्थायिक झालेली होती.
अनिकेत आणि निर्मले च्या लग्नाच्या वेळी नाना आणि माई तीन महिने अमेरिकेत जाऊन आपल्या लेकाच्या घरी राहिले होते. सून होती लाघवी, सुंदर परंतु शेवटी ती अमेरिकेत वाढलेली होती. तिचा जन्मच अमेरिकेतील होता. भारतीय संस्कृती तिला फारशी परिचयाची नव्हती. अमेरिकन संस्कृती मात्र तिच्या अंगवळणी पडली होती. सगळ्या गल्लीला आपले घर मानणाऱ्या माई आणि ऑफिसमधील चपराशाला सुद्धा अगत्याने बोलणारे नाना यांना अमेरिकेतील आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्याचे गणित काही जमेना. आणि लेका सुनेच्या संसारातील आपला उपरेपणा त्यांना सहन होईना. शेवटी तीन महिन्यानंतर दोघे पुन्हा भारतात निघून आले उदासवाणे होऊन !
अनिकेत नाना माई यांचा एकुलता एक मुलगा होता. खूप हुशार होता लहानपणापासून. दोघांनाही त्याचा खूप अभिमान वाटायचा. त्याला खूप शिकवायचे, त्याच्या शिक्षणात आपण कुठे कमी पडायचे नाही, हे दोघांनीही त्याच्या जन्मापासूनच ठरवून घेतले होते. नाना कुठल्याशा सरकारी ऑफिसमध्ये सिनियर क्लर्क होते आणि माई गृहिणी होत्या. तसे मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. अनिकेत शिकत गेला आणि नाना त्याला पैसा पुरवत गेले.
त्याने नानांच्या कष्टाचे चीज केले. आयआयटीतून इंजिनीअर होऊन तो एम.एस.साठी अमेरिकेत गेला, आणि त्याच्या हुशारी मुळे त्याला लगेचच तिथे नोकरीही मिळाली. नाना माई ना तर त्याच्या या उत्तुंग यशामुळे स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच भास होत होता. अनिकेतच्या शिक्षणामुळे नाना माईंनी आपली हौस मौज सगळी मारून टाकलेली होती जणू! दोनच खोल्याच्या संसारात त्यांचे आयुष्य गेले होते.अनिकेत नोकरीला लागला आणि नाना रिटायर झाले. रिटायरमेंट ला मिळालेल्या पैशातून नानांनी या सोसायटीत हा टू बीएचके फ्लॅट घेतला होता. 'मिळणार्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसे भागेल', याची नानांना मुळीच चिंता नसे. कारण त्यांचा लाडका अनिकेत आता मोठ्या पगारावर लागला होता. सुखी आयुष्याच्या सुखद संध्याकाळचे स्वप्न नाना रंगवत असायचे. सुरुवातीला अनिकेतने नाना माईंना महिन्यांकाठी काही पैसेही पाठवले. पण ती रक्कम दिवसेंदिवस कमी कमी होत गेली. आणि त्याच्या लग्नानंतर गेल्या सहा वर्षांपासून तर बंदच झाली.
अनिकेतची मुलगी सई जन्मली आणि त्यानंतर नाना माईंना फोन करण्याचे त्याचे प्रमाण सुद्धा हळूहळू खूप कमी झाले. नुकताच त्याच्या कंपनीला कुठलासा आर्किऑलॉजिकल संबंधातील प्रोजेक्ट मिळाला आणि त्याचे काही काम भारतात निघाले, त्यामुळे कंपनीने अनिकेतला भारतात पाठवले. कंपनीच्या कामासाठी तीन महिने अनिकेत भारतात येत होता, तब्बल सहा वर्षांनी. येताना प्रवासात त्याला खूप अपराधी वाटत होते. 'गेली सहा वर्षे नाना माईंना आपण कपर्दीकही पाठवली नाही किंवा त्यांची कसली चौकशीही केली नाही', हे त्याला प्रकर्षाने जाणवत होते. नाना माई आपल्यावर खूप रागावले असतील आता असेच त्याला वाटत होते.
तो घरी आला. ह्या नवीन फ्लॅटमध्ये राहण्याचा योग त्याला फारसा आलाच नव्हता. त्याच्या येण्याने नाना माईंना खूप आनंद झाल्याचे त्याला जाणवत होते. गेले दोन दिवस त्याच्या आवडीचे पदार्थ माई त्याला करून खाऊ घालत होत्या. आईच्या हातची ती चिरपरिचित मायेची चव जिभेला लागताच, अनिकेत मनातून खूप ओशाळा झाला,ढासळून गेला. सगळं लहानपण त्याला आठवलं. 'आता नाना माईंना कधी काही कमी पडू द्यायचं नाही, हे त्याने मनोमन ठरवलं'.आज सकाळी उठल्यावर त्याने, इंडियात जायचे हे कळाल्यावर घाईघाईने केलेल्या शॉपिंग मधील, नाना माईं साठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या. त्यावेळी प्रसन्नपणे, समाधानाने हसत माई त्याला म्हणाल्या, " अनिकेत, अरे इतकं करतोस आमच्यासाठी, हा आणखी कशाला खर्च करीत बसलास?"
त्या बोलण्याने अनिकेत चमकला. माईंनी आपल्याला, 'ही शालजोडीतली मारली', असे त्याला वाटले. पण माईंच्या चेहऱ्यावर तसे कुठलेही भाव त्याला दिसले नाहीत.
माईंनी अक्षरश: दिवाळी सारखे फराळाचे केले होते. अनिकेतला प्लेट भरून नाश्त्यासाठी फराळाचे त्यांनी दिले, तेव्हा ओशाळा होऊन अनिकेत त्यांना म्हणाला, माई कशाला गं एवढा खर्च करत आणि त्रास घेत बसलीस?"
"अरे त्रास कसला त्यात अनिकेत? तुझ्यासाठी करायचे म्हणल्यावर काही त्रास होईल का मला? आणि खर्चाचे म्हणशील तर तूच नाही का बिलं भरत वाण्याची, औषध दुकानदाराची, इलेक्ट्रिसिटीची, गॅसची? नानांची अर्ध्याच्या वर पेन्शन तर शिल्लकच राहते हो महिन्याला! "माई मनापासून बोलल्या.
अनिकेतने पुन्हा माईंकडे पाहिले. पण नाही, त्या अगदी मनापासून खरे बोलताहेत, असे त्याला जाणवले. काल नाना ही असेच काहीसे म्हणत होते. हे त्याला आठवले. हे काय गौडबंगाल आहे हे त्याला समजेना.
शेवटी दुपारी तो सोसायटीतील वाण्याकडे गेला. त्याच्या दुकानात गर्दी नाही ही संधी साधून त्याने त्याला विचारले, "नानांच्या घरच्या किराण्याचं बिल नेमकं कोण भरतयं?"
दुकानदाराने त्याच्याकडे आपादमस्तक पाहिले. माईंनी त्याला सांगितले होते, 'त्यांचा मुलगा येणार ते', हे त्याला आठवले. 'हाच तो'! याची त्याला खात्री पटली. त्याने त्याच्या कडून वचन घेतले की, 'नानांना आणि माईंना यातील काही कळू द्यायचे नाही', आणि त्याला एक फोन नंबर दिला. त्या फोन नंबर वरून त्यांची सगळी बिले भरली जातात, हे सांगितले.
अनिकेतने त्या फोनवर फार उत्सुकतेने फोन केला. पलीकडे फोनवर कोणी रघू बोलत होता. तो कोण हे काही अनिकेतला समजेना. शेवटी त्याने त्याला भेटायचे म्हणून वेळ मागून घेतली. आणि तो त्याला भेटायला गेला, हॉटेल कॅफे गोल्ड मध्ये. रघु म्हणजे रघुनाथ. उंचीपुरी, गोरटेली, हँडसम म्हणण्या जोगी, हसतमुख, उंची पेहरावातील व्यक्ती अनिकेतच्या समोर बसली होती. त्याने अनिकेतला नमस्कार केला. दोघांनी एकमेकांचा परिचय एकमेकांना करून दिला. अनिकेतने दोघांसाठी कॉफी मागवली आणि त्याला सरळच विचारले, "तुम्ही नाना माईंच्या घरची सगळी बिलं भरता, असे मला वाण्याने सांगितले. हे काय गौडबंगाल आहे? हे का करता तुम्ही"?
अनिकेत मी फार मोठं असं काही करतोय असं नाही. नाना माईंनी माझ्यासाठी खूप काही केलंय. माझी आई तुमच्या घरी भांडे घासायला होती. वडील रेल्वे स्टेशनला हमाली करायचे. आजी-आजोबा आणि तीन आत्या,म्हणजे वडिलांच्या तीन बहिणी, आई-वडील आणि मी असे आमचे मोठे कुटुंब होते. कितीही कष्ट केले तरी दोन वेळचे जेवण कसेबसे मिळायचे. आत्यांची लग्ने वडिलांनीच करून दिली. आजी-आजोबांचे आजारपण असे. घरात कायमच ओढताण असायची.
असच एकदा मी छोटा असताना आईसोबत तुमच्या घरी भांड्याला आलो होतो. आई भांडे घासत होती आणि मी घरात बसलेला होतो. साधारण पाचवी सहावीला असेल मी. तुमचे नाना बाहेरून आले आणि त्यांनी कपडे बदलले व पॅन्ट मधील पैशांचे पाकीट काढून तुमच्या घरातील आरशावर ठेवले आणि ते घाईघाईने कुठेतरी बाहेर गेले. पाकिटात पैसे होते. सकाळीच शाळेत सहलीची सूचना आली होती. सहलीसाठी दोनशे रुपये वर्गणी सरांनी सांगितली होती. माझे वडील पैसे देऊ शकणार नाहीत, हे मला कळत होते. आणि वडिलांपुढे मागायची मला हिम्मतही नव्हती, कारण वडील खूप कडक स्वभावाचे होते. आईचे सुद्धा त्यांच्या पुढे काही चालत नव्हते. घरची परिस्थितीच अशी होती की दोनशे रुपये दुसरीकडे कुठे खर्च केले तर, महिन्याचे बजेट सगळे कोलमडले असते. मी इकडे तिकडे पाहीले. पटकन उठलो, आणि त्या पाकिटातून दोनशे रुपये काढून घेतले व खिशात ठेवले. मागे वळून पाहतो तर माई उभ्या होत्या.
मी नखशिखांत घाबरलो. वडिलांचा चेहरा आणि त्यांचा मार माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. वरती आईचे काम माझ्यामुळे सुटणार आता, अशी भीती वाटू लागली. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी एकही शब्द बोलू शकत नव्हतो. मी माईंना हात जोडले. काही न बोलता माई माझ्याजवळ आल्या. त्यांनी मला जवळ घेतले. मला पुढच्या खोलीत घेऊन गेल्या, आणि शांततेत विचारले," पैसे कशाला घेतलेस?
"मी खरे खरे सांगितले शाळेत सहलीसाठी लागतात", म्हणून. मी माईंच्या पायावर पडलो त्यांना विनवू लागलो, रडत रडत, "आईला सांगू नका, कामावरून काढू नका. मी चुकलो." मी ते पैसे माईंच्या हातात दिले.
माईंनी मला कसलीही शिक्षा केली नाही. पैसे हातात घेतले. मला खाण्यासाठी लाडू दिला. माझे डोळे पुसले. तोपर्यंत माझ्या आईचे भांडे घासून झाले होते. ती पण तिथे आली. तिच्या हातात ते दोनशे आणि आणखी पन्नास असे अडीचशे रुपये माईंनी दिले आणि आईला म्हणाल्या, "अगं, रघु ची सहल जाणार आहे असे तो म्हणाला. त्याला सहलीला पाठव. हे असू दे माझ्याकडून त्याच्या सहलीसाठी." आणि नंतर माझ्याकडे वळून म्हणाल्या," रघु यानंतर तुला शाळेत शिक्षणासाठी कसलीही गरज पडली, तरी नि:संकोच माझ्याकडे येत जा हो मागायला."
घडलेल्या घटनेचा माईंनी चुकूनही कधी पुन्हा उच्चार केला नाही. उलट माझ्या शाळेसाठी जर मला काही कमी पडत असेल तर वेळोवेळी त्यांनी ते पुरवले. पुढे माझे वडील वारले. पण नाना माई माझ्या मागे माझ्या शिक्षणासाठी भक्कमपणे उभे राहिले. अगदी माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या शिक्षणासाठी ते वेळोवेळी मदत करत राहिले. माईंच्या त्या एका कृतीने मला फार काही शिकवले. जबाबदार बनवले, आणि मी त्यानंतर परत त्या वाटेला कधीच गेलो नाही. जिवापाड मेहनत करून मोठ्या कष्टाने मी आज या पदाला पोहोचलोय. हे केवळ नाना माईं मुळेच शक्य झालेय. आज माझ्याकडे धन-दौलत, पैसा-अडका, गाडी-बंगला, क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी सगळं काही आहे.
त्या दिवशी जर माईंनी आरडाओरडा केला असता. मला चोर ठरवले असते, तर माझ्या आई-वडिलांच्या नजरेतून आणि स्वतःचाही नजरेतून मी उतरलो असतो. आणि कदाचित हळूहळू गुन्हेगार बनत गेलो असतो. पण माई फार मोठ्या मनाच्या ! त्यांनी आपल्या वागण्याने हे घडू दिले नाही. उलट मला जबाबदारी शिकवली. तुझ्या लग्नानंतर अमेरिकेतून आलेल्या नाना माईंना मी भेटायला गेलो होतो. त्यांचं एकंदर बोलणं ऐकून मला सगळं काही समजलं. कारण, "त म्हणता ताकभात" समजून घेण्याइतकी बुद्धि मला आहे. आणि मी ठरवले नाना माईंना काही कमी पडू द्यायचे नाही. पण त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का लागू द्यायचा नाही. त्याच दिवशी येताना मी सोसायटीतील वाण्याला, मेडिकलवाल्याला माझा नंबर दिला, आणि त्यांची बिले माझ्याकडे पाठवीत जा मी फोनवरून ती भरत जाईन असे त्यांना सांगितले. तसेच सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी व गॅसच्या बिलांबद्दलही हेच सांगितले व सर्वांना विनंती करून सांगितले, की नाना माईंनी विचारले, तर तुमचा मुलगा अमेरिकेतून ही बिले भरतोय असे सांगा".
अनिकेत, मी काही फार मोठं किंवा वेगळं काम करतोय, असं समजू नकोस. मी फक्त माईंची परतफेड करतोय. एकेकाळी त्यांनी मला माझ्या आई-वडिलांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवले होते. मी त्यांच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवतोय. तेव्हा त्यांनी मला आयुष्यात उभं राहण्यासाठी मदत केली. आता मी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी त्यांना मदत करतोय इतकेच ! " बोलता-बोलता झटकन कॉफी पिऊन रघुनाथ उठला. अनिकेतला शेक हॅन्ड केला आणि हॉटेलच्या बाहेर निघत त्याच्या आलिशान गाडीमध्ये बसून गेला ही !
अनिकेत अजूनही सुन्न बसून होता तिथे.
लेखक- अनामिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा