गाढ झोपला होता तो आणि अचानक त्याच्या कानाशी, एक आवाज उमटला. जणू काही, हाक मारली होती कोणीतरी त्याला. 'केतूsss'. दचकूनच उठला तो. त्याने आजूबाजूला पाहिलं अंदाज घेत, पण मिट्ट काळोखाशिवाय कोणीही नव्हतं खोलीत. दोन दिवसांपूर्वीच त्याची बायको, तिच्या माहेरी गेली होती रहायला. त्यांच्या लेकाला घेऊन. त्याने मोबाईलमध्ये पाहिलं, तर रात्रीचे तीन पस्तीस झाले होते. हात लांब करत नाईट लॅम्प लावला त्याने, नी उठून बसला तो पलंगावर. पुन्हा उजळणी करू लागला तो, नेमकं काय झालं त्याची. काल एक वेब सिरीज पहात होता तो, नी जोडीला सिंगल माल्टचे तीन-चार पेग्स उडवायचाही विचार होता त्याचा. तेवढ्यात ऑफिसमधून, एका टेक्निकल प्रॉब्लेमसाठी कॉल आला होता. जो निस्तरण्यात दोन तास गेले होते. अखेरीस दमून भागून साधारण सव्वा बाराच्या सुमारास, तो पलंगावर आडवा झाला होता. मानसिक थकव्यामुळे त्याला झोपही लवकरच लागली होती आणि मग मध्यरात्री, तो हाक ऐकू येण्याचा प्रकार घडलेला 'केतूsss'.
डोक्यात विचार घुमू लागला त्याच्या. केतू? हे असं तर आपल्याला, फक्त आईच हाक मारत असे. बाकी घरातील म्हणा वा मित्रांपैकी, किंवा ओळखीतही. अनिकेतचं सर्रास अनि, अना, अन्या केलं जायचं. पण आईव्यतिरिक्त अशी 'केतू' ह्या टोपण नावाने, कधीच हाक मारलेली नव्हती कोणीही. त्यामुळे त्याला आणिकच आश्चर्यच वाटलं होतं. कारण इतक्या वर्षांनंतर ही अशी हाक, ऐकली होती अनिकेतने. त्याची आई जाऊनही आता, जवळपास पंधरा वर्षांचा काळ लोटला होता. इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता त्यावेळी अनिकेत, नागपूरला हॉस्टेलमध्ये रहात असे तो. एके दिवशी भल्या पहाटे बाबांचा फोन आला होता अनिकेतला, हे सांगायला की आई गेली. अचानकच. शेवटचा आचका जो असतो, तो तिचा. 'केतूsss' अशी एक निर्वाणीची हाक होती. हे कळून अनिकेत ताबडतोब मुंबईला परतला होता. ढसाढसा रडला होता तो मग, आईच्या निष्प्राण देहाच्या पायांवर डोकं ठेवून. अनिकेतचं इंजिनीरिंग पुर्ण होऊन, त्याला नोकरी लागते ना लागते तोच. त्याचे बाबाही गेले होते. आपल्या लेकाच्या शिक्षणासाठी, आयुष्यभराची जमापुंजी लावलेले अनिकेतचे आई बाबा. त्याच्या स्वकमाईचा मात्र, एक रुपयाही उपभोगू शकले नव्हते.
अनिकेत भानावर आला, ह्या नकोशा आठवणींतून. पुन्हा त्याने वेळ पाहिली, तर सव्वा चार वाजले होते. त्याच्या मनात आलं. आता कठीणच होणारेय वेळ निघणं. त्यातून आज शनिवार, म्हणजे ऑफिसही नाही. काय करायचं काय आता? तरी बायको विचारत होती की, तू ही येतोस का पुण्याला? पण मलाच एकटं रहायचं होतं आणि आता हा स्साला एकटेपणाच छळणार आहे. जावं का पुण्याला? तशीही आता झोप उघडलीच आहे, तर पटापट आवरून निघू. अजून पाचही वाजलेले नाहीत.अगदी सहाला निघालो, तरी नऊच्या आत पुणं. बायको, लेक, सासुरवाडीचेही सरप्राईज होतील. हे सगळं मनात येऊन, अनिकेत उठला आवरायला. ठरवल्या प्रमाणे सहा वाजता, अनिकेत त्याच्या कारपाशी होता पुण्याला निघण्यासाठी आणि तेवढ्यात त्याच्या बायकोचा, आभाचा फोन आला त्याला. अनिकेत जरा गोंधळलाच. पण आभाला सरप्राईज द्यायचं असल्यामुळे, त्याने झोपेतून उठल्यासारखा आळसावलेला आवाज काढला. समोरून आभा बोलू लागली.
"हॅलो... अरे अनिकेत... त्या देशमुखांकडून फोन आलेला आत्ता, पाच मिनिटांपूर्वी".
"कोण देशमुख?".
"अरे... देशमुख रे... ज्यांनी आपल्या आई - बाबांचं घर विकत घेतलं होतं".
"बाराहून जास्त वर्ष झाली त्या गोष्टीला आणि त्यांचा तुला आज का फोन आला? तो ही असा अचानक?".
"त्यांचा नाही... त्यांच्याकडून"
"काय बोलतीयेस?".
"ऐकून घे नीट. मिसेस देशमुखांच्या मोबाईलवरून, मला फोन आलेला एका इन्स्पेक्टरचा".
"काय?".
"हो... ऐक... माझा नंबर त्या देशमुखबाईकडे सेव्ह असणार आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये, पहिलं नाव माझंच दिसलं असणार त्यांना म्हणून त्यांनी मला कॉल केला असणार".
"ते ठीकेय... पण इन्स्पेक्टरनी कॉल का केलेला?".
"अरे...मिस्टर आणि मिसेस देशमुखांच्या कारचा, ऍक्सीडेन्ट झालाय आणि ते दोघेही ऑन दि स्पॉट गेलेत. पण सरप्राइझिंगली त्यांची मुलगी वाचलीये. बट राईटनाऊ शी इज व्हेरी मच सिरीयस".
"त्यांना मुलगी होती?".
"हो. आपल्याकडून जागा घेतली, तेव्हा ते जस्ट मॅरीड होते रे. नंतर झाली म्हणजे.".
"देव त्या दोघांच्या आत्म्याला शांती देवो, त्या मुलीला लवकर ठिक करो. पण हे सांगायला तू मला इतक्या सकाळी फोन केलास? अगं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये तरी होते का ते?".
"देशमुखांची मुलगी फक्त दहा वर्षांची आहे रे आणि ती सिरीयस आहे. सायन हॉस्पिटलमध्ये आहे ती. तू जाशील जरा तिथे?".
"काय? मी तिथे जाऊ? अगं कशासाठी पण? आपला काही संबंध तरी होता का? आणि त्या इन्स्पेक्टरने आत्तापर्यंत, त्यांचे नातेवाईकही शोधून काढले असतीलच की त्यांनाही कळवलं असेल. तेव्हा तू हे काहीतरी उगीच, माझ्या गळ्यात मारू नकोस हा सुट्टी दिवशी."
"अनिकेत अरे त्या मुलीचा ब्लड ग्रुप, AB negative आहे रे. इट्स अ रेअरेस्ट ब्लड ग्रुप. जो तुझा आहे".
"सो व्हॉट?... हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये, तो उपलब्ध असणारच की".
"हाच ब्लड ग्रुप, आपल्या आईंचासुद्धा होता ना? आणि... आणि ते इन्स्पेक्टर मला काय म्हणाले माहितीये?".
"काय?".
"ती मुलगी बेशुद्ध पडण्यापूर्वी, एक शब्द म्हणाली होती. 'केतूsss'... जशी काही हाक मारली तिने कोणालातरी, मदत म्हणून कदाचित".
"काय?".
"हो अनिकेत. मला इन्स्पेक्टर तेच विचारत होते की, तुम्ही ओळखता का हे 'केतू' म्हणजे कोण आहेत? मला ऐकूनच कापरं भरलं रे. आपल्या आई गेल्या, तेव्हा जातांना तुलाच हाक मारून गेल्या होत्या. हे तुझ्याकडून ऐकलं होतं मी. म्हणजे बघ ना. आपलं घर विकत घेणाऱ्यांना, त्या घरी एक मुलगी होते. साधारण आपल्या आई गेल्यानंतर पाचेक वर्षांनी, त्यांचाच रेअरेस्ट ब्लड ग्रुप असलेली. आणि तिच मुलगी मरणाच्या दारात असतांना, तेच नाव घेते. ज्या टोपण नावाने तुला एकट्या आईच हाक मारायच्या".
"आभा...ही जी मुलगी आहे... ती... ती साधारण किती वाजता ऍडमिट झाली होती हॉस्पिटलमध्ये?"
"नक्की माहित नाही. पण ती अनकॉनशिअस झाली.आय मिन तुझं नाव जोराने घेऊन. तेव्हा पोलिस रेकॉर्ड नुसार, रात्रीचे साधारण साडे तीन वाजले होते. असं ते इन्स्पेक्टर म्हणाले. का रे?... असं का विचारतोयस?अनिकेत. हॅलो अनिकेत. अनिकेत काय झालं रे?".
आता आभाला समोरून, फक्त अनिकेतच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. मग तिनेही कट केला होता फोन, हे जाणून की आता अनिकेत तिथे पोहोचून त्या मुलीला वाचवण्यासाठी जीवाचं रान करेल. आभा स्वतः सुद्धा, लगेचच निघणार होती मुंबईसाठी. मेंदूला अतर्क्य वाटणारं काहीतरी, पडताळून पाहण्यासाठी. फक्त नी फक्त स्वतःच्या मनाचा 'कौल' सांभाळत. जो 'कौल' अर्थातच अनिकेतच्या मनानेही दिला होता, त्यांच्या संभाषणा अखेरीस. हुंदक्यांवाटे.
- सचिन श. देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा