सोमवार, १ एप्रिल, २०२४

1010. बाप

ऑफिसला जाता जाता उंबरा ओलांडतानाच मोबाईलची रिंग वाजली.
"हॅलो...ऽऽऽ मी बोलतोय...पलिकडून फक्त खोकण्याचा आवाज आला. तशी हातातली बॅग परत टीपॉय वर ठेवत कानाशी मोबाईल घट्ट पकडत आणि स्वतःलाच धीर देत विचारले "बाबा खोकला झालायं? तब्बेत ठीक आहे ना? "अरे मला काय धाड भरलीयं,तुझं सगळं ठीक चाललयं ना? फोन असाच सहजच...". पुन्हा खोकल्याची उबळ आणि फोन कट पाठोपाठ ताईचा फोन "हॅलो दादा, बाबांची तब्बेत पुन्हा बिघडलीय. मी आत्ताच ह्यांच्या बरोबर गावाला आलीए. "घाईघाईनं ताईही फोन बंद करते आणि माझ्या मनात चर्र...होतं. आता माझी गाडी गावाच्या दिशेनं चाललेली असते. शेजारीच बायको आणि मुलगा बसलेला असतो. नकळत गाडीचा वेग वाढत रहातो आणि आठवणीचं एकएक पान पलटत रहातं.
     समोर बाबांचा चेहरा दिसतो उभ्या आयुष्यात खूप काही सोसलेला तरीही न थकलेला. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या मध्ये हार-जीत,मान-अपमान, जखमा-घाव,आसू-हसू सारं काही गुंडाळलेला. खूप पावसाळे पाहिलेला. अनुभवाने रापलेला,तरीही शांत आणि समाधानी. लहानपणी मला प्रश्न पडायचा,खरचं कुठुनं आलो मी? त्यावेळी आजी मला जवळ घ्यायची आणि माझ्या जन्माची गोष्ट सांगायची.
"बाई गं !,त्यावेळी रात्र वैऱ्याचीच होती. काळयाकुट्टं अंधारात वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं. आभाळातल्या ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट पोटात भीतीचा गोळा उठवतं होता आणि घरात पोटातल्या वेदनेनं तुझी आई जमीनीवर तळमळत होती. आख्ख्या गावात एकमेव असणाऱ्या टेम्पोचं चाक नेमकं त्याच दिवसी फुटलं होतं. वीस पंचवीस मैलावर असणाऱ्या तालुक्याच्या थोरल्या दवाखान्यात पोहचायचं कसं? हा मोठा प्रश्न होता. पण तुझा बाबा डगमगला नाही. विनवणी करून त्यानं शेजारच्याची बैलगाडी मिळवली. त्यात अलगत आईला उचलून ठेवली. माळ्यावरची जुनी पत्र्याची पानं गाडीच्या दोन्ही दांडक्यावर आडवी टाकून तारेनं करकचून बांधली पुढून आणि पाठीमागून प्लॅस्टिकच्या कागदाचे तुकडे लावले आणि स्वतः भिजत आईला घेऊन तालुक्याला पोहचला. पाच दिवस दवाखान्याच्या बाहेर बाकड्यावरचं झोपला आणि येताना तू आणि तुझ्या आईला घेऊन सारं जग जिंकलेल्या राजासारखा थाटात गावात आला."
खरं तर बाबाचं माझ्यावर खूप प्रेम होतं पण त्याची खोली कधीच लक्षात आली नाही. कदाचित आईच्या मायेत या गोष्टीकडे कधी लक्षच गेलं नव्हतं. अर्थात आई आणि मुलांतील प्रेमाच्या रेसमध्ये बाबा कधीच नव्हते. लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून जत्रेतल्या गर्दीतून देवदर्शन घेताना बाबांची तोल सांभाळत धडपडणारी पाऊलं कधीच दिसली नव्हती आणि देवाचं दर्शन घेताना आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय हे ध्यानातचं आलं नव्हतं. आता मागे वळून पहाताना प्रत्येक गोष्टीचा नव्यानंच अर्थ लागतं होता.मी १२ वीला गेलो तेंव्हा बाबांनी फंडा वरचं कर्ज काढून टेरेसवर छोटीसी स्टडीरूम बांधली.अभ्यास करताना बाबांची सोबत असावी असं वाटायचं म्हणून समोरच्या भिंतीवर मीही बाबांचा फोटो लावला होता. माझ्या लग्नानंतर त्याच स्टडीरूमचं बेडरूम झालं. एकदा सहजच भिंतीकडे लक्ष गेल तेंव्हा तिथे बाबांचा फोटो दिसला नाही तेंव्हा त्याबद्दल आईला विचारलं तर ती म्हणाली "परवा खोलीची सफाई करताना बाबांच्याच हातून खाली पडून तो फोटो फुटला म्हणून त्यांनी तो काढून टाकला."
लग्नावेळचीच गोष्ट काही कारणामुळे नवीनच असणाऱ्या आमच्या नवरा-बायकोत वादावादी झाली आणि बायको माहेरी निघून गेली तेंव्हा माझ्या नकळत बाबा तिच्या घरी गेले. आपल्या सुनेची समजूत घालून तिच्या वडिलांना "काळजी करु नका. आता ती माझी मुलगी आहे."असं भरभरुन आश्वासन देवून आपल्या सुनेला परत घेवून आले. आपल्या सुनेत ते कायम आपल्या चिमणपरीला शोधत. मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई या सगळ्यासाठी बाबांच्या मनात एकाच ठिकाणी जागा होती. बहिणीचा भाऊ कसा असावा. भाच्याचा मामा कसा असावा. आत्या, काका, मावशी यांच्याशी आदराचं आणि जिव्हाळ्याचं नातं कसं ठेवावं हे सारे प्रेमाचे संस्कार बाबांच्या चालण्यात,बोलण्यात आणि वागण्यात दिसायचे. परीक्षेच्या आदल्या दिवसी गाढ झोपेत असताना कुणाचा तरी डोक्यावरुन हात फिरायचा तेंव्हा झोपेतचं कुशी बदलत समोर पाहिलं तर बाबाचं असायचे आणि न बोलताही त्यांच्या डोळ्यात लिहलेलं "ऑल दि बेस्ट" स्पष्ट दिसायचं. रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा, सायकल शिकवताना किंवा पोहायला शिकवताना "हो जमतयं जमतयं" असं म्हणत कॉन्फिडन्स वाढवतं नकळत हळूच हात सोडणारा, शाळेच्या पहिल्या दिवसी मी कितीही रडत असलो तरी माझा हात पकडून मला मुद्दामहून वर्गात बसवणारा, शाळा सुटेपर्यंत बाहेर थांबणारा आणि येताना आईस्क्रीमची कांडी देणारा बाबाच होता. आपल्या कुटुंबासाठी सदैव दरवाज्याच्या बाहेर बुलेटप्रूफ जॅकेट घालून उभा असणारा आणि घराबाहेरची वादळं बाहेरच थोपवणारा बाबाच होता. माझ्या पहिल्या पगारातून त्यांना घेतलेला रेडीमेड शर्ट साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत कौतुक करताना न थकणारा बाबाच होता.
    स्क्रॅचेच पडून पिवळसर झालेला चष्मा वापरणारे आणि बाटाचा जुना बुट पुन्हा पुन्हा पॉलिश करून वापरणारे बाबा,कॉलेजची भरमसाठ फी भरून येताना खरेदी केलेला लॅपटॉप माझ्या हातावर ठेवत म्हणायचे "खूप खूप अभ्यास करा,मोठं व्हा,प्रसंगी टाकीचे घाव सोसा,घराच नांव काढा, स्वाभिमानानं जगा पण सर्वात महत्वाचं केवळ स्वतःसाठी जगू नका आणि चांगला माणूस म्हणून जगा. आपल्या मुलांच्या उद्यासाठी स्वतःचा "आज" सॅक्रिफाईज करणाऱ्या बाबांच्या बोलण्यात खूप खूप आशिर्वादा बरोबरच तळमळ असायची. आईची तब्येत बरी नसली की,आज ऑफिसमध्ये कुणाचातरी वाढदिवस आहे असं खोटचं सागून डबा न नेता उपाशी राहणारे बाबा ताईनं केलेली बेचव भाजी मिटक्या मारत खातं पण जेवताना भांड्यातली संपत आलेली भाजी दिसली की मस्त पैकी ढेकर देत. ऑफिसात बॉस बनून ऑर्डर सोडणारे बाबा शाळेच्या वर्गशिक्षिकेने सांगितलेल्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे नोट करून घेतं.खरंतर बाबा आपल्या नोकरीवर मनापासून प्रेम करायचे.नोकरीला ते आयुष्याची भाकरी मानायचे.पण त्याच बरोबर आजारी असलेल्या आजीसाठी आणि आमच्या शिक्षणासाठी आलेली प्रमोशनची संधी घालवली तरी नाराज व्हायचे नाहीत कारण घरच्यांच्या सुखातचं त्यांना समाधान मिळायचं. आपल्या मुलांसाठी सुपरमॅन असणारे बाबा ताईच्या तोंडातून निघालेली कोणतीही गोष्ट पटकन जादूने काढायचे.नेहमी नशीबा पेक्षा कर्तुत्वावर बोलणारे बाबा माझ्या नोकरीसाठी आणि ताईच्या लग्नासाठी देवापुढे मनापासून प्रार्थना करायचे. आपल्या परीसारख्या मुलीसाठी राजकुमार शोधता शोधता झिजलेल्या चप्पलांकडे त्यांच कधीच लक्ष गेलं नाही.ताईच्या लग्न सोहळ्यात गुपचुप कोपर्‍यात उभं राहून मनातल्या मनांत ढसाढसा रडत "काही चुकलं तर पोरीला संभाळुन घ्या." असं दोन्ही हात जोडुन सांगणारे बाबा मिळालेल्या जावयाला देवदूत समजून गावभर मिरवत रहायचे.
आपण केलेल्या चुका मुलांच्या हातून घडू नयेत म्हणून लहानपणी कान पकडून आणि मोठेपणी ज्यास्तीत ज्यास्त मृदूभाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न बाबा करत असतं. असचं एकदा मी चांगल्या संधीबरोबरच पगारही वाढून मिळतोय म्हणून पहिली नोकरी सोडायची ठरवलं तेंव्हा आयुष्यभर एकाच संस्थेशी एकनिष्ठ रहात काम करणाऱ्या बाबाना थोडसं वेगळं वाटलं. मग मीही थोडीसी बंडखोरी करत बाबाना सांगितलं "बाबा तुमचा काळ वेगळा होता पण आत्ताचा काळ बदलला आहे. तुम्ही हार्ड वर्कर होता कबुल पण आम्ही स्मार्ट वर्कर आणि ब्रॉड मान्डेड आहोत.तुम्हाला आत्ताच्यातलं काही कळणार नाही". माझं हे बोलणं बाबांच्या लक्षात यायच नाही पण काळ बदलतो आहे आणि जेनेरेशन मधला गॅपही वाढत चालला आहे याची त्यांना जाणीव असायची म्हणूनच माझ्या या तारूण्य सुलभ सोईस्कर भूमिकेवर बाबा काहीच न बोलता माघार घ्यायचे. खरंतर मलाही अशावेळी चुकल्या सारखं वाटायचं आणि मी मनांतल्या मनांत त्यांची माफी मागायचो.
     बाबा रिटायर झाले आणि नेमक्या त्याच वर्षी माझं प्रमोशन होवून हैदराबादला पोस्टींग झालं. खरं तर हा चांगला योगायोग घडून आला होता. म्हणूनच मी आई-बाबांना कायमच्यासाठी हैदराबादला नेण्यासाठी आग्रह करत होतो. माझं मनं राखण्यासाठी बाबा माझ्याबरोबर आलेही पण केवळ आठवडाभरचं राहिले. मात्र जाताना बजाऊन गेले "पुढच्या वेळी माझ्याबरोबर खेळायला एक छोटासा नातू असला तरच कायमचा रहायला येईन." तसे बाबा अधूनमधून यायचे, आपल्या नातवाकडून स्मार्ट फोनची फीचर्स शिकता शिकता खूप दंगामस्ती करायचे. गुडघ्यात वेदना होत असतानाही घोडा घोडा करायचे आणि नातवाशी खोटी खोटी फायटींग करत त्याच्या नाजूक चापटीने गडाबडा लोळायचे. मागच्या दिवाळीत घरी गेलो होतो तेंव्हाच बाबांची तब्बेत खालावलेली दिसली पण त्यांना वाईट वाटेल म्हणून काहीच बोललो नाही.आपल्यामुळे कुणाला त्रास हेवू नये आणि आपली कोणाला अडगळं वाटू नये म्हणून बाबा अलिकडे एकटे एकटेच रहात होते.मनांत आलं की आपली जुनी बॅग उघडून बसायचे आणि त्यातील प्रत्येक कागद आणि वस्तू पुन्हा पुन्हा पहात, हाताळत परत आपल्या थरथरत्या हातानी बॅगेत ठेवायचे.का कुणास ठाउक पण ते कशाचीतरी बांधाबांध करताहेत असं वाटायचं. समोर गावची वेस दिसली तसा मी बाबांच्या आठवणीतून बाहेर आलो. गाडीचा वेग कमी करत गाडी घरासमोर थांबवली आणि लोकांची गर्दी पाहून छातीत धस्सं झालं. स्वतःला सावरत दगडा सारखा तिथचं थिजून उभा राहिलो. कुणीतरी धरून मला आत नेलं. सगळा जीव डोळ्यात आणून बाबा दरवाज्याकडेचं पहात होते. मी दिसल्या बरोबर ते हसले. धावतच जाऊन मी बाबाचा हात हातात घेतला. कितीतरी वेळ असाच निघून गेला.आणि अचानक ताई माझ्या गळ्यात पडून ओरडली "दादा,असं कसं झालं रे...बाबा तुला मलां पोरकं करून सोडून गेले रे..."
     तेराव्या दिवसी नदीच्या संगमावर अस्थी विसर्जन करत असतानाच हेड ऑफिसचा मेल आला. आता मलाही परत नोकरीच्या ठिकाणी जाणं भाग होतं. म्हणूनचं मनं थोडसं घट्ट केलं. बरेच दिवस एकाच ठिकाणी असलेली गाडी बाहेर काढली. तर समोर बायको तिच्या सासूची म्हणजे माझ्या आईची भरलेली बॅग घेवून उभी होती तर माझा लेक आपल्या आजीचा हात हातात घेवून तिला गाडीत बसवत होता आणि माझ्या बाबांचे संस्कार माझ्या मुलापर्यत झिरपत असलेचं पाहून माझ्या डोळ्यांच्या दोन्ही कडा भरून आल्या. सहजच मनांच्या गाभाऱ्यात डोकावलं तर तिथे बाबाचं होते,नेहमी सारखे हसतमुख डोळेभरून आपली बायको, मुलगा, सून आणि नातू या गोतावळ्याकडे पहाता पहाता, भरभरून आशिर्वाद देत होते आणि त्यांनी आजपर्यत जपलेली सगळी वडिलोपार्जित संस्काराची प्रॉपर्टी माझ्या नांवावर करत होते.

- राजन कृष्णराव पोळ
rajanpol8056@gmail.com 
७५८८२६४३२८
(कृपया सदरचा लेख शेयर केल्यास नावांसहीत शेयर करावा ही नम्र विनंती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...