मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

1026. देणं

       त्यांचं लव्ह मॅरेज. अगदी दोन टोकं होती त्यांची. त्याचं अगदी लहान काम करतानाही प्लॅनिंग करणं आणि तिचं पटकन मनात आलं आणि कृती करून मोकळं होणं. म्हणतात ना ऑपोझिट अट्रॅक्टस. तसंच काहीसं होतं. तिच्या सतत कोणाला काहीतरी देण्याच्या सवयीसाठी मात्र तो क्वचित रागवायचा. ती सगळ्यांच्या वाढदिवसाला छोटस काहीतरी द्यायची. कोणी घरी पहिल्यांदा आलं आहे म्हणून. कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. त्याच्या  बहिणींना राखी पौर्णिमा/भाऊबीजेचं त्यांच्या घरात नक्की कशाची गरज आहे हे शोधून त्या गोष्टी आणायची. ती इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायची. सहकारी मेस ला त्याच त्या जेवणाला कंटाळले म्हणून. एखादी गरोदर मैत्रीण असेल तर. जमेल तेव्हा सगळ्यांना डबा घेऊन जायची. काही बार्शी-लातूर भागातल्या शेतकऱ्यांची मुलं होती. घरून पैसे वेळेत मिळायचे नाहीत. मग कधी परीक्षेचे फॉर्म भरायला पैसे दे. कधी घरी केलेल्या खाऊची पिशवी त्यांच्यासाठी घेऊन जायची.
         त्याला हा तिचा स्वभाव कॉलेजमध्ये ते एकत्र शिकत होते तेव्हापासून माहीत होता. युवा महोत्सवाचा तिचा मित्र मैत्रिणींचा गृप होता. सर्वजण होस्टेलला राहणारे. 15 ऑगस्ट सुट्टी दिवशी चतुर्थी आली होती. मेसवर कधी फडफडीत तर कधी कच्ची खिचडी  खायची सर्व पोरा-पोरींच्या अगदी जीवावर आलं होतं आणि मेसचे महिन्याचे पैसे घरच्यांनी भरलेले असल्यामुळे. पैसे घालवून परत वेगळं खाणं घालवणारी ती मुलं नव्हती. बोलता बोलता तिला हे आदल्या दिवशी समजलं, लगेच तिनं त्या सर्वांना उद्या झेंडावंदन झालं की नाष्टा करायला माझ्या घरी जातोय. असं जाहीर केलं. उपवासवाल्यांना खिचडी आणि बिन उपवासवाल्यांना बघू आपण. तो तिला ओळखत होता. पण ती त्याला फक्त नावानं ओळखत होती. झेंडावंदन झाल्यावर हा होस्टेलला जायला निघाला आणि याचा रुममेट तिच्या घरी. ते दोघं बोलतच होते. तेव्हढ्यात ती तिथं आली. त्याचा उपवास असतोच. पण तो घरी येण्यासाठी संकोच करताना दिसल्यावर तिनं त्याच्याशी बोलून  त्याला आग्रहाने घरी आणलं होतं. आणि सर्वांनी कितीतरी दिवसांनी घरचा नाष्टा केला होता. तिच्या आईच्या हातच्या मऊसूत, खोबऱ्याने सजवलेल्या खिचडीवर आणि भोपळ्याच्या गरम घारग्यांवर यथेच्छ ताव मारला होता. सिग्नलवर भेटणारी लहान मुलं, लहान बाळांना घेऊन जाणाऱ्या बायका सगळ्यांना ती सुटे पैसे,बिस्कीट पुडे द्यायची.
     त्याची तत्व मात्र वेगळी होती. कष्ट करणाऱ्याला तो द्यायला नाही म्हणायचा नाही. कधी जोगवा मागणाऱ्या बायका/बहुरूपी आले तर तो त्यांना छोटीशी कामं सांगायचा आणि मग खुशीने काही देऊ करायचा. "जे नाही म्हणायचे त्यांना तो ही मग जमत नाही," म्हणायचा. तो स्वतः कितीतरी समाजोपयोगी संस्थांसाठी त्याचा वेळ,त्याचे श्रम द्यायचा. तिला कधीतरी रागवायचा,म्हणायचा, "तुझ्यासारखं वेड्यासारखं मी देत बसत नाही...!" 
     एकदा ते शेगावला गेले होते. सहकुटुंब. अगदी अचानक जोडून सुट्टी आली होती. भक्त निवासात जागा नव्हती. म्हणून ते दोघं आजी-आजोबा आणि लहान मुलाला मंदिरात बसवून बाहेर आले आणि रुम शोधू लागले. समोरच चहाची टपरी होती. चहा घेण्यासाठी ती दोघं गेली. त्यांची आपापसातली रूमची चर्चा ऐकून, चहावालीनं 'बोलू की नको,' अश्या विचारातच तिला विचारलं.
"ताई, बाजूला माझं छोटंसं घर आहे. येता, का, आमच्या घरी? खाली आम्ही रहातो. वरची खोली स्वच्छ करून घेतलीय. आत्ताच चार दिवसांपूर्वी नवीन गाद्या, उश्या आणल्यात. तेव्हढीच मदत होईल गरिबाला. तुम्ही म्हणला, तर रात्रीचं जेवण. सकाळचा नाश्ता पण देईन...!" 
   ते दोघं घर बघून आले. छोटंसं अंगण. रेखीव रांगोळी. झाडी. थोडंसं पण नीटनेटकं सामान..! त्याच्या उत्तरासाठी न थांबता तिनं पटकन सांगितले," मावशी आम्ही आलोच घरच्यांना घेऊन. मस्त गरम गरम पिठलं भाकरी खाऊ घाल आम्हाला...! " त्याला मात्र तितकं पटलेलं नव्हतं.
          ते आले त्यांच्या घरी. साधारण सहावी-सातवीतील एक मुलगी भांडी घासत होती. तिच्याहून थोडाच लहान मुलगा देवासमोर दिवा लावत होता. अंगणात त्यांची मस्त जेवणं झाली .तिचा मुलगा मनसोक्त बागडत होता. ती मुलगी आई आणि आजीला मदत करून आता अभ्यास करत होती. तिला सहज विचारलं, "तुझे बाबा अजून आले नाहीत घरी?" 
तर मुलीनं धडाधड सांगितलं. "ताई,ते गेले देवाघरी 4 महिन्यांपूर्वी. त्यांची चहाची टपरी आई बघती, आजी शेतीची कामं बघती. आता ही खोली भाड्यानं द्यायची.बापूंना मला खूप शिकवायचं होतं. आई अन आजी खूप कष्ट करत आहेत. मी खूप अभ्यास करेन आणि सर्वांचे कष्ट थांबतील अशी कमाई करेन.!"
   ते दोघेही एकदम निशब्द झाले. दुसऱ्या दिवशी चहा,पोहे खाऊन ते निघाले. तिने नवऱ्याला विचारले, 
"तुझ्याकडे आत्ता किती पैसे आहेत? मला हवे आहेत .मी माझ्या एटी एम् मधून तुला थोड्या वेळाने लगेच देते.....!"
        त्याला कल्पना आली होती. काही न बोलता त्याने खिशातले तीन हजार तिला काढून दिले. ती त्या आई आणि आजीकडे गेली आणि ते पैसे त्यांच्या हातावर ठेवले. त्या घेईनात. "फक्त भाड्याचे आणि जेवणाचे पैसे द्या", म्हणू लागल्या..तेव्हा ती म्हणाली, 
"ज्या जिद्दीने तुम्ही हे सर्व करताय. त्यापुढे हे काहीच नाही. अगदी छोटीशी मदत आहे." पोरीच्या मावशीनी दिले, असं समजा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करा." 
"त्या दोघींच्या डोळ्यांत पाणी जमलं होतं, हात जोडले गेले होते. ते आपल्या हातानं बाजूला करून, ओलावल्या डोळ्यांनी ती निघाली.
    तो वाट बघत उभाच होता,हे सर्व बघत. ती पटकन त्याला" सॉरी" म्हणाली..." चल..एटीएम शोधू,तुला पैसे देते."
तिच्या डोक्यावर टपली मारत. तिचे पाणावलेले डोळे पुसत..तो हसत म्हणाला.., 
"तू अशी वेडी आहेस. आणि वेड्यासारखी देणी देत राहतेस ना., म्हणून मी नव्यानं तुझ्या प्रेमात पडतो. आली मोठी पैसे परत करणारी. जा !बस गाडीत...! "
        तो काही म्हणाला, की, ती नेहमी त्याला तिची बाजू सांगायची ! तिच्या आईबाबांनी जवळच्या खेडेगावात छोटे दवाखाने सुरू केले. तेव्हा तिला व तिच्या छोट्या भावाला कुठे ठेवायचं. या प्रश्नामुळे आई घरीच थांबत होती. नव्याने जवळ राहायला आलेले रिटायर्ड बिडकर आजी-आजोबा पेशंट म्हणून घरी आले. नंतर त्यांनी "करमत नाही", म्हणून आमची जबाबदारी घेतली. शाळेतून आल्यावर आम्हाला जेवायला देणं. अभ्यास घेणं. हे तर केलंच..पण आजीआजोबांची माया व संस्कारही दिले. वळण लावलं. एक-दीड महिन्यांनी आईबाबांनी त्यांना पैसे देऊ केले तर ते चक्क रागावले होते. नंतर त्यांच्याशी अगदी घरोब्याचे संबंध निर्माण झाले, जे आजवर सर्वांनी जपले आहेत. आई बाबांनी ही खूप जीव लावला त्यांना. ती तेव्हा लहान होती. पण बिडकर आजी आजोबांची वाक्यं तिला आठवत होती.
"या देण्यातून आम्हाला निखळ आनंद मिळतो म्हणून आम्ही ही गोड जबाबदारी स्वीकारतो. " 
हे पक्कं तिच्या डोक्यात राहिलं होतं ."देण्यातून निखळ आनंद मिळणं" आणि तिचे आई बाबा पण तसेच होते की सर्वांच्या गरजेच्या वेळी जमेल तशी मदत करत राहणारे...! 
    आज ती त्याच्या फोटोसमोर उभी होती. सहा महिने झाले त्याला जाऊन. मित्रांसोबत ट्रीपला गेला. मित्राच्या ड्रायव्हिंगच्या चुकीमुळे की नियतीचा खेळ? माहिती नाही..तो जागीच गेला होता. तिला आणि तिच्या पाच वर्षाच्या मुलाला सोडून. तिचं मन त्याच्याशी संवाद साधत होतं. मला वेडी म्हणायचास ना तू? काय नी किती सांगू तुला?  इंजिनिअरिंग कॉलेजची अनियमित पगारामुळे मी सोडलेली नोकरी. आणि चार दिवसात तुझा ऍक्सिडेंट. घरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले सासू-सासरे., छोटा मुलगा...! "सगळं शून्य झालंय", असं वाटत असतानाच, तुझे ऑफिसचे मित्र मला जबरदस्तीने कंपनीत घेऊन गेले. इंटरव्ह्यू घेऊन, जॉईन करून घेतलं. तुझ्या कामामुळे पुण्याईमुळेच मला कंपनीत घेतलं. तू नसतानाही, केवढं मोठं देणं मला दिलंयस? तुझ्या अगदी जवळच्या मित्रांनी जबरदस्तीने अकाउंट नंबर घेऊन त्यात पैसे जमा केले. तुझ्या  बॉस कडून मला वीस हजाराचा चेक घरी आला. गेले सहा महिने आई-दादांच्या डॉक्टरांनी माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही तपासणीचा. आपल्या पिल्लूच्या डॉक्टरांनी पण नाही. त्याच्या ग्राऊंडच्या टिचरनी पण पैसे नाकारले. मी कंपनीत काम करण्याचं टेन्शन घेतलं,तर माझ्या स्टुडंट्सनी माझं काऊन्सलिंग केलं. "तुम्हाला जमेल सगळं!" असा धीर दिला. माझ्या मैत्रिणींनी तू गेलास, तेव्हा दोन आठवडे नाश्ता,स्वयंपाक घरपोच दिला. नंतरही मदत करत राहिल्या. नातेवाईक, भावंडं,नणंदांनी किती मदत केली याला तर गणतीच नाही. कंपनीतले तुझे काही मित्र तर 'मला अक्षरशः बहीण मानून मला जपत आहेत...! '  सगळ्या हितचिंतकांनी दिलेल्या आधारामुळे मी उभी राहतेय...! तुला तर, मीच वेडी वाटायचे...पण तुला सांगू. माझ्यापेक्षा खूप वेडी लोकं आहेत रे या जगात...! वेड्यासारखं देत रहातात...! आज सर्वांच्यासाठी अपार कृतज्ञता मनभर व्यापलीय...!
      विचारात हरवलेल्या तिने भरून आलेले डोळे अलगद पुसले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...