माई नी अण्णा एक सुसंस्कृत, सुखवस्तू जोडपं.चाळीस वर्षांपुर्वी रीतसर कांदेपोहे खाऊन, मोठ्या मंडळींच्या देखरेखीत होणार्या बघण्याच्या कार्यक्रमात. जुजबी दोन-चार प्रश्न विचारुन, दहा मिनिटांत आयुष्याचा निर्णय घेणार्या पीढीतील खरंतर. पण त्यावेळी या दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं. तेही पळून जाऊन. माईंनी अण्णाना पळवलं होतं.
माई. पुर्वाश्रमीच्या वैजयंती रोटकर, एका अतिशय सधन नी पुढारलेल्या कुटुंबातील. आई-वडिल दोघंही ऊच्चशिक्षीत. नी त्या काळी आग्री समाजातील एक मानाचं कुटुंबं. वडिल अतिशय शौकीन मिजास असलेले. टापटीप रहाण, ऊंची खाणं - पीणं, नाटक - सिनेमे बघणं असे शौक राखून असलेले. वैजयंतीमाला चे डायहार्ड फॅन नी 'नया दौर', 'कठपुतली', 'मधुमती' हे नी तीचे बरेच पिक्चर्स डझनावारी बघितलेले. तीच्यावरुनच आपल्या एकुलत्या एक मुलिचं नाव ठेवलेले. वैजयंती त्याकाळी काॅन्व्हेंटमध्ये शिकलेली नी सिडनेहॅम ची ईकोनाॅमिक्स स्टुडंट. प्रचंड हुशार नी अतिशय लेव्हल हेडेड.
अण्णा... निळकंठ गोखले, दापोलीच्या गोखले मास्तरांचा पाचवा मुलगा. मास्तर म्हणजे पोस्ट मास्तर. शंकराचे कडवे ऊपासक. पुजा - अर्चा, सोवळ्या - ओवळ्यावर प्रचंड भीस्त असलेले. कडक शीस्तीचे नी 'सातच्या आत घरात' नी मग देवासमोर शुभंकरोती नी पाढे, हा कायदा घरातील प्रत्येक मुलाला राबवायला लावणारे. चार मुलींच्या पाठीवर आलेला हा नवसाचा निळकंठ. घरात सगळ्यांचा लाडका, पण म्हणून फाजील लाड कधीच न झालेला. पराकोटीचा मेहनती. अव्वल दर्जाचा हुशार. एम.काॅम झालेला नी पुढलं ध्येय गाठायला मुंबईत स्थलांतर होऊन आलेला. आपलं घरटं मागे सोडून.
काॅटनचा पायजमा, अंगावर खादीचा सदरा, पायात वाजणार्या कोल्हापुरी चपला अशा वेषात निळकंठ, मुंबईच्या नॅशनल लायब्ररीमध्ये वैजयंतीशी टक्करला. तीच्या हातातील आठ - दहा पुस्तकं जमिनीवर ऊताणी आपटली तोंडावर. तर ह्याच्या चपलेचं नाक तुटलं पार मुळापासून. सामान्य लोकांनी एकमेकांवर आगपाखड केली असती. पण ही दोघं? वैजयंती चुपचाप खाली वाकली पुस्तकं ऊचलायला तर निळकंठला प्रश्न पडला चांभारावर पैसे खर्च झाले, तर समग्र कार्ल मार्क्स घेण्यासाठी चाललेली बचत कोलमडणार. निळकंठच्या चेहर्यावर ऊमटलेली चींता, वैजयंतीच्या डोळ्यांनी टिपली. तीने विनासंकोच त्याची चप्पल ऊचलली, नीट तपासली नी म्हणाली. "दोन - चार रुपये घुसणार तुमचे यात. कशावर नेमकं पाणी सोडावं लागणारेय तुम्हाला?. मी देऊ केलेले पैसे तर तुम्ही घेणार नाही. ईथे अंध लोकांना पुस्तकं वाचुन देण्याचं काम करणारं हवय कोणितरी. मी तुमच्यासाठी शब्द टाकून बघते. जे काही मीळेल ते. काय म्हणता?" निळकंठ अवाक् होऊन बघतच राहिला. अशा तर्हेने निळकंठला मुंबईतील पहिली नोकरी मिळाली नी चप्पलही शिवली गेली त्याची.
मग रोजच गाठी - भेटी व्हायला लागल्या दोघांच्या. गप्पाही रंगायला लागल्या दोघांत. वादही होत असत पण अतिशय सशक्त असे. एकमेकांच्या विचारांचा आब राखत. एव्हाना दोघांनाही एकमेकांची कौटुंबीक पार्श्वभुमी कळून चुकली होती आणि अजून पुढे काही हे आपलं जाऊ शकत नाही, हे सुद्धा. दापोलीच्या बर्यापैकी कर्मठ चित्पावन ब्राम्हण कुटुंबातील निळकंठ. नी मुंबईतील अप्पर मिडल क्लास ला बिलाॅन्ग करणार्या कुटुंबातील, आग्री समाजातील वैजयंती. पण असच हातचं जाऊन देतेय ती वैजयंती कसली. एकेदिवशी वैजयंतीने निळकंठला विचारलच "तू माझ्यात नक्की काय शोधतोयस? एक जिवाभावाची मैत्रीण जी पुढे जाऊन कदाचित दुरावूही शकते. की एक बायको जी कायम तुझी सोबत करेल, एकतर तू असेपर्यंत कींवा ती असेपर्यंत. तुझ्याकडून आत्ताच मला एकच ठाम ऊत्तर हवय. ज्यावर मला ठरवता येईल की मी ईथे थांबायला हवय की निघायला हवय ताबडतोब".
निळकंठला कळुन चुकलं होतं खरंतर आधिच, पण आता शिक्कामोर्तब झालं होतं की या मुलीशिवाय आपली बायको दुसरी कोणी असूच शकत नाही. त्याच्या तोंडून नकळतच बाहेर आलं "माझी जिवाभावाची मैत्रीण होऊ शकेल, जी कायम सोबतही राहिल माझ्या अशी बायको बघतोय मी तुझ्यात". वैजयंतीला तीचं ऊत्तर मिळालं होतं नी दोन दिवसांतच दापोलीला पोहोचली होती ती, तीच्या बाबांना घेऊन. ज्यांची परवानगी तीने गृहितच धरली होती, अगदी न मागताही. त्यांचा तीच्या निवडीवर असलेला भरवसा लक्षात घेऊन.
गोखल्यांकडे भुकंपच आला जसा काही. पंतांनी अतिशय संयतपणे परिस्थीती हाताळत, रोटकरांसमोर हात जोडत. त्यांना नम्रपणे नकार दीला होता. "निळकंठ समजुतदार आहे. त्याचा निर्णय अंतिम राहिल. पण या घराचे दरवाजे त्याच्याकरता कायमचे बंद होतील. आपण लांबुन आलेला आहात, तेव्हा आजच्या दिवस मुक्काम करुन ऊद्याच नीघा". वैजयंती नाही थांबली पण एक तीने पक्क केलं मनाशी की हे सासर मी सोडणार नाही. आज न ऊद्या गोखल्यांकडचे मी नक्की वळवेन माझ्याबाजुने, माझ्या वर्तणुकीने. निळकंठ नी वैजयंतीने कोर्ट मॅरेज केलं. "ज्या दिवशी मी तुझ्या घरच्यांना जिंकेन, त्याच दिवशी आपण माझ्या घरच्यांचाही आशिर्वाद घेऊ". ती म्हणाली होती.
पुढच्या दोन वर्षातच निळकंठच्या घरचे वैजयंतीची तारीफ करतांना थकत नव्हते. जग जिंकल्याचा भास होत होता दोघांनाही. एक छानसा दिवस ठरवून एकत्रीत थोरा मोठ्यांच्या पाया पडण्याचाही कार्यक्रम झाला होता. पोटुशी असलेल्या वैजयंतीला भरभरुन आशिर्वाद मिळाले होते गोखल्यांकडून. भुर्रकन ऊडून गेले होते दिवस नी आज साठीच्या माई आणि पासष्ठीचे अण्णा मुला-नातवंडांच्या गराड्यात बसले होते. त्यांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस होता आज. फाॅरेनला स्थाईक असलेल्या दोन्ही मुलांनी, आपापसात संपर्क साधुन हा सरप्राईज सोहळा प्लॅन केला होता. केक कापला... टाळ्या वाजल्या... गाणी झाली... नी अण्णा बोलायला ऊभे राहिले.
"आज तुझ्या केसांत मी
गजरा माळणार आहे.
चाळीस वर्षांपुर्वी लाजायचीस तश्शीच लाजलीस
की मीही तुला अगदी तस्सच अलगद ऊचलणार आहे"
माई गोड लाजल्या. नी अण्णांनी त्यांच्या केसांत मोगरा माळून, त्यांना चक्क ऊचलुन घेतलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या ऊपस्थित लहान, मोठ्या जिवण्या आनंदाने पसरल्या. माई अण्णांच्या गळ्यात दोन्ही हात टाकून, त्यांच्या डोळ्यांत बघून म्हणाल्या.
"आज तुझ्या डोळ्यांतून मी
शेवटचं तुझ्या मनात ऊतरणार आहे
तुझ्या अंतरातुन सतत तेवणार्या मला
मीच आज फुंकर मारुन विझवणार आहे"
आणि माईंनी डोळे मिटले कायमचेच. हो, हे सगळं त्या हाॅस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये झालं होतं, जीथे गेले सहा महीने माई दुर्धर आजाराशी लढत होत्या. दोन दिवसांपुर्वीच डाॅक्टरांनी कल्पना दिली होती. नी त्याच अनुषंगाने दोन्ही मुलांनी, हे आजचं सेलिब्रेशन आखलं होतं. सुखान्त यावा वाट्याला तीच्या ह्या ऊद्देशाने. अण्णांनी माईंना वाहत्या डोळ्यांनी कवटाळुन घेतलं. असेपर्यंत सोबत देण्याचा दिलेला शब्द, माईंनी पाळला जो होता. आणि अचानकच अण्णांना जाणवलं, की त्यांच्या पायातील चप्पल आज पुन्हा तुटलीये.
-सचिन श देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा