एकदा एका वर्गात एका गणिताच्या शिक्षिकेने सर्व मुलांना स्वतः सोडून बाकीच्या सर्व आपल्या वर्गमित्रांची नावे दोन पेपर वर लिहायला सांगितली व प्रत्येक नावाच्या बाजूला थोडी जागा ठेवायला सांगितले. त्यानंतर आपल्या प्रत्येक वर्गमित्राबद्दलची एक चांगली गोष्ट त्याच्या नावाच्या शेजारी लिहायला सांगितले. वर्गाचा जवळ जवळ पुढचा सर्व वेळ मुलांचा ते लिहिण्यातच गेला. त्या शनिवारी त्या शिक्षिकेने एका वेगळ्या नव्या पानावर प्रत्येक मुलाचे नाव व त्याच्या शेजारी प्रत्येकाने त्याच्या बद्दल लिहिलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा लिहुन काढल्या. सोमवारी वर्गात गेल्यावर तिने प्रत्येक मुलाला आपापला कागद दिला. थोडा वेळ होतो न होतो तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती व प्रत्येकजण खुप खुश होता. मला नव्हतं माहिती मी कोणाला इतका आवडू शकतो, मी कोणासाठी तरी इतका महत्त्वाचा असू शकतो' सर्व कॉमेंट्स ह्या अशाच खूप सकारात्मक व कौतुकास्पद होत्या. त्यानंतर ह्या पेपर्सची वर्गामध्ये कधीही चर्चा झाली नाही. शिक्षिकेला माहित देखील नव्हते की मुलांनी आपापसात त्या गोष्टींची चर्चा केली अथवा नाही केली. घरी पालकांना सांगितले की नाही सांगितले. तिला त्या गोष्टीशी काही देणे-घेणे देखील नव्हते. तिचा हेतू साध्य झाला होता. मुलं एकमेकांवर व स्वतःवर प्रचंड खुश होती.
अनेक वर्षानंतर तिचा एक विद्यार्थी कारगिलच्या युद्धात शहीद झाला. शिक्षिका ह्या विशेष विद्यार्थ्याच्या अंतिम संस्काराला गेली होती ह्या आधी त्या कधीही सैनिकाच्या अंतिम संस्काराला गेल्या नव्हत्या. त्याच्या चेहऱ्यावर जणू काही एक विशेष शांति विलासत होती. जागा गच्च भरली होती. प्रत्येक मित्र व बाकी सगळे त्याला शेवटचा प्रणाम करून बाजूला होत होते. शिक्षिकेने सर्वात शेवटी अंतिम दर्शन घेतले.
तेवढ्यात एक सैनिक तिच्यापाशी येऊन म्हणाला, "तुम्ही संजयच्या गणिताच्या शिक्षिका होता का?" त्यावर होकार दिल्यावर तो सैनिक म्हणाला, "संजय तुमच्या बद्दल खूप बोलायचा."
अंतिम संस्कार झाल्यावर संजयचे बरेचसे वर्गमित्र, त्याचे आई-वडील व बरेचजण त्या शिक्षिकेशी बोलायला उत्सुक होते.
संजयचे वडील म्हणाले, "तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे." असे म्हणून पाकिटातून दोन चिकटवलेले, चुरगळलेले कागद काढून म्हणाले, "आम्हाला वाटलं तुम्ही ओळखाल. आम्हाला हा कागद संजयपाशी मिळाला." तो कागद बघताच तिच्या लक्षात आले की तो कुठला कागद होता ते. अनेक वर्षा पूर्वी सहज म्हणून घेतलेल्या ऍक्टिव्हिटीचा कागद होता तो.
संजयची आई म्हणाली, "तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुलांकडून ती सकारात्मक ऍक्टिव्हिटी करून घेतली. संजयने तो कागद आयुष्यभर जपून ठेवला होता."
संजयचे सर्व वर्गमित्र हळूहळू त्या शिक्षिके भोवती जमा व्हायला लागले. अर्जुन थोडे स्मितहास्य करून म्हणाला, "तो कागद माझ्याकडे अजून आहे. मी तो माझ्या ड्रॉवर वर लावून ठेवलाय."
पृथ्वीराजची बायको म्हणाली, "पृथ्वीराजनी मला त्याचा कागद आमच्या लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये लावायला सांगितला होता."
रश्मी म्हणाली, "माझ्याकडे पण तो कागद अजून आहे. माझ्या डायरी मध्ये आहे."
त्यानंतर दिपाली. तिच्या पाकिटातून तिने तो अर्धवट फाटलेला, चुरगळलेला कागद सर्वांना दाखवला आणि म्हणाली, "मी हा कागद माझ्या जवळ कायम ठेवते. मला वाटते आपण सगळ्यांनीच आपापले कागद खूप जपून ठेवलेत."
हे सर्व बघून, ऐकून शिक्षिकेचे मन भरून आले, स्वतःच्या भावना सावरू न शकल्याने तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते.
आपण एकमेकांचे दोष इतक्या पटकन प्रकर्षाने बघतो व आत्मसात करतो की आपल्या लक्षातच येत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुण देखील आहेत आपलं थोडंसं देखील एकमेका बद्दलचे गुण बघणं, एकमेकांचे कौतुक करणं व समोरच्याला सांगणं की तो-ती आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे व किती आवडता आहे. हे त्या व्यक्तीची आयुष्यभराची पुंजी होऊ शकते. पेराल ते उगवेल. कायम गुण व प्रत्येकातला चांगलेपणाच फक्त बघावा.
दोष तर सर्वांच्याचकडे असतात. पण दोष बाजूला सारुन गुणांची कदर करणेच जास्त महत्त्वाचे आहे, नाही का?
मिलिंद पंडित, कल्याण,
डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा