शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

1060. सादेला प्रतिसाद

  माहिती नाही,यावर का लिहावेसे वाटले.पण "Experience makes man perfect " हे बोलायला खूप सोपे आहे.तसेच हे अनुकरण किती जण करतात? हा ही मोठा प्रश्न आहे.
    झाले असे,परवा मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि नेमकीच मी एक  नाटक बघायला गेले होते. फोन सायलेंट वर असल्याने मी तिला मेसेज केला, "काही अर्जंट आहे का"? नाहीतर घरी गेल्यावर आरामात फोन करते, तर चालेल म्हणाली. नाटक आटपून मी घरी गेल्यावर तिला फोन लावला, तर तिने स्वाभाविक प्रश्न विचारलेच. कोणते नाटक? कोणा बरोबर गेली होतीस? आणि बरेच काही. जेव्हा तिला समजले, की मी एकटीच नाटकाला गेले होते तेव्हा ती तीनताड उडाली. म्हणाली कसे काय जमवतेस ग तू? मला तर नाही बाबा जमणार. मग माझे स्पष्टीकरण ऐकून तिला कदाचित माझा निर्णय बरोबर वाटला असावा.
     माणूस हा समाज प्रिय असतो.क्वचितच एखाद्या अपवादात्मक प्रकरणी माणूस  एकलकोंडा किंवा माणूसघाणी होतो. प्रत्येक वेळेस साथीदार आपल्या बरोबर येईलच अशी परिस्थिती नसते .आणि कधीकधी काही गोष्टीं आपल्या मैत्रीणीं बरोबर एंजॉय करायची मजा वेगळीच असते.म्हणूनच जेव्हा जेव्हा माझ्या मनात काही येते, म्हणजे एखादे नाटक किंवा पिक्चर बघावा, कधीतरी लंच किंवा डिनर ला जावे, एखादी पिकनिक किंवा ट्रीप,एखाद्या प्रदर्शन ला भेट, किंवा माॅल मधे जावून विंडो शाॅपिंग आणि खादोडी करून एखादा उनाड दिवस जगावा, तेव्हा  मी ज्या कोणी  माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांना  विचारून बघते. पण आज अनेक वर्षांपासून चा माझा अनुभव खूप वेगळा आहे. फार क्वचितच पटकन तयार होणारे काहीच अपवादात्मक मेंबर्स आहेत.😌
      इतर ठिकाणी मग होते काय, चर्चा इतकी खोलवर होते की योजलेली गोष्ट बरेच वेळा होतच नाही आणि त्यामुळे माझा मात्र हिरमोड होतो आणि म्हणूनच मी हा मार्ग अवलंबायचा ठरवला. आपल्याला वाटते म्हणून प्रत्येक वेळेस सगळ्यांनी यायलाच पाहिजे हा अट्टाहास का करावा? आणि नाही कोणी आले म्हणून कोणावरही राग रूसवा का करावा? आणि मग जसे हल्ली सोलो ट्रीपचा ट्रेंड आलाय तसेच ही सोलो भटकंती करायचे मी ठरवले. हे सगळे ऐकल्यावर मैत्रीण पण खूप भावूक झाली. आणि तिने तिच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला.
    झाले असे, तिच्या एका दुस-या ग्रृप मधली त्यांची एक मैत्रीण सारखी ग्रृप वर मेसेज करून आपण भेटूया, कुठेतरी जावूया असे सांगायची. पण तिला फारसे कोणी सिरीयसली घेतले नाही. दरवेळेस बरेच जण अनेक कारणे देऊन तीला नंतर कधीतरी भेटू या असे खोटे आश्वासन द्यायचे.☹️ नंतर बरेच दिवस तिचा काही मेसेज नाही म्हणून चौकशी केली असता ती मैत्रीण एका गंभीर आजाराने आजारी असल्याचे कळले. तेव्हा सगळेच त्रस्त झाले. बरेच जण तिला प्रत्यक्ष भेटून आले. काहीनी तिची फोनवरून चौकशी केली पण उपयोग काय? माणूस जेव्हा आयुष्याच्या अंतिम क्षणाजवळ असतो तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत आणि म्हणूनच जेव्हा कोणी तुम्हाला साद घालतो तेव्हाच शक्य असल्यास हो म्हणायला शिका, किंवा प्रतिसाद द्या. खरेच आपण न भेटण्याची कारणे देतो ती खरोखरच त्या माणसाच्या आनंदापेक्षा इतकी किंमती असतात का?  याचाही सगळ्यानी प्रामाणिक विचार करावा.नाहीतर नंतर पश्चाताप करून काहीच फायदा नाही.
    अनेक लोकांना सवय असते,ती म्हणजे त्यांच्या बीझी शेड्यूल मधे जर त्यांना कोणाचा फोन आला तर ते रीसीव्ह करत नाही आणि त्या व्यक्तीला पुनःच्छ काॅल बॅक करायचे सौजन्य ही दाखवत नाहीत. 😔पण सगळ्यांना हे कळायला पाहिजे की एखादी व्यक्ती जर आपल्याला दोन तीन वेळा काॅल करते तर निश्चितच त्याचे काहीतरी महत्वाचे काम असणार, किंवा आपली त्याला गरज असणार. पण बरेच वेळेस दुर्दैवाने याची जाणीव सगळे काही संपून गेल्यावर होते.आणि त्या वेळेस पश्चातापा व्यतिरिक्त काहीही हातात रहात नाही.😔म्हणूनच एखाद्याने साद घातली तर त्याला  प्रतिसाद द्यायला शिका.
     माझ्या मैत्रिणीची घडलेली एक गोष्ट.दोन्ही मुलगे परदेशात आणि ही येथे यजमानां बरोबर. डायबेटिस अचानक वाढल्याने सिरीयस झाली तेव्हा हाॅस्पिटल मधून यजमानांना सांगून तिच्या एका खास  मैत्रीणीला फोन करून कसेही जमव पण मला येवून आजच्या आज ताबडतोब भेट, खूप महत्वाचे बोलायचे आहे असा निरोप दिला. त्या मैत्रिणीने विचार केला उद्या सकाळीच जाईन.पण दुर्दैव असे त्या मैत्रिणीने  मध्यरात्रीच या जगाचा निरोप घेतला.😢आज त्या दुस-या मैत्रिणीला आयुष्यभर ही खंत रहाणार की मला शक्य असताना मी का लगेच गेले नाही? आणि तिला असे काय मला सांगायचे असेल?
     या आणि अशा अनेक अनुभवातून एक गोष्ट मी नक्कीच शिकले, की आपण कितीही कामात व्यग्र असलो तरी तुम्हाला कोणी हाक दिली तर त्याला ओ म्हणून त्याचे म्हणणे ऐकून घ्या. न जाणो आपल्या या कृतीमूळे त्या व्यक्तीचे काही भले होईल, किंवा आपण दिलेल्या प्रतिसादाने त्याच्या आयुष्यात आनंद येणार असेल. दरवेळेस वेळ नाही किंवा बिझी आहे अशी न पटणारी कारणे देऊन समोरच्याचा हिरमोड होणार नाही याची काळजी घ्या. कसे आहे न,वेळ कोणासाठी थांबत नाही. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला भक्ती भावानेअर्पण करतो,तेव्हा तो परमात्मा तर खूष होतोच  पण आपल्या जिवाला आणि मनाला ही खूप वेगळेच समाधान मिळते आणि त्या चंदनाचा सुगंध ही तुमच्या हाताला बराच वेळ राहून तुम्हाला त्या परमात्म्याला दिलेल्या सुखाची सुखद जाणीव देत राहतो.😌 अगदी तसेच आहे येथे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला समजून घेऊन त्याला प्रतिसाद देतात किंवा त्याच्या मनाप्रमाणे वागतात तेव्हा त्याला झालेल्या आनंदाने तुम्हीही सुखी होतात.😍😍
      आयुष्यात आपल्याला दुसरे तरी काय हवे असते? आणि सुख म्हणजे हेच असते, जे फार कष्ट न करता अगदी सहजच मिळते.😌👍🏻👍🏻
       
 सौ.केतकी किशोर १२/०४/२०२४.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...