गरीब घरचा कुणी विद्यार्थी आलाच तर त्याची राहायची सोय व्हावी म्हणून मागच्या बाजूला बांधलेली छोटी खोली, सहा महिन्यां पासून रिकामी पडून होती. चिमण्यांची नजर ज्वारी नाचणीचा दाणा जसं शोधत असते तशी माझी नजर, विद्यार्थी शोधत होती. या वर्षी शाळेत, गावातलीच मुलं होती. सगळ्यांची आपापली घरटी होती. माझ्याकडे येणार तरी कोण?
मास्तर, आहात का? रविवार पहाट होती. मागच्या अंगणाची साफ सफाई करत होतो.
कोणय?
मी आहे. पांडुरंग ! या आता इकडे, मास्तर !
पांडुरंग ! आलो. तुझं दर्शन आपसूक होतंय. आलो.
मास्तर, हा पोरगा बघा. बघा त्याच्याकडे जाग्या डोळ्यांनी, मास्तर ! माझ्या झोपडी बाहेर बसून होता. फांदी सारखं अंग वाकडं तिकडं झालं होतं. गरम पाणी टाकलं अंगावर, तेंव्हा झालाय सरळ! शाळेसाठी आलाय म्हणतोय.
शाळेसाठी आलाय? छान ! ये...नाव काय? पांडुरंग जवळ उभ्या मुलाला विचारलं. आधी विचारपूस करायला हवी होती. नंतर वाटून गेलं. मुलगा छान वाटला. डोळ्यां इतकी माणसां कडे हुशारी असती, तर...तर, माणसं अशी का दुर्लक्षित राहिली असती कधी?
वासुदेव !
वासुदेव? छानच नाव आहे ! ये...पांडुरंग तू पण ये. चहा ठेवतो. पोळी? पोळी खाशील ना? ये.
चहा घेऊन झाल्यावर, पांडुरंग निघाला. पाया पडला. देव तो, माझ्या पाया का पडतो, मला नाही कळायचं.
गुरुजी, आता हा तुमच्या पंखा खाली आहे बघा..निघतो मी. जाता जाता पांडुरंग बोलला. ही माणसं म्हणायला अशिक्षित, पण बोलतात किती छान! पंखा खाली...!
वासुदेव, ये इकडे. ही बघ, ही खोली आज पासून तुझी. खोली समोरचं आंगण पण तुझं. मला घर, परिसर स्वच्छ ठेवायची वाईट सवय लागलीय. सहा महिन्यां पासून खोली रिकामी आहे पण माहितीय. रोज साफ सुफ करून ठेवतो. त्या कोपऱ्यात माठ आहे, बादली पण आहे. बाहेर आड आहे. अंघोळीचं पाणी आडात जाणार नाही, काळजी घ्यावी लागेल. काही हवं असेल तर मागून घे. असा अस्वथ का आहेस?
गुरुजी..माझ्याकडे भाडं देण्यासाठी पैसे नाहीयत.
भाडं? आहे तर ! या फुल झाडांची काळजी वाहायची आणि. तो तिकडे रांजण दिसतोय ना, तो भरून ठेवायचा ! आता सांग, कोणत्या वर्गात प्रवेश हवाय तुला?
सातवी.
म्हणजे मग चार वर्षे आहेस की इथे ! राहा आरामात. आता थोडावेळ आराम कर. तुला चादर, सतरंजी आणून देतो. जेवण? जेवणाचं काय? मी वरण भात खाणारा. तुला चालेल?
गुरुजी, मी स्वयंपाक छान करतो.
खरंच? मग आज पासून आपल्या दोघांचं जेवण बनवायची जिम्मेदारी, तुझी ! ठरलं? आलोच मी. ही चादर.सतरंजी ! छान पैकी झोप काढ.
जेवण, उत्तमच आहे ! घरी कोण कोण आहे तुझ्या?
कुणी नाहीय. एकटा आहे मी.
वासुदेव कधी का एकटा असतोय? असू दे. आता आज पासून मी आहे !
वासुदेव आला त्या गोष्टीला, वर्ष झालं. दिवस कडे गेल्ये, नाही समजलं. घरी परतायचो ते, घरा साठी. वाटायचं, त्याला एकटं राहायची सवय आहे कुठे? आता, घरात राहाणारा वासुदेव घरी परतण्याचं कारण बनला. तो आल्या पासून बाग पण सतत फुललेली असायची. उशिरा का होईना, माझ्या आयुष्याने मोहोर धरल्याचा आनंद, नक्की होता. वासुदेवचं, आठवी पूर्ण झालं आणि मी, सेवेतून बाहेर पडलो. निवृत्त झालो. सांगलीला शशी ताई कडे जाऊन राहायची अनेक वर्षांची इच्छा अशी पूर्ण होणार होती. ताई एकटी, सत्तरी ओलांडून पुढे गेलेली. एक मुलगा, परदेशात स्थायिक झालेला. मोठं घर. तिच्या म्हातारपणात माझी तिला साथ होईल, असं वाटत होतं. मोठ्या कष्टाने बांधलेलं माझं छोटं घर, वासुदेव च्या नावे करण्याचा विचार , खूप आधीच पक्का झाला होता. सामान बांधून झाल्यावर त्याला सांगायचं, ठरवलं होतं.
गुरुजी, मला नकोय काही. एक गोष्ट सांगू? चार सहा दिवसां साठीच जा तुमच्या ताईकडे. पण..
पण, काय? सांग...ऐकायचंय मला.
इथे यायच्या आधी मी ज्या आश्रम शाळेत होतो तिथले गुरुजी सांगायचे,
रक्ताची नाती वाहाती ठेवायची असतील, तर जेवणं एकत्र पण घरं वेगवेगळी असावीत. वासुदेव बोलला.
खरंय तुझ्या गुरुजींचं. करायचं काय ! ताई एकटी असते, म्हातारपणी मागे लागणारी दुखणी पाठीशी आहेत. वाटतं, लहान पणी तिने माझं खूप केलंय आता.
गुरुजी, कांही दिवस राहून परत या. घर मला नकोय. हो, काही दिवसांनी तिथेच राहावंसं वाटलं तर..तर बघुयात! वासुदेव बोलला. माझं एक काही ऐकलं नाही त्याने.
ताईकडे आलो, तब्येत एकदम ठणठणीत झाली. रोज वेग वेगळे पदार्थ करून खाऊ घालणारी ताई ची स्वयंपाकीण, कुसुम आणि चहा नाश्त्याचे लाड पुरविणारा भालू ! आठवडा कसा गेला, नाही काही कळलं.
राजा, जाणारयस कधी? ताई ने विचारलं.
जाणारय? ताई, मी इथेच राहायचा विचार करून आलोय. तू एकटी असतेस ना, तुझी देखभाल.
माझी देखभाल? काही गरज नाहीय. बघतोयस ना, भालू आणि कुसुम चोवीस तास सेवेत असतात ते ! इथे राहाशील, मग तुझ्या घराचं काय?
घराचं? सांगायचं राहून गेलं. माझ्याकडे एक विद्यार्थी राहायला असतो, तुला माहितीय. दोन वर्षां पूर्वी वासुदेव नावाचा विद्यार्थी आलाय. अनाथ आहे. मोठा गोड आहे. घर त्याच्या नावे करायचा विचार आहे पण माहितीय, ताई, त्याला घर नकोय अग !
घर अनाथ पोराच्या नावे करणार आहेस? तुझा भाचा, तो काय मेलाय होय? घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. काय रे, माझी काळजी वाटते म्हणतोस आणि मग असे कांही निर्णय एकट्याने घेतोस? अरुण अमेरिकेत असला म्हणून काय झालं? घर दार, मग ते कुठेही असो, कुणाला नको असेल होय? ताई म्हणाली.
संध्याकाळी मंदिराच्या पारावर बसलो. वासुदेव पुढ्यात आहेस वाटलं. साठी ओलांडून पुढे आलो होतो तरी, आयुष्य नावाच्या साटोरीत कुठलं म्हणून सारण असतं, मला का कळलं नसावं? वासुदेव. बारा तेरा चा पण..काल परवा ज्या गोष्टी त्याने मला सांगितल्या त्या. माझा घसा भरून आला. प्रसाद. कुणीतरी आवाज दिला म्हणून वळून पाहिलं. पुजारी होते.
जेवणा वर इच्छा नव्हती. कुसुमला सांगून खोलीत परतलो. बाहेर काढलेले कपडे, पेटीत बंद केले. रात्र अशीच गेली. इथे राहायला आलायस. किती छान. राहा ना मग..मला ना बरंच वाटेल. ताई म्हणेल, मला का म्हणून वाटलं असेल?
भालूने दिलेला चहा प्यायलो. पेटी, पिशवी उचलून ताईच्या खोलीत गेलो. आशीर्वाद दे, म्हणालो खरा. पण आशीर्वाद कश्यासाठी मागितला होता मी?
निघालास? काळजी घे. ताई बोलली.
भालू टांगा घेऊन आला. टांग्यात बसलो. ताईचा मोठा वाडा पहिल्या वळणाआड गेला. वळणं, मोलाचं काम करतात. नको ते डोळ्या आड करतात आणि कधी, हवं ते डोळ्यांसमोर आणून उभं करतात !
गुरुजी, आलात ?
चहा ठेवतो. गुरुजी, आधी इकडे या. वासुदेव बरोबर मागच्या अंगणात गेलो. कांही दिवसां पूर्वी पांडुरंगने कुठून तरी गुलाब कलम आणून मातीत टोचलं होतं तिथे आता डेरेदार झाडं होतं आणि त्या झाडाला केशरी रंगाचे असंख्य गुलाब फुलं लागली होती. भात आमटी जेवलो शांत झोपलो. रक्ताच्या नात्यांना वाहात ठेवायचं असेल तर जेवण एकत्र पण घरं वेगळी. वासुदेव ने सांगितलेली मोठी मोलाची गोष्ट, कानाच्या खोलीत अजूनही फिरत होती !
++++
अनिल महाजन
मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा