बरेच दिवसांपासून मानवी नातेसंबंधाबाबतचा मी स्वतः अनुभवलेला एक हृद्य प्रसंग तुम्हा सगळ्यांबरोबर share करावा असं वाटत होतं. पण आज उद्या करत करत लिहायचे राहून गेले. असो, नमनाला घडाभर तेल ना घालता आता आज सांगतेच. हा प्रसंग आहे सुमारे दोन महिन्यांपूर्वी कोईम्बतूरमध्ये घडलेला. चेन्नईहून कोइम्बतूरला गेलो पण कोइम्बतूरचे घर लहान असल्याने दोन बेड ठेवायला जागा नव्हती, म्हणून आम्ही एक बेड वापरु लागलो आणि एक fold करून ठेवला होता. fold करून ठेवलेला बेड लाकडी आणि वजनदार होता. चेन्नईहून कोइम्बतूरला सामान shift करतानाच्या गडबडीत बेडच्या एका फळीला एक थोडा छेद गेला होता एवढे सोडले तर बाकी बेड अतिशय उत्तम स्थितीत होता. पण बेड असा fold करून ठेवला तर तो लौकरच खराब होईल आणि नंतर जेव्हा हवा असेल तेव्हा नवीन विकत घेता येईल या विचाराने काही दिवसांनी आम्ही तो fold करून ठेवलेला बेड विकून टाकायचे ठरवले. त्याप्रमाणे olx वर ad दिली. हो, आजकाल हे फार छान आहे, घर बसल्या online पुष्कळ गोष्टी करतोय आपण. ad दिल्यावर response यायला सुरुवात झाली. त्यामध्येच एक सॅम नावाच्या मुलाचा मला मेसेज आला.
सॅम हा एक साधारण २४-२५ वर्षांचा काळा सावळा उंच शिडशिडीत मध्यमवर्गीय तमीळ मुलगा. त्याचा नंतर फोनही आला. भेटायची वेळ ठरवून त्याच संध्याकाळी भेटायला आला. त्याला मी येण्यापूर्वीच कल्पना दिली होती कि बेड fold केलेला आहे आणि तो इतर सामानात pack करून ठेवलेला आहे, आणि तुला पाहायचा असेल तर तुला तो सामानातून बाहेर काढून पाहावा लागेल, घरात इतर ठिकाणी जागा नसल्याने तो पाहून झाल्यावर परत पॅक करून सामानात ठेवून द्यावा लागेल आणि मला हे एकटीला शक्य नाही, माझ्याकडे कोणीही मदतीला पण नाही, तर तू करू शकत असशील तरच ये पाहायला. पण तो हो म्हणाला आणि त्याप्रमाणे संध्याकाळी आला पाहायला. त्याची शिडशिडीत म्हणण्यापेक्षा किडकिडीतकडे झुकणारी शरीरयष्टी पाहून मला आता हा कसा काय तो बेड काढून पाहणार असा प्रश्नच पडला. पण त्याने आणि मी प्रयत्न करून सामानातून तो बेड काढला. त्याने तो पहिला. मग मला म्हणाला मी उद्या सकाळी माझ्या बहिणीला घेऊन येतो दाखवायला. मी म्हटलं "आता हा बेड असाच ठेवू नाही शकत, पुन्हा आत ठेवायला लागेल नाहीतर घरात फिरायला आम्हाला जागाच नाही राहणार." त्याने ताबडतोब तयारी दर्शविली आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी पुन्हा प्रयत्नांती तो बेड pack करून आत ठेवून दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सॅम त्याच्या बहिणीला घेऊन आला. त्याची बहीण पण त्याच्यासारखीच काळी सावळी, शिडशिडीत. त्याच्यापेक्षा दोन एक वर्षांनी लहानच असावी अशी. पण दोघांचेही डोळे खूप छान होते, पाणीदार, तडफदार, काहीतरी करून दाखवण्याची चमक असणारे, अगदी बोलके, बोलताना माझे लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे जात होते, कारण त्यांच्या सावळ्या रंगात डोळेच खूप उठून दिसत होते. पण तरीही त्यांना पाहून मला ही मुलं काही बेड विकत घेतील असे वाटेना, अगदीच कोवळी, बेताच्या आर्थिक परिस्थितीतील दिसत होती, दोघेही कुठे छोट्या कंपन्यामध्ये नोकऱ्या करत होते. unnecessary timepass आहे का असेही वाटून गेले. पण सॅम आणि त्याची बहीण मात्र उत्साहाने पुन्हा बेड सामानातून बाहेर काढून पाहण्यात गर्क झाले होते. त्यांचा तमीळमध्ये जो काही किलबिलाट चालला होता, तो मला काही कळला नाही. पण एवढे मात्र कळले कि त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे आणि यावेळी मात्र ऑंटी तुम्ही नका उचलू आम्ही उचलतो असे म्हणून मला त्यांनी काही ते शारीरिक कष्ट करायला लावले नाहीत. पाहून झाल्यावर पुन्हा त्यांनी तो बेड व्यवस्थित pack केला आणि सामानात पुन्हा ठेऊन दिला.
जाताना मला सांगून गेले कि त्यांना तो बेड आवडला आहे पण त्यात एका फळीला जो छेद आहे तो रिपेअर कसा करायचा ते सुताराला विचारतील आणि मग बेड घ्यायला येतील. जाताना हे हि सांगितले कि त्यांना तो बेड आवडला आहे, त्यामुळे ते तो घेणार आहेत आणि तो दुसऱ्या कोणाला विकू नका. मीही त्यांना ठीक आहे आणि मी वाट पाहीन असे सांगितले.
त्यानंतर दोन-चार दिवस गेले, ना सॅमचा फोन आला ना मेसेज आणि इकडे olx वर इतर लोकांचे एवढे मेसेजेस, फोन यायला लागले. बरं सॅम आणि त्याच्या बहिणीचे काय चालू आहे तेही कळेना. म्हणून मग मीच त्याला फोन केला व सांगितले कि "अरे, तुम्ही काय ठरवले आहे, कारण इतर buyers यायला लागले आहेत." त्याने सांगितले कामात busy होतो आणि सुताराला पण अजून भेटलो नाहीये, पण उद्या सकाळी नक्की येतो, तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊ नका. मी बरं म्हणून वाट बघत बसले. दुसऱ्या दिवशी दुपारी सॅम आणि त्याची बहीण एक छोटा टेम्पो घेऊन आले.
आधी का नाही आलात असे विचारल्यावर त्यांनी सांगितले कि, सुताराला पण भेटायचे होते, टेम्पो ठरवायचा होता. दोघांच्या नोकऱ्या सांभाळून हे सर्व करायचे होते आणि, मुख्य म्हणजे पैशांची जमवाजमव करायची होती. मग त्यांनी मला विचारले कि ऑन्टी बेडची किंमत थोडी कमी कराल का, एवढे पैसे नाही देऊ शकणार. मग मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. थोडा रागही आला. वाटलं काय हे एकतर इतके दिवस घालवले, इतरांना कोणाला विकू दिला नाही बेड, आणि आता पैसे नाहीत म्हणून किंमत कमी करा. मी त्यांना म्हटले अरे बेडची किंमत अगदी वाजवी लावली आहे. एक फळी खराब आहे म्हणून आम्ही आधीच किंमत कमी लावली. इतर ठिकाणी बेड कितीला मिळतो. नवीन बेड कितीला मिळतो त्याची चौकशी करा म्हणजे कळेल आम्ही लावलेली किंमत कशी वाजवी आहे ती. माझा typical विक्रेत्याचा अविर्भाव. ते शांतपणे ऐकत होते. दोघांचेही डोळे मात्र आता केविलवाणे पण तरीही खूप निर्व्याज आणि निरागस दिसत होते.
मी त्यांना म्हटले, "अरे, इतकी काही गडबड करू नका, शांतपणे विचार करा, पैसे आता नसतील तरी अजून चार दिवसांनी घेऊन आलात तरी चालेल, तुमच्या आई वडिलांशी पण बोलून ठरवा." त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने मात्र मी अवाक झाले. "ऑंटी, आमच्या आईवडिलांसाठी आम्ही हा बेड घेत आहोत आणि त्यांना आमच्याकडून हे surprise आहे.."
ते ऐकले आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आले. ही दोन २२ ते २५ च्या वयोगटातील किडकिडीत पोरं. छोट्या छोट्या नोकऱ्या करणारी. आईवडिलांना आर्थिक हातभार लावणारी, आईवडिलांना खुश करण्यासाठी त्यांना बेड देऊन surprise देणार होती, मला त्यांचे मन मोडवेना आणि मग अर्थातच discount देऊन टाकला. माझा होकार मिळताच पोरांची लगबग सुरु झाली, ताबडतोब पुन्हा एकदा सामानातून पॅक असलेला तो जड बेड त्यांनी बाहेर काढला, अनेक प्रयत्नांती त्यांनी तो त्या छोट्या टेम्पोमध्ये चढवला आणि टेम्पो घेऊन आनंदाने रवाना झाले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना मेसेज करून विचारले, काय रे आईबाबांना बेड आवडला का तर सॅमने thank you सोबत त्याच्या आईवडिलांचा हसऱ्या मूडमधला बेडवर बसलेला फोटो मला पाठवला. हा प्रसंग माझ्या मनात कायमचा रुतून बसला आहे. आजही जेव्हा जेव्हा या प्रसंगाची आठवण येते, तेव्हा तेव्हा त्यांनी तो बेड सामानातून काढण्यासाठी आणि पुन्हा ठेवण्यासाठी, निव्वळ आम्हाला त्रास होऊ नये म्हणून, घेतलेले कष्ट आठवतात. त्यांचे बोलके निरागस डोळे आठवतात आणि आईवडिलांवरचे प्रेमही जाणवते. आणि मग फक्त एवढाच म्हणावेसे वाटते, "देव त्यांचे भले करो."
सुवर्णरेखा रणदिवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा