एक ताबा सुटलेली भरधाव कार लग्नावरून परतणाऱ्या डॉ. उमेश आणि अश्विनी सावरकर आणि त्यांची केवळ ३ महिन्यांची बछडी मीरा, यांच्या कारला अमरावती जवळ जोरदार धडक देते. आई कमरेतले हाड तुटून आणि चिमुरडी मुलगी मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन बेशुध्द होतात. रस्त्यावरची काही माणसे गंभीर जखमी डॉ. उमेश आणि अश्विनी यांना एका हॉस्पिटलमध्ये आणि प्रसंगावधान ठेऊन लहानग्या मीराला एका पेडीएट्रीक हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. मीराला दाखल केल्या केल्याच व्हेंटिलेटर लावला जातो, दुसऱ्या दिवशी जरा सावरलेले डॉ. उमेश मिराच्या हॉस्पिटलमध्ये पोचतात. जवळपास ब्रेन-डेड झालेली मीरा काही केल्या वाचणं शक्य नाही हे डॉ उमेश यांच्या लक्षात येतं, कमरेचं हाड मोडल्याने गंभीर जखमी असलेल्या पण आता शुद्धीवर असलेल्या डॉ अश्विनी यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये परत येऊन जवळ घेतात, पतीचे डोळे पाहून डॉ अश्विनी यांचे डोळे सुद्धा पाण्याचे डबडबतात. पतीच्या कानात येऊन त्या कुजबुजतात,”ऑर्गन डोनेशन.” बांध फुटलेले दोघे एकमेकांना सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतात.
ते स्वतः डॉक्टर असल्याने आणि या प्रकारची पूर्ण माहिती असल्याने डॉ. उमेश आता ऑर्गन डोनेशनच्या तयारीला लागतात, स्वतःचे आभाळाएव्हढे दु:ख बाजूला ठेऊन स्वतःच्या पोटच्या पोरीचे ऑर्गन कुणाला उपयोगी ठरू शकतील याची देशभरातली यादी तपासायला लागतात, ज्यांच्यात मीराचे अस्तित्व जिवंत राहील अशी दोन नावे मिळतात. एव्हाना मीराला व्हेंटिलेटरवर ठेवून चार दिवस झालेले असतात, वेगाने पावले उचलली जातात, मीराचे अवयव काढून एअर ऍम्ब्युलन्सने शिफ्ट करायची तयारी केली जाते. हे सगळ करायला फक्त चार तास उरतात, डॉक्टर दांपत्य पोटाच्या पोरीला छातीशी कवटाळून बसतात, इतर डॉक्टर ऑर्गन डोनेशनची तयारी सुरु करतात. ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार केला जातो आणि तितक्यात. ...तितक्यात मीराला जोरदार हार्ट अटॅक येतो. आई-वडलांच्या समोर मीरा अखेरचा श्वास घेते. दु:खाने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा आई-वडील फोडतात. पोटच्या पोरीचे अस्तित्व सुद्धा आता जपता येणार नाही या विचाराने आधार देण्यापलीकडे जाऊन कोलमडून जातात.
हळूहळू दिवस, आठवडे, महिने जातात. कामे सुरु होतात. आई-वडील उभे राहायच्या प्रयत्नात असतात. अचानक एके दिवशी ब्रेकफास्ट टेबलावर, मीरा असली असती तर मीराचा वाढदिवस दोन महिन्यांवर आलेला दोघांना जाणवतो. आत्तापावेतो सांभाळलेले दोघेही जण पुन्हा एकदा फुटतात. एकमेकांना सावरत असताना धीरोदात्तपणे काही निर्णय घेतात. दोघांचेही डोळे अंतस्थ आनंदाने लकाकतात. दोन महिन्यांवर आलेल्या मिरच्या वाढदिवशी कुणा लहानग्याला, ज्याला सरकारी मदत मिळू शकत नाही अश्याला वैद्यकीय मदत देऊन जीवन देण्याचे ठरवतात. शोधाशोध सुरु करतात. मुंबईतल्या देवनार आणि अंबेजोगाई इथली दोन मुले सापडतात. दोघांचेही ओपन हार्ट ऑपरेशन होणार आहे आणि दोघेही फार गरीब असून त्यांना सरकारी कुठलीही मदत मिळण्याची शक्यता नाहीये. दोघांनाही संपर्क केला जातो. ऑपरेशनचा दिवस ठरतो. विख्यात हार्ट सर्जन तयार होतात. ऑपरेशनचा दिवस उजाडतो. त्याचं दिवशी दोन्ही मुलांमधल्या एकाला आयत्या वेळी सरकारी मदत जाहीर होते. त्याचे नाव यादीतून गळते. आता उरते मुंबईतल्या देवनार इथली रोजगारीवर काम करणाऱ्या आणि कुठल्याही सरकारी मदतीच्या निकषांवर न बसणाऱ्या श्री. पराटे यांची तिसरी मुलगी पायल. गेल्या तब्बल वर्षभरापासून पैश्यांअभावी ऑपरेशन टाळत असणाऱ्या पायलचे ऑपरेशन सुरु होते. ऑपरेशन संपते. पूर्ण खर्च डॉ. उमेश आणि अश्विनी उचलतात. ऑपरेशन झाल्या झाल्या आणि पायल शुद्द्धीवर आल्या आल्या पायललाही उचलून कडेवर घेतात. आत्मसमाधानाने .मीराला कडेवर घेतल्याच्या आत्मिक आनंदाने. आणि एक निर्णय घेतात. दरवर्षी मीराच्या वाढदिवशी एका ‘मीरा’ला जगवण्याचा.
डॉ. उमेश आणि डॉ. अश्विनी दोघांचे आभार आणि तुम्हां दोघांच्या सामाजिक आनंदात आम्ही सर्व सव्वाशे कोटी भारतीय नागरिक सुद्धा सहभागी आहोत.
मिलिंद वेर्लेकर,
टीम भारतीयन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा