"सांगितलं ना एकदा, मी नाही गुढीला नमस्कार करणार, मला नाही आवडत गुढीपाडवा ! मला चैत्र महिनाच आवडत नाही." मानसी रडू लागली.
बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला," असं नाही म्हणायचं बाळा. ही तर नवीन वर्षाची सुरुवात असते, आवडत नाही म्हणून कसं चालेल?"
दहा वर्षांची मानसी, "हो, उकाडा, घाम, लाहीलाही हाच असतो चैत्र महिना ! ज्या चैत्र महिन्याने माझी आई माझ्यापासून हिरावून घेतली तो चैत्र, तो गुढीपाडवा कशी नवीन सुरुवात करेल? मी नाही विसरू शकत बाबा , गुढी उभारल्यावर, तिला नमस्कार करतानाच आई चक्कर येऊन पडली, तुम्ही तिला दवाखान्यात नेत असतांना तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला तो शेवटचा, नंतर चार दिवसात सारं आटोपलं. ती गेल्यानंतर ना मला आंबा गोड लागला ना माझ्या आयुष्यात आईचा थंडावा परत आला. वाट्याला आलं ते फक्त ऊन ! कसा आवडेल ऊन घेऊन येणारा चैत्र मला ? "
" हं, चैतू, बरोबर तुझं, मी काय सांगतो ते नीट ऐक. तू आता मोठी झालीस, मी सगळं सांगतो तुला. शांत हो आधी. तुझ्या आईला, फाल्गुनीला चैत्र महिना खूप आवडायचा. तिचं बालपण आणि तारुण्य सुद्धा खूप कष्टात गेलं, ती म्हणायची माझं नाव फाल्गुनी आहे म्हणून शेवट संघर्ष माझ्या वाटेला येतो. तुझं नाव तिला चैत्राली ठेवायचं होतं पण घरात इतरांना आवडलं नाही म्हणून तिने माघार घेतली. तिला वाटे, माझ्या मुलीला चैत्र महिन्याप्रमाणे उन्हातही सगळं उत्कृष्ट मिळावं, जसं की चैत्रातली पहिली पालवी, लाल फुलांनी उन्हातही डवरलेला गुलमोहर किंवा त्याच दिवसांत येणारा पण फळांचा राजा म्हणून मिरवणारा आंबा, उत्तम चवीची आणि पौष्टिकही असलेली डाळ, थंडगार पन्ह ! सृष्टीच्या उन्हातून म्हणजे फाल्गुनीच्या आयुष्याच्या चटक्यातून, तिच्या उकड्यातून बहरलेली तू चैत्राली असं तिला वाटायचं ! खूप खूप आवडायचा तिला चैत्र महिना, गुढीपाडव्याची आसुसतेने वाट पहायची ती "बाबा आठवणीत रमले होते.
"बाबा, म्हणून तुम्ही मला चैतू म्हणता का? पण तरीही तिला आवडत होता मग का त्या चैत्राने हिरावून नेलं तिला माझ्यापासून? सांगा ना ? "
" तू तेव्हा सहा सात वर्षांची होतीस. आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, निदान झालं तेव्हाच तो शेवटच्या स्टेजला होता, केमोथेरपी चालू होत्या पण तिची अट होती, मानसीला ह्यातलं काहीही सांगायचं नाही. तू लहान होतीस त्यामुळे केमोच्या दिवशी तुला आजीकडे ठेऊन आम्ही दोघे जायचो. दुसऱ्या दिवशी ती पूर्ण थकलेली असायची. तुला जाणवू नये म्हणून तुझ्याबरोबर नॉर्मल रहायची. सगळ्या कामांना बाई होतीच. ती फक्त आणि फक्त तुला वेळ द्यायची. तिला असह्य वेदना व्हायच्या पण ती त्या पचवायची. रात्री मला म्हणायची ही मानसी म्हणजे माझ्यासाठी वाळवंटातील ओएसीस आहे. तिच्याकडे बघून मी एकेक दिवस जगते आहे. गुढीकडे बघून जसं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं तसं मानसी कडे बघून मी ह्या खडतर आयुष्याचं स्वागत करते आहे." बाबा अचानक रडू लागले. मानसी बाबांजवळ येऊन बसली.
" चैतू, फक्त तुझ्यासाठी ती केमोथेरपी झेलत होती, कॅन्सरशी लढत होती. इतकी सहनशक्ती कशी ह्याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटे, चार आठवड्याची मुदत बघता बघता चार महिने वाढली होती. पण तिला खूप त्रास होत होता गं, तुला काहीच माहित नव्हतं ह्यातलं " बाबा म्हणाले.
"आई बऱ्याच वेळा झोपून असायची, तिचे खोल गेलेले डोळे आणि डोक्याला सतत असलेला रुमाल मला आठवतो पण ती मला ... म्हणजे... कसं कळलं नाही...का तिने असं केलं?" मानसीला बोलवत नव्हतं.
" चैतू, तिचा त्रास मला बघवत नव्हता गं, गुढीपाडव्याच्या दिवशी ती चक्कर येऊन पडली तेव्हाच मला कळलं होतं, आता सगळं संपणार, खरं सांगू, मला वाटत होतं संपावं, ती खूप सहन करत होती, तिच्या चैत्रपालवीसाठी ! पण तिच्या वेदनांना कुठेतरी पूर्णविराम मिळण्याची गरज होती. फाल्गुनीच्या भोगांचा नाश होऊन त्या चैत्राने तिला मुक्ती दिली होती. बेटा चैतू, तुझं चूक नाही गं, तू आई गमावलीस पण एकदा नीट विचार कर, ह्याच चैत्राने तिला मोकळं केलं, नव्याने बहरुन येण्यासाठी ! आज कदाचित ती स्वर्गात आरामात असेल किंवा एखाद्या सुखवस्तू कुटुंबात जन्म घेऊन बाललीला दाखवत असेल गं. तू चैत्र महिन्यावरचा तिचा विश्वास खोटा नको ठरऊस. तेच तेच उगाळत बसण्यापेक्षा तुझ्या आयुष्यातही नवी चैत्रपालवी येऊ दे, गेल्या चार वर्षात तू अभ्यासात मागे पडलीस, आता नव्याने गुलमोहर फुलव आणि बहावा फुलू दे, तीच आईला श्रद्धांजली असेल." बाबा हताश होऊन खाली बसले.
रडत रडत मानसी पळत गुढीपाशी गेली, "हे गुढी, माझी आई जिथे असेल तिथे खुशाल असू दे. प्रत्येक चैत्रात आईला अभिमान वाटेल असे मार्क्स मी मिळवणार आणि प्रत्येक शालेय नव-वर्ष मी बहरुन टाकणार हाच माझा संकल्प ! "
मानसीने संकल्प पूर्ण केला होता, यंदाच्या वार्षिक परीक्षेत सगळ्या तुकड्यांमधून ती पहिली आली होती आणि त्या आनंदप्रित्यर्थ जणू सगळ्यांच घरी गुढी उभारली होती.
©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा