आईने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला.
"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."
मुलगा म्हणाला.
"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."
आई स्मितहास्य करीत म्हणाली.
"अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."
मुलगा म्हणाला.
"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "
आई आता हसली म्हणाली.
"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला.
"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली.
"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."
"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. लक्षात ठेव तुझ्या हातून कुठलही गैर कृत्य होऊ देवू नकोस, कोणतही व्यसन करु नकोस, भ्रष्टाचार, चोरी लबाडी करू नकोस. कोणतही अस कृत्य तुझे हातून होऊ देवू नकोस की ज्यामुळे आमची मान खाली झुकेल. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव. "लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता. देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली. तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल. करशील का हे"?
निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते. धन्य धन्य ती माता निरपेक्ष व निस्वार्थ प्रेम फक्त माताच करु शकते,
🌷👏👏👏👏👏🌷
त्रिवार वंदन प्रत्येक मातेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा