व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा, त्यांच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण ८/९ वर्षांपूर्वी घडलेल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात . मानवी स्वभावाची जडणघडण, त्यांचे वेगळेपण, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच
व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तूपाठ पाहायला मिळाला त्यामुळे त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहात नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणा स्थानं आहेत याची नव्याने जाणीव झाली. ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे २०१५ ते २०१८ या काळात घडलेल्या आहेत. त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे. जाताना सकाळी लवकर रेल्वेनं जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं हे अनेक वर्षं रुटीन चालू होतं. येताना आमच्या व्यवसायाकरीता लागणारी वेलची वाशी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रूटीनचा भाग होता. असंच एका बुधवारी वाशीहून पुण्याकडे जाणा-या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं दहा किलोचं छोटं बाजकं पण बरोबर होतंच. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या एक दोन आल्या त्या भरुन येत होत्या. त्यामुळे दोन तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून ५/६ जणच होते. कंडक्टर आला तिकीट घेतलं, त्यानं चौकशी केली साब "वेलची का अच्छा खुशबू आता है" मग वेलची कुठून आणली, कशासाठी आणली, त्याचा उपयोग काय इ. ची जुजबी माहिती त्याला दिली. इतरांना तिकीटं देण्यासाठी पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे वाचन करायला सुरुवात केली.
काही वेळाने कानावर कानडी मध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं पण बहुदा तिकीटाच्या पैशाबाबत काही तरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेंव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिचं एक वर्षांचं बाळ आणि ३/४ वर्षांचा मुलगा पण रडायला लागले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे हे विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला. ती बाई म्हणे नव-याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्याला उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाका प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो पण त्या बाईला कानडी शिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरलाच दुभाष्या बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली "तुम्हीच माझे अण्णा (मोठा भाऊ) आहात, मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू ? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनीऑर्डर करून पैसे परत पाठवते. अशा गोष्टींचा अनुभव असल्याने मला तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत जाऊदेत बुडीत खात्यात असा विचार मनात आला. नाहीतरी शिवनेरी बसनं गेलो असतो तर ४५०/- रुपये तिकीट पडलं असतं आणि आताच्या बसला १५०/- रू खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता ५०/- रू. जवळ ठेवून ४००/- रू. कंडक्टर कडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुस-या पुढच्या बसचं तिकीट जाऊन १०/२० रू. शिल्लक राहतील असं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर ४/५ जणांनी २००/- रू गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली , पाया पडायला लागली तुमचा पत्ता द्या. मनीऑर्डरने पैसे पाठवते असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि गावाला गेलीस की नव-याला बोलावून घेऊन भांडणं मिटवून टाक असा सल्ला कंडक्टर करवी दिला. कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी तिला जपून जा, मुलांकडे लक्ष दे असं सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावर सुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो. अर्थात हे प्रकरण आठवडा भरात विसरून गेलो. माझं रूटीन चालूच होतं.
दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला. नेहमी प्रमाणे वाशीच्या बस स्थानकात वेलचीचं बाजकं घेऊन उभा होतो. आज पुण्यात लवकर पोचायचं म्हणून मिळेल त्या पहिल्या बसनं जायचं ठरवलं होतं. नेमकी कर्नाटकची बस आली, बस कोथरूड वरून जाते याची खात्री करून घेतली आणि बसमध्ये बसलो. वेलचीचं बाजकं सिटखाली ठेवलं. कंडक्टर आला, तिकीट देताना त्याला वेलचीचा वास जाणवला असणार, त्यानं मला एकदा निरखून पाहिलं आणि मला म्हणाला काही वर्षापूर्वी तुम्ही एका बाईला तिकीट काढायला पैसे दिले होते का? माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हिच ती बस आणि हाच तो कंडक्टर. मी हो म्हणालो. तो काही न बोलता पुढे निघून गेला. सर्व प्रवाशांची तिकीटं झाली आणि नंतर तो माझ्या बाजूला येवून बसला. आणि म्हणाला "अहो साहेब मी तुम्हाला किती शोधत होतो. तुम्ही बुधवारी इथूनच पुण्याला जातो असं म्हणाला होता म्हणून कितीतरी वेळा बस वाशी स्टॅंडवर थांबवत होतो. खाली उतरून तुम्ही कुठे दिसताय का बघत होतो, आणि आज दोन वर्षांनी भेटलात."
नंतर त्यानं जे सांगितले ते ऐकून अक्षरशः थक्क झालो.
त्यानं सांगितलेली ती घटना अशी होती. त्यादिवशी ज्या बाईला मदत केली होती तिला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून दिलं आणि थोडेफार पैसे पण खर्चासाठी दिले. आणि त्याचं दिवशी दुपारी ती बाई आपल्या वडिलांना घेऊन स्टॅंडवर आली आणि या कंडक्टरला शोधून काढलं. हातात ४००/- रू. असलेलं पाकीट आणि शेतातील भुईमूगाच्या शेंगांची पिशवी त्याच्या हातात दिली आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या "अण्णाला " म्हणजे मला द्या असं विनवू लागली. कंडक्टर म्हणाला अहो, असा पॅसेंजर काय रोज रोज भेटत नसतोय . पण त्यांनी आग्रह करून दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या आणि माझा नवरा पण आज येणार आहे आणि आम्ही परत भांडणार नाही. एक दोन दिवसांनी मी पण परत मुंबईला जाणार आहे नव-याबरोबर हे पण त्या अण्णाला सांगा असं बोलून आणि नमस्कार करून तिच्या गावाकडे परत गेली.
आता त्या कंडक्टर पुढे धर्मसंकट उभं राहिलं.
कसं शोधायचं मला ?
मग वर सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी तो माझा शोध घेत राहिला. महिनाभरानंतर त्या शेंगा त्याने इतर प्रवाशांमधे वाटून टाकल्या. एवढं बोलून तो उठून उभा राहिला आणि त्याच्या सिटकडे गेला, वर ठेवलेली त्याची बॅग काढून उघडली आणि काहीतरी घेऊन पुन्हा माझ्याजवळ आला आणि एक मळकट खाकी पाकीट माझ्याकडे दिलं. हे काय आहे असं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो तेंव्हा तो जे म्हणाला ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला " साहेब, ही तुमची अमानत आहे, गेली दोन वर्षे मी सांभाळून ठेवली होती, आता तुमची तुम्ही घ्या आणि मला मोकळं करा. ते ऐकून मला काय बोलायचं हेच सुचेना. मी ते पाकीट फोडून बघितलं तर काय.
आत मध्ये १०० च्या चार नोटा. बरेच दिवस पाकीटात बंद असल्याने चिकटून गेल्या होत्या. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आवंढा गिळून एवढंच म्हणालो की नाही नाही हे पैसे मी घेऊच शकत नाही. कंडक्टर एवढंच म्हणाला की अहो त्या बाईला मी कबूल केलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन, आता तुम्हीच सांगा या पैशांचं करायचं काय. नंतर लगेच तो म्हणाला की एखाद्या संस्थेला मदत करू किंवा एखाद्या देवळात देवापुढे ठेवून देवू . मग मीच तोडगा काढला. त्याला सांगितलं की पुढे मागे एखाद्या पॅसेंजरला अशी अडचण आली तर तू हे पैसे वापरून टाक. बोलेबोले पर्यंत माझा थांबा आला म्हणून मी उतरण्याआधी त्या कंडक्टरला घट्ट मिठी मारली. आणि आभाळ भरल्या डोळ्यांनी खाली उतरलो. त्या सुहृद कंडक्टरचं नांव चिदानंद हेगडे. गुलबर्गा डेपो. त्यांचा फोटो त्यांनी काढू दिला नाही किंवा मोबाइल नंबर पण दिला नाही. या गोष्टीला आता ८/९ वर्षं झाली. पण अजून माझा गोंधळ होतो की , सचोटी आणि प्रामाणिकपणा जर उणे अधिक करायचा असेल तर तो कुणाचा करायचा. कबूल केल्याप्रमाणे तिकीटाचे पैसे न विसरता परत करणा-या त्या माऊलीचा की ते पैसे मिळाल्यावर अफरातफर न करता २ वर्षं व्यवस्थित सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन करणा-या चिदानंद हेगडे यांचा. तुम्हीच सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा