सेवानिवृत्ती नंतर दिवस काढणं मुश्किल होत चाललं. आयुष्य जरा रटाळ होऊन गेलं. एकुलता एक मुलगा तोही परदेशात, वेळ कटता कटत नव्हता. काही तरी करायला हवं हे समजत होतं. पण नक्की काय हे कळत नसल्याने शालिनीताई अन सुधाकरराव दोघेही कंटाळले होते. शरीराप्रमाणे दिवसही हातपाय गाळून बसतात की काय कोण जाणे ! सरता सरत नाहीत.आजही वेगळं काही घडणार नव्हतं. चहा घेऊन झाला अन दाराबाहेर पडलेलं वृत्तपत्र आत घेण्यासाठी म्हणून दार उघडण्यासाठी शालिनीताई उठल्या तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी घड्याळात पाहिलं 7 वाजत होते. कोण असेल? त्यांच्या मनात आलं, दाराबाहेर एक तरुण स्त्री उभी होती, ती लगबगीने म्हणाली.
'ताई, माझ्या मुलीला तुमच्याकडे ठेवून घेता थोडा वेळ? माझ्या आईला ऍडमिट केलंय दवाखान्यात. तिला बघून मी तासाभरात येते. शालिनीताई गडबडल्या.
'अग तू कोण कुठे राहतेस?? आपली साधी ओळखही नाही. तू तिला सोबत घेऊन जा बरं.
'ताई ..मी दोन घरं सोडून पलीकडे राहते. आपली ओळख नाही कारण आम्ही चार दिवसांपूर्वीच राहायला आलो इकडे. ऐका न माझं. मी हात जोडते, पदर पसरते. पोर चारच महिन्याची आहे. तिला दवाखान्यात कसं नेऊ, अजिजिन बोलत तिनं हात जोडले. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्यांनी त्या बाळाला हातात घेतले.
'ये लवकर मात्र'. त्या म्हणाल्या तसं त्यांच्या हातात दुधाची बॉटल ठेवत ती म्हणाली
'येते मी लवकर, थॅंक्यु ताई'. तिनं परत हात जोडले अन डोळ्यातलं पाणी थोपवत ती जायला निघाली. गेट बाहेर गाडीवर आधीच तिची कुणी वाट पहात असावं.
'अग तुझं नाव तरी सांग'. त्या जवळ जवळ ओरडल्याच.
'मी नयना धांडे' एवढं बोलत हात उंचावत ती निघून गेली. हातातल्या त्या इवल्याशा गोळ्याने हालचाल केली तशा त्या भानावर आल्या. अग बाई, दुपट ओलं झालं दिसतंय. बाळाला सोफ्यावर ठेवत त्यांनी दुपटं बाजूला केलं. ती रडायला लागली तसं त्यांनी तिला उचलून घेतलं आणि बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सुधाकरराव, शालिनीताई चे मिस्टर हॉल मध्ये आले.
'अग हे काय? कुणाचं बाळ आहे'? ते चकित होऊन बोलले.
'सांगते, तुम्ही बसा बरं आधी'
जे घडलं ते तसं च्या तसं सगळं त्यांच्या कानावर घालत त्या म्हणाल्या,
'येईल न हो ती परत'?
'येईल अग, कोणती आई आपल्या बाळाशिवाय किती वेळ राहू शकेल'? सुधाकररावांच्या बोलण्यानं त्यांना हायसं वाटलं.
तू 'तिला दे माझ्याकडे आणि चहा टाक बरं' ..
'तुमच्याकडे'? त्या आश्चर्याने म्हणाल्या. तसं सुधाकरराव हसून म्हणाले,
'बघू तर दे,तिला, तिची आई आली तर घेऊन जाईल'..
'बरं घ्या हो'. म्हणत त्यांच्या हाती तिला सोपवत त्या किचन कडे वळल्या .
'काय ग चिंगे कशी काय आलीस बरं आमच्या घरी.. हा आवडलं का घर आमचं' .. बाळही गोड हसलं.
'अग बाई, चांगलीच गट्टी जमली वाटतं तुमची'. तिच्याशी खेळण्यात दोन अडीच तास कसे निघून गेले दोघांनाही कळलं नाही.
'अहो हिची आई अजूनही नाही आली'... त्यांच्या स्वरात आता काळजी होती.
'येईल! तू हिच्या आईचा फोन नंबर घ्यायला हवा होतास'.
'अहो, सगळं एवढं घाईत घडलं..राहून गेलं पण खरंच नंबर हवाच होता तिचा'
कामवाली सरुबाई बाळाला पाहून म्हणाली, 'ताई कुणी पावने आलेत काय? कुनाचं लेकरू हाये हो' तसं त्या म्हणाल्या
'आपल्या घराजवळ ती नयना धांडे म्हणून रहाते ना तिची मुलगी आहे बघ'.
'हे नाव काय आयकल्या सारक वाटना ओ ताई'..
'अग नवीनच राहायला आलीय ती.'
'असय व्हय.. मी काडते माहिती' असं बोलून ती कामाला लागली.
सकाळची दुपार झाली तरी बाळाच्या आईचा पत्ता नव्हता. शालीनीताई आता घाबरल्या होत्या. सारखं आतबाहेर करत होत्या. तेवढ्यात सरुबाई परत घराकडे येताना दिसली.
'ताई, नयना धांडे नावानं कुनी नाई ऱ्हात आसपास. समदीकड ईचारून आली बगा मी. आता कसं करायचं वं ताई'? तिचं बोलणं ऐकून शालिनीताई ना घाम फुटला.
'ताई मी येते कामं र्हायलीत आजून' त्यांचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. पुढे काय करायचं? हा प्रश्न छळत होता.
संध्याकाळ झाली तरी नयनाचा पत्ताच नव्हता. दवाखान्यात काही इमर्जन्सी असेल. दोघही मनाची समजूत काढत होते.
'काय करायचं हो आता'? 'मला वाटतं मी पोलीस स्टेशन ला जाऊन येतो. काही बरवाईट घडण्याआधी पोलिसांना सगळं कळवलं पाहिजे. हलक्यात घेऊन चालायची नाही ही गोष्ट'.
'हो, मलाही तसच वाटतं. तुम्ही जाऊनच या.'
दिवस मावळला पण बाळाची आई आलीच नव्हती. बरेच जण घरी येऊन गेले. या बाळाचं पुढे काय करायचं हा प्रश्न होता. बाळाला अनाथाश्रमात ठेवण्यावाचून पर्याय दिसत नव्हता. शालिनीताई आणि सुधाकररावाना ही ते पटत होतं. असं कसं कुणी येऊन फसवून जाऊ शकतं? ह्याचं राहून राहून त्यांना नवल वाटत राहिलं. त्या छोट्या जिवाच्या ते गावीही नव्हत. रात्रीही ती शांत झोपली. आपण फार मोठं प्रश्नचिन्ह बनून राहिलो आहोत ही जाणिवही त्या लहानगीला नव्हती.
सकाळ उजाडली. शालिनीताईनी तिला न्हाऊमाखू घातले, पावडर तीट केली. त्यांच्या मुलाचा लहानपणीचा ठेवणीतला शर्ट तिला घातला. त्यांच्या मनात आलं, कशाला पाठवायचं अनाथाश्रमात हिला. आपणच सांभाळलं तर. गोडआहे पोर. एका रात्रीत त्यांना तिचा इतका लळा लागला की तिला कोणी घेऊन जाईल हे मनात येऊन त्यांचे डोळे भरून आले.
'चिंगे, जाशील ग तू आता' ! नको जाऊ ना, राहा माझ्याजवळ.. अगदी कायमची ! बोलताबोलता त्यांनी तिच्या गालाचा पापा घेतला. सुधाकरराव त्यांचे बोलणे ऐकत होते.
'काय ग, चिंगीला ठेवून घ्यायचंय का आपल्या घरी' त्यांनी वळून पाहिलं,
'खरंच? पोटच्या मुलीप्रमाणे वाढवावं लागेल बरं ! झेपेल न आपल्याला?
तुम्ही साथ द्याल मला? त्यांनी नवऱ्याला आशेने विचारलं.
'काय हरकत आहे शालिनी'? सुधाकररावही त्यांना निश्चयी स्वरात म्हणाले.
'आपण स्वीकारू चिंगीचं पालकत्व. मी आहे ना'.
माणसाचं मन कसं असतं न, जवळची व्यक्ती जसं बोलेल तसं प्रवाही होतं. 'खरच हो, सांभाळू हिला आपण, सोडवत नाही पोरीला. असंही दिवस किती जड चाललेत आपले. जड म्हणजे रोजचा दिवस कसा ढकलायचा हा एक टास्क झालाय आपल्यासाठी. टीव्ही नाहीतर मोबाईल ह्या पलीकडे विश्व उरलं नाही आपल्याला. कंटाळवाण रुटीन, तेच ते अन तेच ते'. बोलताबोलता त्या स्वतःलाच समजावत होत्या.
'आपला मुलगा भारतात परतेल न परतेल, कुणास ठाऊक? शालिनीताई डोळे पुसत म्हणाल्या.
'हो तेच म्हणतोय मी दिवस भराभर सरतात, हा हा म्हणता चिंगी मोठी होईल. तिला चांगले संस्कार देऊ आपण. लवकर ठरव काय करायचं ते. ते शालिनी ताई कडे पहात बोलले.
'राहील ती आपल्या जवळ कायम, माझा निर्णय झालाय'. त्या ठाम पणे म्हणाल्या आणि तिची आई येईल न येईल त्याचा विचार नको करायला आता. तशीच काही अडचण असेल तिची म्हणूनही तिने आपलं घर निवडलं असेल'. चिंगीला छातीशी कवटाळत त्या बोलल्या. खरंतर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मनाजोगं जगण्यासाठी छानसं कारण हवंच. येणारा प्रत्येक दिवस उत्साही असतो मग !
चिंगी नव्हे...'ईशा' असं नामकरण केलं होतं तीच त्यांनी. ईशा त्यांच्याच घरी राहिली. तिची आई फिरून कधी आलीच नाही. विचारांती दोघांनी पाळणाघर सुरू केले. ईशासोबत शालिनीताई आणि सुधाकररावांच आयुष्य खूप सुकर झालं. नव्याने उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला जणू पंख फुटले होते. त्यांनी ईशाला शिकून सवरून मोठं केलं. ती चांगल्या नोकरीला लागली. यथावकाश त्यांनी तिचे लग्न लावून दिले. तिचे सणवार, माहेरपण, बाळंतपण हे सगळं त्यांनी व्यवस्थित पार पाडलं. ईशाही त्यांची खूप काळजी घेते कारण ते नातंच तितकं घट्ट आहे ! अवघड असले तरी योग्यवेळी घेतलेले अचूक निर्णय आयुष्य फुलवून टाकतात. खरंच, बऱ्याचदा रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती काकणभर सरस ठरतात, नाही का?
-- सौ. वर्षा कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा