सोमवार, १ एप्रिल, २०२४

1004. भिकार सावकार

      इसपिक च्या पत्त्यावर दुसरा इसपिकचा पत्ता पडला आणि आठ वर्षांची अवनी खुश होत चित्कारली 
"हे !…..मी जिंकले...जिंकले " आणि पत्ते हातात घेऊन कॉट वर चक्क नाचू लागली. 
शेखर मात्र हसून तिच्याकडे मजेने पहात होता, हा गलका ऐकून स्वयंपाक घरातून प्राची बाहेर आली, तिच्या हातात अवनीचा शाळेचा डबा होता.
"अगं अगं... असं नाचतीयेस काय कॉट वर? काय झालं दंगा करायला?"  डबा तिच्या शाळेच्या बॅगेत ठेवत विचारलं.
" आई ..मी जिंकले...जिंकले ! बाबा हरला , हे बघ सगळे पत्ते माझ्याकडे" हातातले पत्ते तिच्या समोर नाचवत अवनी म्हणाली
" मी सावकार...बाबा भिकार ! "
" बरं बरं आता उतर खाली. ही बॅग घे, शाळेला उशीर होतोय, मी आलेच बाहेर. चल पाहू पटकन " प्राची तिला गडबड करीत म्हणाली.
" अहो, तुमचे पोहे करून ठेवलेत ओट्यावर. चहा पण झालाय.  थोड्या वेळाने नक्की घ्या आणि सकाळच्या गोळ्या ही घ्यायच्या आहेत बरं, काल तुम्ही विसरला होतात." 
पटापट स्वतः च आवरत प्राची ने शेखर ला ह्या सगळ्या सूचना दिल्या.
" हो..हो बाई घेतो मी सगळं बरोबर ! काळजी करू नको. उशीर होईल बघ तुला." शेखर समजुतीच्या स्वरात म्हणाला.
     शेखर  गेले बरेच दिवस क्षयरोगा मुळे हलका झाला होता आणि क्षय रोग जसा येताना एकटा येत नाही. तो स्वतः बरोबर ताप, खोकला, सर्दी आणि थकवा असे बाकीचे साथीचे आजार ही घेऊन येतो. त्यामुळे शेखर सध्या अंथरुणाला खिळलेला होता .अशक्त झाला होता. सरकारी दवाखान्यातून " डॉट्स" चे उपचार सुरू होते. प्राची , अवनीच्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी करायची, मग या आई लेकींची शाळेत यायची आणि जायची एकच वेळ असे. ह्या दोघी बाहेर पडल्यावर कॉट वर पडलेले पत्ते गोळा करता करता शेखर ला " भिकार सावकार " आठवला , त्याच्या बालपणीचा " भिकार सावकार" खरोखर त्याचं बालपण एक प्रकारच्या सावकारीत गेलं होतं
रत्नागिरी सारख्या कोकणच्या निसर्गरम्य नंदनवनात , केवळ रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण कोकणात  प्रसिद्ध आणि मोठ्या अश्या अनेक एकरात पसरलेल्या " देसाई वाडी" ह्या आंब्याच्या बागेचे मालक असलेल्या ' रघुनाथ देसाईंचा ' एकुलता एक मुलगा होता शेखर , घर सोन्या नाण्यानी भरलेलं , सर्व सुखं सुबत्ता दारात हात जोडून उभी होती, 
     रत्नागिरी हून गणपती पुळ्याला जाताना लागणारा ' आरे वारे ' चा निसर्गरम्य सागरतीर, त्या किनाऱ्याशी स्पर्धा करीत शेजारून पळणारा लाल मातीचा रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे उंचवट्यावर वसलेली ' वरची देसाई वाडी ' आणि खाली सपाट भागी असलेली " खालची देसाई वाडी" आणि ह्या दोन्ही वाड्यांच्या मधोमध होता तो देसाई निवास टुमदार चौसोपी आणि ऐसपैस असा. इथल्या उत्तम प्रतीच्या हापूस आंब्याची केवळ कोकणात नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध होती, उंच पठारावर मिळणारा नैसर्गिक सूर्य प्रकाश आणि सुपीक जमीन यामुळे पातळ साल आणि केशरी रंगाचा हा रसाळ आंबा बाजारात फारच"  भाव खाऊन" असायचा. नंतर नंतर तर राजमान्यता मिळून  हा आंबा परदेशी निर्यात देखील होऊ लागला. अर्थात ह्या सर्व सुबत्ते मागे " रघुनाथ देसाईंची ' मेहनत , कष्ट आणि प्रामाणिक वृत्ती होती, वाड वडिलार्जित ह्या वाडीतील केवळ प्रत्येक कलमच नव्हे तर एका एका फळाची काळजीपूर्वक निगा राखायचे रघुनाथ देसाई, अर्थात एव्हढ ऐश्वर्य उपभोगत असताना देखील त्यांची दानशूर वृत्ती मात्र कायम असायची. बाजारात चढ्या भावाने विकला जाणारा आंबा, अनेकदा गोर गरीबाना आणि त्यांच्या वाडीतील कामगारांना मात्र फुकट द्यायचे ते.. दर वर्षी 'अक्षय तृतीयेस" पुळ्याच्या गणपती बाप्पाची आरास करण्याचा मान हा देसाई वाडी च्या आंब्यालाच मिळे ! काहीश्या अबोल , आणि भिडस्त परंतु अतिशय प्रामाणिक व सरळमार्गी स्वभावाच्या शेखर ला बालपणापासून फारसे मित्र नव्हते, त्याच्या जीवा भावाचा एकच मित्र होता जयदीप. स्वभावाने मात्र शेखर च्या अगदी विरुद्ध होता जयदीप ! बडबड्या, सदा हसतमुख मोठी मोठी स्वप्न छोट्या छोट्या निळसर पिंगट डोळ्यात घेऊन जगणारा. शेखर ला जयदीपच वागणं , बोलणं खूप आवडायचं. अतिशय उत्साहात येत जेव्हा जयदीप बोलू लागायचा तेव्हा त्याचे ते निळसर डोळे एकदम चमकायचे. जयदीप चे वडील म्हणजेच  श्रीधर काका हे रत्नागिरी मधील एका " मरीन एक्स्पोर्ट ' कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते . मग शाळे पासून सुरू झालेली जयदीप - शेखर ची कट्टी उत्तरोत्तर घट्ट होत गेली. सुट्ट्यांमध्ये मनसोक्त आंबे ..फणस , समुद्रकिनारी क्रिकेट आणि मग देसाई वाडीच्या आमराईच्या शीतल छायेत अगदी दुपार पासून रंगायचा तो " भिकार सावकार" चा खेळ, एका कडचे पत्ते संपत आले की पाच दहा पत्ते त्याला उधारीच्या बोलीवर देऊन हा खेळ तसाच न संपता चालायचा. कोणीच ' भिकार ' व्हायचं नाही की कोणी सावकार ! शेखर कॉलेज च्या दुसऱ्या वर्षाला असताना हृदय विकाराचा झटका येऊन रघुनाथ देसायांनी इहलोकीची यात्रा संपवली,आणि शेखर खऱ्या अर्थाने पोरका झाला! आईच्या मदतीने शेखर 'देसाई वाडी' चा कारभार सांभाळू लागला, अर्थात वडिलांची पुण्याई आणि त्यांनी जोडलेली माणसं याचा आधार ही होताच. वाढत्या वयासोबत शेखर - जयदीप ची मैत्री ही घट्ट होत होती. असच एकदा सागरतीरी, मावळतीच्या सूर्याला पहात गप्पा मारत असताना जयदीप ने शेखर समोर एक प्रस्ताव ठेवला 
"तुला ठाऊक आहे का शेखर या मरीन एक्स्पोर्ट कंपन्या काय करतात ? ! अरे आपल्या रत्नागिरी च्या समुद्रात पिंक पर्च म्हणजेच ' राणी मासा ' मोठ्या मुबलक प्रमाणात मिळतो , त्या माश्या मध्ये मिळणारी चरबी काढून पॅक करून ह्या कंपन्या युरोपात बेल्जियम आणि जर्मनी मध्ये पाठवतात ,तिथल्या कंपन्या  त्यावर प्रक्रिया करून ते लोक ह्या चरबीचां  उत्तम प्रतीच्या चॉकलेट मध्ये वापर करतात !!! आणि करोडो कमावतात आणि इथल्या कंपन्यांना मात्र त्या तुलनेत अगदी नाममात्र मोबदला मिळतो." 
शेखर हे सगळं लक्ष देऊन ऐकत होता...पण अजून हि मुख्य मुद्दा त्याच्या डोक्यात शिरत नव्हता 
," बरं मग ,???" त्याने अनवधानाने विचारलं
" अरे विचार कर. नीट ऐक माझा एक प्लॅन आहे. आपण बेल्जियम मध्ये ह्या चरबी च प्रोसेसिंग युनिट सुरू करायचं तो सगळा नफा आपणच कमवायचा. अरे इथल्या कंपन्या पेक्षा दहापट फायदा आहे. माझ्या पप्पांचे तिकडे बरेच कॉन्टॅक्ट आहेत. सेट अप साठी मदत मिळेल. हे बघ मला ह्यातला अनुभव आहे, प्रोजेक्ट तयार आहे. तू गुंतवणूक करायला तयार असशील तर पार्टनर शिप करू" हे सगळं बोलत असताना पुन्हा एकदा जयदीप चे ते निळसर डोळे चमकू लागले. 
"अरे पण कश्याला उगीच रिस्क घ्यायची. हा आंब्याचा बिझनेस व्यवस्थित आहे की " भिडस्त स्वभावाच्या शेखर ने मुद्दा मांडला पण लगेच तो खोडून काढत जयदीप म्हणाला 
" अरे आंब्याचा बिझनेस सिझनल आहे. चार सहा महिने तेजी. नंतर काय ? पण मी म्हणतोय तो बिझनेस बारमाही आहे. तू काळजी करू नकोस. तुझी गुंतवणूक दोन वर्षात डबल होते की नाही बघ !" 
   अखेर जयदीपने शेखरला त्या स्वप्नील योजनेचा विचार करण्यास भाग पाडले. पण मुख्य प्रश्न होता तो गुंतवणुकीचा आणि हा आकडा मोठा होता, रघुनाथ देसाइंच्या जाण्याने आधीच खचलेली शेखरची आई यास परवानगी देणे शक्यच नव्हतं. मग अखेर जयदीपशी चर्चा करून शेखरने परस्पर तो अवघड निर्णय घेतला. देसाई वाडी व देसाई निवास गहाण ठेऊन मोठी रक्कम उभी करण्याचा.रत्नागिरी मधीलच एका जुन्या जाणत्या संस्थेकडे हे सर्व गहाण ठेऊन त्याने मोठी रक्कम उचलली आणि जयदीपच्या मैत्रीवर आणि त्याने दाखवलेल्या त्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती रक्कम जयदीप च्या स्वाधीन केली
"डोन्ट वरी मित्रा. फक्त दिड - दोनच वर्षात तुझी देसाई वाडी पुन्हा ह्यातून सोडवून आपण भरघोस नफा कमावू." 
बेल्जियमला जाण्यासाठी निघताना जयदीपने शेखरला हे वचन दिले आणि दोन्ही मित्रांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली ती शेवटचीच
     सहा महिने. आठ महिने आणि मग पाहता पाहता वर्ष उलटलं. पण जयदीप शी संपर्क तुटला तो तुटलाच. संस्थेकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा होऊ लागला. शेखर मोठ्या तळमळीने जयदीप शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता परंतु त्याला यश मिळत नव्हते. जयदीप आपली फसवणूक करणार नाही याची त्याला खात्री होती पण आता मात्र तो हतबल झाला होता. कर्जाचे सुरुवातीचे हप्ते जमापुंजी मधून फेडले जात होते पण नंतर मात्र परिस्थिती हळू हळू बिकट होऊ लागली आणि मग ती हाताबाहेर गेली. इतके दिवस आई पासून लपवून ठेवलेला हा व्यावहारिक निर्णय अखेर तिला समजलाच. अश्यातच शेखरचे लग्न ही ठरले होते. एव्हढ्या छान सुखवस्तू कुटुंबातल्या एकुलत्या एक मुलासाठी स्थळे आली नसती तरच नवल होतं. राजापूरच्या वाडेकर कुटुंबातली प्राची मात्र बघता क्षणीच सर्वांना पसंत पडली होती. दिसायला छान, स्वभाव मनमिळावू आणि बोलका  शेखरच्या विनंतीनुसार विवाह साध्या पद्धतीने मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. हे सर्व घडत असताना शेखर ला मात्र जयदीप ची उणीव अस्वस्थ करीत होती. लग्ना नंतर सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्राची वर मात्र नियतीची करडी नजर पडली आणि पिढ्या न पिढ्या अतिशय सुबत्तेत चालणाऱ्या देसाई वाडी वर अखेर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हा घाव मात्र शेखरच्या आईला काही सहन झाला नाही आणि त्या माऊलीचे ह्या धसक्याने निधन झाले .शेखरने कसंबसं परिस्थिती सावरायची शिकस्त केली पण कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा डोंगर याच्या वजनाखली मात्र तो पूर्ण दबून गेला आणि अखेर सर्वस्व हातातून कधी निसटले ते समजले ही नाही. नातेवाईकांनी साथ सोडली आणि अखेर शेखरने ही प्राचीच्या साथीने मोठ्या जड पावलांनी आणि भरलेल्या मनानी रत्नागिरी सोडली आणि मुंबईत संसाराचा नवीन अंक सुरू केला. वर्षानुवर्ष असंख्य गरजूंना रोजगार देणाऱ्या रघुनाथ देसायांचा एकुलता एक मुलगा आता मिळेल ते काम करण्या साठी मुंबापुरीत कष्ट करू लागला. स्वाभिमानी अर्धांगिनी असलेल्या प्राचीने देखील अश्या परिस्थितीत इतर कोणाच्या मदतीवर अवलंबून न राहता शिक्षिकेची नोकरी पत्करून संसाराच्या गाडीच्या दुसऱ्या  चाकाची भूमिका स्वीकारली.
    बरेच दिवसांनी ह्या पूर्वायुष्या चा फ्लॅश बॅक डोळ्या समोरून गेल्याने शेखर काहीसा अस्वस्थ झाला होता. अश्यातच दुपारी ग्लानी मुळे कधी डोळा लागला ते त्याला ही समजले नाही. अखेर अवनीच्या जोरजोरात खिदळण्याने आणि आरडाओरडी मुळे त्याला जाग आली, शाळा सुटून मायलेकी घरी परतल्या होत्या.
" बाबा..बाबा " ..म्हणत अवनी शेखर च्या गळ्यात पडली.
" बाबा वीस तारखे पासून ..सुट्टी आणि ह्या सुट्टीत आमची ट्रीप….हे…..!!! " अवनी भलतीच खुशीत होती 
" अहो ! यंदा शाळेने पहिल्यांदाच सुट्टीत मुलांसाठी समर कॅम्प आणि ट्रीप ठेवली आहे आणि नियोजनाची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. " अवनी ने फेकून दिलेले दप्तर. डबा गोळा करीत करीत प्राची ने माहिती दिली
" अरे वाह !! मजा आहे की मग !! ' शेखर अवनी ला टाळी देत म्हणाला व पुढं विचारलं " कुठं आहे तुमचा समर कॅम्प ??'
" रत्नागिरी ला…. आंबा महोत्सवात न्यायचे आहे मुलांना " 
प्राची ने थोडंसं चाचपडत उत्तर दिलं आणि शेखर मात्र एकदम शांत झाला व इकडे तिकडे अस्वस्थ पणाने पाहू लागला. त्याची ही अस्वस्थता प्राची च्या नजरेतून मात्र सुटली नाही.  इतकी वर्षे झाली तरी रत्नागिरी चां उल्लेख झाल्यावर मात्र शेखर बेचैन व्हायचा .
"मी काय म्हणते शेखर ,आपण तिघे ही जाऊया ना रत्नागिरीला!! सुट्ट्याच आहेत. तुला ही थोडा हवामान बदल आणि अवनी ला मनसोक्त आंबे खायला मिळतील." शेवटचं वाक्य अवनीकडे पाहून तिने खट्याळ पणे उच्चारल. शेखर ही विचारात पडला ' एके काळी देसाई वाडी वर राज्य करणारा आघाडी चां आंबा उत्पादक व व्यावसायिक आता परिस्थिती मात्र मुली साठी डझन भर आंबे विकत घेताना शंभर वेळा विचार करायला भाग पाडायची. अखेर मायलेकींनी शेखर ला रत्नागिरी ला जाण्यासाठी पटावलंच. इतक्या वर्षांनी स्वतः च्या गावात पाऊल ठेवताना शेखर च्या मनात मात्र समोर दिसणाऱ्या समुद्राच्या लाटां पेक्षा जास्त खळबळ माजली होती. विचारांचं काहूर माजलं होतं " आता आपली वाडी असेल का ?? छे ! पतसंस्थेने ती केंव्हाच सिल करून टाकली असेल, कोणी तरी कब्जा केला असेल, जुने लोक कोणी भेटतील का? ह्या विचारातच सगळे आंबा महोत्सवात येऊन पोहोचले ,इतके सगळे आंबे पाहून अवनी मात्र आश्चर्याने आणि आनंदाने थक्क झाली होती. शेखर ची भिरभिरती नजर मात्र ' देसाई वाडी ' चा स्टॉल शोधत होती ,आणि तो त्याला दिसला. तिथेच मुख्य मैदानात महोत्सव ऑफिस शेजारी. जिथे वर्षांनुवर्ष असायचा. तसं तर बाजारात भाव खाणाऱ्या आणि उत्तम प्रतीच्या फळामुळे रघुनाथ देसायांना आंबा महोत्सवात आंबे मांडायची कधी गरज नव्हतीच मुळी. पण पणन महासंघ आणि समितीच्या आग्रहा मुळे ते महोत्सवात सहभागी व्हायचे !! आत्ता ही त्या स्टॉल समोर सर्वात जास्त गर्दी होती. पण स्टॉल मधली मंडळी मात्र नवीन दिसत होती, अर्थात आधी पेक्षा खूप कृश झालेल्या आणि दाढी मिश्या वाढवलेला शेखर ला तिथे कोणी ओळखणे शक्यच नव्हते, शेखर ची पावले नकळतच तिकडे वळली. स्टॉल समोर आकर्षक रित्या सजवून ठेवलेल्या आंब्याच्या पेट्या होत्या, त्यातून एक फळ उचलून शेखर न्याहाळू लागला…
" घ्या ना साहेब ! किती देऊ ? असा आंबा तुम्हाला कोकणात कुठेही मिळणार नाही, पातळ साल ,केशरी रंग.." 
समोर बसलेल्या व्यक्तीच्या आवाजाने शेखर एकदम दचकून भानावर आला आणि मनातल्या मनात त्याला हे सगळं ऐकून हसू ही आलं..
" नको...नको मी फक्त पाहत होतो आता नको आंबे." शेखर अदबीने म्हणाला आणि माघारी जाण्यासाठी वळणार तेव्हढ्यात थरथरत्या पण आश्वासक आवाजात त्याला हाक ऐकू आली " कोण ?? शेखर ?? शेखरच आहे ना तू ?" 
शेखर ने चमकून मागे पाहिले, तिथेच गल्ल्यावर बसलेली एका वयस्क व्यक्ती डोळ्यावरील चष्मा डोक्यावर घेत , हातातले पैसे तसेच खाली ठेवत पुढे येत त्याला बोलावत होती.
" श्रीधर काका ! ? तुम्ही ?? " आता आश्चर्य चकित व्हायची पाळी शेखरची होती. क्षणभर त्याचा स्वतः च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
" शेखर ..शेखर असं म्हणत श्रीधर काका पुढे आले आणि त्यांनी शेखर ला कडकडून मिठी मारली. त्यांचे डोळे आता भरून आले होते. शेखर ची ही आता तशीच अवस्था होती.
" अरे शोधून शोधून दमलो कि रे बाळा तुला. रत्नागिरी सोडून तू कुठं गेलास कोणालाच पत्ता नाही. पण मला खात्री होती की कधी तरी तू ह्या आंबा महोत्सवातच भेटशील." 
तो पर्यंत प्राची आणि अवनी देखील तिथे येऊन पोहोचल्या आणि हा अनोखा मिलाप पाहू लागल्या. दुकानातली बाकीची मंडळी देखील अचंबित झाली होती. आता मात्र दुकानातल्या काही जुन्या कामगारांनी त्यांच्या शेखर दादा ला ओळखले होते.
"चल बाळा. आधी घरी चल तुझी सगळी अमानत म्हणजे तुझी देसाई वाडी, तुझी कंपनी , सगळा कारभार एकदा तुझ्या स्वाधीन करून जयदीप ची शेवटची इच्छा पूर्ण करू दे मला." असं म्हणत श्रीधर काका शेखर चां हात धरून निघू लागले तसं त्यांचं शेवटचं वाक्य मात्र तप्त शिशा सारखं शेखरच्या कानात शिरलं आणि क्षणभर तो बधीर झाला 
काकांचा हात तसाच घट्ट धरत तो अविश्र्वासाने म्हणाला 
" शेवटची ?? म्हणजे ?? काका?? जयदीप कुठं आहे? काय झालं?" 
ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देताना अत्यंत व्यथित होत श्रीधर काका सांगू लागले. "काय सांगू बाळा तुला, तुझ्या भांडवलाच्या गुंतवणुकीवर जयदीपने तिथे बेल्जियम मध्ये कंपनी सुरू केली. खूप छान सेत अप केला आमचे तिथले कॉन्टॅक्टस वापरून अनेक नामांकित युरोपियन ग्रुप्स सोबत करार केले त्याने. जिवापाड मेहनत करून केवळ दीड दोन वर्षात मूळ गुंतवणूक पार करून कंपनी नफ्यात आणली. 
" पप्पा शेखरची सगळी गुंतवणूक आहे तशी जमा करून त्याची देसाईवाडी सोडवण्यासाठी मी रत्नागिरीला जाऊन शेखरला सरप्राइज देणार आहे!" हे त्याने मला सांगितले होते आणि त्याने स्वतः चे शब्द खरे करून दाखवले बाळा 
श्रीधर काका हे बोलताना मात्र आता रडु लागले होते. डोळे पुसत ते पुढे बोलू लागले 
" तुझी देसाईवाडी पतसंस्थेच्या ताब्यातून सोडवण्या इतके पैसे गोळा करून त्याने भारतात येण्यासाठी तिकीट काढले पण, पण ... एअरपोर्टवर जातानाच कार अपघातात…" 
ह्या पुढे श्रीधर काकांना बोलणे शक्य नव्हते आणि शेखर ला ऐकणे. बराच काळ जीवघेण्या शांततेत गेल्यावर श्रीधर काकांनी गाडी बोलावली आणि शेखर, प्राची आणि अवनीला घेऊन ते निघाले ...देसाई वाडी कडे
प्राची च्या लक्ष्यात आता थोडं थोडं येऊ लागलं होतं , गाडीतून देसाई वाडी कडे जाताना इतर सर्व गोष्टींचा हळू हळू उलगडा होत होता , अवनी मात्र भलतीच गोंधळून गेली होती, 
देसाई वाडी ला पोहोचल्या वर मात्र इतका वेळ संयमाने धरून आणि भरून ठेवलेल्या भावनांचा कडेलोट झाला आणि शेखर एखद्या लहान मुला सारखा रडू लागला 
त्याची " देसाई वाडी" होती तशीच जतन करून ठेवण्यात आली होती, छान टुमदार. रंग रंगोटी केलेली. जुन्या लाकडी कुंपणाच्या जागी मात्र जांभ्या चिऱ्या चे मजबूत कंपौंड बांधण्यात आलं होतं, देसाई निवास समोरील रस्ता आता पक्का करण्यात आला होता. हे सगळं भान हरपून पाहणारा शेखर, श्रीधर काकांच्या शब्दांनी भानावर आला.
"शेखर ही तुझी देसाई वाडी, तुझा देसाई निवास आणि सगळा व्यवसाय तुझ्या स्वाधीन करीत आहे  आणि जयदीप व तुझी कंपनी देखील !! मी पुन्हा बेल्जियमला जाऊन तुझ्या वतीने तिकडे देखभाल करेन. बाकी बँक आणि इतर कायदेशीर बाबी आपण उद्या परवा पूर्ण करू ," 
शेखर मात्र केवळ कृतज्ञतेने भरून येत हात जोडून त्यांच्या समोर उभा होता. डोळ्यातील अश्रू आणि गळ्यातील आवंढा त्याला बोलू देणे शक्यच नव्हतं. मग मात्र इतक्या वेळाने दाबून ठेवलेल्या कुतूहलाने छोट्या अवनी ने आईला विचारलं " आई ग, बाबा का रडतोय? आणि हे आजोबा कोण आहेत?? हे मोठं घर कोणाचं आहे??"
शांत पणें स्वतःचे डोळे पुसत,अवनी च्या डोक्यावरून हात फिरवत प्राची उत्तरली " काही नाही बेटा, नेहमी भिकार सावकार च्या खेळात तुझा बाबा हरायचा ना ?? आज ह्या खेळात तुझा बाबा जिंकलाय ! तो सावकार झालाय आज."
अर्थात हे सगळं अवनीच्या डोक्यात शिरणं शक्य नव्हतेच. ती मात्र निरागस पणाने देसाई निवास बाहेर रचून ठेवलेल्या आंब्यांच्या पेट्या आणि बाजूलाच रचलेली आंब्याची रास बघण्यात गुंग झाली होती

©️ सागर जोशी पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...