तेव्हा सायकल तीन टप्प्यात शिकली जायची. पहिला टप्पा कैची, दुसरा टप्पा दांडा, आणि तीसरा टप्पा सीट. तेव्हा सायकल चालवणं इतकं सोपं नव्हतं कारण तेव्हा घरात एकच सायकल असायची जी फक्त बाबा चालवायचे. तेव्हा साकलची उंची चोवीस इंच असायची जी उभं राहिल्यावर आमच्या खांद्या येव्हडी यायची अशी सायकल सीटवर बसून चालवणं शक्यच नव्हतं. कैची ती कला होती ज्यात आम्ही सायकलच्या फ्रेम मधल्या त्रिकोणात घुसून दोन पायडलवर दोन पाय ठेवून सायकल चालवायचो. आणि जेव्हा आम्ही अशी सायकल चालवायचो तेव्हा आम्ही छाती पुढे काढून कमरेतून तिरपं होऊन हँडलच्या मागून आमचा चेहरा बाहेर काढून ट्रींग ट्रींग करून घंटी वाजवायचो जेणे करून रस्त्यावरच्या लोकांना कळेल की आम्ही सायकल चालवतोय. आजची पिढी ह्या साहसा पासून वंचित आहे त्यांना कल्पनाच नाही करता येणार की आठ दहा वर्षाच्या वयात चौवीस इंची सायकल चालवणं हे विमान उडवण्या सारखंच होतं. आठवत नाही आम्ही कित्येकदा आमचे गुढगे आणि तोंड फोडून घेतलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा अजीबात दुखायचं नाही. पडल्यावर पटकन इकडे तिकडे बघून चड्डीला लागलेली माती झाडत गुपचुप उभं रहायचो. आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे आता पाचव्या वर्षीच मुलं न धडपडता सायकल चालवतात कारण बाजारात दोन दोन फुटी सायकली आल्या आहेत. आणि श्रीमंतांची मुलं तर थेट बाइक चालवतात तश्या छोट्या बाईक्स मिळतात बाजारात.
पण आजच्या मुलांना हे कधीच कळणार नाही की लहान वयात त्या मोठ्या सायकलवर संतूलन मिळवणं हा आयुष्यातला पहिला धडा असायचा जबाबदारीची पहिली पायरी असायची जी चढल्यावर तुम्ही गहू दळूण आणण्या लायक झालेले आहात हे नक्की व्हायचं आणि तुमच्यावर ती जबाबदारी टाकली जायची. जाताना दळणाचा डबा कॅरीयरवर ठेवून सायकल ढकलत चक्की पर्यन्त जायचं आणि येताना कैची चालवत यायचं पण खरंच ही कष्टदायक जबाबदारी पार पाडताना खूप आनंद वाटायचा. आता कैची ही प्रथा लोप पावलेली आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी सायकल ही अशी तीन टप्प्यात शिकली. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी घरात बसून परीच्या आणि राक्षसाच्या गोष्टी ऐकल्या, जमीनीवर किंवा पाटवर बसून जेवलो बशीतून चहा प्यायला. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी लहानपणी घराच्या अंगणात किंवा पटांगणात मित्रां बरोबर विटी दांडू, लपाछपी, कबड्डी, खोखो, गोट्या, भोवरे, पतंग, पावसाळ्यात खुपसणी, सूर पारंब्या, लगोरी, डबा ऐस पैस, लंगडी, ह्या सारखे परंपरागत खेळ खेळले आहेत. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात गृहपाठ केला आहे आणि चांदोबा आणि कॅामिक्स वाचली आहेत. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी भावनांची देवाण घेवाण पत्रातून केली आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी त्यांचं बालपण कूलर एसी फ्रिज फोन गाडी शिवाय घालवलं आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी दिवाळीत भल्या पहाटे उठून लाल रंगाचं सुगंधी तेल केसांना लावलंय आणि मोती किंवा म्हैसूर सँडल सोपनी अभ्यंग स्नान केलंय. आम्ही त्याच शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी शाईचं पेन वापरताना वह्या, पुस्तकं, कपडे, दप्तरं आणि हात निळे केले आहेत. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी शिक्षकांचा भरपूर मार खाल्ला आहे. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी गोदरेजच्या गोल डब्बीतल्या साबणानी दाढी केली आहे गुळाचा चहा प्यायला आहे भल्या सकाळी काळ्या लाल किंवा पांढऱ्या दंतमंजनानी बोटानी दात घासले आहेत बंब पेटवला आहे बंबातल्या गरम गरम पाण्यानी आंघोळ केली आहे.
आम्ही नक्कीच ते शेवटचे लोक आहोत ज्यांनी चांदण्या रात्री अंगणात किंवा गच्चीवर खाटेवर झोपून ट्रांझिस्टर वर ॲाल इंडिया रेडिओ, बीबीसीच्या बातम्या, विवीध भारती, बिनाका गीतमाला ऐकलं आहे. आम्हीच ते शेवटचे लोक आहोत जे संध्याकाळी गच्चीवर पाणी शिंपडायचो मग हंतरूणं घालायचो आणि त्यावर झोपायचो एक डुगडुगणारा पंखा सगळ्यांना वारा घालायचा आणि सगळ्यांना शांत झोप लागायची. सकाळी उन आल्यावरही तोंडावर पांघरूण घेऊन झोपून रहायचो. आता हे सगळं नाही राहिलं डब्ब्यां सारख्या खोल्यां मधे कूलर किंवा एसी लाऊन रात्र होते दिवस पुढे सरकतात. आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी नात्यांमधला गोडवा जपणारी आणि वाटणारी माणसं बघीतली आहेत जी आता दिवसें दिवस कमी होत चालली आहेत. आता लोक जेव्हडं शिकतायत तेव्हडंच स्वार्थ, अनिश्चितता, एकाकीपणा,नैराश्य ह्यात हरवत चालेले आहेत. आम्हीच ते नशीबवान लोक आहोत ज्यांनी नात्यांची गोडी अनुभवली आहे. आमची पिढी ही अशी एकमेव पिढी आहे जिनी नेहमी आपल्या आई वडिलांचं ऐकलं आणि आता आपल्या मुलांचंही ऐकते आहे. आमच्या पिढीतलं जसच्या तसं वर्णन आवडलं पाठवलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा