शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

1088. 'Honour' (सन्मान )

      हा तिसरा कॉल होता सागरला आलेला. त्या एका संस्थेकडून. 'स्वप्नपूर्ती' नावाची एक एनजीओ होती ती. जी समाजातील दिव्यांग लोकांसाठी, कामं करत असे. त्यांना शक्य तितकी शारीरिक, मानसिक मदत करून. ह्या समाजात वावरण्याकरिता सक्षम करण्यादृष्टीने, कार्यशील होती ही संस्था. अगदी पहिल्या कॉलमध्येच, सागरला ही माहिती देण्यात आली होती. सागरनेही थोडंफार ऐकून घेतलं होतं. पण जशी ती समोरची व्यक्ती अधिकच माहिती देऊ लागली, त्याने कामाच्या व्यापाचं कारण देत फोन कट केला होता. लगेच त्याने तो नंबर सेव्ह केला स्वप्नपूर्ती नावाने, नी पुढे कंसात लिहिलं 'Do not pick'. काही दिवसांपूर्वी मग ह्याच नंबरवरून त्याला कॉल आलेला, जो त्याने अर्थातच उचलला नव्हता आणि आता पुन्हा त्यांचाच कॉल आला होता तिसऱ्यांदा, जो सागरने पुन्हा इग्नोर केला होता. "डोनेशन साठी किती तो तगादा लावतात मागे, ह्या अशा संस्था. बरं दिलेल्या डोनेशनचा खरोखरंच सदुपयोग होतो की नाही, हे कोणी बघितलंय". असं स्वतःशीच पुटपुटत, सागर पुन्हा आपल्या कामात व्यग्र झाला होता. 
     सागर पारसनीस, एक प्रथितयश आर्किटेक्ट होता आणि त्याची स्वतःची फर्म होती. विसेक जणांचा स्टाफ होता त्याच्याकडे आणि चांगल्यापैकी प्रोजेक्ट्सही होते, हातात त्याच्या. गेल्याच आठवड्यात एका इंग्लिश न्यूज पेपरमध्ये, सागरची नी त्याच्या ह्या आर्किटेक्चर फर्मची सविस्तर माहिती आली होती. आणि त्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासूनच, हे कॉल प्रकरण सुरु झालं होतं. त्यामुळेच सागरचा ठाम समज होता की, डोनेशनसाठीच हे सगळं चालू आहे. संध्याकाळी पाचच्या दरम्यान, सागर एका क्लायंट मिटिंगसाठी बाहेर पडला. बरंच ट्रॅफिक होतं रस्त्यावर, त्यामुळे थांबत थांबतच गाडी चाललेली. कंटाळला होता सागर आणि तितक्यात त्याला त्या स्वप्नपूर्ती संस्थेची आठवण झाली, नी त्याने विचार केला. "तसाही काही टाइमपास नाहीचेय, तर करूया त्यांना फोन. बघू तर मजा, कसं गुंडाळू पाहतायत आपल्याला". म्हणून सागरने फोन लावला तिथे. पलीकडून एका स्त्रीने फोन उचलला. 
सागरने त्याची ओळख देताच, ती स्त्री पहिल्यांदाच बोलून मोकळी झाली की. 
"तुम्हाला केले गेलेले तिन्ही कॉल्स, तुमच्याकडून डोनेशन मिळेल ह्या हेतूने केलेले नाहीत". सागर खरंतर चपापलाच हे ऐकून. पुढे ती स्त्री म्हणाली. 
"आम्हाला अर्थात सवय असते अशा प्रतिसादाची, त्यामुळे आम्ही विशेष मनावर घेत नाही हे. मी तुम्हाला उद्या फोन करणारच होते. उचलला नसतात तर पुन्हा परवा". हे ऐकून बऱ्यापैकी वरमला सागर, नी विचारलं त्याने.
"पण जर तुम्हाला डोनेशन नकोचेय, तर का एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा इतका खाटाटोप?". हे ऐकून ती स्त्री उत्तरली.
 "Thanks for coming straight away on the point. म्हणजे पहिल्या कॉल वेळी मी किती बिझी आहे हे जे तुम्ही दाखवलंत, ते अगदीच काही खोटं नव्हतं. बरं मी ही मुद्द्यावरच येते फार वेळ न घेता. कारण एकदा कॉल कट करून, दोनदा न उचलून, तुम्हीच कॉलबॅक केलायत म्हणजे तुम्ही कुठेतरी चाल्लायत, नी तिथे पोहोचेपर्यंत तुम्हाला मे बी टीपी करायचाय". इतकं बोलून ती स्त्री स्वच्छ हसली, नी इथे सागरने कपाळाला हात लावला. तिनेच पुढे कंटिन्यू केलं. 
"आमच्या संस्थेबद्दल, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतंच त्या दिवशी. तर आमची संस्था दिव्यांगजनांसाठी, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. ह्यावर्षी येत्या रविवारी, आम्ही 'Parasports' चं आयोजन केलेलं आहे. तेव्हा त्याच्या बक्षीस समारंभाला. बक्षीस वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही यावत, अशी आमची इच्छा आहे. खेळ सकाळी दहा पासून सुरु होणारेत आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास, बक्षीस समारंभ सुरु होईल. तेव्हा तुम्ही अगदी चार पर्यंत आलात तरी चालेल". हे ऐकून सागरच्या मनात आलं की अरे देवा उगीच कॉल लावला. आणि तो म्हणाला.
"अहो काहीतरी काय. मी एक साधा आर्किटेक्ट आहे हो. आणि ह्या आधी असा कधीच कुठेही, प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो नाहीये. त्यातून भाषण वगैरे तर मला बिलकुल जमणार नाही. So it is not my cup of tea. तुम्हाला कितीतरी प्रतिष्ठित नागरिक मिळतील की ह्यासाठी. मी अगदीच रॉंग नंबर आहे हो. मुळात मला आता असं वाटतंय की, तुम्ही पहिल्यांदा मला कॉल केलात तो तर रॉंग नंबर नव्हता लागला ना ?".
ह्यावर त्या पलीकडील स्त्रीचा, पुन्हा एकदा निर्मळ हसण्याचा आवाज आला. शांतपणे म्हणाली ती.
"अजिबात नाही. तुमच्याशीच बोलायचं होतं मला. इनफॅक्ट गेली बरीच वर्ष, मी ह्याच प्रतीक्षेत होते. गेल्या आठवड्यात तुमची माहिती आली पेपरमध्ये, नी मला निमित्त मिळालं". हे ऐकून सागर आश्चर्यानेच उद्गारला. 
"काय? म्हणजे?". 
पलीकडून ती स्त्री पुन्हा खळाळून हसली. नी आणिक काहीही अवांतर न बोलता, जिथे यायचंय त्या ठिकाणाचा पत्ता दिला तिने. सागरने नाव विचारलं तिला, तेव्हा म्हणाली.
"प्रत्यक्षात भेटल्यावर सांगेन की". आणि पुन्हा एकदा छानसं हसत, तिने फोन कट केला. ह्या एवढ्या वेळात, सागर क्लायंटच्या ऑफिसपाशी पोहोचलाच होता. पण तिच्या त्या हसण्यात मात्र, अडकला होता सागर.
रविवार उजाडला. "त्यांनी चार पर्यंत बोलावलंय, म्हणून आपण अगदी तेव्हाच गेलं पाहिजे असं नाही. ज्यांना बक्षीसं द्यायचीयेत, त्यांचे खेळ जरा तरी बघू". असा विचार करून सागर दोनच्या सुमारास दिलेल्या पत्त्यावर, त्या इनडोअर स्टेडियमला पोहोचला. सागरची कार थांबली. ड्राईव्हर लगबगीने खाली उतरला. मागचा दरवाजा उघडत, त्याने फोल्डिंग व्हीलचेअर बाहेर काढून ती व्यवस्थित उघडली. पुढचा दरवाजा उघडला आणि सागरला अलगद पकडून बाहेर काढत, व्हीलचेअरवर बसवलं. दरवाजा बंद करून, गाडी लॉक करून, ड्राईव्हर व्हीलचेअर पकडणार तोच आणि कोणीतरी पकडली ती मागून. ड्राईव्हरने त्यांच्याकडे पाहिलं, तर ती स्त्री म्हणाली.
"तुमचे सर आता आमचा, ह्या संस्थेचा Honour आहेत. सो... मी नेते व्हीलचेअर पुढे". 
सागर संकोचून, नको नको म्हणतच होता तर ती स्त्री एकदम पुढ्यात येऊन उभी राहिली त्याच्या. 
"मी श्वेता पंडित. तिच श्वेता पंडित. जी वीस वर्षांपूर्वी, अगदी मरता मरता वाचली होती. कारण एका देवदूताने वाचवलं होतं तिला. ताबा सुटलेल्या एका भरधाव ट्रकने, उडवलंच होतं तिला की त्या अपरिचिताने तिच्या अंगावर उडी मारून, दूर ढकललं तिला. पण ह्या सगळ्यात त्या ट्रकचं एक चाक मात्र, खाली पडलेल्या त्याच्या कंबरेवरून गेलं. आणि... आणि त्यामुळे तो कायमचा कंबरेखालून.". इतकं बोलल्यावरच, श्वेताच्या गळ्यात हुंदका दाटून आला. सागरही एकदम शांत झाला, नी त्याने त्याच्या ड्राईव्हरला 'ठीकेय' ची खूण केली. चेअर सावकाशीने ढकलत, श्वेता आत घेऊन गेली सागरला. 
    खेळ संपले, बक्षीस समारंभ आटोपला, निघायची वेळ आली. त्यावेळी तिथे बाजूलाच उभा असलेला ड्राईव्हर, सागरपाशी येऊ लागला. श्वेताने पुन्हा त्याच्याकडे पाहून थांबवलं त्याला, नी सागरच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली ती. सागरकडे पाहून बोलू लागली. 
"त्या अपघातातून वाचल्यावर शरीराला जरी काही झालं नसलं, तरी मनाने प्रचंड धसका घेतला होता माझ्या. रस्त्यावरून चालण्याचाही कॉन्फिडन्स उरला नव्हता माझ्यात. ऐन विशीतच, अगदी पार गमावून बसले होते मी माझा आत्मविश्वास. किती मनसोपचार तज्ज्ञ झाले, त्यांची कित्येक सीटिंग्ज झाली. पण माझा अगदी गोळा झाला होता, एकाच जागी पडून असलेला. अशीच पाच वर्ष गेली. नी एकदा एका मराठी वर्तमानपत्रात, एका दिव्यांग तरुणाच्या जिद्दीने आर्किटेक्ट बनण्याच्या प्रवासाची माहिती आली. सागर पारसनीसच्या अफाट जिद्दीची कहाणी. ते सगळं वाचून माझ्या मनात आलं की. आपल्यावरचं संकट स्वतःवर ओढून घेणारा, ते रोज भोगणारा जर जिद्दीने स्वतःचा मार्ग आखू शकतो, मग मी का नाही? हा विश्वास मला त्या दिवशी मिळाला आणि मी उठले, पुन्हा एकदा नव्या जोमाने. तुम्ही... तुम्ही मला, पुन्हा एकदा वाचवलंत. पुढे मी राहिलेलं ग्रॅज्युएशन केलं, लॉ केलं, सोशल वर्कमध्ये मास्टर्स केलं. आणि फक्त नी फक्त तुमच्याच प्रेरणेने, ही संस्था स्थापन केली. दिव्यांगजनांच्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांची, पूर्ती करतो आम्ही. म्हणून ही त्यांची स्वप्नपूर्ती."
हे ऐकून सागरचे डोळेही भरून आले. नी त्याने दिलखुलासपणे हसत, श्वेताकडे पाहून टाळ्या वाजवल्या. श्वेताही तिचं हुकमी लाघवी हसली, नी पुढे म्हणाली.
 "इथे आत तुम्हाला घेऊन येतांना मी म्हणाले होते की तुम्ही आमचा, ह्या संस्थेचा Honour आहात इथे असेपर्यंत. पण आता इथून जातांना, मी विचारतेय तुम्हाला की यापुढे कायमस्वरूपी माझा, माझ्या एकटीचा Honour व्हाल? तसंही तुमचं लग्न झालेलं नाही, हे माहिती करून घेतलंय मी खूप आधीच. आणि मी तर तुमच्यासाठी लग्नाची थांबणारच होते. तसंही आता तुमच्या चाळीशीत माझ्याइतकी सुंदर, तुम्हाला मिळणारही नाही कोणी."
सागरने हसूनच मान हलवली, नी कपाळावर हात मारला. श्वेता सुद्धा मुक्तपणे जिवणी भरून हसू लागली. आणि तिथे बाजूलाच उभ्या असलेल्या ड्राईव्हरने, कडक सॅल्यूट ठोकला सागर आणि श्वेताला. 
एकीच्या प्रेमकथेला एकाने दुजोरा देत, 'Honour' प्राप्त करून दिला होता.

--सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...