कृष्णा कॉलनी फार देखणी होती. मध्ये रुंद रस्ता, नि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समोरासमोर घरे. घरे अगदी ऐसपैस, प्रत्येक घरासमोर छोटीशी बाग, आणि गंमत म्हणजे प्रत्येक घरासमोर एक तरी आंब्याचे झाड लावलेले. कॉलनीत शिरताना गेटमधून सरळ लांबवर नजर टाकावी, तर आंब्याची डेरेदार, हिरवीगार, एका ओळीतली झाडं बघून डोळे कसे सुखावून जात. या झाडांमधून डोकावणारी घरं फार सुंदर दिसत. गौरीच्या बाबांनी याच कॉलनीत तीन रूम भाड्याने घेतल्या होत्या. पहिल्या मजल्यावरच्या त्या तीन रूम फार छान होत्या. खाली स्वतः मालक, निवृत्त कर्नल कुलकर्णी रहात. वरच्या मजल्यावर निम्म्या जागेत तीन रूम बांधून, पुढची सगळी गच्ची अंगणासारखी मोकळी ठेवली होती. कर्नल कुलकर्णींना झाडांचं फार वेड. घरा पाठीमागच्या मोकळ्या जागेत लिंबू, नारळ, कढीपत्ता, शेवगा, पेरू, ही झाडं, तर पुढच्या मोकळ्या जागेत आंबा, मोगरा, झेंडू, गुलाब अशी फुलझाडं! हे कमी की काय म्हणून गच्चीवरही कोपऱ्यात, कुंड्यांमध्ये अनेक फुलझाडं, शोभेची झाडं लावलेली. कर्नल कुलकर्णीँसारखीच तिसरीतल्या गौरीला सुद्धा झाडांची, पशुपक्ष्यांची फार आवड होती. गच्चीवर लावलेली झाडं मालकांची होती, तरी गौरीला त्या झाडांना पाणी घालणं,नवीन पानं येताना त्यांचं निरीक्षण करणं, नवीन कळी आली, की त्याची वर्दी सर्वांना देणं फार आवडे. सकाळी उठली की गौरी ची पहिली भेट गच्चीवरच्या त्या झाडांना असे. सकाळचं दूध पिणं, सुट्टीच्या दिवशी नाष्टा करणं, ही गौरीची कामं त्या झाडांजवळ बसूनच चालायची.
एके दिवशी गंमत झाली. गौरीच्या शाळेला सुट्टी होती. तिच्या आईनं इडली केली होती. इडली खायला ती कुंड्यांजवळच बसली. खाता खाता थोडीशी इडली खाली सांडली. खाऊन झाल्यावर मग ते भरून टाकू असा विचार करून गौरी स्वयंपाक घरात प्लेट ठेवायलास गेली. पाणी पिऊन मागे येऊन पाहते तो काय! चिमण्या त्या इडलीभोवती जमलेल्या. सांडलेली सगळी इडली चोचीत भरून त्या भुर्रर्र उडूनही गेल्या. गौरीनं आनंदानं टाळ्या पिटल्या. मग तिनं आणखी इडली आणून ठेवली त्या कुंड्यांजवळ, आणि दाराच्या आत गुपचूप उभी राहिली. चिमण्या चिवचिवत पुन्हा आल्या. यावेळी आणखी चिमण्या आल्या. गौरीचा आता रोजचा नियम झाला. रोज सकाळी उठलं, की काही ना काही अन्न कुंड्यांजवळ नेऊन ठेवायचं. चिमण्यांपाठोपाठ येऊ लागल्या साळुंख्या. साळुंख्या चिमण्यांना हुसकावून लावत , त्यांच्यावर दादागिरी दाखवत, पोट भरलं की उडून जात.मगच चिमण्यांना संधी मिळे. आजूबाजूच्याही झाडांवर बरेच वेगवेगळे पक्षी येत . गौरीचं रोज निरीक्षण चाले. झाडांमधे लपलेले पक्षी ओळखायला गौरी आता सरावली. तिचं पक्ष्यांबद्दलचं कुतूहल पाहून तिच्या बाबांनी तिला पक्ष्यांचे च फोटो आणि त्यांची माहिती असलेलं पुस्तक आणून दिलं. नवीन कोणताही पक्षी दिसला, की गौरी पुस्तक काढून, त्याचा फोटो त्यात शोधे. त्याची माहिती वाचण्याचा प्रयत्न करे. कावळा, चिमणी, साळुंकी या नेहमीच्या पक्ष्यांबरोबरच तांबट, भारद्वाज, ब्राह्मणी घार , बगळा, लालबुड्या बुलबुल, दयाळ, कोकीळ, कोकिळा, खंड्या, रॉबिन,चष्मेवाला, फुलचुखी असे अनेक पक्षी ओळखायला शिकली गौरी. अशाच एका सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गौरी जागी झाली. दार उघडून बाहेर आली, नि दारातच खिळून उभी राहीली. समोरच्या आंब्याच्या झाडानं जणू काही पांढरी टोपी घातली होती डोक्यावर! किती तरी बगळे त्या झाडावर येऊन निवांत बसले होते. जणू काही त्यांची सभाच भरली होती. हिरवंगार गर्द झाड आणि त्यावर पांढरे बगळे! फार सुंदर दृश्य होतं ते ! थोड्याच वेळात सगळे बगळे उडून जाऊ लागले. जणू त्यांचे सभेतले कामकाज आटोपले. गौरीनं नेहमीप्रमाणे पोळीचे तुकडे,भात कुंड्यांजवळ आणून ठेवला. तोंड धुऊन दुधाचा ग्लास घेऊन बाहेर आली, आणि अगदी हरखूनच गेली ! इतका सुंदर, देखणा, छोटासा पक्षी ! रंग तरी काय सुंदर ! नजर हटू नये असा ! पिवळ्या जर्द पोटाचा, पाठीवरची पिसे चिमणीसारखी काळसर आणि डोकं पिवळ्याधमक रंगाचं! गौरीनं त्याला बघताक्षणीच नाव पाडलं, 'हेल्मेट '! हा आणखी एक नवीन पक्षी दिसला. गडबडीने तिने आईला हाताला धरुन ओढतच बाहेर आणलं.
"अगं, हा तर सुगरण पक्षी ! मागे एकदा बाबांच्या मित्रानं एक छानसं घर आणून दाखवलं होतं बघ. ते बांधणारा हा सुगरण पक्षी ! "
गौरीचे डोळे विस्फारले. पण याला तर हात नाहीत, आणि असं अवघड घरटं बांधतो तरी कसा तो? गौरीला त्या कलाकार पक्ष्याचं फार कौतुक वाटलं. दुसऱ्या दिवशी तो सुगरण पक्षी पुन्हा आला. येताना त्यांनं आणखी चार सवंगडी आणले. चिमण्या, सुगरण पक्षी एकमेकांशी न भांडता पोळीचे तुकडे खात. त्यांचं चांगलं पटे. गौरी नि तिची आई पाहत असतानाच चिमणी आणि सुगरण पक्षी उडाले. अरेच्चा! काय झालं? कोण आलं? गौरी आणि तिची आई समोर पाहतात तो काय, भला मोठा कावळा गच्चीच्या कठड्यावर येऊन बसलेला! क्षणात तो खाली कुंड्या जवळ आला. रागीट वाटणारे ते मोठे डोळे, दणकट पाय ! चिमण्या आसनी सुगरण पक्ष्यांच्या मानाने तो केवढा तरी मोठा ! आपल्या टोकदार बळकट मोठ्या चोचीत कावळ्यानं पोळीचे टाकलेले तुकडे एका दमात सगळे भरून घेतले आणि गच्चीवरच्या लिंबाऱ्याच्या झाडावर बसला. घराच्या गेटजवळ लावलेलं हे झाड गच्चीवरच्या कोपर्यात, कुंड्या ठेवल्या होत्या त्या कोपऱ्याच्या अगदी जवळ होतं. ताडमाड उंच वाढलेलं, एकांड्या शिलेदारासारखं, सरळसोट, उंच आणि अगदी वर शेंड्याला बऱ्याच फांद्या होत्या. पोपट, चिमण्या, साळुंक्या नेहमी या झाडावर बसत. दयाळ पक्षी हिवाळा जसा कमी होऊ लागला, तसा रोज संध्याकाळी या झाडावर येऊन बसायचा. गोड आवाजात बडबडत रहायचा. एके दिवशी भर दुपारी येऊन बसली होती तांबट पक्ष्यांची जोडी. फ़ांद्या, पानं विरळ असल्यानं गौरीला सगळे पक्षी स्पष्ट दिसायचे. तर याच झाडावर बसून कावळ्यानं चोचीत भरून घेतले पोळीचे तुकडे खाल्ले. पुन्हा कुंडाजवळ आला. आता चोचीत भात भरून घेतला नि मग उडून गेला. पुढे मग हे नेहमीचंच झालं. कावळा आला, की सगळ्या छोट्या पक्षांना हुसकावून लावी. त्याचं पोट भरल्यावर मग साळुंक्यांचा नंबर असे. आणि नंतर छोट्या चिमण्यांचा. सुगरण पक्षी कधी कधीच येत.
आज गौरीचा वाढदिवस होता. आंघोळ झाल्यावर आईने तिला औक्षण केलं, आणि म्हणाली, " जा देवाच्या पाया पड, आणि खाली कर्नल आजोबा -आजींना नमस्कार करून ये. "
कर्नल कुलकर्णी, किंचित सावळा असा रंग, उंची चांगली सहा फूट, तलवार कट मिशा, मिलिटरीतून रिटायर होऊन वीस बावीस वर्ष झाली. तरी तब्येत आजही युद्धभूमीवर जाऊन लढायला तयार अशी ! नियमित व्यायाम, खाणे साधे, पण वेळच्या वेळी, रात्री झोपायला कितीही उशीर होवो, पहाटे पाचला उठून फिरायला जाणे, व्यायाम करणे कधीच चुकले नाही. त्यांच्या निरोगी तब्येतीचं आणखी एक कारण होतं, त्यांचा आनंदी स्वभाव. त्यांच्या सहवासात दुसऱ्याला नेहमी उत्साही प्रसन्न वाटे. कर्नलांच्या पत्नीचाही स्वभाव मनमिळावू होता. हसरा चेहरा, कर्नल आजोबांच्या मिलिटरीतल्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे पटकन कुठेही, कोणाशीही जमवून घेण्याची त्यांची वृत्ती बनली होती. त्याही कर्नल आजोबांसारख्या उंच पण रंगाने गोर्या होत्या. कर्नल पती पत्नीना दोन मुली आणि एक मुलगा. तिघांची लग्न झालेली, तिघेही परगावी असत. दोघा पती-पत्नींना मुलांमध्ये मिसळायला फार आवडे. नेहमी दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असल्याने नेहमी त्यांच्याकडे अनेक माणसे येत जात असत. अशा या कर्नल आजोबा आजींशी गौरी ची गट्टी व्हायला मुळीच वेळ लागला नाही. आठ-नऊ वर्षांच्या चिमुरड्या लाघवी गौरीचे त्यांनाही फार प्रेम वाटे. नाजूक बांगड्यांचा नाजूक किणकिण आवाज व्हावा, तसं नाजूक आवाजात गाणं गुणगुणत गौरी जिना उतरून कर्नल आजोबा आजींकडे आली. खाली वाकून दोघांनाही नमस्कार केला.
तिला आशीर्वाद देत कर्नल आजोबांनी कौतुकाने तिला विचारले, " काय प्रेझेंट द्यायचं आमच्या गौरीला? "
आजींनी तिचा गालगुच्चा घेत विचारलं, " काय हवं गं चिमणे तुला? "
चिमणीचं नाव काढताच गौरीचे डोळे चमकले. क्षणभर आपल्याच विचारात हरवली गौरी. मग म्हणाली, " काय देणार? "
" तू मागशील ते " कर्नल आजोबा गमतीने म्हणाले.
" बघा हं, नाही म्हणायचं नाही. "
कर्नल आजोबा मोठ्यानं हसले.
" काय हवं, सांग. "
आपले मोठे मोठे डोळे कर्नल आजोबांकडे रोखत गौरी म्हणाली, " आजोबा, मला आपल्या गेट जवळचं झाड द्या."
कर्नल आजोबा लिंबाऱ्याचं हे झाड अधून मधून डाहाळंत. म्हणजे झाडाचा शेंडा न तोडता आजूबाजूच्या फ़ांद्या तोडून मेंढपाळाला विकत. कॉलनीच्या जवळ बरीच शेती होती. उन्हाळ्याच्या दिवसात या शेतांमध्ये मेंढपाळ मेंढ्या बसवण्यासाठी येत. या दिवसात मेंढ्यांना चारा फारसा मिळाला नाही, कि मेंढपाळ लिंबाऱ्याचा, बाभळीचा पाला शोधत फिरत. दोन दिवसांपूर्वी कर्नल आजोबांनी विचारायला आलेल्या एका मेंढपाळाला फ़ांद्या तोडून घेऊन जायला सांगितलं होतं. फ़ांद्या डहाळल्या, की, तीन /चार महिन्यात पुन्हा पालवी फुटून नवीन फ़ांद्या येत. झाडाचा शेंडा वर वर चढत राही. कर्नल आजोबांना आठवलं त्या मेंढपाळाला सांगताना गौरी तिथेच होती.
"झाड? झाड कशाला हवं तुला? " आजींना मोठे आश्चर्य वाटले.
"तू त्या झाडाचं काय करणार गौरी? " आजोबांनी न राहवून विचारले.
" अहो आजोबा, आमचा कावळा, चिमणी, पोपट त्या झाडावर येऊन बसतात ना ! कावळा चोचीतून पोळी, भात भरून घेतो,त्या झाडावर बसून खातो. पोपट येतात पिकलेल्या लिंबोळ्या खातात. तुम्ही झाड तोडलंत तर ते बिचारे सगळे कुठे बसतील? "
"पण आपल्या इथे तर कितीतरी झाडं आहेत, त्या झाडांवर बसतील. "
हो पण मला दिसणार नाहीत ना इतक्या जवळून ! "
गौरीचे उत्तर ऐकून कर्नल पती-पत्नी चाट पडले. वाढदिवसाला एवढी छोटीशी मुलगी एखादा game, किंवा इतर काही वस्तू,असं काहीतरी मागायचं सोडून काय मागते, तर झाड ! आजींना तिचं फार कौतुक वाटलं.
आजी आजोबांना म्हणाल्या, देऊन टाका हो झाड तिला. ती इथे राहते आहे, तोपर्यंत तरी त्या झाडाला हात लावायचा नाही." गौरीनं खुशीने उडी मारली आणि धावतच वर आईकडे गेली. कर्नल आजोबांनी तिची वाढदिवसाची ही भेट मोठ्या आनंदाने तिला दिली, ती तिथे राहत होती, तोपर्यंत ते झाड तोडलं नाही.
© नेहा पुजारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा