निशा काम संपवून बसलीच होती की फोन ची घंटी वाजायला लागली.मेरठहून विमला काकूंचा फोन होता, ”बेटी, येऊन आपल्या बाबांना येथून घेऊन जा. आजारी असतात, खुप अशक्त झाले आहेत. आम्ही पण आता तरुण राहिलो नाही, आता त्यांचे आवरणे अवघड होऊ लागले आहे. असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले.”
निशा म्हणाली, ”ठीक आहे काकू या रविवारी येतो, बाबांना आम्ही दिल्लीला घेऊन येऊ.” मग इकड-तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला.
बाबांना तीन भाऊ आहेत, वडिलोपार्जित घर आहे, तिघे तेथेच रहातात. निशा आणि तिचा छोटा भाऊ विवेक आपल्या परिवारासह दिल्लीला रहतात. तीन चार वर्षांपूर्वी विवेकला फ्लॅट घेण्यासाठी पैश्यांची आवश्यकता पड़ली तेव्हा बाबांनी भावांकडून घराच्या आपल्या तिसऱ्या हिस्याचे पैसे घेऊन, आपले कपडेलत्ते व खाण्या-पिण्यासाठी थोडे पैसे ठेवून, बाकी विवेकला दिले होते. दिल्लीला येण्याची त्यांना इच्छा नव्हती म्हणून जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत स्वत:साठी एक छोटी खोली ठेवली होती. निशाला वाटत होते, आई गेल्यापासून बिल्कुल एकटे पडले असतील बाबा, पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचं. दोन्ही काकू पण त्याचेकडे लक्ष द्यायच्या. दिल्लीत दोघा बहीन भावाचा संसार पण आनंदात चालला होता.रविवारी निशा आणि विवेक मेरठला निघाले. निशाचे पति अमित एक व्यस्त डाक्टर आहेत, महिन्याची लाखोंची कमाई आहे. त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणे खुपचं अवघड आहे. रुग्णांचा आजार रविवार बघत नाही व सोमवार ही नाही. विवेकची पत्नी रेनूचे आपले जीवन आहे, उच्च वर्गाच्या कुटुंबांमध्ये उठ- बस आहे तिचे. अशा छोट्या-मोठ्या पारिवारिक लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नाही. संपूर्ण प्रवासात विवेक मन मारून व गप्पच बसल्याचे निशाला जाणवत होते. ती म्हणाली, "इतका परेशान नको होऊ, काळजी करण्यासारखे काही नाही, वय झालं आहे, थोड़े अशक्त झाले आहेत, ठीक होऊन जातील.”
विवेक वैतागून बोलला, "सर्व व्यवस्थीत चालले होते,माहीत नाही काकांना अशी काय अडचण झाली, दोन चार वर्ष अजून सांभाळले असते.आता तर घरांच्या किंमती आभाळाला भिडल्यात. तेव्हा किती कमी पैशात तिसरा हिस्सा आपल्या नावे करून घेतला.”
निशा त्याला शांत करण्यासाठी म्हणाली , ”ठीक आहे ना, त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले आणि बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल."
विवेक उत्तेजित होऊन बोलला, ”ताई, तुला हे सांगणे खुप सोपे आहे. तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठं ठेवणार त्यांना? रेनूची वेगळीच कटकट राहील. तिने तर साफ मना करून दिले आहे की, ती बाबांचे काहीच आवरणार नाही. तसं तर ताई, मुली सगळं मागायला लगेच उभ्या रहातात, करायच्या नावाने का मागे सरकतात. आज काल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो. तू का नाहीं घेऊन जात बाबांना आपल्या घरी, इतका मोठा बंगला आहे, दाजींची लाखों ची कमाई आहे ?”
निशाला विवेकचे असे बोलणे ठीक वाटले नाही. पैसे घेतांना कसा अश्वासन देत होता बाबांना, ”तुम्हाला कोणत्याही वस्तुची गरज असेल तर निसंकोच फोन करून द्या, मी त्वरीत घेऊन येईल. या वेळी थोडी तंगी आहे बस्स.” नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकला ही नाही त्यांची विचारपूस करायला.
निशा: ” तू काळजी करू नको, मी घेऊन जाईन बाबांना आपल्या घरी.”
बरोबर आहे, तिला काय कमी आहे, इतके मोठे घर, नवरा रात्रंदिवस रूग्णांची सेवा करतो. एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय तर देऊच शकत होता.
बाबांना बघून तिचे डोळे भरून आले. इतके दुबळे व लाचार दिसत होते. त्यांना मिठीत घेऊन म्हणाली, ”आधी फोन करवला असता तर आधीच घ्यायला आली असती.”
बाबा म्हणाले,”तुझा आपला संसार आहे, कशाला त्रास देऊ. असेही दिल्लीत तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल.”
रात्री डाक्टर साहेब खूप उशीरा आले,तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते. जेवण करून निवांत झाल्यावर निशा ने डाक्टर साहेबांना म्हटले, ”बाबांना मी येथेच घेऊन आले आहे. विवेकचे घर खूपच छोटे आहे, त्याला त्यांना ठेवायला थोडी अडचण झाली असती.”
अमितचा मुड एकदम बदलला, तो रागात म्हणाला, ”येथे घेऊन आली म्हणजे? तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे. मी मोठे घर वृद्धाश्रम उघडायला नाही घेतले, आपल्याला रहायला घेतले आहे. प्राॅपर्टीचे पैसे हड़पतांना विचार नाही केला साले साहेबाने की बापाचे पण करावे लागेल. रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावतो, ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे.”
नवऱ्याचे हे रूप निशाला नविनच होते. “तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करता, माझ्या वडिलांसाठी तुमच्या घरात व हृदयात इतकीही जागा नाही का?”
अमितचा चेहरा ताणला गेला, तो जवळपास ओरडत म्हणाला, ”माणूस आजारी पडतो व ठीक होण्यासाठी पैसे देतो,मी ईलाज करतो व पैसे घेतो, हा व्यवहार आहे, यात सेवेसारखं काही नाही. हे माझे काम आहे, माझी रोजी-रोटी आहे. तू एक दोन दिवसांत आपल्या वडिलांना विवेकच्या घरी सोडून आली तर ठीक.”
निशा ला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता, ज्या पतीचा ती इतका आदर करत होती, तो असे काही बोलू शकतो. का तिने आपल्या भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला? का तिने सुरुवातीपासूनच एक एक पैशाचा हिशोब नाही ठेवला?
इतकी चांगली नोकरी करत होती, पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अमित ने हे सांगून सोडायला लावली की, "मी इतके कमवतोय तर तुला नौकरी करायची काय गरज आहे. तुला कुठल्याही गोष्टीची कमी नहीं राहणार, आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर."
आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्या जवळ किंवा या दहा वर्षांत घरात पुर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असती तर इतके तर जमा झालेच असते की वडिलांची स्वतःच्या हिंमतीवर काळजी घेऊ शकली असती. म्हणायला दर महीन्याला तिच्या नावावरच्या बैंक खात्यात पैसे जमा होतात परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती. भावाला ही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते, ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते. पती आणि भावाला दोघांना रांगेत उभे करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते, माहीत होते काही ना काही उत्तरं अवश्य असतील. पण या प्रश्नोत्तरात नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिरवणे अवघड होऊन जाईल.
दुसऱ्या दिवशी अमित दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन निशा बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून बसलेले होते. उदास स्वरात म्हणाले, ”माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस. माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहीत नाही. मी वृद्धाश्रमात बोलणं केले आहे, माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ती लोकं मला ठेवण्यास तयार आहेत. हा पत्ता घे आणि मला तेथे सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ.”
निशा समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे, मेंदू नाही. जावई कामावर जाण्याआधी भेटायला ही आले नाहीत यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही. काय उत्तर देणार,चुपचाप टैक्सी बोलवून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली. नजर मिळवू शकत नव्हती, व काही बोलणं ही जमत नव्हतं. बाबाचं तिचा हात हातात घेऊन म्हणाले, ”परेशान नको होऊ मुली, परिस्थितीवर आपलं कुठे नियंत्रण असतं. मी येथे समवयस्क लोकांमध्ये आनंदात राहील.”
तीन दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन. निशा ला कोनाशी बोलायचे मन होत नव्हते व काही खाण्याचंही. फोन करून विचारायची ही हिम्मत होत नव्हती की ते कसे आहेत. इतकी आत्मग्लानी होत होती की,कोणत्या तोंडाने विचारावे. वृद्धाश्रमातूनच फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत.दहा वाजले होते, मुलं सहलीला गेले होते, आठ नऊ वाजेपर्यंत येतील,अमित तर येतातच दहा वाजेपर्यंत. कोणाच्याच दिनक्रमावर काही फरक पडणार नाही, कुणाला निरोप तरी काय द्यावा. विवेक आॅफिसला गेला असेल, उगाच सुट्टी घ्यावी लागेल. संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रुंची धार वहात राहीली होती तिची, सांगणे मुश्किल होते वडिलांच्या जाण्याच्या दुःखात की आपल्या विवशपणावर. पण शेवटच्या घटकेत ती त्यांचे काहीच आवरू शकली नाही. तीन दिवस, फक्त तीन दिवस अमितने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिने मनापासून अमितला देवासमान मानले असते.
वृद्धाश्रमाच्या संचालकांच्या मदतीने तिने सारे सोपस्कार पार पाडले. ते म्हणत होते, ”रेकॉर्ड नुसार यांची सून, मुलगा आणि जावई ही आहेत, त्यांनाही कळविले असते तर बरे झाले असते." ती काहीशी सावरली होती, म्हणाली, "नाही, यांचे कुणीही नाही, ना सून, ना मुलगा आणि ना जावई, फक्त एक मुलगी आहे व ती ही फक्त नावापुरतीच.”
संचालक महाशय नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बोलत होते, ”परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देवो व बाबांच्या आत्म्याला शांती मिळो.”
निशा विचार करत होती,"बाबांच्या आत्म्याला तर शांति मिळालीच असेल. जाण्याआधी त्यांचा सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता. समजून गेले असतील कोणी कुणाचं नसतं, मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील.आणि हो, परमात्मा तिला इतकी शक्ति देवो की ती बहिण आणि पत्नीचे नाते कसेबसे निभावू शकेल.“
हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावतो आहे.
मी ही एक मुलगी आहे,पण एक गोष्ट सांगू इच्छिते की," प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपले हातचे सर्व सोडून द्यायला नको. आपल्या भाविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे. नंतर तर मुलांचेच आहे पण जीवंतपणी मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगले !"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा