"आईs, उठ ना ग… नको ना अशी झोपुन राहुस. तुला असं झोपलेलं बघण्याची सवय नाहीये." शरयू आईजवळ बसून म्हणत होती, पण आईला तिचे शब्द ऐकू येत होते की नाही ते तो देवच जाणे, कारण आई आता सगळ्याच जाणिवा, भावना ह्यापासून खूप लांब गेलेली होती.
रडून रडून शरयू आता दमली होती. आईला हाका मारून थकून गेली अगदी. शेवटी निलेशनी तिला बाजूला नेले. आईs.. आईला आठवत शरयू कॉटवर फक्त बसून होती. किती वेळ ते तिलाही समजत नव्हतं, कारण अगदी समजत नव्हतं त्या वेळेपासून, आई ही एकच अशी व्यक्ती होती जी तेव्हापासून आत्ता पर्यंत तिच्या बरोबर कायम होती, तिची स्वतःची सुखदुःख बाहुला ठेऊन शरयूच्या सुखदुःखात सामील होत होती. आणि आता तिची लाडकी आई. तिची एकमेव सखी तिला सोडून पुढच्या प्रवासाला निघून गेली होती. खूप आठवणी अश्रूंच्या आड शरयू च्या डोळ्यात दाटून येत होत्या. अचानक पहिले लहानपणीचे दिवस डोळ्यांसमोर आले, आणि आईची हाक तिच्या कानावर ऐकू आली.
"अग शरयूs... किती वेळ अजून खेळणार? आता, दिवेलागणी झाली तरी तू अजून खेळतेच आहेस. आत्ता नाना येतील, चल बरं घरात, हात पाय धुवून देवाजवळ बस बरं शुभंकरोती म्हणायला". एवढे म्हणून जानकी आत गेली. जानकी आणि रामराव म्हणजेच आई आणि नाना राजापूर मधलं एक कष्टाळू आणि संस्कारी कुटुंब. आजी नेहेमी म्हणायची कि, आमचं घर तसं विस्कटलेलंच होतं. आजी तीन मुलांना एकटीच सांभाळत होती. घरची अगदी गरिबी. आजोबा ही मुलं लहान असतानाच एकदा घर सोडून अचानक निघून गेले. हिमालयात जायचं म्हणून. त्यांना देव, समाधी लावून बसणं, ह्या सगळ्यांचीच जास्त आवड होती म्हणे. मुलांची जबाबदारी एकट्या आजीवर पडली. आजी म्हणायचीही. "ते गेले होss संसार, मुलं बाळं, सगळं सोडून. पण मी कसं जाणार? हे सगळं वाऱ्यावर सोडून मी कुठे जाणार?. आता मुलांची जवाबदारी मला एकटीलाच उचलली पाहिजे. बाईच्या जातीला नाही जमत असं घरावर तुळशीपत्र ठेऊन हिमालयात निघून जायला. पण मग अश्या माणसांनी संसारात पडावच कशाला?" आजी आपली आजूबाजूच्या घरी कुरडया पापड्या, पापड, लोणची करून देऊन कशी बशी घर चालवत होती. तिन्ही मुलं शाळेबरोबरच थोडी पूजे अर्चेची कामेही शिकत होती. त्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये सत्यनारायण, रुद्र वगैरे सांगून थोडी आजीला मदत होत होती. रामराव मोठे. त्यामुळे साहजिकच दोन धाकट्या भावांची जवाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली. पुढे पुढे रामरावांनी आजीचे कष्ट कमी करून स्वकष्टावर घर सांभाळायला घेतलं .रामराव अगदी पहिल्यापासूनच सहनशील होते. एखादवेळी स्वतः घास न खाता आधी आई आणि भावंडांच्या मुखात देत होते. त्यांनी भावंडांची शिक्षणं केली. आजीला नेहेमी वाटायचं की रामरावांना बायको चांगली मिळायला हवी ! आजपर्यंत त्यांनी सगळ्यांना सांभाळलं, आता त्याला सांभाळणारी, त्याला प्रेम लावणारी अशी बायको त्याला मिळु दे.
आणि खरचं जानकी अगदी तशीच होती. मूळ रत्नागिरीची, शिकलेली, आणि शाळेत शिवकणारी.
लग्न होऊन जानकी राजापुरला आली, रामरावांच्या संसाराची सहचारिणी बनून. जानकी आली आणि रामरावना आपलं स्वतःच आयुष्य अगदी बदलून गेल्यासारखं वाटत होतं. आता घराची, दिरांची, आजीची आणि खुद्द रामरावांची सुद्धा जबाबदारी तिने उचलली होती. सगळ्यांचं हवं नको बघत होती. हळू हळू दोन्ही दिरांची लग्न झाली आणि दोघेही नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. इकडे आजी, नाना आणि आई तिघेच, अडचणी येत होत्या, दिवसेंदिवस पूजेची कामेही कमी होऊ लागली होती. त्यातच आता शरयू आणि दोन वर्षात शंतनु चा जन्म झाला होता. मुलांची शिक्षणं, त्यांचं खाणं पिणं, आजीही आता वय झाल्यामुळे थकली हाती. आता ती ही झोपून झोपूनच असायची. आईनी मग आजूबाजूच्या मुलांच्या शिकवण्या चालू केल्या, त्या बरोबरच घरपोच डब्यांचाही घरगुती व्यवसाय तिने चालू केला होता. शरयू , शंतनू आणि नाना ही तिला होईल तशी मदत करत होते. ती नानांना म्हणायची,"संसार तुमच्या बरोबरीने माझाही आहेच ना मग अडचणीच्या वेळी मी पण तुमच्या बरोबरीने उभी राहीन, आपल्या मुलांना छान शिक्षण देऊन आपण त्यांना त्यांच्या पायावर उभे करूयात." जनाकीच असणं, हाच नानांसाठी एक आधार होता. ती मुलांनाही नेहेमी शिकवायची की ह्या जगात नुसतं जगत राहाण्यापेक्षा आपल्या माणसांबरोबर अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभे राहून, त्यांचा आधार होऊन जगावं. काही दिवसातच आजीही गेली. जाताना जानकीला म्हणाली ती, "खुप केलंस होsमाझं. घरचंही सगळं कसं खंबीरपणे करते आहेस. आता तुझ्यावर घराची जबाबदारी देऊन मी जायला मोकळी."
नानांची पूजेची कामे थोडी थोडी चालूच होती. जानकीच्या शिकवण्या आणि डबेही चालू होते. तिचे आणि नानांचे संस्कार मुलांवर होत होते. शरयू आणि शंतनु दोघेही छान शिकले. शरयू इंजिनिअर तर शंतनू एमबीबीएस झाला. शरयूला मुंबईत नोकरी मिळाली. तर शंतनूने स्कॉलर शिपवर विदेशात पुढचं शिक्षण घेऊन नोकरी सुरू केली. शरयूच्या ऑफिसमध्येच निलेश कामाला होता. दोघांची ओळख झाली आणि प्रेम जमलं. तिने आणि त्याने आपापल्या घरी ही गोष्ट सांगितली. अडथळा यावा असं काहीच नव्हतं. दोघांचंही शिक्षण छान, एकाच ठिकाणी कामाला. मग काय. राजापूरलाच लग्न झालं. खूप छान लग्न करून दिलं जानकी आणि नानांनी. शरयू सासरी गेली.. आता आई आणि नाना एकटेच. तसा शंतनु ही येऊन जाऊन होता. त्याचंही कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम होतं. मुंबईतच होते तिचे आई वडील. मुंबईला शरयू कडे राहूनच आई नानांनी शंतनूचही लग्न केलं. तो आणि त्याची बायको काही दिवसातच अमेरिकेला गेले. आई नाना परत राजापुरला आले. शरयू आणि निलेश त्या दोघांना खूप आग्रह करत होते की आता इथेच राहा म्हणून. पण जानकीच एकच म्हणणं की, "अजून हात पाय चालतायत तोपर्यंत नको. कधीही तुम्हाला गरज लागली तर येऊच की हक्काने." आणि खरचं काहीच दिवसात ती वेळ जवळ आलीच. शरयू ला दिवस राहिले होते. घरी कोणी नाही, निलेशच्या आईबाबांची तब्बेतही बरी नसायची त्यामुळे ते म्हणायचे की "आम्हालाच बरे नसते, त्यात अजून आम्ही तुमच्यावर भार होऊन कसे राहायचे?" जानकी ने मात्र लगेच प्रश्न सोडवला. ती आणि नाना शरयू कडे येऊन राहिले. अगदी तिचं बाळ होईपर्यंत आणि रीमाचा जन्म झाला.
शरयू म्हणालीही. "आईs तू होतीस म्हणून बरं झालं ग. नाही तर माझं कसं झालं असतं? त्यात तुला नानांकडेही बघावं लागत होतं"
पण जानकीच आपलं नेहेमीच उत्तर. "अडीअडचणीला नाही कामी यायचं तर कधी यायचं?" आणि ती दोघे परत गेली राजापुरला. शंतनूलाही मुलगा झाला. त्याच्याकडेही आई आणि नाना बाळंतपणासाठी अमेरिकेला गेले. आता मात्र शंतनू म्हणाला. "आईस.आता तरी ते डबे, शिकवण्या बंद कर ना. आम्हीही चांगले कमावतो. पैसे पाठवू की आम्ही. नाही तर इथेच राहा नाs" पण जानकीला आत्ताच हे सगळं नको होतं. तिला पुढची काळजी वाटत होती. नानांची. नाना आता जरा जास्तच थकले होते. आई त्यांना सोडून मुंबईला यायला तयार नव्हती. आधीच्या अति कष्टामुळे नानांची तब्बेत आता साथ देत नव्हती. आणि एक दिवस नानांनी कोणालाही न कळता देवाची पूजा करत असतानाच शांतपणे डोळे मिटले ते कायमचेच. त्यावेळी सगळे आले होते राजापूरला. जानकी म्हणाली.. " खूप सहनशील माणूस होते नाना म्हणजे काही होत असेल तरी मला जास्त त्रास नको ना म्हणून काही बोलायचे नाहीत. पण मला दिसत होतं सगळं. औषधं घेऊनही काही फायदा होत नव्हता". आता जानकी शरयू कडेच येऊन राहिली. घरातला स्वयंपाक, रिमाचं हवं नको हे सगळं तीच बघत होती. रिमालाही आजी खूप आवडायची. दोघींची चांगलीच गट्टी जमली होती. जानकी तशी स्वाभिमानी होती. शरयू आणि निलेश वर आपला खूप भार नको म्हणून जमवलेल्या पैशातून ती बरेच वेळा नकळतच घरात भाजी, किराणा आणीत होती. अशीच बरींच वर्ष मध्ये गेली. जानकी इकडे छान मिसळून गेली होती. अधून मधून शंतनू ही येत होता भेटायला. आणि एक दिवस जानकी ही कोणाला न कळता अचानकच हे जग सोडून गेली. अगदी प्रसन्न मनानी.
शरयूने खूप हाका मारूनही आई उठतच नव्हती. ती आता इथला प्रवास, इथली जबाबदारी पार पाडून पुढच्या प्रवासाला गेली होती कायमची. शरयू चे डोळे रडून रडून सुजले होते. रीमा तिच्या जवळ येऊन म्हणाली.
"मम्मा नकोs ग रडू.. मी आहे ना तुझ्याबरोबर. जशी तू होतीस आजी बरोबर. पूस बरं डोळे".
शरयू रिमाकडे पहातच राहिली आणि समजून गेली की हा तर प्रत्येक पिढी दर पिढी संपणार नाही असा प्रवास आहे. तो हसत खेळतंच केला पाहिजे. आपल्या माणसांच्या उपयोगी येऊन त्यांना पुढे नेऊनच हा प्रवास करायला हवा. शरयू ने रिमाला मिठी मारली आणि म्हणाली.
"खरंच माझ्या आईसारखीच मी ही सदोदित तुझ्या अडचणींच्या वेळेला तुझ्याबरोबर असेन. आजीसारखाच मी हि हा प्रवास असाच अखंड ठेवेन. आई.. मग ती कोणाचीही असो, पण ती कधी आजारी, अंथरुणाला खिळलेली अशी बघवतच नाही. कायम हसणारी, आपल्या सोबत असणारी, सगळ्यांना जपणारी आई, काळाच्या ओघात कधी थकून जाते? अंथरुणाला आपलंस करते, ते कळतंच नाही. आई.. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आपण आहोत.
©® smita Agte..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा