रेल्वेने नागपूरला इन्टरव्ह्यूसाठी चाललो होतोे. रेल्वेतून निव्रुत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते. नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बँगा घेऊन आत चढला. माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली. तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली. तिला पाहीलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !
"कुठं जाताय?" तो तरुण मला विचारत होता.
"नागपूरला "मी शुध्दीवर येत म्हंटलं.
" थोडं लक्ष ठेवाल का? मिसेस गोंदीयाला जातेय. एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे."
तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.
" हो ठेवेन की. त्यात काय विशेष ! "
मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली. गाडी निघाली तसा तो उतरुन गेला. तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं. समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती. खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती. मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या. त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती. तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते. विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती. माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती. बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे. पण तीची फिगर अतिशय सुरेख होती. मनात विचार आला, स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का? की हिच्यापेक्षा जास्त? नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो. ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती. मुलाला बाटलीने दुध पाजतांना, त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.
एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं. तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली. नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती. पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा, भडकपणा नव्हता. घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती. काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं. ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती. मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती. आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो. भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा. तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.
"या जेवायला"
अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम गडबडून गेलो.
" मी आताच जेवलो बघा."
ती सौम्य हसली. मग म्हणाली
" हो पाहिलं मी. हे स्वीट तरी घ्या." एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली. मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.
" नागपूरला रहाता?"
तिनं जेवता जेवता विचारलं.
"नाही. इंटरव्ह्यूला चाललोय"
" कोणत्या कंपनीत?"
मी कंपनीचं नाव सांगितलं.
"इंजीनियर आहात?"
"हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये" मी जरा अभिमानानेच सागितलं.
"मी सुध्दा इंजीनियर आहे" ती म्हणाली."एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये"
मी वरमलो. माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.
" मग जाँब करताय कुठे?"मी विचारलं
" नाही. करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं."
" मिस्टर काय करतात तुमचे?"मी थोडं इर्ष्येने विचारलं.
" ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात."
" फँक्टरीज?"
" हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात."
बापरे !मी गार झालो. एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो. तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो. माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील. तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती. कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.
" तुम्ही एकट्याच जाताय? नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?"
एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं.
"का? कशासाठी? नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं. गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच. एका रात्रीचा तर प्रश्न होता. तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं "
" तरीपण कुणीतरी..…."
"अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले. आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? "
मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती. मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी ग्रुहिणी असावी पण फँक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फँक्टरीच्या प्राँडक्ट्सची, त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगबद्ल तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा, तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खुप भारावून गेलो होतो.
"थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते"
मी होकारार्थी मान हलवली.
ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पँसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा ! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो गोड वाटत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला.
तेवढ्यात ती आली.
"रडत होता वाटतं !" तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.
थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हांला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पँसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.
"मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय." तिनं स्पष्टीकरण दिलं.
सकाळ झाली.आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो. कथाविश्व ग्रुप. एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.
"घरी कोणकोण असतं?"तिनं अचानक प्रश्न केला.
" मी,आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीय"
"म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे"
"हो तर ! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार?"
तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली "तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मँनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना एसएमएस करते"
मी नाव सांगितलं तिनं एसएमएस केला.
"तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून"
"संजना कोण?"मी विचारलं
"मीच. माझंच नांव संजना" ती हसून उत्तरली.
" थँक्यू व्हेरी मच अँड साँरी."
"साँरी? कशाबद्दल? "तिनं आश्चर्याने विचारलं
" काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात, एका मुलाची आई आहात. माझी चुक झाली. आय अँम एक्स्ट्रीमली साँरी फाँर दँट"
तीनं हलकसं स्मित केलं.म्हणाली. "फरगेट इट.अशा नजरांची मला सवय आहे. स्वतःची बायको सुंदर असतांना दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमँरीड आहात आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते."
थोडं थांबून ती म्हणाली" आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहीजेत. खरं ना?"
" नाही नाही" मी घाईघाईने म्हणालो "अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढेन" तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला. नागपूर आलं. मी खाली उतरलो. तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.
"बेस्ट आँफ लक फाँर युवर इंटरव्ह्यू" ती म्हणाली.
"थँक्स"
जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला. इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्नीकल प्रश्न विचारुन एकशेसाठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की. संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही. पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खुप चांगली शिकवणही देऊन गेली.
© दीपक तांबोळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा