शनिवार, १३ एप्रिल, २०२४

1052. मानिनी

आशाने साठ वर्षे पुरी केली आणि तिचा मुलगा जय तसेच सून वर्षा यांचे म्हणणे पडले, आईची एकसष्ठी साजरी करायची.जयने त्याच्या अनुमावशीला आणि माधवमामाला फोन केला. 
जय - मावशी, आईने साठी पुरी केली, आमची इच्छा आहें तिची एकसष्ठी साजरी करूया, तुझे काय मत आहें? 
मावशी - होय बाबा, तिने आयुष्भर कष्ट केलेत, त्रास खुप सोसलाय. तुला वाढवताना आणि व्यवसाय सुरु करून पैसे मिळविताना, तीच कोणी कौतुक केलंच नाही पण इतरांचे कौतुक करायला ती सर्वांच्या आधी पुढे असते. आणि नेहेमी हसतमुख, तू दिवस ठरव, आम्ही आहोत तूझ्या मदतीला. 
 जय -हो मावशी, मामाला पण फोन केलाय, तो पण मामीसह येणार आहें. 
संध्याकाळी जय आणि वर्षाने आईला एकसष्ठी कार्यक्रमाबद्दल सांगितले, तेंव्हा आशाने त्याला उडवून लावले. 
आशा -असले कार्यक्रम मला आवडत नाहीत रे आणि मी माझ्या आयुष्यात काय एवढे दिवे लावलेत की पराक्रम केलाय म्हणून माझा एवढा कार्यक्रम करतोस तू? मी आपली साधी बाई, नवऱ्याने घरातून हाकलून लावलेली. माझे कसले कार्यक्रम नकोत.
    आई अशी ऐकणार नाही he जयला माहित होते, त्यामुळे त्याने अनुमावशीला आणि आशाच्या आत्या विजूआत्या ला कळविले. मग विजू आत्या ने आशाला दम भरला तशी आशा तयार झाली. मग जय आणि वर्षाने तयारी चालू केली, छोटा हॉल पाहिला,आईला न कळवता हिऱ्याची अंगठी केली,सोन्याचा नेकलेस केला. साडया खरेदी केल्या. जवळच्या नातेवाईकांना भेटी घेतल्या. एका योग गुरुचे प्रात्यक्षिक आणि लेक्चर ठेवले. कुणा कुणाला बोलवायचे याची यादी करण्यासाठी जय आणि वर्षा बसली. एव्हड्यात वर्षाच्या लक्षात आलं म्हणून तिने जयला विचारले "तूझ्या बाबांना, काका काकू ना बोलवणार आहेस क?'
जय थंबकला. हा जटील प्रश्न त्याच्या लक्षात आला नव्हता.
"हे आईलाच विचारायला हवं 'जय म्हणाला.
रात्री आशा मेडिकल स्टोअर मधून आली, त्यानंतर काही वेळाने जय आणि वर्षा आपल्या एजन्सी मधून आली. रात्री जेवताना तिघांनी एकत्र जेवायचं हे ठरलेलं.
जेवायला सुरवात केली एव्हड्यात जय ने आईला विचारले 
"आई, बाबांना काका काकूंना बोलवायचं आहें ना?
हे वाक्य आशाने ऐकलं मात्र, हातातला घास ताटात टाकून ती किंचाळली "नाही, अजिबात नाही,'
"अग पण एकसष्ठीला बायकोबरोबर नवरा.
"नावाचा नवरा तो, हिम्मत नव्हती म्हणून सोडल नाही मी. पण मनातून कधीच कंटाप केलाय त्याला, मला घरातून हाकलून लावलेल्या माणसाला कार्यक्रमला बोलवायचं, पुरुष नाही का बायको नसेल तर कणवतीला सुपारी लाऊन कार्य उरकतात, मग आम्ही बायका तसं का करू नये?'. संतापलेल्या आशाने घास ताटात टाकला आणि हात धुवून खोलीत गेली आणि धाडकन दरवाजा लाऊन घेतला.
जय वर्षाला म्हणाला "उगाचच बाबांचं नाव घेतलं, त्या रागाने आई रात्रभर झोपायची नाही.
बेडवर पडलेल्या आशाचा संताप संताप झाला. काही गोष्टी विसरायचंय म्हंटल तरी पिशाच्च होऊन समोर उभ्या राहतात. तिच्या डोळ्यसमोर तीस वर्षांपूर्वीचें तीच लग्न डोळ्यसमोर आले.
तीस वर्षांपूर्वी 
   आशा भावंडात शेंडेफळं. सर्वात देखणी आणि सर्वांची लाडकी.अभ्यासात जेमतेम पण खेळात, नृत्यात पुढे.शाळेतील नाटकात सुद्धा तिने भाग घेतलेला आणि बक्षीसे मिळविलेली. तिने तारुण्यात प्रवेश केला आणि ती अनेकांची "दिल की धडकन 'झाली.पण तिने कुणाकडे लक्ष दिले नाही. मोठया बहिणीचे अनुचे लग्न झाले आणि मग भावाचे माधवचे पण लग्न झाले.त्यानंतर आशा साठी नवरा शोधणे सुरु झाले. आशाचा आपल्या आईवडिलांवर विश्वास होता. आपल्यासाठी ते योग्य ते स्थळ शोधतील हे तिला माहित होत. मग ओळखीतून नितीनचें स्थळ आले, दापोलीच्या जवळच त्यांचे घर होते, गावात औषध दुकान होते. नितीन आणि त्याचा मोठा भाऊ दुकान सांभाळत होते. घरी फक्त नितीनची मोठी वहिनी आणि त्यांची दोन मुले. म्हणजे नितीन आणि भावाची चार माणसे.  वडिलांना नितीन बरा वाटला. आपण पण आईवडिलांना जास्त त्रास नको म्हणूंन होय म्हंटल.थोडक्यात लग्न झालं आणि आपण सासरी गेलो. नव्याचे चार दिवस संपले आणि सासरची नेमकी परिस्थिती लक्षात यायला लागली. घरात जशी थोरल्या जाऊची दादागिरी तशीच मोठया दिराची दुकानात.दुकानचा सर्व व्यवहार मोठया दिराच्या हातात -आलेले पैसे, दयायचे पैसे, माल मागवणे, चेक्स वर सही सर्व मोठया भावाकडे.  नितीन फक्त काऊंटर वर उभा किंवा एका टेबलावर बसलेला. घरी पैशाचा व्यवहार थोरल्या जाऊकडे, पैसे हवे असतील तर तिच्याकडे मागायचे. त्री नितीन खोलीत आला की ती नवऱ्याला विचारायची.
"तुम्हाला या घरात आणि दुकानात कसलीच किंमत नाही, सर्व काही मोठया भावाच्या आणि वहिनीच्या ताब्यात. मग इथे राहता कशासाठी? आता लग्न केले आहें तर माझा पण काही विचार करायला नको? मी तिच्याकडे पैसे मागणार नाही. मी तुमच्यकडे मागेन. तुम्ही मला पैसे आणुन द्या '.
असे ती बोलली की नितीन चिढी आणि अबोला ठेवी. आशाला काय करावे हे सुचेना. तिच्या लक्षात आले, या घरातून बाहेर पडायला हवे तरच पुढचे आयुष्य सुसह्य होईल. आशाने शहरात जाऊन नवीन औषधं दुकान काढायचे म्हंटले की तिचा नवरा चिडायचा, भाऊ वहिनी, पुतणे पासून वेगळे व्हायचे नाव घेईना. त्यात आशाला दिवस गेले त्यामुळे तिची आणखी चिडचिड व्हायची. प्रसूतीसाठी आशा माहेरी आली, तिच्या घरची एकांदर परिस्थिती पाहून तिची आई रडायची. मोठया मुलीला समजूतदार माणसे मिळाली, मुलाला चांगली बायको मिळाली पण लाडक्या धाकट्या मुलीच्या बाबतीत फसवणूक झाली, म्हणून तिला वाईट वाटायचं. जयचा जन्म झाला आणि आशा सुखावली. त्याचा चेहरा थेट तिच्यासारखा होता. सहा महिने माहेरी राहून आशा घरी आली पण घरची परिस्थिती होती तशीच.सासरी आल्यानंन्तर पुन्हा तसेच दिवस जाऊ लागले. मोठी जाऊ जयचा तिरस्कार करत होती, तो रात्रीचा रडायला लागला की हिची बडबड सुरु होई, मोठे दीर सुद्धा चिडत असत. आशाची पुतणी लहान जयला खेळाऊ पहात असे पण तिचे आईवडील तिच्यावर चिडत असत. छोटया जयला डॉक्टर कडे न्यायचे तिने तीन तीन वेळा नवऱ्याला सांगितले, पण तो सोबत आला नाही. मान खाली घालून तिला जावकडे पैसे मागावे लागत होते. जाऊ चिडून बोलून दोनशे रुपये हातावर टिकवत असे. सुदैवाने तिची अनुमावशी आली की तिच्या हातात हजार रुपये टेकावून जात असे, त्या पैशाचा तिला आधार होता. जुन्या आठवणींनी डोक्यात पिंगा घालायला सुरवात केली तशी आशाची झोप उडाली, मग ती बेडवरून उठली आणि तिच्या रूममध्ये असलेल्या झुलत्या खुर्चीवर येऊन बसली.  मन मारून नाईलाजाने ती घरात राहत होती. मधल्या काळात बाबा देवाघरी गेले, दोन वर्षांनी आई गेली. माधव मुंबईला आणि मोठी बहीण पुण्यात. अशा वेळी तिला रत्नागिरीत राहणाऱ्या विजूआतेचा आधार वाटे. महिन्यातून एकदा ती विजूआते कडे जाई.
अशा परिस्तितीत जय पाच वर्षाचा झाला, तेंव्हा ती परत एकदा नवऱ्याच्या मागे तगादा लावला, त्या गावात जिल्हा परिषदेची चौथी पर्यत शाळा होती पण चार किलोमीटरवर. या असल्या शाळेत मुलाला घालून त्याचे नुकसान होईल म्हणून दापोली नाहीतर खेड मध्ये नवीन दुकान काढू म्हणजे तेथे बिऱ्हाड करता येईल आणि जयला पण शाळेत घालता येईल. तिचा मोठा आवाज ऐकून जाऊ मध्ये पडली, मग दीर बोलू लागला. त्याच्या धीराने नवरा आशा बरोबर भांडू लागला. मग जाऊ घरात गेली आणि कपडे सुकत घालायची काठी घेऊन आली आणि त्या काठीचे दोन तडाखे तिच्या डोक्यात घातले, आशाच्या डोक्याला खोक पडली आणि रक्त येऊ लागले.  तिचा नवरा मग पुढे झाला आणि त्याने तिला हाताला धरून बाहेर ढकललं. ती अंगणात पडली. तिचे रडणे ऐकून जय जागा झाला आणि आईच्या दिशेने धावला. आशाच्या जावेने दार बंद करून घेतले. रडत रडत आशा उठली, तिच्या पायाकडे बसलेल्या जयला तिने उचलून घेतले आणि बंद केलेल्या दाराकडे पहात ती अंगणातून बाहेर पडली. या रात्रीच्या वेळी सोबत लहान बाळाला घेऊन कुठे जावे, असा ती विचार करत असताना तिला मारुतीच्या देवळाशेजारचे बाबीं काका आठवले. बबिकाका आणि काकीकडे ती कधीमधी जायची. त्यांची एकूलती एक मुलगी लग्न करून दिलेली मालवणला असायची, त्यामुळे ती दोघेच घरात असायची. काकी तिला खूप प्रेमाने वागवायची.आशाचे घरची मंडळी तिला खुप त्रास देतांत, म्हणून ती हळहळायाची. रात्रीच्या अशा वेळी आशाला काका काकीची आठवण आली. ती त्यांच्या घरच्या दिशेने चालू लागली. आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.
काकी -अग, या वेळी.. आणि तूझ्या डोकयातून रक्त येतेय.. आणि जय का रडतोय?
तोपर्यत काका पण बाहेर आले, त्यानी आशाची परिस्थिती पाहिली. त्यांच्या लक्षात आले, घरी मारझोड झाली आहे.
काका -अग तिला आत तर येउदे.
आशा आणि यश आत आले. काकीने तिला पाणी दिले.
काकी -काय झाले ग? मारलं का तुला?
आशा - होय काकी, जावेने काठीने मारले आणि यांनी घरातून बाहेर फेकून दिले. काका, आजची रात्र मला आसरा द्या. उद्या मी विजूआतेकडे जाणार. आजची रात्र मला आसरा द्या.
 काका -अग, रहा ना. आसरा कसला? आमची मुलगीच तू.
 काकीने दोघांना आत घेतले. चटकन गॅस वर भात ठेवला, दही होतच. दहिभात दोघांना वाढला. कपडे बदलायला दिले.* 
 आशा -काकी, उद्या सकाळच्या गाडीने मी रत्नागिरीला जाते. विजू आतेने मला सांगून ठेवलय, घरात काही त्रास झालं तर आपल्याकडे यायचं. काकी, मला फक्त पन्नास रुपये द्या,S.T तिकिटासाठी. 
 काकी -काही काळजी करू नकोस. मी इथे राहा पण म्हंटल असत, पण याच गावात राहिलीस तर तूझ्या घरच्यांना कळणार आणि मग मला शिव्या खायला लागणार.
 आशा -बरोबर आहें काकी, आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायला हवं आणि जयचं पण पुढील आयुष्य आहें, यासाठी रत्नागिरी सारखं शहर हवंच. त्या रात्री ती आणि जय काकीकडे राहिली, सकाळी लवकर उठून काकांनी दिलेले पाचशे रुपये घेऊन तिने रत्नागिरीला जाणारी बस पकडली. आशा जयला सोबत घेऊन सकाळच्या गाडीने रत्नागिरीत पोहोचली आणि चालत चालत मधल्या आळीतील विजुआतेच्या घरी आली, विजुआतेचे यजमान जे डॉक्टर होते, ते स्कूटरवर किक मारून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होते, त्यानी तिला मुलासोबत येताना पाहिले. त्यानी बायकोला हाक मारून सांगितले.
" विजू, अग आशा येते आहें जयला घेऊन'.
विजआते गडबडीने बाहेर आली. आशा ला पाहून तिला आनंद झाला पण एवढे सकाळीच आलेली पाहून काळजी पण वाटली.
"अग आशु, सकाळीच, ये ये.
विजूआतेला पहाताच आशाच्या गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि आतेच्या गळ्यात पडली.
"अग अग आशु, काय झालं, तू आत ये पाहू. तिने तिच्या नवऱ्याला दवाखान्यात जायला सांगितले. आशु आणि जयला घेऊन ती आत आली. प्रथम तिने जयला दूध बिस्किटे दिली आणि आशूला चहा पोहे. मग आशुने आतेला सर्व हकीकत सांगितली, डोकयावरची खोक दाखवली. आते तिची खोक पाहून हळहळली. आते म्हणाली 
"आशु, तू आता आंघोळ कर, जयला आंघोळ घाल, आराम कर. दुपारी हे आले की मग ठरवू काय करायचे ते '.
    दुपारी डॉक्टर घरी आले, मग सर्वांची जेवणे झाली. आतेने डॉक्टरना आशुची सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरनी पण आशूला लहानपणा पासून पाहिलेले, तिचे लाड केलेले. तिची अशी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यानी आशूला विचारले.
 "आशू, तुला परत त्या घरात जायचे आहें काय? असेल, तर पोलिसांकडे तक्रार करून तुला मानाने घरात प्रवेश मी मिळवून देतो आणि घरातल्या सर्व मंडळींना सक्त सूचना देऊन '. 
 "नाही काका, मला त्या घरात जायचे नाही, नवऱ्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला माझ्या पायावर उभे राहायचे आहें, त्यासाठी धंदा, नोकरीं करून जयला मोठं करायचे आहें ' 
 "ठीक आहें, तू कष्ट करायची तयारी ठेव, आम्ही तूझ्या पाठीशी आहोत.' 
जुलै महिना सुरु होता, डॉक्टरकाकांनी रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेज मधून D.farm चा फॉर्म आणला आणि आशुचे फार्मसी कॉलेज सुरु झालं. जय आता शेजारच्या बालवाडीत जाऊ लागला होता. विजूआतेचा एकच मुलगा सुनील पुण्यात मेडिकला होता, त्यामुळे रत्नागिरीत आते आणि डॉक्टरकाका दोघेच असायचे. त्यामुळे त्याना पण आशू आणि जय मूळे जाग होती. आशूकॉलेज मध्ये जाऊ लागली, कॉलेज मधील मूल तिच्यामागून कॉमेंट्स मारत होती, पण कुणाकडेही लक्ष न देता आशूने चिकाटीने फार्मसी कोर्स पुरा केला. काकांचे लक्ष होतेच. काकांचे मित्र परांजपे डॉक्टर यांचा मुलगा प्रथमेश स्त्री रोग तज्ज्ञ झाला होता आणि रत्नागिरीत हॉस्पिटल काढणार होता. त्याच्या हॉस्पिटलचें काम सुरु होते, त्या हॉस्पिटल मध्ये मेडिकल स्टोअर ची जागा ठेवली होती. डॉक्टरकाकांनी परंजपेना सांगून ती जागा आशू साठी पक्की केली.  दिवाळीत हॉस्पिटलचें उदघाटन झाले आणि त्याच दिवशी डॉक्टरकाका आणि विजआते च्या हस्ते "जय मेडिकल 'चें उदघाट्न झाले. डॉक्टरकाकांनी स्वतः जामीन राहून आशूला बँक कर्ज मिळवून दिले.
   पहिल्या दिवसापासून परांजपे हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे जय मेडिकल मध्ये पण गर्दी होऊ लागली. हॉस्पिटलच्या आवारात असल्याने तेथल्या नर्सेस आणि इतर स्टाफ तिचा मित्र बनला. त्यामुळे दिवस कसा संपायचा हे तिला कळत नसे. रोज येणारे पेशन्ट औषधं खरेदी करता करता तिला आपल्या घरच्या गोष्टी सांगायचे. औषधं सप्लाय करणारे डिस्ट्रिब्युटर, त्यांचे सेल्समन, मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव. मेडिकल रेप. ची तिला आठवण झाली आणि आशू खुर्चीतून उठली आणि तिच्या बेडरूमला जोडून असलेल्या गॅलरीत आली. तिला शिरीष ची प्रकर्षाने आठवण झाली, कुठे असेल शिरीष? शिरीष गोखले? मेडिकल सुरु केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आते काकांचा पाठींबा होताच पण परांजपेडॉक्टर मंडळीचा पण होता. तिची संसारातील फारपट त्याना समजली होती. मग डॉ परांजपे यांचे लग्न झाले आणि डॉ समिधा त्या हॉस्पिटल मध्ये आली.  समिधा आशुची मैत्रिणच झाली.रिकामा वेळ असेल तेंव्हा समिधा तिच्या मेडिकल मध्ये येउंन बसायची. आतेकडे येऊन पाच वर्षे झाली होती, या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिची चौकशी पण केली नव्हती.कर्ज फिटले होते, त्यासुमारास रत्नागिरीत प्लॅट सिस्टिम सुरु झाली होती. तिने पण समुद्रा जवळ मोठा प्लॅट बुक केला आणि एका वर्षात ती जय सह तिकडे राहू लागली. आशुच्या डोळ्यसमोर तो काळ आला. आपण त्या वेळी पस्तीशीच्या होतो. आर्थिक सुबत्तेमुळे आणि सतत चांगल्या लोका मध्ये असल्याने आपण फारच देखण्या दिसत होतो. अचानक शिरीष भेटला.
शिरीष -शिरीष हा एका मोठया औषधं कंपनीचा प्रतिनिधी (M. R), डॉ ना भेटायला रोज किमान सहा सात तरी M.R. यायचे. डॉक्टरना भेटून झाले की ते आपल्या मेडिकल मध्ये येऊन नवीन औषधाची माहिती सांगायचे,ऑर्डर्स घयायचे. शिरीष पण त्यातलाच. तो कोल्हापूर मधून यायचा. दर महिन्याच्या बारा किंवा तेरा तारिखला तो रत्नागिरीत असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वत काही तरी जादू होती, तो डॉ कॉल ला आला की हॉस्पिटल मधील नर्सेस पण उत्तेजित व्हायच्या, त्यांच्यात नेत्र पल्लवी सुरु व्हायची, डॉ कॉल नंतर तो आपल्या मेडिकल मध्ये यायचा. आत येता येता 
"मॅडम, चहा मागवा 'अस ओरडत यायचा. मी पण पुष्पाला चहा आणायला पाठवायची, तेव्हड्यात माझ्या खुर्ची समोर टेबल घेऊन तो माझ्या डोळ्यात बघत बोलायचा.
"मॅडम, या ड्रेस मध्ये छानदिसताय, आज तुमचा नवरा खूष असणार..'
मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार तोच तो ऑर्डर बुक काढायचा आणि पेन उघडून ऑर्डर्स साठी वाट पाहायचा. इतरांना कंजुषीने ऑर्डर्स देणारी मी शिरीषला मात्र मोट्ठी ऑर्डर्स दयायचे. मग चहा घेऊन तो निघायचा. निघताना म्हणायचं " मॅडम,आता पुढील बारा तारीख '.
पुढची बारा तारीख कुठली मी दुसऱ्यादिवशी पासून त्याची वाट पहायचे. रोज कॅलेंडर कडे पहात उसासे सोडायचे. मग दहा तारीख.. मग अकरा... मग बारा.. आणि ती मस्त कपड्यात अकराच्या सुमारास यायचा..
 माझं मन म्हणायचे, याच लग्न झाले असणार.. याची बायको यांच्यासारखीच सुंदर असेल... किती नशीबवान ती... मग माझी परिस्थिती मला जाणवायची आणि मी उसासे सोडायची.  डिसेंबर महिना आला, मी बारा तारीखची वाट पहात होते, बारा तारिखला छाती धडधडत होती.. शिरीष अकरा वाजता येईल.  पण दुपारचे दोन वाजले तरी तो आला नाही.. दुसऱ्या दिवशी नाही... तिसऱ्या दिवशी नाही. माझ्याकडे to पर्यत लँड लाईन आला होता पण शिरीषचा नंबर कुठे माहित होता? पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.
मी -तुम्हाला शिरीष गोखले माहित असतील ना?
MR - हो, का?
मी -मी त्यांच्याकडे गेल्या महिन्यात ऑर्डर्स दिली होती, त्याने कुठल्या एजन्सी कडे दिली काही कळत नाही, अजून माल आला नाही, म्हणून..
M. R -मॅडम, शिरीष माझा मित्रच. तो सध्या डिस्टर्ब मूड मध्ये आहें.
मी -काय झालं? आजारी आहें का तो?
M. R.-आजारी नाही. त्याची बायको घर सोडून गेली आहें कायमची.
मी -का? एवढा चांगला नवरा आणि..
M. R-शिरीष चांगलाच आहें हो. पण त्याची बायको तऱ्हेवाईक आहें, कुणाशी तिचे पटत नाही, त्यांची रोज भांडणे व्हायची. आता मात्र ती कायमची घर सोडून गेल्याचे मला समजले आणि त्यामुळे शिरीष.
मी -त्या मूळे शिरीष सतत दारूच्या नशेत. कुणाला भेटत पण नाही, फोन केला तर हॅल्लो करतो आणि ठेऊन देतो.
आशुच्या लक्षात आले, शिरीष कडे फोन आहें.
मी -तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहें का?
MR- आहें
अस म्हणून त्याने आशूला शिरीषचा लँडलाईन नंबर दिला.
शिरीष सतत दारूच्या नशेदेत त... काय हे, एवढा हुशार देखणा पुरुष आणि याची बायको याच्याशी भांडतेच .. आणि आता सोडून गेली म्हणे...
दैव देत आणि कर्म.. असच नाही का... मला असा नवरा मिळाला असता तर.. आयुष्य म्हणजे आनंदाच झाड झालं असत..
आशूने मिळालेल्या फोन नंबर वर फोन लावला.
आशु -हॅल्लो, शिरीष बोलतात काय?
शिरीष दारूच्या नशेत होता. मोठया प्रयासाने त्याने रिसिव्हर उचलला.
शिरीष -कोण बोलताय?
आशु -मी आशा, रत्नागिरीहुन, जय मेडिकल..
शिरीश ची खाडकन दारू उतरली. तो रेसिव्हर सांभाळत उत्तरला 
शिरीष -कोण मॅडम? कसा काय फोन केला? आणि माझा नंबर कुठे मिळाला?
आशू -नंबर कसा मिळाला हे महत्वाचे नाही, तुमचे काय चालले आहें?
शिरीष -कसले आणि काय?
आशु -मला कळले आहें तुम्ही व्यसनात अडकला आहात. माझी इच्छा आहें की तुम्ही आज पासून हे व्यसन बंद करा आणि पूर्वीसारखे कामाला लागा.
शिरीष -हो मॅडम, आज पासून नव्हे आता पासून व्यसन बंद.
आशु -माझा तुमच्यावर विश्वास आहें, ठेवते.
आशूने फोन ठेवला, शिरीषआश्यर्य चकित झाला,्जी आपल्याला आवडते ती जय मेडिकलची मालकीनीने स्वतः आपल्याला फोन केला.आपण तिला आवडतो की काय?मग तिच्या गळ्यातील काळे मणी आणि कुंकू.. याचा अर्थ काय?
    थोडी तब्येत बरी झाल्यानंतर शिरीष रत्नागिरीत आला. आल्या आल्या तो जय मेडिकल मध्ये आला. त्याला पहाताच आशूला मस्त वाटलं. त्याची तब्येत बरी दिसताच तिला आनंद झाला. 
 आशू -कशी आहें तब्येत? 
 शिरीष -कशी दिसते? चांगली आहें. 
 आशू -आयुष्यात असे प्रसंग येत असतात, स्त्रियांवार सुद्धा येतात पण कोण व्यसने सुरु करत नाही, त्याला तोंड द्ययच असत. 
 शिरीष -तुमच्यावर असे प्रसंग आले नाहीत म्हणून.. 
 आशू -आले होते नव्हे त्यात मी अडकले आहें पण.. 
 शिरीष -कसला प्रसंग मॅडम.. 
 आशू -हे दुकान आहें, सांगेन.. कुणाला तरी सांगावे असे वाटते.. पण आज आणि इथे नको.* 
 शिरीष -मग केंव्हा? 
आशू -मी फोन करेन तुम्हाला..
बर अस म्हणून आणि चहा पिऊन शिरीष गेला.
शिरीष कोल्हापूरात गेला पण रोज आशुचा फोन येईल म्हणून वाट पहात होता. पण चार दिवस झाले तरी तिचा फोन आला नाही.
इकडे आशू विचार करत होती, खरच हे संबंध वाढवावे की आत्ताच कट करावेत. आपल्याला हे झेपेल? जय चें काय,? आपली बहीण, भाऊ, विजू आते, काका? डॉ परांजपे फॅमिली? आणि आपला अजून घटस्फोट नाही झालेला? शिरीषचा पण नाही झालेला.
शिरीष आपल्याला हवासा वाटतो, सतत सोबत असावासा वाटतो. त्याच्या खांद्यावर मान ठेऊन समुद्राकडे पहात राहावंसं वाटतं.अजून आपण तरुण आहोत, तरुण स्त्री च्या सर्व इच्छा भावना आपल्यालाही आहेत. पाच दिवस वाट पाहून मग शिरीषने तिला कॉल लावला. ती खुप आंनदीत झाली. तिने आपला सर्व भूतकाळ त्याला सांगितला.त्याला खुप वाईट वाटलं.त्यानेही आपली घरची परिस्थिती, आईवडील, नोकरीं, लग्न, मूल न होणं वगैरे सांगून आपलं मन मोकळ केल. आणि मग रोज रात्री उशिरा जय झोपल्यावर त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले. शिरीषने तिला जीवनसाथी बनण्याची इच्छा व्यक्त केली.आशुने सर्व अडचणी सांगितल्या. अजून घटस्फोट न घेतल्याचे सांगितले. त्यावर त्याने इतकी वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल असे सांगितले आणि पुढील आठवड्यात आपण रत्नागिरीमध्ये येत असून त्यावेळी मराठे वकिलांना भेटूया, असे सांगितले. तसेच आपली पत्नी बहुतेक या महिन्यात आपणाकडून घटस्फोट मागणार अशी बातमी आपल्याला कळली असल्याने ती पण अडचण नाही, असे सांगितले. आशू आंनदात होती. तीच मन मोरासारखे थुई थुई नाचत होते.  गेली कित्येक वर्षात ती देवळात गेली नव्हती. आता ती देवळात जाऊन देवाचे दर्शन घेत होती. येताना फुलांच्या दुकानात जाऊन रोज कुठल्या न कुठल्या फुलाचा गजरा घेऊन केसात माळत होती.तिने स्वतः साठी फारसे ड्रेस किंवा साडया घेतल्या नव्हत्या, आता मात्र तिने जय साठी कपडे घेतलेच पण आपल्यासाठी शोभणारे ड्रेस तसेच साडया, सॅन्डल्स घेतले. घरात नवीन फर्निचर घेतले.शिरीष पुढील आठवड्यात आला म्हणजे वकिलांना भेटून घटस्फोटची नोटीस दयायची,अशा आंनदात आशू होती. शिरीष पण घटस्फोट घेईल, मग आतेला, बहीण भावाला सांगायचे असे तिने ठरवले. सर्वाना आनंदच होईल हे तिला माहित होते. रोज रात्री त्या दोघांचा फोन ठरलेला होता.शनिवारी रात्री तिने फोन लावला, दुसऱ्यादिवशी दुकान बंद म्हणून तिला बोलण्यास वेळ होता.
 "हॅल्लो शिरीष... तिने लाडाने त्याला विचारले 
 "कोण? तू मेडिकलवाली काय, माझ्या नवऱ्याला फुस लावतेस?"पलीकडून खेकसत एका स्त्रीचा आवाज आला. 
 आशू घाबरली 
 "कोण.. कोण.. शिरीष आहें. 
 "शिरीष हवाय तुला? तुला लाज वाटतं नाही एका लग्न झालेल्या पुरुषाला रात्रीअपरात्री फोन करायला..आणि तिने असभ्य भाषेत शिव्या द्यायला सुरवात केली. 
 आशू गडबडली. तिने फोन खाली ठेवला.पाच मिनिटानंतर पुन्हा फोनची रिंग वाजली, तिला वाटले शिरीषचा फोन असेल. पलीकडून तीच बाई बोलत होती 
"ए भवाने, मी शिरीष गोखलेची बायको बोलते आहें, मला कळलं हल्ली माझा नवरा रत्नागिरीत पडलेला असतो, कोणी मेडिकलवाली भुलवते आहें त्याला, पण लक्षात ठेव मी जिवंत असेपर्यत काही घडणार नाही, मी दोघांना जेलमध्ये घालेन, माझ्या नवऱ्याचा नाद सोड, दुसरा कुणी पकड. आणि ती बरीच बडबडत राहिली, शिव्या देत राहिली.
आशू सुन्न झाली. तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली एका मिनिटात. आशू रडू लागली, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ठोकरच बसते आहें.
   मग दुसऱ्या दिवशी शिरीषचा फोन आला, तो रडत तिची माफी मागत होता. हे पण संकट जाईल अस म्हणत होता, पुन्हा आपण एकत्र येऊ अस म्हणत होता,  तिने त्याचे म्हणणे ऐकले आणि शांतपणे रेसिव्हर खाली ठेवला. शिरीष नावाचा चॅप्टर तिने बंद केला. पुन्हा ती देवळात जायची बंद झाली, गजरा माळायची बंद झाली. आता घर, रोजचे जेवणं, डबा घेऊन दुकानात जाणे, जयचा डबा, त्याची शाळा, केंव्हातरी विजू आतेकडे जाणे, भावाबहिणीला फोन करणे बस्स. तिच्या दुकानात रोजच M. R. येत असत, त्यांच्या गप्पातून तिला कळलं, शिरीषने पुण्याला बदली घेतली. मग काही दिवसांनी कळलं, शिरीषने कंपनी बदलली आता तो मराठवाड्यात असतो. त्याच्या बायकोचे आणि त्याचे रोज भांडण होते, मारामारी रोजची इत्यादी.ती निर्वीकार मानाने सर्व ऐकत होती. एका दिवशी ती नेहेमीप्रमाणे दुकानात असताना एका कंपनीचा MR तिला म्हणाला 
"तुम्हांला कळलं का मॅडम, शिरीष गोखलेने आत्महत्या केली म्हणे.
ती किंचाळली "काय?'
"म्हणजे अजून गेला नाही तो, हॉस्पिटल मध्ये आहें पण सिरीयस आहें अशी बातमी आहें '.
तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं.ती मनातल्या मनात रडू लागली. पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती. 
     म्हणता म्हणता ती साठ वर्षाची झाली. जय बारावी झाला, मग तो B. Farm ला गेला. त्याला व्यवसायाची आवड म्हणून तिने त्याला "जय एजन्सी 'सुरु करून दिली. एवढी वर्षे ती मेडिकल चालवत होती, त्यामुळे तिच्या ओळखी होत्याच. एका वर्षात त्याला वीस कंपन्याच्या agencies मिळाल्या. दहा माणसे कामाला ठेवली. जोरात धंदा होऊ लागला. मग माल सप्लाय करण्यासाठी टेम्पो घेतला. त्याला मुली सांगून येऊ लागल्या, मग परंजपे डॉक्टर यांच्या ओळखीच्या कुटुंबातील वर्षा चें स्थळ आले आणि जयचे लग्न होऊन वर्षा सून म्हणून घरात आली.  गॅलरीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या आशुच्या डोळ्यसमोर तिच्या आयुष्याचा चलतचित्रपट सरकत होता. साठ वर्षे आपण पुरी केली, कळलेच नाही. या आयुष्यात आईवडिलांसारखे विजुआते आणि काका तसेच डॉ पराजपे यांचे उपकार न विसरण्याजोगे. याच आयुष्यात शिरीष भेटला आणि मनात वसला तसेच बाहेर पण पडला. हे आपले साठ वर्षाचे आयुष्य. जय आणि वर्षा यांनी आपली एकसष्ठी ठेवली आहें आणि तो विचारतो, जन्मदात्याला आणि काकाकाकूला बोलवणार का, म्हणून?  काय केल बाबा तूझ्या पित्याने?  काकाकाकूने? हाकलून दिल घरातून, पुन्हा चौकशी पण केली नाही कधी. जिवंत आहोत का मेलो याची. 
   आशुची एकसष्ठी पार पडली. बहीण भावोजी, भाचरे, भाऊ वहिनी तसेच मावंशी आणि तीच कुटुंब, विजुआते, डॉ काका, डॉ पराजपे फॅमिली हॉस्पिटलस्टाफ, जिल्ह्यातील केमिस्ट परिवार तसेच अनेक ओळखीची मंडळी हजर होती.कार्यक्रमला मंगळसूत्र घातलेल्या बाईचा नवरा उपस्थित नाही म्हणून काही मंडळींनी कुजबुज केली पण ज्यांना आशुची परिस्थिती माहित होती, त्यांना आश्यर्य वाटले नाही. सर्व मंडळी आपापल्या घरी गेली, पुन्हा आशू मेडिकल मध्ये आणि जय वर्षा एजन्सी मध्ये मग्न झाले. एक दिवस वर्षाने आपल्या नवऱ्याला म्हणजे जयला विचारले 
"जय, तूझ्या आईचा जवळजवळ पस्तीस वर्षे नवऱ्याशी संबंध नाही मग तिला दुसरे लग्न करावे असे वाटले नाही कधी?
"विजआजी मला एकदा म्हणाली होती, शिरीष गोखले नावाचा एक कोल्हापूरमधील MR तिला आवडायचा, असे आईने आजीला सांगितले होते. त्याची बायको घटस्फोट घेणार होती आणि मग आई घटस्फोट घेऊन त्यांच्याशी लग्न करणार होती, पण काही कारणाने ते लग्न झाले नाही. शिरीष गोखले आता कुठे असतांत कोण जाणे?
एक दिवस आशू दुकानात असताना जयचा फोन आला "आई, गावाकडून काकूने निरोप दिला आहें, तुझे बाबा जास्त आजारी आहेत,त्यांना घेऊन जा '
"आत्ता आठवण झाली का आमची, पण तुझा पत्ता त्यांना कळला कसा?
"अग त्या गावातील एक मुलगा माझ्या एजन्सी मध्ये कामाला आहें, त्याने त्यांना सांगितले असणार.'
 "काय आजारी आहेत?"हार्ट अटॅक आलाय बहुतेक '. 
 "ठीक आहे, मुलगा आहेस म्हणून कर्तव्य कर, गाडी घेऊन जा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर '. 
 जय गाडी घेऊन गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला आणि डॉ परकार हॉस्पिटल मध्ये त्याना ऍडमिट केले. हॉस्पिटल मध्ये सर्व तपासण्या झाल्या आणि बायपास करायला हवे असे डॉ नी सांगितले. जयने सर्व पैश्याची व्यवस्था केली. जय रोज हॉस्पिटल मध्ये जात होता पण आशू एकदाही गेली नव्हती. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आधल्या दिवशी जय आईला म्हणाला "आई, ते म्हणत आहेत, माझे गावाकडे खुप हाल होत आहेत, जेवणं पण मिळत नाही, खिशात पैसे नाहीत, मी तुमच्याघरी येऊ काय?' 
     आशू कडाडली -"जय, त्यांना त्यांच्या घरी पोहोचून ये. त्या घाणीतून मी पस्तीस वर्षांपूर्वी मी तुला घेऊन बाहेर पडले, ती घाण परत माझ्या घरात नको. आणि परत असले निरोप मला देऊ नकोस.यांनतर तूझ्या माणसाला सांगून ठेव, त्या घरातले बरे किंवा वाईट निरोप दयायचे नाहीत. मी इथे मानाने रहाते आहें, मानिनी सारखी. त्यांची दृष्ट लागायला नको '.
जय वडिलांना गावी पोहोचून आला.
    आशुचे आयुष्य नेहेमीसारखे सुरु होते, सून वर्षा हल्ली सतत म्हणायची "आई, तुम्ही कुठेच फिरला नाहीत. अजून धड कोकण पाहिले नाहीत. केंव्हा तरी लग्नकार्याच्या निमित्ताने मुंबई किंवा पुणे, ते पण घाईत. लोक आता युरोप ट्रिप करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तुम्ही पण जा ना.
आशू मनात म्हणायची, मला पण जावेसे वाटते पण जाऊ कुणाबरोबर. रोज सारखा कंटाळवाणा दिवस सुरु होता, निमा आणि मीना काऊंटर सांभाळत होत्या, आशू स्टोकिस्ट कडून आलेली बिले चेक करत होती, एव्हड्यात दुकानासमोर रिक्षा थांबली आणि गृहस्थ हातातील बॅग सांभाळत सरळ आत येत म्हणाला "मॅडम, चहा मागवा '.
आशू चमकली, तोच आवाज, बोलण्याची तीच पद्धत वीस वर्षा पूर्वीची. तिने झटकन मान वर करून पाहिले, डोळे विसफ़ारले, चेहरा आश्रयचकित झाला, ती किंचाळली "शिरीष '.
काही कळायच्या आत ती त्याला बिलगली. शिरीषने तिला थोपटत म्हणाला,"होय आशू, मी शिरीष '.
ती रडत रडत म्हणाली "अरे तू आहेस?
"होय आशू, मी आहें. तुला कुणीतरी सांगितले असेल मी आत्महत्या केल्याचे. करायचा होता मला नाश स्वतःचा, पण शेजाऱ्यांनी धावपळ करून मला वाचवलं, आता गेल्या महिन्यात ती पण गेली कॅन्सरने. माझा शत्रू संपला पण मी आहें '.
 आशुच्या लक्षात आलं, आज आपण जे वागलो ते पाहून दुकानातल्या मुलींना आश्यर्य वाटलं असणार. ती परत शिरीष पासून अलग झाली आणि त्याला म्हणाली "चल, आपण घरी जाऊ, मला तुझ्याशी खुप खुप बोलायचं आहें '. निमाला दुकानाकडे लक्ष दयायला सांगून तिने रिक्षा बोलावली आणि त्याला घेऊन ती घरी आली.  मग शिरीषने आपली सर्व हकीकत सांगितली. मग बायको आपल्यावर कसा लक्ष ठेऊन असायची. कुणाला फोन करतो, कुणाचा येतो हे पहायची. रोज पैशावरून, जेवणावरून भांडणे. आपण या काळात तीन नोकऱ्या सोडल्या. कंटाळून खुप झोपेच्या गोळया घेतल्या, पण शेजारी बरा होता त्याच्या लक्षात आले, त्यानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि वाचवले. कंटाळवणे आयुष्य चालले होते. दोन वर्षांपूर्वी बायकोला कॅन्सर झाला. मी हयगय न करता सगळे उपचार केले पण उपयोग झाला नाही, आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर तिला माझ्या बरोबर दुष्ठपणाने वागल्याचा पक्षचताप झाला, तिने क्षमा मागितली आणि पंधरा दिवसात ती गेली '.
आशू शिरीषला म्हणाली "शिरीष, तू पुन्हा भेटशील ही आशा मी सोडली होती, माझ्या मनातला पुरुष तूच होतास, आता मी समाजाचा विचार करणार नाही, माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या नाहीत. जय चें लग्न झाले आहें, दुकान, एजन्सी जोरात सुरु आहें, पण मी एकटी आहें रे, तुझ्यावाचून मी अपुरी आहें, मला या वयात साथी हवा आहें आणि तो तूच आहेस. आपण लग्न करू आणि आयुष्याचा शेवटचा काळ एकमेकासामावेत घालवू, नाही म्हणू नकोस शिरीष.
"नाही कशाला म्हणू आशू, मी मनापासून तुझ्यावरच प्रेम केलाय.'
"तर मी आज जय आणि वर्षाला सांगते, आम्ही लग्न करतोय म्हणून '
    त्याच दिवशी जय आणि वर्षा घरी आली आणि अनोळखी माणूस पाहून चक्रवली. आशू ने जयला ओळख करून दिली 
"जय, हा शिरीष, शिरीष गोखले. जयला एकदम आश्यर्य वाटले, त्याने त्यांचे नाव विजूयाआजी कडून ऐकले होते. त्याला माहित होत, आईला यांच्याशी लग्न करायची इच्छा होती. 
"अरे हो, छान छान.. मी ऐकलं होत तुमच्याबद्दल.. विजू आजी म्हणाली होती '
"हो ना, जय तेंव्हा आम्ही लग्न करू शकलो नव्हतो, पण समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही लग्न करत आहोत '.
  जयच्या डोळयांतून पाणी आलं, आपल्या आईने कसे संन्यासी सारखे आयुष्य काढले, हे त्याने पाहिले होते. आईला सुख मिळालेच पाहिजे निदान या वयात. जयने शिरीषला मिठी मारली, वर्षाने आशूला मिठी मारली. चार दिवसांनी आशू आणि शिरीष यांचे मोजक्या लोकात लग्न झाले.  जयने दुसऱ्या दिवशी दोन युरोप ट्रिप ची तिकिटे शिरीषच्या हातात ठेवली. 
   आयुष्यात पहिल्यांदा आशू विमानात बसणार होती. ती घाबरत नव्हती कारण तिचा प्रिय शिरीष तिच्यासामवेत होता. त्याचा हात हातात घेऊन ती लंडन, पॅरिस, स्वीझारलंड, जर्मनी फिरणार होती. 
    
प्रदीप केळुस्कर ✍️ 9422381299/9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...