शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

2392. मरणाच्या अंधारावर चालून गेलेले पाच शौर्य सूर्य !

 Unforgettable Forgotten Heroes of Indian Army!
   मेजर संजय चौहान मैत्रिणीच्या घरी जाऊन, तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्या वडिलांशी बोलणी करायची आहेत या कारणासाठी विशेष सुट्टी मागितली आणि अशा मंगल मोहिमेसाठी वरिष्ठांनी ती मंजूरही केली! मेजर संजय चौहान कोणतीही मोहीम कमीत कमी वेळ आणि मनुष्यबळ वापरून मोहिमा फत्ते करण्यात वाकबगार होते! पठ्ठ्या एकटाच तिच्या घरी धडकणार आणि तिच्या वडिलांकडून होकार मिळवूनच येणार,याची १६,राजपुताना रायफल्स मधील त्याच्या मित्रांना खात्रीच होती!
   मेजर संजय चौहान गावी जाण्यासाठी सामानाची ट्रंक भरायच्या तयारीत असतानाच त्यांनी पेरलेल्या खबरी नेटवर्क मधून पक्की खबर आली.
काश्मीर मधल्या लछिमपोरा गावाजवळच्या वारिबन जंगलात २८ ऑक्टोबर रोजी रात्री स्थानिक, पाकिस्तानी आणि अफगाणी अतिरेक्यांची एक मोठी आणि महत्त्वाची बैठक होणार आहे!
  एकाच दगडात अनेक गिधाडं टिपण्याची नामी संधी आहे,असा विचार मेजर साहेबांनी केला नसता तरच नवल!
मेजर संजय चौहान..वय वर्षे अवघं सत्तावीस. पण अनुभव जणू दुप्पट वर्षांचा. 
अतिरेकी असल्याची खबर आली की यांच्या जणू अंगात येई! ही खबर तर खूपच मोठी होती. आग्या मधमाशांचं भलं मोठं पोळंच जणू. भारताला डसणाऱ्या काळया माशा ह्या. माशा घोंगावत उठायच्या आत पोळं खालून पेटवायची संधी सोडायला नको. मेजर साहेबांनी ठरवलं!
ट्रंक भरली होती ती पुन्हा रिकामी केली. साहेबांपुढे जाऊन उभे राहिले. योजना आखली गेली. साहेबांना यांची कार्यपद्धती पक्की ठाऊक होती. मेजर साहेब अगदी मोजकेच सैनिक सोबत नेत..सर्वजण बहुतेक वेळा अतिरेक्यांच्या वेषात. धोका असेल तर मेजर साहेब स्वतः आधी पुढे जाणार आणि विजयी होऊनच परतणार. असा लौकिक त्यांनी मिळवला होता.
 तरणेबांड सेकंड लेफ्टनंट अनिल यादव,दलबीर सिंग,कृष्ण कुमार आणि गिरीश सिंग हे तीन रायफलमेन. एकूण पाच...इतकीच टीम. रायफल्सना भरपूर वेळ पुरेल इतकी काडतुसे मात्र पाहिजेत.. बाकी वजन काही नको. काम झाल्यावरच जेवण.. म्हणून तेही सोबत नको असा खाक्या!
आजतर युनिफॉर्म पण 
नको होते. अफगाणी अतिरेकी घालतात ती पेहरन..म्हणजे ढगळ कपडे, ते लोक बर्फात चालण्यासाठी त्यांनीच जुगाड करून स्थानिक पातळीवर बनवून घेतलेले शूज घालतात तसेच शूज मेजर साहेबांनी कुठून तरी पैदा करून ठेवले होतेच...ते सर्वांनी पायांत चढवले... डोक्यावर पेशावरी टोप्या, शाली.. थंडीसाठी नव्हेत... रायफल्स लपवायला..दाढ्या तर तशाही वाढवलेल्या होत्याच...अतिरेक्यांच्या शोधात त्यांच्याच अवतारात ही मंडळी नेहमीच जंगलात जात असत!
 हे  निघाले... बैठक रात्री होणार...पहाटे पहाटे तिथे पोहोचायचे.... म्हणून २८ तारखेच्या रात्री चालत निघायचं.. एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरच्या नेतृत्वात वीस सैनिकांची एक तुकडी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर थांबून गरज पडल्यास तिथून मदतीला धावणार होती.
संजय साहेबांना एरव्ही एखाद दुसरी शिकार मिळायची...आज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी शंभर किंवा किमान सत्तर ऐंशी श्वापदे मिळू शकणार होती!२९ ऑक्टोबरची पहाट सरली...थोडा उजेड झाला आणि 
हे पाच जण डोंगर उतरून अगदी सहज चालत,बोलत त्या गावात शिरले...जणू पहारा द्यायला गेलेले अतिरेकी परत येताहेत...वाटेत त्यांना अनेक गावकऱ्यांनी, आणि अजून पुरते जागे न झालेल्या अतिरेक्यांनी अफगाणी पद्धतीने अभिवादनही केले..यांनीही त्याच भाषेत त्यांना प्रतिसादही दिला! गरजेपुरते काही पुश्तू अफगाणी शब्द यांनी शिकून घेतले होते...आणि तसा हेल काढून बोलायचा सरावही त्यांनी करून ठेवला होता!
पण शेवटी अफगाण्यांना शंका आलीच...हे पाच आपल्यातले नाहीत..हे त्यांच्या बोलण्याच्या, वावरण्याच्या ढंगामुळे अतिरेक्यांच्या ध्यानात आले...त्यांनी यांच्यावर रायफल्स रोखल्या...आता थांबून उपयोग नव्हता...या पाच वीरांनी ...राजा रामचंद्र की जय! असा घोष केला... रावणाच्या लंकेत शिरलेले हनुमान आणि वानर यांनी असाच घोष केला असेल...राजपुताना रायफल्सची ही युद्धगर्जना....मेजर संजय चौहान यांनी फायर आदेश दिला...शाली बाजूला सारल्या गेल्या...पाच एके ४७ धडाडल्या...१७ अतिरेकी यमसदनी गेले...दोघे जायबंदी झाले. उरलेले ८१ आधी घाबरून इतस्ततः पांगले...पण पुढे जाऊन पुन्हा एकत्र आले...हे कौरव पुढे सरसावले...आपले हे पाच पांडव तिथून निसटले..त्यात मेजर संजय क्रॉसकंट्री धावण्यात चॅम्पियन होते...हिमाचली शरीर पहाड चढण्यासाठीच मूळचे बनलेले होते...त्यांनी आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी पळत एक छोटी टेकडी गाठली...पुन्हा एकत्रित झालेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर चारही बाजूंनी फायरिंग सुरू केले ..मेजर संजय साहेबांनी जे.सी.ओ.ला मदतीसाठी यावे म्हणून वायरलेस कॉल लावला...पण दुर्दैवाने संभाषण होऊ शकले नाही.....प्रचंड गोळीबार सुरु होताच....शेवटी इकडे या पाच बहाद्दर सैनिकांच्या गोळ्या संपल्या...पण त्या आधी त्यांनी आणखी सात अतिरेकी टिपले होते...ज्यांचे मृतदेह नंतर आपल्या बचाव पथकाला जंगलात आढळून आले!
  आपली बचाव तुकडी पोहोचत होतीच...वरिष्ठांनी आणखी मोठी कुमक धाडली...पण उशीर झाला...अतिरेक्यांनी या पाचही जणांना जिवंत पकडण्यात यश मिळवले...पण झालेल्या प्रत्यक्ष झटापटीत या वीरांनी त्यांचे दोन चार खलास केलेच!
पण...अतिरेक्यांनी त्यांच्या पाशवी परंपरेला जागणं सोडलं नाही! या पाचही सैनिकांच्या हातापायांच्या बोटांची नखं उपसली, डोळे काढले,हात कोपरापासून छाटले......मरण कणकण आणि क्षण क्षण...या गतीने आले असेल! देशासाठी एवढ्या वेदना सहन करतात सैनिक...आपण फक्त आणि फक्त कल्पना करू शकू!
काही वेळाने कुमक पोहोचू शकली...भारतीय सैन्य पाहून अतिरेकी जंगलात पळाले...त्या टेकडीवर त्या ठिकाणी पाच भारतीय देह निश्चल पडलेले...रक्ताचे थारोळे..तोडून फेकले गेलेले हात...रक्ताच्या थारोळ्यात आभाळातल्या चांदण्यांचे प्रतिबिंब...पाच तारे! अतिरेक्यांच्या वेषात भारताचे शूर सैनिक मरणाच्या नाट्यात आपापल्या भूमिका वठवून काळाच्या पडद्याआड निघून गेले होते!
२९ ऑक्टोबर,१९९४. काश्मीर... भारताचे अभिन्न अंग...राखण्यासाठी अमानुष वेदना सोसून झालेली बलिदाने...माहीत नसतात आपल्याला...माहीत असलेली बलिदाने स्मरणात ठेवली
जात नाहीत. फेसबुक पेजेस आहेत हल्ली..इंग्लिशमध्ये असते माहिती. त्रोटक स्वरूपात.
वीर भोग्या वसुंधरा असे राजपुताना रायफल्सचे ब्रीदवाक्य आहे. सैनिक लढून जिवंत राहिले तर पृथ्वी भोगतात..आणि धारातीर्थी पडले तर त्यांना स्वर्ग प्राप्त होतो.. असे म्हणतात. पण यांच्या बलिदानाने खरे तर सामान्य नागरिकच पृथ्वी भोगू शकतात.. हे निश्चित!
देशाने हुतात्मा मेजर संजय चौहान यांना मरणोत्तर शौर्य चक्र दिले...
संजय चौहान...हिमाचल प्रदेश मधील सोलन गावात जन्मलेला वीर. शिकायला बाहेर पडला..शहरात आला...एकदा गावी जाण्यासाठी जालंधर स्टेशनवर उभा होता..समोरच्या प्लॅटफॉर्मवर लष्करी जवानांना,अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी ट्रेन थांबलेली...दरवाजात कुणी लष्करी अधिकारी उभे दिसले...रुबाबदार व्यक्तिमत्व..चमकदार युनिफॉर्म! उंचापुरा संजय थेट त्यांना भेटला..मला मिळेल का असा युनिफॉर्म? काय करावं लागतं यासाठी? त्याने विचारले. साहेब म्हणाले "युनिफॉर्म मिळत नाही...कमवावा लागतो!"
संजय यांच्या कुटुंबातील कुणीही लष्करात नव्हतं..मित्रही नव्हता कुणी फौजेत.
पुढे एम.एस्सी.करण्यासाठी अलिगढ विद्यापीठात शहरात शिष्यवृत्ती मिळाली..तिथे जाऊन आय.एम.ए. Indian Military Academy ची वाट गवसली. अभ्यास आणि खेळ अवगत होता..खूप मेहनत केली..दोन लाखातून दीडशे निवडले गेले...त्यात संजय चौहान होते...academy मध्ये प्रशिक्षणासाठी 'इंफाळ' नावाच्या कंपनीत निवडले गेले...आडनाव चौहान म्हणून सोबत्यांनी 'चऊ' टोपणनाव दिले! Gentleman Cadet  संजय चौहान ट्रेनिंगमध्ये अव्वल ठरले. राजपुताना रायफल्स. शौर्यासाठी प्रसिद्ध. Rajrif नावाने प्रसिध्द असलेल्या या दलात १४ डिसेंबर,१९९१ रोजी संजय चौहान साहेब अधिकारी म्हणून दाखल झाले. नंतर पुढे राजस्थानमध्ये  लालगढ जट्टान येथे नेमणूक झाली..त्यांचे युद्ध कौशल्य पाहून वरिष्ठांनी घातक प्लाटूनचे कमांडर बनवले!
जून १९९३ मध्ये राजपुताना रायफल्स काश्मीर खोऱ्यात गेली.
घातक कमांडर म्हणून अनुभव असल्याने संजय साहेबांनी स्थानिक जनतेत खबऱ्यांचे जाळे विणले.
एकाच ठिकाणी सुमारे १०० अतिरेकी येणार असल्याची खबर त्यांनाच लागली! एकाच फटक्यात यातले निम्मे जरी मारले तरी धरणीचा भार तेवढाच हलका होईल! म्हणूनच मेजर संजय चौहान यांनी हे प्रचंड धाडस केले!
Unforgettable Forgotten Heroes मधील हे एक मोठे हिरो..त्यांचे स्मारक आहे हिमाचल मध्ये..पण....हिमाचल वगळता देशाला फारसे माहित नाहीत! अधिकाऱ्यांची माहिती तरी बऱ्यापैकी असते..पण जवानांची नावं अज्ञात राहतात! लेफ्ट. कर्नल जे.एस. सोधी यांच्यासारखे माजी सैन्याधिकारी इंग्रजीत लिहित असतात. हिरोज इन युनिफॉर्म सारखी शेकडो पेजेस आहेत. मी यांतून आणि अनेक बातम्या,व्हिडिओज मधून माहिती घेतो आणि केवळ कॉपी पेस्ट करत असतो. मेजर संजय चौहान साहेब, त्यांचे या मोहिमेतील सहकारी युवा सेकंड लेफ्टनंट अनिल यादव, रायफलमेन दलबीर सिंग,कृष्णन कुमार आणि गिरीश सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 जय हिंद  !
 संभाजी बबन गायके. 9881298260.
ही शौर्यगाथा किमान एका व्यक्तीला ऐकवा...पाठवा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...