बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2425. निर्णय

     राजीव आणी स्वप्नाली यांचा लौकीक अर्थाने अरेंज्ड मॕरेज असला तरी ते लग्नाआधी पासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचा एक सामायिक मित्र, विशालच्या घरी ते भेटले होते. दोघांच्या घरी तेंव्हा लग्नाची लगबग सुरु होतीच. पहिल्या भेटीपासुन दोघे क्लिक झाले. काही दिवस एकमेकांना भेटल्यावर स्वप्नालीने  त्याला लग्नाबद्दल विचारले. जात वेगळी असली तरी दोघांच्या घरचे सुधारवादी असल्याने यथावकाश दोघांचे लग्नही झाले. 
लग्नाच्यावेळी दोघांचे वय तिशीच्या आसपास होते. दोघात फक्त  एखाद वर्षे अंतर. दोघेही करिअरला प्राधान्य देणारे त्यामुळे लग्नाला आधीच उशीरच झालेला. त्यानंतर मुल होउ द्यायचं की नाही इथुन सुरु झालेला विचार प्रत्यक्ष मुल होई पर्यंत आणखीन चार वर्ष गेली.. वयाच्या पस्तीशीत झालेली मुलगी..स्वरा..दोघांच्या नावाची आद्याक्षरे घेउन ठेवलेलं नाव.  स्वरा थोडी प्री-मॕच्युअर जन्मल्याने नाजूकच होती. ती थोडी मोठी होइपर्यंत काळजी घ्यावी लागणार होती. 
     डिलीव्हरीसाठीची सहा महिने रजा संपवून स्वप्नाली परत कामावर रुजू झाली.  इंजिन्स बनवणा-या  एका मोठ्या मल्टीनॕशनल इंजिनिअरींग कंपनीत,  युनीट डिजाइन हेड असल्याने स्वप्नाली ब-यापैकी जबाबदारीच्या स्थानावर होती. तिचे  इंजिनियरींग पूर्ण झाल्या नंतर, कंपन्या न बदलता गेले दहा वर्ष या कंपनीत ती जिद्दीने व आपल्या अंगभूत हुशारीने, एक एक पाय-या चढत आज खूपच चांगल्या पोजीशनवर पोचली होती. त्यामुळे तिचं करिअर हे तिला अतिशय महत्वाचं होतं...अगदी स्वरा आणि राजीव इतकच…!
मल्टीनॕशनल कंपन्या 'वर्क फ्राॕम होम' म्हणजे घरुनही काम करायची मुभा देतात त्यामुळे स्वप्नाली स्वराच्या दुखण्या खुपण्यात घरुन काम करत आपलं काम संभाळत होती.
      राजीवला अर्थात ते स्वातंत्र्य  नव्हते. त्याची खाजगी बँकेतली नोकरी होती. कस्टमर फेसींग रोल असल्याने रोज आॕफीसला जाणे क्रमप्राप्त होतेच.  कामाच्या वेळाही जास्त व कामाचे स्वरुप अतिशय तणावपूर्ण होते. तो ब्रँच बँकींग मधे रिजनल हेड होता. बँकेत बराच जुना व सिनीअर असल्याने नव्याने रुजू होणा-या ब्रँच मॕनेजर ना ट्रेनींग देण्यासाठी देशभरात जे मोजके लोक होते त्यात तोही एक होता. तोही एम.बी.ए नंतर खडतर परिश्रम व उपजत टॕलेंटच्या जोरावर आज या ब-यापैकी सिनीअर पदावर पोचला हौता. स्वरा झाल्यापासून मात्र तो घरी लवकर यायचा आटोकाट प्रयत्न करायला लागला होता. 
      स्वराचा पहिला वाढदिवस दोघांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. दोघांच्याही घरचे, नातेवाइक, मित्र-मैत्रीणी व आॕफिसचे सहकारी झाडून हजर होते. स्वरा अद्याप बोलत नव्हती पण एवढी गर्दी पहायची सवय नसल्याने ती आधी घाबरली, मग तिने रडून दंगा घातला व नंतर आजीच्या मांडीवर झोपूनही गेली. तिचा वाढदिवस म्हणजे काय असते हे कळण्याचे तिचे तसेही वय नव्हते. आपण आपल्या हौसेसाठी उगाच स्वराला वेठीला धरले व तिचे हाल झाले असे त्यांना नंतर वाटले. तिला कळेपर्यंत तिचा असा मोठा  वाढदिवस करायचा नाही हे स्वप्नालीने ठरवून टाकले. राजीवनेही त्याला दुजोरा दिला. 
       स्वराच्या वाढदिवसानंतर साधारण एक महिन्यानंतर स्वप्नालीच्या कंपनीची ग्लोबल डिजाइन टीम  भारतात एका अभ्यास दौ-यासाठी आली होती. भारतीय ट्रक्स व बसेसमधे जाणारे त्यांचे इंजिन्स आता भारत-6 या नव्या एमिशन स्टँडडसाठी पात्र होतील त्यासाठी इथल्या डिजाइन विभागाने केलेली तयारी पहायला ते मुख्यतः आले होते.  इथल्या टीमने जे इंजिन विकसीत केले होते ते  भारतात विकले जाणारे डिझेल, भारतीय रस्ते यांचा विचार करुन,  शिवाय भारत-6 मानकाच्या सर्व प्रदुषण चाचण्यांमधेही यशस्वी होइल, असे विकसीत केले होते. या प्रोजेक्टसाठी कंपनीतर्फे जी सहा लोकांची कोअर टीम बनवण्यात आली होती त्यात स्वप्नाली एकमेव महिला होती. तिने केलेला भारतीय रस्त्यावर धावणा-या ट्रकच्या गरजांचा अभ्यास, भारतात विविध वातावरणात धावणारे ट्रक्स किंवा बसेस  यांचा सखोल अभ्यास व त्याबरहुकुम डिजाइन मधे तिने केलेले बदल., हे सर्व पाहून ग्लोबल डिजाइन हेड डाॕ.फ्राॕस्ट हे खूपच प्रभावीत झाले. तिच्या डिजाइनला व ब-याचश्या सुचनांना मान्यता देत नव्या इंजिनचे डिजाइन त्यांच्याकडून फायनल करण्यात आले. 
      अमेरिकेला निघण्याआधी चार दिवस, डाॕ.फ्राॕस्टनी स्वप्नालीला बोलवून घेतलं. त्यांच्या बरोबर कंपनीचे भारतातील पूर्ण कारभार पाहणारे भारतीय सी.इ.ओ हरमीत बक्षी देखील होते.  डाॕ.फ्राॕस्टनी नव्या इंजिनच्या डिजाइन मधे तिने केलेल्या कामगिरीची वाहवा केली व तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मग त्यांनी हरमीत बक्षींकडे पाहिले. जणू सुचवले की पुढे त्यांनी बोलावे. 
हरमीत बक्षींनीही  तिचे अभिनंदन केले...पण ते वेगळ्या कारणासाठी. त्यांनी जे सांगीतले ते ऐकून स्वप्नालीला एक प्रचंड सुखद धक्का बसला. 
डाॕ फ्राॕस्टनी तिला अमेरीकेच्या त्यांच्या ग्लोबल डिजाइन टिम मधे पुढील दोन वर्षांसाठी जगभरच्या त्यांच्या युनीट्स साठी चाललेल्या खूप महत्वाच्या प्रोजेक्टस वर काम करण्यासाठी निमंत्रीत केलं होतं ज्यामधे तिचा सारा खर्च अर्थातच कंपनी करणार होती. 
एकदा इथलं नवीन इंजिन पुढील महिन्यात प्रोडक्शनाइज झाले की तिचे इथले काम संपवून तिला अमेरिकेला, कोलंबसला रवाना व्हायचं होतं. 
ही लाखात एक अशी संधी होती. अचानक समोर एखादी अलीबाबाची गुहा उघडावी व आपण लहान मुलासारखं भांबावून जावं अशी तिची अवस्था झाली होती. 
'मला कृपया  दोनच  दिवस विचार करायला द्या.. ' अशी विनंती करुन ती त्यांच्या केबीन बाहेर पडली. 
ती बाहेर येउन आपल्या आॕफीसमधे, आपल्या सीटवर येउन बसली. एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं सारं तिला. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. राजीवला फोन करुन हे सांगावं असे तिला वाटले. पण तिने काही विचार करुन त्याला फोन केला नाही. 
मग तिचं लक्ष गेलं तिच्या डेस्कवर तिने अलिकडेच फ्रेम करुन ठेवलेल्या एका फोटोकडे. फोटोमधे वाढदिवसा दिवशी रडण्याच्या बेतात असणारी स्वरा व तिला कडेवर घेतलेला हस-या चेह-याचा राजीव तिच्याकडेच पहात होते..जणू तिला चिडवत होते.
अचानक तिव्रतेने तिला वास्तव  समोर दिसू लागलं...
"किती वेडी आहे मी..राजीव शिवाय जगणं किती आवघड आहे आता मला. आणि...स्वरा..!! तिच्याशिवाय दोन वर्षे..? कसं शक्य आहे स्वप्नाली..?? तु असा विचार सुद्धा कशी करते आहेस? स्वरापासून आई व राजीवपासून त्याच्या बायकोला दूर करते आहेस..!! केवळ तुझ्या वैयक्तिक करिअरमधे तुला पुढे जायला मिळते आहे म्हणून तू खुशाल आपल्या नव-याला, पोरीला मागे सोडून दोन वर्षांसाठी सात समुद्र ओलांडून इतक्या दूर जाणार आहेस की उद्या त्यांना किंवा तुला इच्छा झाली तरी भेटता येणार नाही"
नाजूक तब्येतीच्या स्वराला बरोबर अमेरिकेला  घेउन जाणे हा पर्याय तर अतार्किक व स्वराच्या तब्येतीसाठी अतिशय धोकादायक होता कारण स्वराची तब्येत दर दोन महिन्यांनी सिजन बदला बरोबर बिघडत होती..
तिचे डोळे भरुन आले. 
अश्रु पुसत एका निर्धाराने ती उठली व सी.इ.ओ बक्षींच्या केबीनमधे जाउन तिने त्यांना आपला निर्णय सांगितला. 
'साॕरी सर..मला कोलंबसला जाता येणार नाही...आय हॕव माय फॕमिली कमिटमेंट्स..'
 त्यावेळी डाॕ फ्राॕस्ट त्यांच्या केबिनमधे नव्हते. हरमीत बक्षींनी तिला समजावलं की अशी संधी एखाद्याच्या आयुष्यात एकदाच दार ठोठावते. तेंव्हा असे निर्णय भावनीकपणे नाही तर अतिशय शांत डोक्याने घ्यायचे असतात. पुढे दोन दिवस शनिवार, रविवार सुट्टी होती.  या दोन दिवसात तिने पुन्हा या आॕफरचा विचार करावा, घरच्यांशी बोलावं आणि मगच अंतीम निर्णय घ्यावा असे त्यांनी तिला समजावले.  
एका प्रचंड  द्विधा मनःस्थितीत  स्वप्नाली बक्षींच्या केबिनमधून बाहेर पडली. 
स्वप्नाली घरी पोचली तशी तिच्या सासुबाईंनी दरवाजा उघडत म्हंटलं..' काय गं..आज लवकरशी आलीस? तब्येत बरी आहे ना?'
'हो आई..मी अगदी नाॕर्मल आहे..' स्वप्नाली आपल्या मनातली खळबळ लपवत म्हणाली 'काम लवकर संपलं होतं..पुन्हा पुढे विकेंड आहे..म्हणून आज जरा लवकरच आले..'
'बरं झालं बाई..' सासुबाई म्हणाल्या..' थोडा आराम कर दोन दिवस आता स्वप्नाली. अलिकडे महिनाभर खूप पळापळ चाललीय तुझी त्या कुठल्याशा प्रोजेक्टसाठी… शेवटी शरीरही इंजिनच ना गं..? त्यात आपल्या बायकांच्या बाबतीत तर अजूनच काॕम्पलिकेशन्स असतात. संधी मिळाली की या इंजिनालाही  आराम द्यावा आपण.'
'हो आई..पूर्ण आरामच करणार आहे आता दोन दिवस' स्वप्नाली हसत म्हणाली. मग इकडे तिकडे पहात म्हणाली 
'स्वरा झोपलीय का?' 
'हो..ग..तासाभरापूर्वीच खेळून खेळून  झोपलीय..उठवते तिला आता..तू फ्रेश होउन ये बरं....' सासुबाई बोलल्या. 
सासु सासरे आणि राजीव-स्वप्नाली यांचे फ्लॕट एकाच बिल्डींगमधे वर खाली होते. त्या दोघांचा खूप आधार होता त्यांना. स्वराला दिवसभर सांभाळत असल्याने अद्याप तिच्यासाठी आया ठेवायची गरज तिला भासली नव्हती. तिच्या करियरसाठी हा एक मोठा आधार होता. 
स्वप्नाली आवरुन आली तोवर स्वरा जागी होउन आजीकडून दूध पित होती. स्वप्नालीला पाहताच ती आजी शेजारुन उठून पळत तिच्याकडे यायला गेली त्यात तिचा हात आजीच्या हातातल्या दुधाच्या पेल्याला लागला व पडला. दूध पडलेले पाहून स्वरा जोरात रडायला लागली. तिला समजावून शांत करेपर्यंत सासू सुनेच्या नाकी नउ आले.
काही वेळाने सासुबाई व स्वतःसाठी स्वप्नालीने काॕफी बनवून आणली ती पिताना सासुबाई सहज म्हणाल्या..
'स्वप्नाली..स्वरा भारीच हट्टी आणि दंगेखोर होतीय बरं..जरा काही मनासारखं झालं नाही की बाईसाहेब मोठ्याने रडायला सुरु. कशी मोठी होणार ग ही आजकालची मुले..?? आमची राजीव आणि राजश्री कधी मोठी झाली आम्हाला कधी कळलं देखील नाही..'
स्वप्नाली बोलता बोलता विचारात मग्न झाली. स्वरा खरीच हट्टी आहे. तिला रात्री लवकर झोपायचं नसायचं. त्यात तिला रात्री अपरात्री काहीतरी हट्ट करुन मोठ्याने गळा काढून रडायची सवय लागली होती. राजीव आणि तिला खूप कसरत करायला लागायची तिला रात्री झोपवायला. दोघेही थकलेले असायचे त्यात वर  स्वराचा हट्टी स्वभाव त्यामुळे कधी कधी वैतागून जायची ती.
 पण राजीव शांतपणे परिस्थिती सांभाळायचा. स्वराला घेउन टेरेसमधे नेउन चांदोमामा दाखवायचा..जमेल तशी अंगाई गायचा..तिच्याशी बडबड बोल बोलायचा..व शेवटी ती झोपली की मग झोपायला यायचा. तोवर ब-याचदा स्वप्नालीला झोपही लागली असायची. 
ती विचारात मग्न होती ते पाहून सासुबाई बोलता बोलता थांबल्या व म्हणाल्या..'काय ग बाळा..तुझं चित्त था-यावर नाहीय आज..! काही प्राॕब्लेम आहे का..?आॕफिसमधे काही टेन्शन?'
'नाही..नाही..हो आई..' स्वप्नाली पटकन सावरत म्हणाली..'मी  स्वराच्याच हट्टीपणा बद्दलच विचार करत होते..  पण ते जाउ दे..तुम्ही काय सांगत होतात?'
'हो..अगं बघ म्हणजे कसं आहे आमच्या ह्यांची गोंदवलेकर महाराजांवर खूप श्रद्धा आहे हे तर तुला ठाउक आहेच. त्यांचं गेले दोन वर्षे मनात होतं की आम्ही दोघांनी गोंदवल्याला सहा महिने राहून आपली सेवा द्यावी..महाराजांच्या सानिध्यात रहावं..पण गेले दोन वर्षे आम्ही जाउ शकलो नाही कारण आधी तुझं बाळंतपण व मग स्वरा लहान होती त्यामुळे तिलाही पहायला घरचं माणूस हवंच. पण आता स्वरा थोडी मोठी झालीय..म्हणजे आपल्याला तिला सांभाळायला एखादी चांगली बाई किंवा मुलगी मिळाली तर आम्ही यंदा महाराजांच्या उत्सवापासून पुढे सहा महिने राहून यावं म्हणतोय.' सासुबाई अपराधी भावनेने पुढे म्हणाल्या.. 'म्हणजे स्वप्नाली..मला ठाउक आहे गं की तुझी थोडी तारांबळ होईल..पण कसं आहे...अजून सेवा करायची उमेद व ताकत आहे आमच्यात तोवर एकदा हे व्रत पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे..'
सासुबाई हे  बोलताना चाचरत होत्या हे स्वप्नालीला कळत होतं. 
हे बरोबर होतं की तिच्या करिअरला मदत म्हणून त्यांनी स्वराची जबाबदारी गेली सात आठ महिने आनंदाने स्वतःवर घेतली होती. पण शेवटी त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या स्वतःच्या आवडी होत्या, पण स्वरामुळे त्यांनाही  बांधल्यासारखं झालं होतं. 
ती हसत म्हणाली..
'अहो आई..तुम्ही काळजी करु नका..तुम्ही आणि बाबा जा गोंदवल्याला निश्चिंतपणे..आपण स्वरासाठी चांगली केअर टेकर मुलगी किंवा पाळणाघर यापैकी काहितरी नक्की करु शकतो. शिवाय प्रश्न सहा महिन्यांचाच आहे.'
समाधानी होउन आई खाली त्यांच्या मजल्यावर गेल्या आणि स्वप्नाली स्वतःशीच हसली. तिची उरली सुरली आशाही संपुष्टात आली होती. आपल्याला अमेरिकेला पुढे जाता येणार नाही हे वास्तव आता तिने एव्हाना मान्य केलं होतं. पण मनात विचारांचं काहूर होतं. तिला आपलं मन मोकळं करायचं होतं त्यासाठी ती राजीवची आतुरतेने वाट पहात होती. राजीव येईपर्यंत तिने स्वराशी खेळण्यात मन रमवलं. 
संध्याकाळी आठ वाजता राजीव घरी आला. 
तो आल्यावर फ्रेश होउन लगेच जेवायला बसायचा. त्याने स्वप्नालीच्या एकंदर बाॕडी लँग्वेजवरुन ओळखलं की वादळ घोंगावतय. ते आता बाहेर येउन कधी धडकतय याची तो ही वाट पहात होता. वरवरचं बोलत जेवण पार पडलं. ओटा आवरुन व स्वराला घरच्या लॕपटाॕपवर नर्सरी -हाइम्स लावून देउन ती टिव्ही वर बिझनेस न्यूज पहाणा-या राजीव शेजारी येउन बसली. कसं सुरवात करु अशा विचारात ती असतानाच तिच्या खांद्यावरुन हात टाकत राजीवने तिला आपल्या जवळ ओढले. 
मग मात्र एवढा वेळ बांधून ठेवलेला तिचा बांध फुटला. ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागली.  तिच्या डोळ्यातल्या आसवांनी राजीवचा टी शर्ट भिजू लागला. . 
राजीवने तिला थोपटत जवळ धरुन ठेवलं. आपली बायको मनस्वी आहे हे त्याला अनुभवाने माहित होतं. रडून तिची खदखद दूर झाली की ती मन मोकळं  करेल हे माहित असल्याने त्याने तिला मनसोक्त रडू दिलं. काही मिनीटांनी ती शांत झाली. मग हळूच तिचा चेहरा आपल्याकडे वळवत राजीव म्हणाला..
'ए वेडाबाई..झालीस का शांत..? की अजून इकडचा खांदाही ओला करायचा आहे माझा?' 
तिने डोळे पुसत लटक्या रागाने त्याच्या छातीवर हलकेच मारल्यासारखं केलं. 
'चेष्टा नको करुस राज..मी सिरीयस आहे..'
राजीवने टिव्ही बंद केला व तिचा हात धरत म्हणाला..
' बरं बोल आता..! काय झालय..मला सगळं व्यवस्थित सांग..'
स्वप्नालीने तिला कंपनीकडून मिळालेल्या आॕफर बद्दल त्याला सांगितलं. तसा राजीव एकदम स्तब्ध झाला.  तिचा हात त्याने सोडला व  काही क्षण शांत झाला. 
स्वप्नाली पुढे बोलणार इतक्यात त्याने हाताने तिला थांबवले..
मग एकदम हर्ष वायू झाल्यासरखं जागेवरच उभे रहात त्याने स्वप्नालीला  घट्ट मिठीत घेतलं व तिचा चेहरा समोर धरत म्हणाला..
'ब्लडी हेल..स्वप्स...इतकी मोठी..इतकी ब्रिलिअंट न्यूज तु मला आता सांगते आहेस...दिस इज दी न्यूज आॕफ द डे. काँग्रॕच्यूलेशन्स..!! अँड आॕफ आॕल थिंग्ज..असली भारी बातमी तू मला रडत रडत  देते आहेस….ते ही आता..कसली आहेस ग तू स्वप्स..?' 
स्वप्नालीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं व हाॕलमधेच  लॕपटाॕपवर गुंग होउन खेळणा-या स्वराच्या केसातून हात फिरवत ती शांतपणे म्हणाली..
'मी नकार दिलाय राज...मी नाही म्हणून सांगितलय आमच्या सि.इ.ओ ना. मी नाही जात आहे..रादर मला जायचं नाहीय कोलंबसला..तुम्हा दोघांना सोडून…' 
राजीव काही क्षण पुन्हा स्तब्ध झाला.तो जोरात प्रतिक्रिया देणार होता..पण मग हळूच म्हणाला..
'स्वप्स...मला वाटतं तु हा निर्णय घेण्यात घाई केलीस. माझ्याशी डिस्कस न करता हा निर्णय घेउन तू मोकळी झालीस..असं कधी केलं नाहीस तू आपलं लग्न झाल्यापासून...मग यावेळी का…?'
राजीव दुखावलाय हे लक्षात आलं तसं स्वप्नाली पटकन त्याच्याजवळ आली व त्याचा हात धरत त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसत म्हणाली..
' आय नो..राज मी तुला कन्सल्ट करायला हवं होतं..पण मला हिच भिती होती की तू मला ही आॕफर घ्यायला सांगशील. पण तू माझ्या अँगलने पहा..अरे आपल्या दोघांची गरज आहे स्वराला..या वयात..ती आॕलरेडी किती टँट्रम्स करतीय तुला ठाउक आहे..शिवाय आई बाबा तिच्यामुळे अडकून पडलेत इथे स्वरासाठी..स्वरा त्यांच्या पायाताला गुंता झालेले मला आवडणार नाही. आणि राज तुझं अन माझं काय..? वी निड इच आदर मोर दॕन एवर बिफोर. अरे वयाच्या पस्तीशित आता आपल्याला सिंगल रहायची सवय पुन्हा करायची..किती आवघड आहे..!! सगळा विचार करुनच मी निर्णय घेतलाय राज. मोठी संधी आहे..पण त्यासाठी एवढं मोठ बलिदान..एवढा त्याग करायची माझी तयारी नाहीय.  नाही..नाही..मी नाही राहू शकत आता तुझ्या आणि स्वराशिवाय राज..!' असं म्हणत ती पुन्हा रडत राजीवच्या कुशीत शिरली. 
राजीवला तिचं बोलणं पटत होतं.तिची घालमेल समजत होती.
पण त्याला हेही ठाउक होतं की ही संधी स्वप्नालीला एका इतका मोठ्या प्लॕटफाॕर्मवर नेणार होती की  तिथून ती आकाशाला गवसणी घालू शकत होती. तिने एवढ्या वर्षात कंपनीसाठी व स्वतःच्या टॕलेंटच्या वाढीसाठी घेतलेले प्रचंड परिश्रम त्याने पाहिलेही होते व इतरांकडून त्याबद्दल ऐकलंही होतं. आता त्याचं चिज होणार होतं आणि नेमकं या क्षणी आपले पंख पसरण्याऐवजी स्वप्नाली त्यांना छाटू पहात होती. ही संधी गेल्यावर ती अशी भरारी पुन्हा घेउ शकेल की नाही..जगभर टॕलेंट शोधणा-या एका मल्टी नॕशनल कंपनीत तशी संधी तिला पुन्हा मिळेल की नाही या सा-या गोष्टींचा विचार स्वप्नाली भावनेच्या आहारी गेल्याने करत नव्हती असे त्याला वाटत होते.
त्या रात्री स्वप्नाली व स्वरा झोपल्यावरही तो बराच वेळ जागा होता. त्याला लक्षात आलं की आता निर्णय घ्यायची वेळ त्याची होती. आणि त्याक्षणी त्याने तो घेतला..
दोन महिन्यांनी रात्री बारा वाजता स्वप्नालीला घेउन एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी इंटरनॕशनल एअरपोर्टवरुन अमेरिकेला झेपावले. तिला सी-आॕफ करायला आलेले राजीवचे व स्वप्नालीच्या आई वडिलांचे डोळे त्यावेळी पुन्हा एकदा पाणावले. 
स्वप्नाली अमेरिकेवरुन येइपर्यंत आपली नोकरी सोडायचा निर्णय घेणा-या राजीवच्या खांद्यावर स्वरा शांतपणे झोपी गेली होती. 

© सुनी़ल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...