साहेबांचे आवाहन ऐकून पेटलेल्या बंड्याने मोर्चात जाण्यासाठी बॉसकडे सुट्टीसाठी अर्ज केला. बॉसने कामाची गरज लक्षात घेता सुट्टी द्यायला नकार दिला. इथे संतापलेल्या बंड्याला साहेबांचे शब्द पुन्हा आठवले आणि त्याने बॉसला मारला. मग बॉसने बंड्याविरोधात पोलिस तक्रार केली. पोलिसांनी बंड्याला अटक केली. कंपनीने बंड्यावर कडक कारवाई केली आणि त्याला बडतर्फ केला. ऑफिसमधले CCTV आणि साक्षीदार यांच्या आधारे बंड्या विरोधातील गुन्हा सिद्ध झाला आणि बंड्याला शिक्षा झाली. कोर्ट आणि पोलिस स्टेशनच्या खेपा मारायला त्याच्या पक्षाचा एकही नेता किंवा मित्र आला नाही कारण ते मोर्चात आणि मग महापालिका निवडणुकीत व्यस्त होते. त्याचे वृद्ध आई वडील मात्र पदरमोड करून बस आणि ट्रेनचे धक्के खात हजर रहायचे. शेवटच्या दिवशी जेव्हा त्याला शिक्षा सुनावली गेली तेव्हा हताश होऊन दोघे गेले ते परत दिसले नाहीत. अखेर काही महिन्यांनी शिक्षा भोगून बंड्या बाहेर आला.
बाहेर आल्यावर घरी जायच्या आधी पक्षाच्या कार्यालयात गेला. त्याच्या शिवायही मोर्चा अतिशय यशस्वीपणे पार पडला होता. पक्षाचा एकही कार्यक्रम थांबला नव्हता. निवडणूकही नीट झाली. या सगळ्याचे फोटो बघून तो भरवून गेला. तशाच भारावलेल्या अवस्थेत तो घरी पोहोचला. दार वाजवले तर भलतंच कोणीतरी दारा उघडले. त्याचे कुटुंब तिथे नव्हते. घरातला एकमेव कमावता माणूस तुरुंगात शिक्षा भोगत असल्याने बंड्याच्या आई वडिलांवर बिकट परिस्थिती उद्भवली होती. राहत्या घराचे भाडे भरायला पैसे नसल्याने त्याच्या कुटुंबाला घरमालकाने बाहेर काढले आणि त्यांना पुन्हा गावाला स्थलांतरित व्हावे लागले. नोकरीच्या ठिकाणी बंड्याला काढल्यानंतरही कंपनीचे काहीही अडले नाही. त्याच्या जागी एका बिहारी तरुणाला नोकरीवर ठेवले. जो अतिशय मेहनतीने काम करत होता. कंपनीचे नियम आणि शिस्त पाळत होता. एखाद्या राजकीय मोर्चासाठी सुट्टी मागत नव्हता आणि बॉसला मारहाणही करत नव्हता.
ही परिस्थिती पाहून बंड्याचे डोके चक्रावले होते. पण आत्ता त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे होते नवीन नोकरी पदरात पाडणे. त्यामुळे तो जागोजागी इंटरव्ह्यू देत नोकरीच्या प्रयत्नात होता. पण आधीच्या कंपनीतून बडतर्फ केल्यामुळे त्याच्याकडे रिलिव्हिंग लेटर ऐवजी टर्मिनेशन लेटर होते, त्यात पोलिस रेकॉर्डवर नाव आल्यामुळे जेव्हा त्याची पार्श्वभूमी तपासली जायची तेव्हा कोणतीही कंपनी त्याला नोकरीवर ठेवून घ्यायला तयार नव्हती. शेवटी हतबल होऊन कंटाळलेल्या बंड्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्याची कथा ऐकून सगळ्यांचाच पारा चढला. त्याला न्याय मिळवून द्यायचे वचन देत ते त्याला मोठ्या साहेबांकडे घेऊन गेले. आपले दैवत असलेल्या साहेबाचा आलिशान बंगला म्हणजे बंड्यासाठी मंदिरच होते. त्याची भव्यता पाहून त्याने आ वासला. साहेबांच्या घरातील कुत्र्यांची खोली ही बंड्याच्या संपूर्ण घरापेक्षा मोठी आणि प्रशस्त होती. या मंदिरात आपल्याला न्याय नक्की मिळणार या आशेने बंड्या साहेबांची वाट बघत उभा होता. थोड्या वेळाने साहेब आले. त्यांनी बंड्याचे म्हणणे ऐकले. आपल्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर आलेली ही परिस्थित पाहून साहेब फारच संतापले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच्या खांद्यावर हात टाकून 'या माझ्या सैनिकाला मी न्याय मिळवून देणारच' असा प्रण त्यांनी केला. साहेबांच्या या शब्दांनी बंड्याला धीर आला. आपल्याला आता नोकरी मिळणार, भाड्याचं का होईना पण मुंबईतील घर पुन्हा मिळणार, आई बाबांना ताठ मानेने पुन्हा मुंबईत आणायची योजना ते करू लागला. एका चांगल्या मुलीशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्न बघू लागला.
इतक्यात साहेबांनी दिलेल्या तातडीच्या आदेशाने तो भानावर आला. साहेबांनी पत्रकार परिषद बोलवली होती. बंड्याला घेऊन ते पत्रकार परिषदेत बसले. पत्रकारांसमोर साहेबांनी आपल्या पल्लेदार भाषेत बोलायला सुरुवात केली. बंड्याला पुढे करत त्यांनी महाराष्ट्रातल्या रोजगाराच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. बाहेरची माणसं मराठी मुलांच्या नोकऱ्या पळवत आहेत आणि नोकरदारवर्ग मराठी मुलांच्या जागी परप्रांतियांना प्राधान्य देत असल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. ही परिस्थिती आपण बदलणारच असं त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी नव्या मोर्चाची घोषणा केली. या मोर्चात बंड्या साहेबांच्या सोबत चालेल असेही त्यांनी जाहीर केले. इतर तरुणांनी सुट्टी घेऊन या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आणि सुट्टी न मिळाल्यास बॉसला मारा असा सल्लाही दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा