बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2420. बोच

     सकाळी सकाळीच तो मुलीवर खूप चिडला होता. झोपेतून उठून तो तोंड धुवायला जायच्या आधीच तिच्या एका खेळण्यावर त्याचा पाय पडला आणि कळ अक्षरशः मस्तकात गेली..एवढं कारण पुरेसे होते. तिचा पसारा बघून त्याचे पित्त खवळले. चिमुकला जीव बाबाचे ते ओरडणे, चिडणे बघून खूप घाबरून गेला. इतके की तो ऑफिसला निघताना तिने फक्त मान हलवली पण नेहमीसारखे " टाटा, बाय बाबा, लवकर ये.." असे काहीच म्हणाली नाही. 
"धाक हवाच बापाचा.." असा विचार करत गाडीची किल्ली तर्जनीवर नाचवत तो ऐटीत बाहेर पडला. 
लंच अवरच्या आधी त्याचा शेजारचा म्हणाला , " आज लंचला ऑफिसमध्ये आहेस की बाहेर चाललायस?" जरा स्ट्रेस्डच वाटला. त्याचा हा वयाने आणि हुद्द्याने सिनियर मित्र. त्यांचे नाते म्हटलं तर मित्राचे किंवा गुरूशिष्याचे. 
"आज इथेच, कारभारणीने डबा दिलाय." तो हसत म्हणाला.  " का सर, काय झाले? ऑल वेल? " त्याने विचारले. 
" नाही, सिरीयस मॅटर नाही काही..बोलू नंतर."  त्याने अंगठा दाखवत समोरच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित केले. 
लंच अवरला दोघे मुद्दामच बाहेर गेले जेवायला. मित्राने ऑर्डर दिली होती. दोघे पदार्थ येण्याची वाट पहात होते. त्याला सपाटून भूक लागली होती. सकाळी न खाताच फक्त चहावर तो बाहेर पडला होता. 
"सर, बोलायचे म्हणालात. ऑफिसमध्ये काही झालंय का?" तो अस्वस्थ झाला होता. 
" नाही, ऑफिसमध्ये नाही. काल रात्री मी माझ्या मुलीचे आणि बायकोचे फोनवर बोलणे ऐकले. तिची सासू तिला ओरडली असे काहीतरी सांगत होती. पण माझ्या बायकोने तिची व्यवस्थित समजूत घातली. माझी पोरगी पण साधी नाही. ब-याच खोड्या आहेत तिच्या अंगात. बायको म्हणते पोर बापावर गेलीये अगदी." मित्राने असे म्हणताच दोघे खळखळून हसले. 
" काय सर, तुम्ही पण मी केवढा टेन्शनमध्ये होतो. मला वाटलं माझी नोकरी वगैरे जाते की काय.." तो जरा तणावमुक्त होत म्हणाला. 
"कसे असते ना. लेकीला कोणी ओरडले हे मी सहन नाही करू शकत. यावेळी समोर तिच्या सासूबाईं आहेत. मी बोलणं शोभणार नाही. एक कळ आली हृदयात खोलवर.. वाटले, आपल्या लेकीवर आपला हक्क नाही राहिला.  तिचा कसनुसा चेहरा हलत नव्हता कितीतरी डोळ्यासमोरून. खूप वाईट वाटले तेव्हा पण कोणाकडे शेअर करणार?  तु एका लेकीचा बाबा आहेस तुला समजेल मला काय वाटले  असेल त्याक्षणी ते. म्हणून तुला बाहेर घेऊन आलो." मित्राचे हे बोलणे ऐकताच त्याच्या ठसका लागला. डोळे भरून आले. सकाळी तो निघताना त्याच्या लेकीने केलेले इवलेसे तोंड आठवले. 
"अरे, एवढं काही सिरीयस नाही..तुला काय झाले?" त्याची अवस्था बघून मित्र म्हणाला.  
"काही नाही सर आजच सकाळी मुलीवर जाम चिडलो होतो. ते आठवले." तो पडलेल्या आवाजात म्हणाला. 
"थोडसं रागवायचे रे कधीतरी..एकदा का लग्न वगैरे झाले ना..रोज दिसत नाही मुलगी  तेव्हा हे सगळे क्षण खूप छळतात..खरंच!" एरवी खंबीर वाटणा-या मित्राचे बोलणं त्याला सहनच होईना. 
"सर, खूप काहीतरी तुटल्यासारखे होतय पोटात. आज लवकर घरी जाईन.." तो कसबसे बोलला. त्याची अवस्था समोर बसलेल्या मित्राला लगेच समजली.. 
"नको, आता लगेच निघ. मला मेसेज कर मी अॅप्रूव्ह करतो तुझी रजा." 
दोघे लगबगीनं ऑफिसला आले. हा लवकर निघाला. घरी येताना लेकीचे आवडते आईस्क्रीम, तिला आवडतात तसे निरनिराळ्या रंगाचे अनेक फुगे घेऊन आला. 
एवढे फुगे नि आईस्क्रीम बघून लेकीचा मूड पालटला. तिने इवल्याशा हाताची घट्ट मिठी मारताच त्याच्या पायातली बोच पूर्ण बरी झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...