शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

2382. शाळा महाविद्यालयांचे गेट-टुगेदर की आकर्षणाचा सापळा?

     गेल्या काही वर्षांत शाळा आणि महाविद्यालयांचे स्नेहमेळावे मोठ्या प्रमाणावर आयोजित होऊ लागले आहेत. जुने मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि सहाध्यायी दशकानंतर पुन्हा भेटतात. त्या भेटीत आनंद, आठवणी आणि रम्यता असते. आयुष्याच्या धावपळीत हरवलेले दिवस जणू पुन्हा परतले, अशी भावना निर्माण होते. हे दृश्य अगदी सुखद असते. पण त्यामागे एक वेगळी आणि थोडी अस्वस्थ करणारी बाजूही आहे; जी समाजाने आता गांभीर्याने विचारात घ्यावी लागेल.
     पूर्वी संपर्क टिकवणं कठीण होतं. आता सोशल मीडियामुळे सगळं सोपं झालं आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामने माणसांमधील दरी बुजवली आहे. परिणामी, क्षणात री-युनियनचा प्लॅन तयार होतो. आपले जुने मित्रमैत्रिणी भेटलेले कोणाला आवडणार नाहीत? प्रत्येकजण हा नॉस्टॅल्जिक क्षण अनुभवण्यास उत्सुक असतो. पण तेथून काहींची भावनिक गुंतागुंतही सुरू होऊ शकते. हा प्रवास नंतर धोक्याच्या वळणावर जाऊ शकतो. शाळा आणि कॉलेजमध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र भूतकाळ असतो. विशेषतः काही प्रेमकथा पूर्ण झालेल्या असतात, काही अर्धवट राहतात, तर काही मनातल्या मनातच दडलेल्या राहतात. पुढे आयुष्याच्या जबाबदाऱ्या वाढतात, संसार सुरू होतो आणि त्या भावना मागे पडतात. पण मनाच्या खोल कप्प्यात त्या कुठेतरी जिवंत राहतातच. स्नेहमेळाव्यात जेव्हा जुने चेहरे पुन्हा दिसतात, तेव्हा त्या दडलेल्या भावनांना पुन्हा हवा मिळते. एकेकाळचा स्नेह पुन्हा हलकेच वर तरंगू लागतो. काहींसाठी ते क्षण फक्त भावनिक आठवणी ठरतात, पण काहींना ही भेट नवी सुरुवात वाटते आणि इथेच खऱ्या गफलतीचा प्रारंभ होतो.
      जर एखाद्याचं वैवाहिक आयुष्य नीट चाललेलं नसेल, संवादात दरी असेल किंवा एकटेपण वाढलेलं असेल, तर या भेटी भावनिक आकर्षणाचं कारण बनतात. 'फक्त बोलतोय, काही चुकीचं नाही' असं वाटतं, पण त्या संवादात नकळत एक जवळीक वाढत जाते. सुरुवात साध्या मेसेजने होते, पुढे फोटो, आठवणी आणि नंतर सीमारेषा पुसट होतात. आजच्या काळात विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढत आहे. याचं थेट कारण स्नेहमेळावे किंवा सोशल मीडिया नसले तरी या गोष्टींनी त्या प्रवृत्तीला व्यासपीठ नक्कीच मिळवलं आहे.
       माणूस आता बाहेरून यशस्वी दिसतो; पण आतून अस्वस्थ आहे. नात्यांमधील संवाद हरवला आहे, समजूत कमी झाली आहे. आणि या रिकामेपणात जुन्या ओळखींचं आकर्षण आश्रयासारखं वाटतं. स्नेहमेळावे म्हणजे आनंदाचा सोहळा असावा, मात्र अनेकदा ते भावनिक धुंदीत बदलतात. काहीजण एकमेकांशी वैयक्तिक गोष्टी शेअर करतात. ‘घरी तणाव आहे’, ‘माझं लग्न बिनसलंय’, ‘कोणी समजून घेत नाही.’ अशा वेळी काही लोक खरी सहानुभूती दाखवतात, पण काही जण या भावनांचा गैरफायदा घेतात. इथेच स्नेह संपतो आणि स्वार्थ सुरू होतो. अर्थात, हा आकडा बोटावर मोजण्याइतका आहे. कारण सर्वच जण संधीसाधू नसतात. काही प्रामाणिकपणे मैत्री जोपासणारेही असतात. मात्र जिथे एक टक्काही चुकीचं घडत असेल, तिथे त्यावर भाष्य झालेच पाहिजे. कधी कधी विवाहबाह्य संबंधांमध्ये ब्लॅकमेलिंगसारख्या घटना घडतात, आणि शेवटी मग आयुष्याची रागरांगोळी होते. यात अनेक जण भरडले जातात.
     भारतीय समाजात लग्न ही केवळ वैयक्तिक गोष्ट नाही; ती सामाजिक संस्था आहे. ती टिकून राहावी यासाठी संवाद, सन्मान आणि संयम या गोष्टी आवश्यक आहेत. पण आजच्या जीवनशैलीत या मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली रेषा पुसट झाली आहे. ‘माझं आयुष्य माझं आहे’ हा विचार योग्य असला तरी त्याला विवेकाची साथ हवी. खरं तर स्नेहमेळावे चुकीचे नाहीत. उलट ते आवश्यक आहेत. पण त्यांचा हेतू भूतकाळात रमण्याचा नसून, वर्तमानाशी पुन्हा जोडण्याचा असावा. जुन्या आठवणींचा सन्मान ठेवावा, पण त्यांच्यात अडकू नये. एक चांगला स्नेहमेळावा म्हणजे भूतकाळाचा आदर आणि वर्तमानाचा स्वीकार असावा. री-युनियन म्हणजे आपण किती बदललो, किती पुढे आलो, हे पाहण्याची संधी आहे. ती भेट आनंद देणारी असावी, मन हलकं करणारी असावी, पण आयुष्य बर्बाद करणारी नसावी. परिणामी, री-युनियनमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्यासाठी काय शाश्वत आणि काय मृगजळ हे वेळीच ओळखावे. 
अन्यथा आकर्षणाचा सापळा कायमचा महागात पडेल, हेच सत्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...