बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2416. जागतिक पुरूष दिवस

आज जागतिक पुरुष दिवस आहे म्हणे?
पुरुषांचा पण दिवस सेलिब्रेट केला जातो ऐकूनच सकाळ सकाळी भारी वाटलं. नै पण मला तरीही अजुनही वाटतंच का म्हणुन पुरुष दिन साजरा करायचा ब्वा..? काहीतरी असेल ना पुरुषांच्यात पुरुष दिन साजरे करण्यासारखं की "मेले सगळेच पुरुष एकसारखेच असतात का..?" तर मुळीच नाही.  खरंतर ऐरवी महिला दिन अगदी बेफिकीरपणे हक्काने वसूल करून घेणाऱ्या घरातील मुलीसाठी , बायकोसाठी,आईसाठी,मैत्रिणीसाठी, ऑफिस मॅडम वगैरेंसाठी मात्र हा पुरुष आयुष्यभर दिवसरात्र धडपडत,जबाबदारी पेलून, एखाद्या बाईला लाजवेल इतकं कमालीचं हळवेपण जपत जीवापाड प्रेम करत, मनस्वी, डिव्होटेड राहून सतत वेगवेगळ्या रूपात त्यांच्या मनावर, हृदयावर राज्य करत जगाचा कारभार हाकत असतो.  खरं सांगू, घरची स्त्री खुश म्हणजे सगळं घर खुश इतकंच समीकरण माहीत असणाऱ्या पुरुषांचा रोजचा दिवस उगवतो तो आपल्या कुटुंबासाठी सुखी कसा करता येईल याची धडपड करण्यात जातो पण हे तितकं कुठंच हायलाईट होत नाही. 
     महिला दिनी, मातृदिनी आईचं, स्त्रीचं कौतुकसोहळा नेहमीच होत राहतो पण तिला सांभाळणाऱ्या पुरुषाचं, वडिलांच अबोल प्रेम सहसा तितक्या उत्स्फूर्तपणे कुठेच दिसत नाही किंबहुना ते समजून घेणं खरंच कठीण आहे. स्त्रीयांची दु;ख डोळ्यावाटे पाझरतांना सर्व जगाला दिसतात पण पुरुष मात्र दु;खाचं एक टिपूसही डोळ्यातून झिरपू देत नाही कारण स्त्रीला अश्रूचे वरदान असते मात्र तेच पुरुषाला पाप असतं कारण तो पुरुषपणाला मिळालेला शाप असतो.  
पुरुषांनाही वेदना होतात, तेच काय डोळ्यात अश्रूही येतात. खरंतर पाण्यात रडलेला मासा व मनात रडलेला पुरुष कोणालाच समजत नाही.बाकी ते " मर्द को दर्द नही होता" सांगणाऱ्यांची बोटे दरवाजाच्या फटीत एकदा चेमटायला पाहिजेत मग समजेल!
असो, पण या पुरुषीपणाचं कौतुक करुन घ्यायला वेळ आहे कुठे? तरीसुद्धा समस्त कर्ते पिता, पुत्र, भाऊ, मित्र, पती, कलिग हि सर्व नाती योग्यप्रकारे जपणाऱ्या सर्व कर्तबगार पुरुष मित्रांना जागतिक पुरुष दिनाच्या आभाळभरून शुभेच्छा!!

शुभेच्छांचा पत्ता नाही 
पुरुष दिवस असून, 
बघा बरं तरी आम्ही 
बसलो नाही रुसून.

तुमच्या ‘डे’ ला आम्ही सारे 
लिहून लिहून थकतो, 
कर्तव्यच ते आमचे सांगा 
आम्ही कधी चुकतो ?

गरीब बिच्चाऱ्या पुरुषांना तर 
उरला नाही वाली, 
चालू वर्ष गेले आता 
पाहू म्होरल्या साली.

छातीवरती दगड ठेवून 
ओढीत असतो गाडा, 
त्याच्या खांद्यावरच उभा असतो 
चिरेबंदी वाडा.

बोलतो कमी काम जास्त
सोशीत असतो खूप.
नितळ हवी दृष्टी,
पहायला ते रूप.

सगळे पुरुष नसतात गुंड
मस्तवाल आणि  मवाली,
घराचीही इज्जत असते 
त्यांच्याच तर हवाली.

लढ बाई लढ म्हणून 
पत्नीस देतो बळ, 
आईच्याही हृदयाचा 
सहज गाठतो तळ.

बहिणीच्या आयुष्यातील 
सावली असतो दादा, 
तिच्यासाठी जीव टाकतो
जरी असला साधा.

पोर जपतो हातावरचा
फोड जणू समजून,
जाता जाता सासरी तिला
जाते सारे उमजून.

फुटतो जेव्हा अश्रूंचाही
लेकीचा त्या बांध, 
देतो सल्ला सासर-माहेर 
समजुतीने सांध.

मुलगा भाऊ बाप आजोबा 
मामा काका दीर, 
पुरुष म्हणजे देशासाठी 
कुर्बान होणारा वीर. 

सगळे नसतात वाईट 
उगाच फोडू नका खडे 
चला चला आणा निदान
आता, पाव आणि वडे !

😄🥰 🌺🌞 🌞🌺 🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...