इतक्यात अहमदाबादला जाणं झालं. कार्यक्रम संपायला मला रात्रीचे अकरा वाजून गेले होते. हातात सामान होतं, कृष्णन बरोबर होते तरी पहाटेची ट्रेन पकडायची म्हणून स्टेशन जवळचं हॉटेल बुक केलं होतं जे कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जवळपास अर्धा पाऊण तासांच्या अंतरावर होतं. ओला बुक केली. 5 मिनिटांत एक फोन आला, की मॅडम I am reaching. Please wait, don't cancel. I am stuck near signal.
आयला, मला जरा गंमत वाटली, आवाजावरून मला तो पंचविशीचा तरुण वाटला. म्हणल्या प्रमाणे तो आला, उतरून त्याने माझ्या आणि कृष्णनच्या हातातून सामान घेऊन पुढच्या सीट वर ठेवलं, सामान ठेवताना म्हणाला, एक एकच बॅग आहे तर सीट वर ठेवतो. and we were ok with it. छान स्माईल देऊन, तो बसला आणि आम्ही आमची ट्रीप / राईड सुरू केली.
कृष्णन अहमदाबादचाच असल्याने त्यांच्या गप्पा सुरू होत्या. मधून हिन्दी, इंग्लिश, गुजराथी सगळं सुरू होतं. कृष्णन आधीच त्याच्या बोलण्याच्या पद्धतीने इम्प्रेस झाला होता, दिसायलाही छान आणि चांगल्या सुशिक्षित किंवा आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित घरातला वाटत होता. गप्पागप्पात त्याने सांगितलं की तो लास्ट इयर ग्रॅज्युएशन ला आहे. आणि फी बाबा भरतात पण इतर खर्च काढण्यासाठी तो ओला मधून कॅब चालवतो. ही कार त्याची स्वतःची आहे. आणि या व्यतिरिक्त त्याच्या अजून दोन कार आहेत. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर बाबांनी लायसन्स काढून दिला आणि कार शिकवली. वडिलांचं सेकंड हँड कार चं शो रूम असल्याने तिथूनच त्यांनी एक चांगली कार त्याला घेऊन दिली आणि म्युच्युअलि असं ठरलं की ही कार त्याच्या वडिलांनी त्याला लोन म्हणून दिली आहे. आणि तिथून त्याच्या स्वावलंबनाचा प्रवास झाला. या शिवाय, पॉकेट मनी, दिवाळी, वाढदिवस मिळून वडील त्याला दर वर्षी एक ते दीड लाख देतात त्यातून त्याने ते लोन फेडलं आणि आता अजून 2 कार अशाच लोन वर वडिलांकडून घेतल्या आहेत. त्या त्याने ओला मध्येच ड्रायव्हर ठेवून चालवायला दिल्या आहेत.
वडिलांनी किंवा इतर कुणीही देत असलेले पैसे तो जमतील जमतील तसे म्युच्युअल फंडस्, शेअर्स मध्ये गुंतवतो. ग्रॅज्युएशन ची फी बाबा भरणार आहेत पण इतर सगळा खर्च त्याचा त्याला करायचा आहे. एम बी ए करायचं आहे आणि पुढे व्यवसायच करायचा आहे. या सगळ्या गप्पा मारताना तो आर्थिक गुंतवणूक, पैसा, राजकारण , मित्र एकत्र मिळून कसं पैसे गुंतवतात वगैरे सगळं सांगत होता. वडील सुखवस्तू घरातले आहेत. व्यवस्थित आणि उत्तम बिझनेस आहे पण वडील आणि आई क्लिअर आहेत की हे तुझं असलं तरी आमच्यामुळे तुला मिळणार आहे, पण तुला तुझं असं काही बनवायचं आहे आणि त्यासाठी कष्ट करणे म्हणजे काही वाईट नाही. आम्ही दुष्ट नाही. हे सगळं सांगताना तो खूप काम होता. आम्ही खूप कौतुक करत होतो त्याने कुठेही तो हुरळून वगैरे गेला नाही. मराठी मित्र आहेत पण ते घरून प्रेशर असल्याने जॉब करतात, तरी आता हळूहळू वळत आहेत बिझनेस कडे असं सांगत होता.
हे सगळं ऐकताना मी मात्र विचार करत होते तो आपल्या इथल्या मुलांचा. 20 वर्षांच्या मुलाला किती clarity होती. कुठून आली? कशी आली? आम्ही मुलं वाढवताना नक्की कुठे चुकतोय ? 22 25 च्या मुलांच्या जॉब साठी आम्ही मित्र परिवारात शब्द टाकतो, मुलांना गाड्या घोडे घेऊन देतो, पेट्रोल भरून देतो,.. अपघात झाले की आम्ही bribe देऊन पोरं सोडवण्याची तयारी ठेवतो. आमची मुलं 21 थर, 15 थर दही हंडी फोडण्यात जीव गमवताना दिसत आहेत, आम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या नाहीत, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायचं आहे, गुजराथला शिव्या द्यायच्या आहेत. यू पी ला शिव्या द्यायच्या आहेत. राजकारणाला शिव्या द्यायच्या आहेत, आणि त्यात त्यांना वावगं वाटूही नये इतके निर्ढावले आहेत ही मुलं? आया बहीणींना शिव्या देणं, त्यांना आता मॅनली वाटायला लागलं आहे? ओला उबर मध्ये मॅक्सिमम परप्रांतीय आहेत, का? विचार करावासा वाटत नाही? आमची मुलं आमच्याच पैशाने घेतलेले आय फोन मिरवतात आणि त्यांना कुठेही काहीही वाटत नाही. मराठी घरात कितीही शिकलास तरी जॉब हाच एक उद्देश त्यांना देतो. कारण आम्हाला अंबानीवर फक्त टीका करायची असते, अंबानी घडवायचे नसतात. मी 23 वर्षाच्या मुलीची आई आहे, मध्यमवर्गीय घरातून, मराठी ब्राह्मण कुटुंबातून आलेली आहे, पण माझ्या सुदैवाने आईने तिला घडवताना खूप कष्ट घेतले आहेत.
आणि तिचाच पगडा माझ्यावर असल्याने मी ही किमया ला एक प्रेमळ उबदार वातावरण देत असले तरी तिला तिचं स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे, तिला स्वतःला घडवायचं आहे याची जाणीव वेळोवेळी करून दिलेली आहे आणि म्हणून आज आई म्हणून मी निर्धास्त आहे. पण तरी अंतर्मुख होते आहे की कुठे तो 20 वर्षांचा मुलगा आणि कुठे मराठी बोला, हिन्दी बोला, म्हणत माथी भडकवून घेतलेली तरुणाई.
मागच्या आठवड्यात डोंबिवली मध्ये हॉटेल मध्ये धक्का लागला म्हणून मुडदा पाडणारी लोक चुकत नाहीयेत, मला वाटतं कुठेतरी आमची पिढी चुकते आहे मुलांना घडवायला.
- शर्वरी मुनिश्वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा