आज अंजलीचा फोन आला. म्हणाली,
"संध्याकाळी भेटायला येते. तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायच आहे. "
" कशाबद्दल ग.."
"अग आई....." हे बोलताना तिचा गळा दाटून आला होता.
" ये ग.." मी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याचे समजल्यावर मी तिला भेटायला गेले होते. तिच्या आईच्या आठवणीने माझे मन एकदम खूप मागे गेले. तेव्हा आम्ही पाचवीत होतो. अंजली, उषा आणि मी आम्ही तिघी घट्ट मैत्रिणी. अंजलीची आई बरेच दिवस आजारी होती .आणि नंतर ती गेलीच. तिची आजी गावाकडे असायची. पण सून आजारी असल्याने ती पुण्याला आली होती. सुन गेल्यानंतर घर ,अंजलीचे बाबा आणि अंजलीला सांभाळण्यासाठी इथेच राहिली. आई गेल्यानंतर अंजलीला फार वाईट वाटले. आम्हालाही. त्या वयात आई हे मुलींच सर्वस्व असते.अंजली ऊदास असायची. जमेल तसं ऊषा आणि मी तिला सांभाळत होतो. तशी तिची आजी घरी होती .ती प्रेमानी तिचं करायची. काही दिवस झाल्यानंतर हळूहळू अंजली नॉर्मल झाली. परीक्षा,अभ्यास ,खेळ असं नेहमीच रूटीन सुरू झाल.नऊ दहा महिने गेले.
एके दिवशी शाळेत आल्यानंतर अंजलीचा चेहरा ऊतरला होता. थोडी भांबावली पण होती. आम्ही तिला विचारल्यावर ती म्हणाली ,
"संध्याकाळी तू आणि उषा माझ्या घरी या मी तुम्हाला सांगते. ईथे नको"
आम्ही तिच्या घरी गेलो. अंगणातल्या एका कोपऱ्यात नेऊन ती म्हणाली
"आधी तुम्ही दोघी रामाची शपथ घ्या. तुम्ही हे कोणाला सांगणार नाही."
"अग पण झाल काय ?ते तरी सांग."
"आधी रामाची शपथ घ्या "
आम्ही दोघींनी रामाची शपथ घेतल्यानंतर रडवेल्या आवाजात ती म्हणाली,
" फार भयंकर गोष्ट आहे. बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत."
बाप रे आम्ही हबकलोच. आता हे काय.
" म्हणजे तुला आता सावत्र आई येणार ?"
"हो ना गं ...."
असं म्हणून ती रडायलाच लागली. काय करावं आम्हाला सुचेचना.
सावत्र ...
या शब्दाचा आमचा कधी संबंधच आला नव्हता. तेव्हा आमच्या वर्गात कोणालाच सावत्र आई नव्हती. आता आपल्या मैत्रिणीला सावत्र आई येणार. आता तिचं कसं होणार? ही चिंता आम्हाला लागली. तिने रामाची शपथ घातली होती त्यामुळे कोणाला सांगता पण येत नव्हते. आमच्या तिघींचं चिमुकलं भाव विश्व पार हादरून गेल होतं. आणि याला काही उपाय आमच्याकडे नव्हता. तिला आता तिची सावत्र आई छळणार ...त्रास देणार ...तिला मारणार... उपाशी ठेवणार.. वगैरे ...असचं आमच्या मनात यायला लागलं. कोणीतरी म्हटलेल अंजलीनी ऐकल की.
"आता लग्न केलं नाही तर तीन वर्ष परत करता येत नाही म्हणे ."
पण म्हणजे काय हे आम्हाला समजले नाही. चार दिवस तिचे बाबा बाहेर गावी गेले होते. येताना तिच्या नव्या आईला घेऊन येणार होते. "रविवारी तुम्ही घरी या. " अस अंजलीनी आम्हाला सांगितलं होत. सावत्र आई कशी असते हे बघायची आम्हाला प्रचंड उत्सुकता लागली होती. त्यामुळे आम्ही मुद्दाम वही द्यायचं निमित्त करून तिच्याकडे गेलो. तिला पाहायला. मनात दडपण भिती होती. तिच्याशी कसं बोलायच? अंजली त्यादिवशी गप्प गप्पच होती. सावत्र आई बाहेर आली. आम्ही नीट बघायला लागलो. पण सगळ्यांची आई असते तशीच ती दिसत होती. गुलाबी साडी आणि गुलाबी ब्लाऊज तिने घातलेला होता .ती आमच्याशी बोलली .आमची नावं विचारली. कुठे राहता, बहिण भाऊ किती आहेत ही चौकशी केली. ईतकच नाही तर तिनी वाटीतुन आम्हाला लाडु खायला दिला. निघताना
"अंजलीशी खेळायला येत जा" असंही म्हणाली.
आम्हाला कसला अंदाजच येईना. दुसरे दिवशी शाळेत आमच्या तिघींचा एकच विषय. नवीन आई..आम्ही अंजलीला अनेक प्रश्न विचारत होतो. खोटं वाटेल पण तीन चार दिवस आम्ही तिचा डबा पण तपासून बघत होतो. तो व्यवस्थित असायचा. म्हणजे तिला सावत्र आई निदान उपाशी तरी ठेवत नाही. असं आम्ही समजत होतो. रोज आम्ही विचारत होतो ,
"आईनी मारलं का गं " ती "नाही "म्हणायची.
आम्हाला वाटायचं तेवढं तरी बरं आहे. आता इतर मैत्रिणींनाही सावत्र आईचे समजले होते .त्यामुळे त्या पण अंजलीला विचारायच्या. तिला उत्तर देताना थोडं अवघडचं वाटायचं. इतक्या वर्षानंतर लक्षात येतं त्या कोवळ्या वयात नव्या आईला स्विकारणं तिला किती जड गेलं असेल. तसेच तिच्या आईची ही अवस्था काय असेल ते आता. या वयात आम्ही समजू शकतो. काही दिवसानंतर ती म्हणाली.
" तसं सगळं चांगलं चाललं आहे पण मला अजून माझ्या आईची आठवण येते ग.."
आम्ही तिचं मन समजू शकत होतो. असेच काही दिवस गेले आणि एकदा ती म्हणाली,
"माझ्या अक्षरावरून नवी आई मला आज रागवली. तिनी मला रोज पाच ओळी शुद्धलेखन काढायला सांगितले आहे."
मी म्हटल "हो का...यासाठी आई रागावली ...मग ठीक आहे."
ती म्हणाली. "आई सारखा अभ्यास घेते. पाढे म्हणून घेते."
"जाऊदे पण मारत नाही ना ?"
"नाही ग मारत बीरत नाही." ती म्हणाली..
आम्हाला जरा बरे वाटले.
"अग माझी पण आई मला अभ्यासावरून रागवते.." ऊषा तीला म्हणाली..
अस होता होता. अंजली सावरली. सहामाही परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले. बाईंनी तिच्या अक्षराच कौतुक केलं. दुसरे दिवशी तिने सांगितलं आई तिच्यासाठी गंमत आणणार आहे बक्षीस म्हणून. मग हळूहळू अंजलीची नव्या आईशी गट्टीच जमली. आधी ती नवी आई म्हणायची नंतर नुसतं "आई" म्हणायला लागली. काही दिवसांनी तर खऱ्या आईला ही विसरली.
इतकी त्या दोघींची जवळीक झाली. आम्हालाही तिची आई आवडायला लागली. अंजलीच लग्न झालं. तिला दोन मुलंही झाली. नातवंडांवर तर तिच्या आईने खूपच प्रेम केले. अंजली पण आईला नीट सांभाळायची. आयुष्यभर खूप प्रेमाच नातं होत दोघींच. आता वाटतं. काही शब्दांचं असं असतं की ते ऐकल्यावर आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार झालेली असते. ती लगेच समोर येते. त्याप्रमाणे आपले मन प्रतिसाद द्यायला लागते. शब्दांच मनावर एक गारुडच असतं...
सावत्र हा शब्द असाच. आमच्या लहानपणी भीतीदायकच वाटायचा ..त्याची दहशतच वाटायची.. त्यात उत्तानपाद राजा त्याच्या दोन राण्या सुरुची आणि सुनिती आणि ध्रुव बाळ ही कथा प्रत्येकाला माहीत असायची. त्यामुळे सावत्र म्हणजे दुष्ट.. त्रासदायक असंच एक चित्र आमच्या मनात होतं. वय वाढेल तस. अर्थात हळूहळू शहाणपण येत जात..
शब्द आणि त्यांचे अर्थ समजायला लागतात. त्यातला गर्भित भाव लक्षात येतो. कित्येक वेळ मी त्या जुन्या आठवणीत होते. अंजली आली. आज आईच्याच विषयी ती बोलायला आली होती.
"आई प्रथम घरी आली तेव्हा तुम्ही दोघींनी मला त्यावेळेस किती आधार दिला ग. तो आता फार जाणवतो.फारच अवघड होती ती वेळ."
"अग तुझ दु:ख केवढ मोठ होत हे तेव्हाही आम्हाला समजत होत."
"नीता..नुकतीच आई गेली तिने माझ आयुष्य फुलवलं समृद्ध केलं. तुला तर माहीत आहे. अजून एक खूप फार मोठी गोष्ट तुला सांगायला आज मुद्दाम तुझ्याकडे आलेली आहे."
हे म्हणताना अनावर होऊन ती रडायला लागली. रडत रडत म्हणाली,
"आई गेल्यानंतर बाबांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय नको म्हणून आईने तिला स्वतःचं मूल होऊ दिलं नाही. आणि हे मला कधी सांगायचं नाही असंही तीनी बजावलं होतं. सांग कसे पांग फेडू ग त्या माऊलीचे नीता...."
आम्ही दोघी धाय मोकलून रडत होतो. कितीतरी वेळ आम्ही हातात हात घेऊन बसलो होतो. नि:शब्द ...
सावत्र सख्ख असं काही नसतच. हे नुसते शब्दांचे खेळ. आई ही आईच असते. एवढ खरं..."
लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी
9763631255. पुणे..🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा