भाऊबीज होऊन दोन महिने होऊन गेले, पण गोपाळचा पत्ता नव्हता म्हणून कुसुमताईना अस्वस्थ वाटत होतं. या गोपाळा साठी काय केलं नाही आपण? लहान भाऊ म्हणून कायम सांभाळून घेतलं, पण हा सगळं विसरून गेला. काही वाद आणि भांडण होऊन दहा वर्षं होऊन गेली होती. तरी आकस धरून बसायचं? आपण ऐशी गाठणार आता! कसं नाही कळत की मनुष्य अमरपट्टा घेऊन आलेला नाही! चांगल्या गोष्टी पटकन विसरून जातो माणूस आणि कडू गोष्टी उगाळत बसतो.
आरती, त्यांची सून, चहा घेऊन आली. बशीत सांडलेला चहा बघून वड्याचं तेल वांग्यावर निघालं.
“आरती, मला चहा बशीत सांडलेला आवडत नाही हे तुला माहित आहे ना? मग मुद्दाम करतेस का?” सोशिक, शांत आरतीसाठी कुसुमताई गप्प बसायचं ठरवतं, पण जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही म्हणतात तेच खरं ठरायचं!
“आई, दुसरी बशी आणते.” नीटनेटकेपणा व सुबकपणात आरती व कुसुमताई यांचा छत्तीसचा आकडा होता. कुसुमताईचं करणं कसं बघत रहावं असं होतं. त्यांचे चिरणं, सजवणे, कपाटं लावणं या सगळ्यात कला होती. आरतीचा मात्र धबडगा होता. भराभर कामं उरकायची आणि ते तसं चूकही नव्हतं. शाळेत शिक्षिकेची नोकरी, पेपर तपासणं, दोन मुलांचं करणं यात तिला कोथिंबीर सुंदर चिरून पोह्यावर कलात्मकतेने टाकायला वेळही नव्हता. कुसुमताईंचा मुलगा अमित कर्तबगार होता. हल्ली कामामुळे त्याला आईशी बोलायलाही वेळ नव्हता. त्यात वेळ काढून तिच्याशी गप्पा मारायला गेलं, तर गोपाळमामाचं वागणं, आरतीनं बशीत सांडलेला चहा आणि एकसारखी न चिरलेली भेंडी हे बोलण्यात त्याला काडीचा इंटरेस्ट नव्हता. आरती एक चांगली व्यक्ती आहे हे त्याला ठाऊक होतं...
असाच एक दिवस अमितचा आरतीला ॲाफिसमधून फोन आला.
“अरू, तुझ्यासाठी एक गुड न्युज आहे व एक बॅड न्युज आहे.. कुठली आधी ऐकायची आहे सांग!”
आरती हसली. “गुड न्युज सांग आधी!”
“आरती, मला आज प्रमोशन मिळालं. मॅनेजर झालो आहे!”
“काय सांगतो आहेस? अभिनंदन, मॅनेजर साहेब! आहेसच तू डिझर्विंग! लवकर घरी ये आज बरंका!” तिच्या आवाजातून कौतुक ओसंडून वहात होतं!
“आता बॅड न्युज! मला बरंच ट्रॅव्हल करावे लागणार आहे. परदेशी पण जावं लागेल.” तो सांगत होता. जगात गुड व बॅड असं काही नसतं. माणसांनी लावलेली ही लेबल्स आहेत असे मानणारी आरती देवासमोर निरांजन लावून नमस्कार करण्यात मग्न होती.
“आईंना ताप आहे. अंगही दुखतंय. मी शाळेतून लवकर घरी आलेय व त्यांना डॅाक्टरकडे घेऊन गेले. खूप चिडचिड होतेय त्यांची. तू घरी आलास की तू स्वत:च त्यांना ही बातमी सांग. खूष होतील! आणि जरा जास्त बोल त्यांच्याशी. त्या वाट बघत असतात तुझी पण तुला वेळच नसतो हल्ली.” आरतीनं एका दमात बोलून टाकलं.
कुसुमताई लवकर जेवत असत. आरतीनं वाढलेल्या भाजीकडे त्या बघत होत्या..
“आरती, अग हे कसलं भाजी चिरणं? अशी चिरलेली भाजी मला नाही खाता येणार. मला आता सांजा करून दे.. तूप घालताना… असं कर.. रवा मंद आचेवर परत.. बोलणं सुरूच होतं.
आरतीनं सांजा केला. देवा मला जेव्हा स्वत:ला करता येणार नाही तेव्हा जे समोर येतं त्यावर टीका करायची बुध्दी देऊ नको रे बाबा... म्हणत तिनं सांजा केला.
अमितने घरी येताच त्यानं प्रमोशनची बातमी आईला सांगितली. आईचा चेहरा आनंदाने भरून आला. बाबा गेल्यापासून तिनं शिवणकाम करून अमितला वाढवले होते. चार दागिने होते ते विकून त्याचं शिक्षण केलं होतं. पाठ मोडून थर्मोकोलची सुंदर कलाकुसर लग्न समारंभासाठी विकून पैसा मिळवला होता. अमित आज मॅनेजर झालेला बघून तिचे डोळे भरून आले. तिच्या श्रमाचं चीज झालं होतं!
“आरती, आपण या रविवारी जेवायला जाऊ बाहेर. आईला बाहेरचे जेवण सोसत नाही म्हणून तू तिची घरी व्यवस्था कर. आपण मल्टिप्लेक्सला “अवतार” लागला आहे तो बघू. जरा मजा करूया”. जेवणं होऊन झोपण्यापूर्वी अमितने आरतीला प्लॅन सांगितला.
शनिवारी संध्याकाळी अमित घरी आल्यावर आरती त्याला म्हणाली, “अमित उद्याचा प्लॅन छानच आहे.. पण एक बदल आहे.”
अमित तिच्याकडे बघत होता.. “काय बदल आता?” त्याने त्रस्त चेहरा केला होता.
“अमित, उद्या तू आईंना जेवायला घेऊन जा. त्यांना कृष्णा डायनिंग रूम मधलं जेवण खूप आवडतं. किती दिवसात त्या तिथे गेलेल्या नाहीत. त्यानंतर तुम्ही नाटकाला जा. “वाहतो ही दुर्वांची जुडी” हे त्यांचं आवडतं नाटक नव्या कलाकारांसह बघायला त्यांना खूप आवडेल.” आरतीने बदललेला प्लॅन सांगितला..
अमित गडबडला पण त्याला मनातून हा नवा प्लॅन व प्लॅन बनवणारी फारच आवडली होती.. आईशी बोलायला हल्ली खरच वेळ नसतो. आता तर जास्तच बिझी होणार. निदान आत्ता तरी तिला घेऊन बाहेर जावं! Mr and Mrs नेने असं तुमचं रिझर्वेशन केलय कृष्णामध्ये असं आरती सांगत होती..
आई आधी नको नको म्हणत होती, पण आरतीने सांगितले, “ आई, तुमचा मान पहिला! नंतर मी. आज अमित तुमच्या श्रमांमुळे मॅनेजर झाला आहे!” आईनं डोळे पुसले! अगदी नीटनेटकं, सुबक, सुंदर वाक्य आरतीच्या तोंडून येत असतं हे कुमुदताईंना जाणवलं.
रविवारी त्या ठेवणीतली नारायण पेठ नेसल्या. कानात टपोऱ्या मोत्यांच्या कुड्या घातल्या. शुभ्र केसांचा सुरेख अंबाडा घातला. कृश हातात दोन बिलवर घातले. बाबांची आठवण काढत त्यांनी दिलेली अंगठी बोटात घातली.
“आई, छान दिसतेय साडी! बरं.. कृष्णा मधे बरंका... हल्ली तो हराभरा कबाब देतात तो नका खाऊ. फार तिखट असतो. बाकी सगळं आवडेल तुम्हाला. गरम टोमॅटो सुप नक्की घ्या हं!”आईच्या साडीच्या निऱ्या खाली बसून एकसारख्या करता करता आरती बोलत होती. कुसुमताईना थोडंसं ओशाळल्या सारखं वाटत होतं.
अमित गाडी काढून आईची वाट बघत होता. कृष्णा मधे आईनं चार घास जास्त खाल्ले. बाबांच्या आठवणीनं दोघं हळवे होऊन गेले. कित्ती दिवसांनी आज अमित बरोबर मनसोक्त गप्पा झाल्या होत्या. जे नाटक दहा वर्षाच्या अमितने आई, बाबा, ताई बरोबर बघितलं होतं ते आज परत बघताना भावना दाटून आल्या होत्या...
येते भाऊ विसर आजवर जे काही बोलले
नव्हती आई तरीही थोडी रागावून वागले…
थकले आपुले बाबा आता…एकच चिंता उरी..
आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते. गोपाळ हल्ली भाऊबीजेला येत नाही... फोन करत नाही! पूर्वी ताई ताई करणाऱ्या गोपाळचा अहंकार त्याला आपणांस भेटू देत नाही!
नाटक संपवून ते घरी आले. घरी पाहुणे आलेले दिसत होते. आत येताच गोपाळ मामा व मामी आलेले बघून आईला धक्का बसला... क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत उभे राहिले व थरथरलेल्या हातांनी काही न बोलता कुसुमताईंनी त्याला मिठी मारली..
“ताई, ही तुझी सून अशी गोड बोलते म्हणून आलो आहे. ती गेले सहा महिने अशा काही गोष्टी बोलली माझ्याशी की मी झालं गेलं विसरून आज इथे आलो आहे.. माझंही चुकलच ताई.. हे मान्य करतो!
“गोपाळा, किती खराब झालास रे! आलास म्हणून फार फार बरं वाटलं बघ.. बायकोची काळजी घेतोस ना?” आई मामीकडे बघत म्हणताच मामी मनापासून हसली.
आरतीनं आईला आवडणारी पुरणपोळी व बिरड्याची उसळ केली होती. खूप गप्पा झाल्या. दोन भावंडं सगळं विसरून हसत गप्पा मारत बसली होती. अमित गप्पात सहभागी झाला होता! एक सुंदर दिवस दोन भावंडांना व मायलेकांना खूप जवळ आणून सुखद आठवणीच्या रूपाने आयुष्याच्या पुस्तकात विराजमान झाला होता! परत आपण असेच भेटू हे आश्वासन मामा मामी घरी परतले.
पण परत भेटण्याची वेळ आली नाही.. ७९ वर्षांची आई पंधरा दिवसात आजारी पडली. अमित नेमका परदेशी गेला होता.. आईला जवळच्या हॅास्पिटलमधे ॲडमिट केले होते. आरतीने आईची खूप सेवा केली.. एक दिवस आईला जरासे बरे वाटत होते.. तिनं आरतीला जवळ बोलावलं..
“आरती, तू फार चांगली आहेस. मी तुला जे वेडवाकडं बोलले त्याबद्दल मला माफ कर. तू गोपाळचा राग घालवून त्याला घरी बोलावलस. मी धन्य झाले! तू मला व अमितला नव्याने जवळ आणलस. खरंच तुझ्याएवढी नीटनेटका प्रपंच करणारी व्यक्ती मी आजवर बघितलेली नाही..
खोकल्याची उबळ आल्याने ती थोडीशी थांबली..
“मी कपड्यांच्या घड्या उत्तम करण्याला महत्व दिलं, आणि तू माणसांची घडी विस्कटू नये म्हणून धडपडलीस.. फार उशीरा कळलं बघ.. मी नशीबवान आहे. मी अमित बरोबर जेवायला गेले ना... त्या दिवशी मी देवाजवळ एक मागणी केली! तुझ्यासारखी नेटका प्रपंच करणारी सून मला प्रत्येक जन्मात मिळो !” आरती डबडबलेल्या डोळ्यांनी ते शब्द ऐकत होती.
मध्यरात्री अमित तिथे पोचला. आई त्याचीच वाट पहात होती. नीटनेटकेपणावर अत्यंत प्रेम करणारी आई गेली... पण जाताना ती बोललेला प्रत्येक शब्द आरतीनं स्मरणाच्या मखमली पेटीत जपून ठेवला होता!
पंधरा दिवसांनी अमितनं न राहवून तिला विचारलं, “असं काय सांगितलंस गोपाळ मामाला म्हणून तो आईला भेटायला आला? कुठलं तत्वज्ञान त्याच्या गळी उतरवलस?”
आरती म्हणाली, “कसलं डोंबलाचं तत्वज्ञान? मी मामांना आई माझ्यावर रोज कशा ओरडतात ते सांगितलं. मामा भेटत नाही याचा राग माझ्यावर निघतो व माझे रोज हाल होतात असं सांगितलं.. जरा वाढवूनच सांगितलं.
त्यांना म्हटलं, की माझे त्रास कमी होण्यासाठी तरी घरी या. मामा तसे दयाळू आहेत.. ठीक आहे! येतो म्हणाले आणि बहिणीचे प्रेम कुणाला आवडत नाही? उगीच काही आकस धरून बसले होते.”
अमितला कौतुक वाटलं.. आरतीनं आईची इच्छा पूर्ण केली होती. मामा भेटला नसता, तर तिचा जीव इथे अडकला असता! मामी आजारी असताना गुपचूप जेवण घेऊन आरती देऊन का येत होती यामागचा भव्य हेतू त्याला उमगत होता! आईची टीका सहन करताना ती कर्तव्याला कुठेही कमी पडली नव्हती. नात्याचं सौंदर्य जपणाऱ्या आरतीच्या प्रेमात तो आकंठ बुडून गेला होता !
©® ज्योती रानडे ✍️
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा