"डॉक्टर साहेब, तुम्ही सुट्टीवर गेलात तेव्हा एक माणूस त्याच्या आईला इथे भरती करून गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत तो परत आलाच नाही. अडचण अशी आहे की ती म्हातारी स्वतःबद्दल काहीच सांगू शकत नाही. आम्ही तिच्याबद्दल खूप शोध घेतला, पण भरती करणाऱ्याने नाव, पत्ता सगळं खोटं लिहून दिलं होतं. आता काय आपण काय करायचं? इतके दिवस कोणाला ठेवणं शक्य नाही आणि तिला असं सोडूनही देता येत नाही," रिसेप्शनिस्टने सांगितलं तेव्हा त्याला आश्चर्याबरोबरच रागही आला.
"इतके दिवस भरती आहे आणि मुलाने एकदाही विचारपूस केली नाही? काय निर्दयी, निष्ठुर मुलगा असेल, जो आईला त्या वेळी सोडून गेला, जेव्हा तिला आधाराची सगळ्यात जास्त गरज होती... बरं, त्या आजींनी काही सांगितलं का? म्हणजे, त्यांच्याबद्दल काहीतरी कळेल असं?" कोट काढत तो विचारू लागला..
"नाही डॉक्टर साहेब! आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्या काही बोलतच नाहीत. हो, कधी-कधी एखाद्या 'सोनू'चं नाव घेऊन पुटपुटतात, पण काय ते कळत नाही."
"सोनू...?" हे ऐकताच त्याच्या अंगावर शहारा आला. मनात काहीतरी चमकलं. "कुठे आहेत त्या?" असं म्हणत तो जवळजवळ धावतच त्यांच्या बेडजवळ पोचला. तिथे गाठोड्यासारख्या सुकलेल्या, अशक्त झालेल्या म्हातारीकडे पाहताच त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं.
हो, त्या ह्याच होत्या - पण किती आजारी, अशक्त...
त्याला आपलं बालपण आठवलं. तेव्हा तो फक्त तीन-चार वर्षांचा होता. 'माई' अनाथाश्रमाच्या बाजूलाच आपल्या मुलासोबत एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होती. उंच, मजबूत माई त्याच्या शाळेत आया होत्या. त्या त्याला इतकं प्रेम करायच्या की अनाथाश्रमातून त्याला रोज काही वेळासाठी घरी घेऊन जायच्या, त्याचे आवडते पदार्थ बनवून स्वतःच्या हाताने खाऊ घालायच्या, शिकवायच्या आणि प्रेमाने म्हणायच्या, "माझा सोनू मोठा होऊन डॉक्टर बनेल. मग मी आजारी पडले की मला औषध देईल, हो ना? देशील ना औषध?"
"हो माई, डॉक्टर बनणार आणि औषध पण देणार.. पण कसकाय बनायचं असतं डॉक्टर?" तर माई डोक्यावरून हात फिरवत त्याला बिलगायच्या — "खूप अभ्यास केल्यावर आणि वर्गात नेहमी पहिला आल्यावर."
आणि मग तो मन लावून अभ्यास करायचा... माईला औषध द्यायचं स्वप्न मनात बाळगत.
काळ गेला. अभ्यासात अव्वल राहिल्याने आणि चांगल्या शिक्षकांच्या मदतीने त्याची डॉक्टरीसाठी निवड झाली. शिकण्यासाठी दुसऱ्या शहरात जाताना तो माईला बिलगून खूप रडला. पण माई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, "इथे राहिलास तर डॉक्टर कसा होशील? थोड्याच दिवसांची तर गोष्ट आहे... बघ, काही कळायच्या आतच कसे निघून जातील हे दिवस, आणि मग आपण सगळे एकत्र राहू."
पण अंतर आणि अभ्यासाच्या व्यापामुळे त्याचं माईसोबत भेटणं कमी होत गेलं. चार वर्षं उलटली. एके दिवशी समजलं की माईचा मुलगा घर रिकामं करून त्यांना सोबत गावाला घेऊन गेला. त्याला खूप धक्का बसला. दोन वर्षांनी डॉक्टरची पदवी मिळाल्यावर त्याने माईला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण कुणालाच त्यांच्या गावाचं ठिकाण माहीत नव्हतं.
"आणि आज, कित्येक वर्षांनंतर, त्या इथे — अशा अवस्थेत?" तो त्यांच्या कानाशी हळूच कुजबुजला, "माई, तुमची इच्छा होती ना की मी डॉक्टर व्हावं? बघा, तुमचा सोनू डॉक्टर झाला आहे. आता तुम्हाला औषध देईल."
हे ऐकताच त्यांच्या डोळ्यांत क्षणभर चमक आली, पण लगेचच ती विरली.
"कोण आहेस बाळा?" कसाबसा शब्द बाहेर पडला आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.
लहानपणी माई नेहमी म्हणायच्या, "माझी स्मरणशक्ती फार चांगली आहे रे, लाखोंच्या गर्दीतही तुला ओळखीन." आणि आज.. कितीही प्रयत्न करूनही त्या त्याला ओळखू शकल्या नाहीत.
"सर, तुम्ही रडताय? त्या तुमच्या ओळखीच्या आहेत का?" रिसेप्शनिस्टने विचारलं.
"हो, ओळखतो!" तो हळूच म्हणाला, "यांचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे... ममतेचं कर्ज."
मग सावरत त्याने आदेश दिला.. "त्यांचे डिस्चार्ज पेपर्स तयार करा. आता त्या माझ्यासोबत जातील... त्यांच्या सोनूच्या घरी."🏠💕🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा