बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2424. स्थितप्रज्ञ

   सदानंदांचं हृदयाचं ऑपरेशन होऊन जेमतेम दोन महिने झालेत नी तेवढ्यात सावित्रीबाईंचा पाय फ्रॅक्चर झाला. नाश्ता आणि स्वयंपाक करायला ताई होत्या पण तरीही बरीचशी कामे सदानंदांना करावी लागत. खरं तर सदानंदांना चार महिने आराम करा, अजिबात धावपळ करू नका असे डॉक्टरांनी सांगितले होते पण आता ते अशक्यच होते.
      दिल्लीला राहणाऱ्या सूनेने फोन करून त्यांना धीर दिला. पुढच्या आठवड्यात आम्ही दोघं येऊ नी महिनाभर तुमच्या बरोबर राहू. आईंना चिकन सूप पाजू, लवकर बऱ्या होतील त्या. आम्ही आल्यावर तुमचं निम्मं दुखणं कमी होईल. 
      सांगितल्याप्रमाणे राज आणि नेहा आले. सदानंद आणि सावित्रीबाईंचा वेळ छान जाऊ लागला. चार दिवसांनी नाश्ता नी स्वयंपाक करणाऱ्या ताईंचा दीड दोन महिने कामाला येणार नाही असा फोन आला. नशीब, नेहा असल्याने काही टेंशन नाही. "नेहा तू करशील ना मॅनेज?" सदानंदांनी विचारले.
     "बाबा मला ऑफिस कामाचा खूप ताण आहे, आणि जवळ जवळ वर्षाने पुण्याला आल्याने मैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटायचं आहे शिवाय शॅापिंगही करायचं आहे. मी बाहेरून फूड ऑर्डर करत जाईल. दिल्लीला पुण्याच्या स्पेशल डिशेस मिस करतो आम्ही."
     "नेहा बेटा, बाबांना बाहेरचं अन्न चालणार नाही, त्यांच्यासाठी कमी तेल आणि मीठ टाकावं लागतं."
    "आई, मला हे अजिबात जमणार नाही, तुम्ही तुमचं कसं करायचं ते बघा. मी जाऊ का? माझ्या आईचा फोन येतोय."
     सदानंदांना खूप वाईट वाटले पण तसे अजिबात न दाखवता त्यांनी यावर मार्ग काढला. सकाळी खूप लवकर उठून, देवपूजा करून मुलगा नी सून उठायच्या आत ते चहा नाश्ता तयार करून स्वतःच्या हाताने सावित्रीबाई, मुलगा आणि सूनेला देऊ लागले. मुलगा नी सून अकरा वाजता जिमला गेल्यावर दुपारचं जेवण आणि ते संध्याकाळी शॅापिंगसाठी बाहेर पडल्यावर रात्रीचे जेवण बनवू लागले. आजारातून पुरते बरे झाले नसल्याने त्यांची खूप दमछाक व्हायची पण त्यांनी ते अजिबात जाणवू दिले नाही. जेवणानंतर मात्र त्यांचा डोळा पटकन लागायचा. आईंना चिकन सूप देऊ म्हणणाऱ्या नेहाने चिकन सूपचा विषयही कधी काढला नाही.
      बघता बघता चार आठवडे गेले. नेहा आधी आणि दुसऱ्या दिवशी राज परत जाणार होता. नेहा गेली त्या दिवशी कॅब्जचा बंद होता. जवळ जवळ एक किलोमीटर चालत जाऊन सदानंदांनी नेहाला एअरपोर्टला जाण्यासाठी रिक्षा आणली.
      दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे चहा नाश्ता तयार केला आणि चक्कर येत होते म्हणून सदानंद कॅाटवर आडवे झाले. "बाबा, तुम्ही खूप झोपतात. किती उशीर झालाय, अजून झोपलात काय? नाश्ता द्या ना", राज म्हणाला. 
     बाबांचा डोळा लागलेला दिसतो म्हणत त्याने नाराजीने स्वतःच प्लेट भरली नी पहिला घास खाताच तो ओरडला, "किती मीठ टाकलंय, बाबांना मीठ कमी खा असं सांगितलंय डॉक्टरांनी." राजने चिडून नाश्ता बनवणाऱ्या ताईंना फोन केला नी विचारले, "ताई आज किती मीठ घातलंस नाश्त्यात? तुला माहित नाही का, बाबांना कमी मीठ खायला सांगितलंय डॉक्टरांनी?"
     "राज दादा, अरे मला बरं वाटत नाही म्हणून गेले ४ आठवडे मी कामाला येत नाही."
     "मग कोण बनवतं नाश्ता नी जेवण?"
    "मला काहीच माहित नाही", ताई म्हणाली.
      आईने ताईचा फोन आल्यावर नेहा काय म्हणाली ते आणि म्हणून अजून पूर्ण बरे झाले नसतानाही सकाळी लवकर उठून, अगदी दिवसभर बाबा किती कष्ट करतात ते सांगितले. 'म्हणूनच नाश्ता आणि जेवण केल्यानंतर ते विश्रांती मिळावी म्हणून लगेच बेडवर आडवे होतात. डॅाक्टरांनी त्यांना कष्ट करू नका सांगितले आहे पण माझ्या मेलीचं फ्रॅक्चर आडवं आलं. त्यांची धावपळ बघवली जात नाही रे माझ्याकडून' म्हणताना आईंचा स्वर रडवेला झाला होता. 
     "आई, नेहा खरंच बिझी असते, पण मला सांगितलं असतं तर मी केलं असतं ना."
     "बेटा, मुलाने करावं आणि आपण खावं असं कोणत्या आई-बापाला वाटेल? अरे, किती लाडात वाढवलं आहे आम्ही तुला. तुझ्या बाबांच्या काळजाचा तुकडा आहेस रे तू."
    "बेटा, पोह्यांत थोडा टोमॅटो आणि खोबऱ्याचा कीस टाकलाय, आता खारटपणा कमी झाला असेल", पोह्यांची प्लेट राजला देत बाबा म्हणाले. 
     "बाबा, पण तुम्हाला खोबरं चालणार नाही ना". 
    "माझं पोट ठीक नाही म्हणून मी नाही खाणार बेटा".
     बाबा इतके शांत नी स्थितप्रज्ञ कसे राहू शकतात? राजला समजत नव्हते. घरातून पाय निघत नव्हता पण केवळ फ्लाईटची वेळ झाली म्हणून राज खिन्न मनाने घराबाहेर पडला. 
      घरी पोहोचल्यावर राजने हे सर्व नेहाला सांगितले तेव्हा नेहाचे बाबा देखील उपस्थित होते. "नेहा बेटा, चूकलीस तू. अगं नुकतंच ऑपरेशन झालेल्या सासऱ्यांनी एवढे कष्ट घेतलेत आणि तुला पत्ताही लागला नाही? आय सॅल्युट दॅट ओल्ड मॅन ॲंड हेट यू नेहा. फोन करून माफी माग त्यांची".
      नेहाने सासूबाईंना फोन लावला. "आमच्या काही मनात नाही आणि तूही विसर", आई म्हणाल्या.
    "आई, मग नाश्ता, जेवण कोण बनवतं? बाबाच करतात का? मी येऊ का ७-८ दिवस?" 
     "नको बेटा. नशीबाने आमची सोय झाली आहे. कालपासून बाबांच्या मित्राची सूनबाई पाठवते नाश्ता नी जेवण."
     "आई, नोकरी न करणाऱ्या बायकांना जमतं हे. ती नोकरी करत नसेल ना?" 
    "करते की नोकरी".
    "सरकारी नोकरी असेल?"
    "नाही, तुझ्याच कंपनीत काम करते ती."
     "क्लर्क किंवा खालच्या पोस्टवर असणार ती".
    "मला नाही वाटत तसं, कारण तीला घ्यायला नी सोडायला स्पेशल कार येते".
    "काय नांव आहे तीचं?"
   "रीना", आई म्हणाल्या.
    "मध्यम उंची, थोड्याशा स्थूल, गोऱ्यापान नी बॅाब कट आहे का त्यांचा?"
    "हो", आई म्हणाल्या.
    "त्यांचं नांव रीना जोशी आहे का?"
    "हो, बरोबर."
    "आई, रीना मॅम माझ्या बॅासच्या बॅास आहेत. पुढच्या महिन्यात आमचं परफॅारमन्स ॲप्रेजल आहे. माझं इन्क्रीमेंट आणि प्रमोशन त्यांच्या हातात आहे. तुम्ही प्लीज सांगाल का त्यांना मी तुमची सूनबाई आहे म्हणून".
     त्यानंतर नेहा रोज फोन करून सासू सासऱ्यांची चौकशी करू लागली. घसघशीत इन्क्रीमेंट नी प्रमोशन झालं. काम वाढलं, जबाबदारी वाढली, साहजिकच रोज येणारा नेहाचा फोन बंद झाला. 
     सदानंद आणि सावित्रीबाईंना ना राग आला ना वाईट वाटलं. ते दोघेही शांत नी स्थितप्रज्ञ होते, गेल्या काही वर्षांत तशी सवयच लागली होती त्यांना.

©® दिलीप कजगांवकर, 
पुणे, 7770025596

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...