बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

2372. गाळात रूतलेले उत्तम घोडे !

      चार्टर्ड अकाऊन्टन्सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची विशेष सत्रे विजयादशमीपासून सुरू झाली. तेव्हा त्यातून आलेले काही अनुभव फारच धक्कादायक होते. 
९५% विद्यार्थी केवळ क्लासेस करणारे आणि त्यावरच सर्वार्थाने अवलंबून असणारे होते. वयाची २३-२४ वर्षे होऊन गेली तरीही परीक्षेमधून अपेक्षित यश मिळत नव्हतं. ‘बघू, करू, आणखी एक वर्ष प्रयत्न करू’ अशा विचारात दरवर्षी क्लासेस लावणं आणि दिवसरात्र अभ्यासिकेत बसणं यापलिकडं दुसरं काही आयुष्यच नव्हतं. अभ्यासाचा वेळ विचाराल तर दररोज नऊ तास, अकरा तास, पंधरा तास...! पण मग एवढा अभ्यास करूनही त्यांना यश का मिळत नाहीय? 
मागील काही वर्षांपासून आम्ही ही विशिष्ट समुपदेशनाची सत्रे घेत आहोत. पण सहा वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यांत प्रचंड फरक आहे. साम्य म्हणाल तर काहीच नाही. मुख्य म्हणजे आपण शिक्षणाकरिता करत असलेला खर्च आणि आपल्याला मिळणारं यश याचा ताळेबंदच जुळत नाहीय, असं दिसतं. (आणि हे विद्यार्थी खरं पाहता ताळेबंदांचाच अभ्यास करत असतात.) वर्षाकाठी किमान अडीच लाख रूपये आर्थिक खर्च, दैनंदिन वेळापत्रकातले किमान दहा तास वेळेचा खर्च आणि शारीरिक-बौद्धिक कष्ट अशा हिशोबाने साधारणत: गेली सहा ते आठ वर्षे याकरिता दिलेल्या विद्यार्थ्यांना मी स्वत:च भेटलो आहे, अजूनही भेटी सुरूच आहेत, चर्चा सुरू आहेत, नवनवे प्रश्न समोर येत आहेत. 
इन्स्टिट्यूट कडून पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य मिळतं, मेरीटची अट नसते, या कोर्सचा अभ्यास कुणीही करू शकतो, अभ्यास भारतभरात कुठेही करता येतो, तयारी झाली की परीक्षा देता येते, कितीही वेळा देता येते, वयाची अट नाही या जमेच्या बाजू.. पण आता मात्र चित्रच बदललेलं दिसतंय. क्लासेस लावल्याशिवाय अभ्यासच होऊ शकत नाही, म्हणून मग गावाकडून शहरांकडे येणं वाढलं. अंधाऱ्या, टीचभर खोलीत काॅट बेसिसवर रहायचं आणि क्लासेस करायचे, पण अभ्यासाला जागाच नाही म्हणून मग अभ्यासिका लावायची. एकाच जागी बसून विषयाचा तुकडा पाडण्याची सवयच नसते, त्यामुळे हे सगळं करूनही तसा फायदा होत नाहीच. ‘नापास’ या शब्दाची सवय होऊन जाते. 
पुष्कळ विद्यार्थी मी असेही पाहिले की, गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी परीक्षाच दिलेली नाही. ‘आधी परिपूर्ण अभ्यास करून मगच परीक्षा देणार’ असा ठाम निर्धार करून ही मुलं गेली तीन वर्षं अभ्यास करत बसली आहेत, पण अभ्यास काही परिपूर्ण होईना आणि यांची परीक्षेला बसण्याची तयारीच होईना...! मधल्यामध्ये वयाची पंचविशी पार व्हायची वेळ आली. काहींनी तर वयाची अठ्ठाविशी ओलांडली आहे. एका विद्यार्थ्याची भेट झाली त्याचं वय आहे ४२ वर्षं ! मार्गी कधी लागणार आणि सेटल कधी होणार, या प्रश्नांपासून कोसो दूर !! 
काहींनी हळूहळू पार्टटाईम नोकऱ्यांचे पर्याय निवडायला सुरूवात केली. दुसरं काही जमतं का, थोडेफार तरी पैसे कमावता येऊ शकतात का, याचा शोध दबक्या पावलांनी सुरू होतो. मग अकाऊंटंट, क्लार्क अशा प्रकारच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न करणं सुरू होतं. मूळ ध्येय बाजूलाच ठेवून प्राप्त परिस्थितीतून उपजीविका करण्यासाठी दुसरे मार्ग निवडले जातात. म्हणजे, मागच्या सगळ्यावर सरळ पाणी सोडायचं आणि एक तारखेच्या पगाराशी गाठ घालायची. करिअर, यश, प्रसिद्धी,पैसा,संपत्ती वगैरे शब्द चक्क बासनात गुंडाळून ठेवले जातात. जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला की, गोष्टी बदलतातच. 
नवी रिस्क घेण्याची उमेद आणि इच्छाशक्ती दोन्हीही संपूनच गेलेल्या असतात. नव्यानं आयुष्याला सुरूवात करावी म्हटलं तर आत्मविश्वासच येत नाही. कुटुंबियांची पैशाची उब थंड पडलेली असते, त्यामुळं तिकडून मदतीची सुतराम शक्यता उरलेली नसते. इतक्या वर्षांचा तोचतोपणा आणि ठराविक आयुष्य यांमुळे बदलत्या जगाची गंधवार्ता नसते. उत्साहच उरत नाही. मनात नकारात्मकता चांगलं बाळसं धरू लागते. मी सोडून जगात बाकी सगळे सुखात आहेत असं दिसायला लागतं. कुटुंबातून चेष्टा, टोमणे, घालून-पाडून बोलणं, अपमान हे सुरू होतं. ‘निदान या जन्मात तरी तू सीए होत नाहीस’ , ‘अजून किती पैसे बोडख्यावर ओतायचेत याच्या?’ ‘पंचविशी आली तरी बापाकडूनच पैसे घेताना काडीची लाज वाटत नाही घोडम्याला’ ‘आम्ही म्हटलं नव्हतं की तू सीए हो, स्वत:च ठरवलं होतंस. स्वत:ची ध्येयं स्वत:लाच पूर्ण करता येत नाहीत तर जाताच कशाला त्या वाटेला? त्यापेक्षा चार घरची धुरी-भांडी करा, फरशी पुसा, पेपर टाका, चौकात उभारून हॅन्डबिलं वाटा..’ असली मुक्ताफळं सुरू होतात. पालक तरी काय करतील? सगळ्यांचेच संयम संपलेले असतात. उसनं अवसान तरी किती आणायचं? 
कित्येक विद्यार्थी माझ्यासमोर ढसाढसा रडले आहेत. कारण हे सातत्यानं पदरी पडणारं अपयश आता सहन होत नाही, पेलवत नाही, आम्हांला आता काहीच करावंसं वाटत नाही, अशी त्यांची मन:स्थिती झाली आहे. रस्त्यावरचा फळविक्रेता, चहावाला, फुगेवाला, झेराॅक्सवाला, वडापाववाला हेदेखील आपल्यापेक्षा कितीतरी अधिक यशस्वी आहेत, असंच त्यांना ठामपणे वाटायला लागतं. बौद्धिकदृष्ट्या सर्वसामान्यांपेक्षा वरच्या वर्गात असूनही त्यांची अशी मनस्थिती का व्हावी? काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती जळून, करपून का जावी? 
साक्षरता आणि रोजगारनिर्मिती यांचा मेळच बसत नाहीय. आणि तोच प्रश्न समाजासमोरचा ब्रह्मराक्षस म्हणून उभा आहे. आता या बेरोजगारीच्या बकासुराला रोजचं गाडाभर अन्न लागतंच आहे, त्याचं काय करायचं? हा प्रश्न एका रात्रीतून सोडवणारी कुठलीही जादूची कांडी अस्तित्वात नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही. साक्षरतेची व्याख्याच बदलली पाहिजे. जगण्याचे साधे, सोपे, सरळ मार्ग युवा पिढीला दाखवले पाहिजेत. नाहीतर ही मुलं योग्य दिशेअभावी भरकटतील. खरं पाहता, काॅमर्स ही कला आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांना स्वत:शी जोडून ठेवणारी ज्ञानशाखा अाहे. विकासाच्या प्रक्रियेतलं काॅमर्सचं योगदान टाळता येण्यासारखं नाही. म्हणूनच, या शाखेतील विद्यार्थ्यांच्या क्षमतांना नवी दिशा देणं महत्त्वाचं आहे. त्यांनी दिवास्वप्नांमधून बाहेर यावं, स्वत:ला परिस्थितीचा गुलाम होण्यापासून रोखावं आणि या क्षेत्रातील करिअरविषयक निर्णय घेताना अंधानुकरण टाळून भवितव्याचा नीट विचार करावा. तरच काॅमर्समधील पदवीधरांची संख्या आणि रोजगारनिर्मिती यांची समीकरणं जुळतील. मन मारून किंवा अपेक्षाभंगाच्या दु:खात होरपळत उपजीविका करावी लागणार नाही,असमाधानाची मोठी किंमत आयुष्यभर मोजत बसण्याची वेळही येणार नाही. 

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...