सकाळची सगळी आन्हिकं आटोपून, तयार होऊन विराज डायनिंग टेबलवर बसला. 'Ready to go' अवस्थेतच मग त्याचा चहा, नाश्ता सुरु झाला आणि तेवढ्याच वेळेत जमेल तसा, पेपरही वाचायला घेतला त्याने. तर पेपर चाळता चाळता विराज, एका पानावरच्या खालच्या कोपर्याशी येऊन थबकला. 'हरवला आहे' च्या बातमीवर. त्यावर असलेला चौकटीतला फोटो, ओळखीचा वाटला होता त्याला. त्याने तो फोटो निरखून बघितला आणि ऑमलेट ब्रेडचा घास घशातच अडकून, ठसका लागला त्याला जोराचा. तो फोटो चक्क त्याचा स्वतःचाच होता, साधारण दहा - बारा वर्षांपूर्वीचा. विराजने तातडीने फोटोखाली लिहिलेलं, वाचायला सुरवात केली.
'हरवला आहे. आमचा एकुलता एक मुलगा. साधारण दहा - बारा वर्षांपासून, हरवला आहे. जेव्हा शेवटचं पाहिलेलं त्याला नीट, तेव्हा वरिल फोटोत असल्यासारखाच दिसे. नंतरही दिसला तो अधूनमधून आमच्या घरी, पण त्या पंधरा मिनिटांत असा कितीसा लक्षात रहाणार होता तो. उंचीला आई - बापापेक्षा खूप मोठा आणि अंगकाठी म्हणाल तर काठी हातात धरुन आई - बाप जाब विचारु शकणार नाहीत, किंबहूना घाबरतील... इतकी मजबूत. जन्मखूण. पोटावर भाजल्याचा, एक कायमस्वरूपी डाग. जेव्हा त्याच्या लहानपणी दिवाळीचा बाण कुठूनसा येत, त्याच्या पोटाशी फुटला होता आणि हा बाप त्याला कडेवर उचलून घेत, डॉक्टरांकडे पळत गेला होता. आई - बापापुढेही पैशाला सर्वस्व मानणं हा मनोविकार असेल, तर मनोरुग्ण. असा हा वयाच्या तिशीपर्यंत, फक्त आमचाच असणारा आमचा मुलगा. गेली दहा - बारा वर्ष झालीयेत हरवलाय. कोणाला काही माहिती मिळाल्यास, खालील नंबरवर / पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा. आपला कृपाभिलाषी... विनायक विद्याधर शारंगपाणी'.
विराजची कानशीलं एव्हाना तापली होती. कपाळावरची शीर तडतडू लागली होती. "What the fxxx is this?". एक कार्पोरेट अलंकार वाक्यात वापरुन, त्याने तातडीने फोन घेतला हातात. आणि त्याच्या लक्षात आलं... त्याच्या रेग्युलर कॉल लिस्ट मध्ये, बाबांचा - आईचा नंबरच नाहीये. "म्हणजे आपण आई - बाबांशी फोनवर बोललेलोच नाही इतक्यात?". त्याला थोडं वरमल्यासारखं झालं. पण ते तसं स्वतःलाच न दर्शवता, कॉन्टॅकट्स मध्ये जात त्याने बाबांचा नंबर शोधून लावला. समोरुन आवाज आला.
"नमस्कार... विनायक शारंगपाणी बोलतोय"
"बाबा... Is this any kind of joke or something u did with me? How the hell u can do this to me? लोक काय म्हणतील आता? त्यांना काय तसंही मनोरंजनच हवं असतं... पण तुम्हाला नको कळायला? माझं नाव आहे सोसायटीत... इभ्रत आहे. And don't u think it has gone on toss now, because of all such bullshit? काय नेमका प्राॅब्लेम काय आहे तुमचा?".
"पटकन्न सांग बाळा मला, माझं वय काय आहे सध्या. बरं ते सोड. मला सांग माझी बर्थडेट काय आहे. बरं चल माझं जाऊदे. कारण तसाही बाप मुलाच्या 'टिनएज' पासूनच, त्याच्यासाठी 'टिनपाट' होतो. तुझ्या आईची जन्मतारीख सांग... तिचं वय सांग".
"अहो बाबा... हे असं वाट्टेल ते, वाट्टेल तेव्हा धाडधाड मशीनगन सारखं विचारलंत. तर पटकन कसं काय सांगता येणार?".
"अरे... जर तुला हे इतकं बेसिकच सांगता येत नसेल, तर तुझ्या आईची शुगर लेव्हल. नी माझी ब्लडप्रेशर रेंज काय विचारणार तुला?".
"बाबा... अहो...".
"बरं ते एक असो. मला सांग हल्लीच दिवाळी होऊन गेली. आलास घरी? सुनबाई, नातवंड येऊन गेली. पण आमच्या आकाशातला आमचा कंदिल काही आमच्याकडे उजळलाच नाही. मित्रमंडळींबरोबर दिवाळी सेलिब्रेशन्स झाली तुझी, एकमेकांकडे फराळाचं जाणं- येणं झालं. पण एकदा इथे येऊन, आम्हाला नुसता उभ्याने जरी भेटून गेला असतास ना. तरी आमचा सण साजरा झाला असता रे."
"बाबा अहो नसेल जमलं... नाही जमतेय सध्या. एकतर कामाचा व्याप इतका वाढलाय, आता तो सांभाळू... की हे बाकीचे ताप?".
"ताप? आणि काय म्हणालास. सध्या? अरे... गेल्या दहा - बारा वर्षांत जेव्हापासून तू वेगळा राहू लागलायस, तुच सांग कितीवेळा आलायस आपल्या घरी? बरं असंही नाही की, भांडणं - तंटे करून आपण वेगळे झालोयत. सगळं गोडीत झालंय. आमचं नी वृषालीचं, आपसात खूप छान आहे. पण तुझं काय चाललंय? आता सांगतोच तुला. गेल्या महिन्यात रात्री झोपतांना, जवळ पाण्याचा तांब्या भरुन ठेवायला विसरलो आम्ही दोघंही आणि मध्यरात्री कधीतरी, नेमका जोराचा ठसका लागला मला. इतका जोराचा ठसका की, प्राण कंठाशी आले माझे. ह्या गडबडीत, माझ्यासाठी किचनमधून पाणी आणण्याच्या धावपळीत. पलंगावरुन उठतांना तुझी आई खाली पडली. दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या बदललेली ती, उठू ही शकली नाही मग आपणहून रे. बेडवर मी ठसका लागून अत्यवस्थ झालेलो. नी खाली जमिनीवर तुझी आई वेदनेने, शरमेने. मग मीच कसाबसा गेलो आत, पाणी प्यायलं आणि धावतच परतलो हिच्याकडे. खूप प्रयत्न केला. पण मलाही काही जमेना, हिला आधार देऊन उठवायला. मग काय? मी ही झोपलो खालीच लादीवर, हिच्या शेजारी. उरलेली रात्र. दिवस उजाडताच शेजारच्या दोघांना बोलावून, त्यांच्या मदतीने तुझ्या आईला पलंगावर निजवलं आम्ही. बरं झाला प्रकार सांगायला, तुझ्या आईने तुला फोन केला होता पुढे. तर सध्या महत्वाची मिटिंग सुरु आहे म्हणालास. नंतर बोलतो सांगितलंस. पण तो तुझा 'नंतर' काही, आठवडा उलटून गेला तरी आलाच नाही. हे सगळं झालं प्रकरण वृषालीला माहितीये. पण मग मीच तिला शपथ घातली आमची, तुला याबद्दल काहीही न सांगण्याची. तू आपणहून भेटायला येत नाहीस, फोन उचलत नाहीस, समोरुन फोन करत नाहीस. मग आम्ही करायचं तरी काय? म्हणूनच ऍड दिली पेपरात. म्हंटलं बघूयात करुन शेवटचा प्रयत्न. बघू सापडतो का, आपला कुठेसा हरवलेला मुलगा आपल्याला परत".
बाबांकडून हे सगळं ऐकून मात्र, विराज प्रचंड अस्वस्थ झाला. काहीच न सुचून. काहीही न बोलता, फोन ठेऊन दिला त्याने आणि जोराचा हुंदका फुटला त्याच्या तोंडून. तोपर्यंत काय झालंय याची साधारण कल्पना आलेली वृषाली. हात फिरवू लागली पाठीवरुन, हातात तोंड खुपसून रडणार्या विराजच्या. पाचेक मिनिटांनी सावरला विराज, नी त्याने पुन्हा फोन हातात घेतला. ऑफिसमध्ये फोन करत, आजची रजा सांगितली त्याने. आजचा अख्खा दिवस तो आई - बाबांबरोबर त्यांच्या, म्हणजेच कधीकाळी त्याच्याही असलेल्या घरी काढणार होता. त्याने बाबांना फोन लावला.
"नमस्कार. मी विराज विनायक शारंगपाणी बोलतोय. तुमचा हरवलेला मुलगा, सापडलाय बरं का. त्याला घेऊन येतोय मी, तुमच्याकडे ताबडतोब. त्याच्या आईला फक्त निरोप द्या त्याचा की, आज त्याला आवडणारा असा. घडीच्या पोळ्या, बटाट्याच्या काचर्या, चिंच गुळाची आमटी नी लसणाची चटणी असा बेत करा. तो येतांना आम्रखंड घेऊन येतोय, त्याच्या बाबांना खूप आवडतं म्हणून. आणि हो त्याने कबुल केलंय मला, की हे एका दिवसापुरतं नाटक नाहीये. तो आता दिवसाआड तुमच्यापाशी येणार आहे, कुठलीही सबब पुढे न करता. बाकी मग झाल्या चुकीबद्दल, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तो तयार आहे."
विराजने भरल्या डोळ्यांनीच फोन ठेवला. तिथे विनायकरावांनी सुद्धा फोन ठेवत, दाटल्या गळ्याने आवाज दिला होता बायकोला. "अगं ऐकलंस का. देवापुढे पहिली साखर ठेव पाहू. आपला कधीचा हरवलेला लेक, सापडलाय एकदाचा".
- सचिन श. देशपांडे . ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा