शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

2383. माहेर

 'मावशी, पटापटा दार उघडायचं, आम्हाला आणखी शंभर घरी जायचं असतं. बरं घरात कोणाला सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आहे का? काही झालं, तरी घराबाहेर पडायचं नाही, बरं वाटलं नाही, तर हा नंम्बर आहे, इथे फोन करायचा. मी दर पंधरा दिवसांनी चौकशीला येणार. चला, काळजी घ्या.'
'पोरी, पाणी देऊ?'
'नको मावशी. मी ठीक आहे. अहो, आमचं कामच आहे असं घडाघडा बोलायचं. फक्त तुम्ही दार उघडायला जरा उशीर केलात म्हणून थोडी वैतागले.'
'हरकत नाही अगं, कामाचा व्याप असला की असं व्हायचंच. मी घरात एकटीच असते ना, म्हणून उठून यायला वेळ लागला. ये, आत येतेस?'
'नको मावशी, पुन्हा कधी. दार लोटून घ्या तुम्ही, भेटू पुन्हा. बरं, चला बसते पाच मिनिटं.'
'येतेस? ये ये, बरं वाटलं आलीस. या घराला आणखी दोन पावलं लागली. नाहीतर घराला माझा आणि मला घराचा उबग आलाय बघ. तुझं नाव काय म्हटलीस?'
'मी सुमन.' नाव सांगत तिने तोंडावर लावलेला मास्क काढला आणि हात सॅनिटाईजरने स्वच्छ केले.
'तू दिसायला अगदी माझ्या गौरीसारखी आहेस गं. तिचं हसणं दिसणं अगदी तुझ्यासारखंच लोभस. पण यंदा मे महिन्याच्या सुट्ट्या असूनही ती मुलांना घेऊन माहेरी येऊ शकली नाही, नाहीतर तुला अगदी आरसा पाहिल्याचा भास झाला असता बघ!'
'मावशी तुम्हाला एकच मुलगी का? तुमचा सांभाळ कोण करतं? म्हणजे राशन पाणी, औषधं वगैरे.'
'मुलगा आहे गं, तोच मला काय हवं नको ते पाहतो, फक्त मला पाहत नाही. मला तरी काय पहायचं म्हणा, मी मेली ही थेरडी. तो साहेब आहे मोठा. त्याच्या घराला शोभणार नाही मी ! पण अगदीच वाऱ्यावर टाकलं नाही त्याने, दाणा-पाणी पोहोचवतो. माझं भागतं त्यात. तू म्हणशील, काय पण म्हातारीने रडगाणं लावलंय. माझं सोड. तू कुठली गं? म्हणजे तुझं माहेर कुठलं?'
'मावशी मी कोकणातली. पण आता तिथे कोणी राहत नाही. जुनं पडीक घर आहे. त्या जागेवर खटले सुरू आहेत. भाऊबंदकीत शेतजमीनिची खांडोळी झाली. माहेर संपलंच माझं. तुमचं माहेर कुठलं?'
'माझं माहेर? आता तर तेही आठवत नाही गं. आयुष्य सगळं इथे खर्ची गेलं. मागचे सगळे दोर तुटले. ह्यांच्या स्वभावामुळे माहेरची माणसं तुटली. ते गेले नि मी राहिले. आता हेच माझं सासर नि हेच माझं माहेर. पण माझी आई कोकणातली होती बरं का? पण तिलाही आमच्या वडिलांनी कधी माहेरी जाऊ दिलं नाही. मात्र, आम्ही दोघी गप्पा मारायचो, तेव्हा ती माहेरविषयी भरभरून बोलायची. फार वाटायचं, एकदा तरी आईने वर्णन केलेलं कोकण प्रत्यक्षात पहावं. पण आता कोकण काय, तर जवळच्या नाक्यावर सुद्धा कैक महिन्यात गेले नाही. घरात कोणी येत नाही आणि मी घराबाहेर जात नाही. देव पण का जगवतोय माहीत नाही...'
'तुमच्या गौरीला माहेरपण मिळावं म्हणून!'
'म्हणजे गं?'
'मावशी, मगाशी म्हणालात ना, मी अगदी तुमच्या गौरीसारखी दिसते म्हणून, मग आता मलाही तुमची गौरी समजा. मी पण हे माझं माहेर समजून तुमची विचारपूस करायला, गप्पा मारायला आणि कधी कधी जेवायला सुद्धा येत जाईन. पण तुम्हालाही लेकीकडे यावं लागेल हं? फार दूर नाही, तुम्ही बऱ्याच महिन्यात न पाहिलेल्या नाक्याच्या पलीकडेच मी राहते. म्हणजे नाका पाहणं होईल आणि लेकीचं घर पाहणंही होईल. माझ्या सासरची मंडळी सगळी कोकणातलीच आहेत, तुम्हाला कोकणाबद्दल आणखीही बरंच काही ऐकायला मिळेल.'
'पोरी, अगं तुला मी लेक म्हटलं आणि तूच मला माहेर देऊ केलंस.'
'मावशी, माहेरचं महत्त्व, माहेर गमावलेल्या बाईपेक्षा  जास्त कोणाला कळणार?'

© ज्योत्स्ना गाडगीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...