बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

2432. करार

 पर्स खांद्याला लटकवून माही ओरडली,"आई,मी निघाले. तू मागे लागलीस म्हणून मी त्या पोराला बघून येते. मला अजिबात लग्न करायची इच्छा नाही, पण तू मला न विचारता सगळं ठरवलं,म्हणून जाते आहे."
लेकीचा अवतार बघून मानसीच्या कपाळावर आठ्या पडल्या. "पोराला भेटून येते काय ग? मुलाला तरी म्हण. आणि काय ही विटकी जीन्स,तो आखूड टी शर्ट. कुठून मी रेखाला कबूल केलं,असं झालंय मला.  तुझा मुलगा आणि माझी मुलगी एकमेकांना भेटतील, त्यांचे विचार जुळले तर पुढचं बघू,असं मीच तिला म्हटलं,त्यामुळे आता काही पर्याय नाही."
"अशा जीन्सची फॅशन आहे हल्ली." माहीच्या मनात आलं,पंधरा मिनिटात तर मी त्या मुलाला कटवते. एक तर मला लग्नच करायचं नाही. त्यात आईने मला न विचारता हा नसता उद्योग केला आहे.
"भिकेचे डोहाळे सगळे." मानसी पुटपुटली.
"कसले डोहाळे म्हणालीस ग?"
"काही नाही. जा भेटून ये विराजला. आणि नीट बोल त्याच्याशी."
                         ..........
      माही ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचली. वीस  मिनिटं झाली तरी विराजचा पत्ता नव्हता. माही हॉटेलच्या बाहेरच उभी होती. दुरून एक मुलगा धावत येताना दिसला. तिने आणि विराजने एकमेकांचे फोटो बघितले होते. जवळ आल्यावर कळलं,तो विराजच होता. बर्म्युडा पॅन्ट, पायात स्लीपर, टी शर्ट,अशा अगदी कॅज्युअल ड्रेसमधे तो आला होता.
"ए हाय,सॉरी थोडा उशीर झाला." इअरफोन काढत विराज म्हणला.
"थोडा? मी वीस मिनिटं बाहेर उभी आहे." माही चिडून म्हणाली.
"चिल माही. अशा वेळी रस्त्यावरचे हँडसम मुलं बघायचे." विराज डोळे मिचकावत म्हणाला.
"फालतू जोक्सवर मला हसायला येत नाही."
"ओके मॅम,चल आत बसू."
    टेबलवर बसल्यावर माही लगेच म्हणाली, "मी स्पष्टच सांगते,मला लग्न करायचं नाही. तुझ्या आणि माझ्या आईने हा नसता घोळ करून ठेवलाय. म्हणून मला यावं लागलं."
"सेम हिअर,दे टाळी. मला पण लग्न करायचं नाही. म्हणजे तसं करायचं आहे,पण इतक्यात नाही." विराज जोरात हसत म्हणाला. "पण मला खरं खरं सांग. तेरा दिल किसीपे आया तो नही?"
"तसं काहीही नाही. मला ते लग्न वगैरे बोअर होतं. तुम्ही मुलं बायकोकडून सगळ्या टिपिकल अपेक्षा करताच. मी तसा नाही वगैरे आधी खूप कबूल करता पण लग्न झालं की तुमच्या अंगात नवरा शिरतोच."
     विराजने माहीचा फोटो बघितला, तेव्हाच त्याला ती प्रचंड आवडली. सरळ सोनेरी केसांचा छोटासा पोनी, गोरा वर्ण,थोडंस अपरं नाक. पण सगळ्यात आवडले होते,ते तिचे डोळे. टपोरे, काळेभोर. प्रत्यक्षात माहीला बघितल्यावर तर तो तिच्या प्रेमातच पडला. मनात आलं,आता माहीला बघितल्यावर दुसरी मुलगी आवडणं कठीणच आहे. काहीतरी करायला हवं. आता माहीशिवाय दुसरी बायको नकोच.
   माहीने विराजकडे चोरून बघितलं. तिच्या मनात आलं. तसा हँडसम आहे. टिपिकल साऊथ इंडियन हिरो वाटतोय. टॉल,डार्क आणि हँडसम. शिवाय अतिशय हुशार. आय टी कंपनीत उत्तम पॅकेज असलेला लग्नाळू मुलगा. पण नाही,मला त्या लग्नाच्या जाळ्यात अडकायचं नाही.
"काही म्हणालीस माही?"
"नाही, काहीच नाही. पण मला एक सांग, आपण नकाराचे कारण काय द्यायचे?"
"विचार करावा लागेल. पण तूच मला नकार दे की. लग्न तुलाच नको आहे. मी तयार आहे.पण छान वाटलं तुला भेटून. आपले बरेचसे विचार जुळतात. एक मैत्रीण म्हणून तुला परत भेटायला मला आवडेल." विराज सॅक उचलत म्हणाला.
   माहीला वाटलं, नकार देणं इतकं सोपं असतं तर मी भेटायला सुध्दा आली नसती. माही घरी आली आणि मानसीने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. माहीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला विराजशी लग्न करायचं नाही,हे ती दोन दिवसांनी सांगणारच होती.
  पण त्या दोन दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या. मानसी आणि माहीचे बाबा शेखर,विराजला भेटून आले. साधा,स्वभावाने अगदी दिलखुलास असलेला विराज दोघांनाही खूपच आवडला.  विराजने देखील त्याच्या आईवडिलांना माही खूप आवडल्याचे सांगून टाकले. लगेच रेखाचा मानसीला फोन आला.
"मानसी,अग विराज माहीवर फिदाच झालाय. माही काय बोलली ग?"
"काहीच बोलत नाहीय. तिला लग्नच करायचं नाही. मीच तिला जबरदस्ती पाठवलं,विराजला भेटायला."
"अग, सगळ्याच मुली असं म्हणत असतात. आपण देखील तेच केलं होतं. पण लग्नानंतर कळलं की,आयुष्यात लाईफ पार्टनर किती महत्वाचा असतो. तिचं मन मी वळवते. तू काळजी करू नको."
                         .............
   रेखामावशीचा नंबर बघून माहीने नाराजीनेच फोन उचलला. "हाय मावशी."
 "माही, विराज तुझ्यावर फिदा झालाय. लग्न करेन तर माहीशीच,नाहीतर नाही, असं म्हणाला. आता बोल." रेखा हसत म्हणाली.   माही चिडलीच. ही काय जबरदस्ती !
"मावशी, मी अजून विचार केला नाहीय. मला थोडा वेळ दे."
"हो ग,तू जरूर वेळ घे, पण चुकीचा निर्णय घेऊ नकोस."
  माही गोंधळून गेली. विराजमधे नाकारण्यासारखं काही नव्हतंच. आईवडिलांनी नकाराचे कारण विचारले,तेव्हा ती उत्तर देऊ शकली नाही. पण स्वभाव एका भेटीत कुठे कळतो? तिने परत विराजला भेटायचं ठरवलं.    त्याच ठिकाणी दोघे परत भेटले.
"विराज, माझ्या काही अटी आहेत,त्या तुला मान्य असतील तरच मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईन. तसा आपल्या दोघांमधे लेखी करार असेल."
"इंटरेस्टिंग. मी तयार आहे. अटी काय आहेत?"
"लग्न झाल्यावर सहा महिने आपण एका खोलीत असलो तरी नवरा बायकोचं नातं आपल्यात नसेल. मी स्वभावाने हट्टी आहे. सहसा माघार घेत नाही. टीपीकल नवऱ्याचं ऐकून घेणं वगैरे मला जमणार नाही. आपण एकमेकांना पूरक आहोत,हे कळल्यावरच मी तुझा नवरा म्हणून स्वीकार करेन. नाहीतर आपण वेगळे होऊ."
"सहा महिन्यात तुला कळेल माझा स्वभाव? कशावरून मी तुझ्याशी खोटं वागणार नाही? आणि घटस्फोट झाला तर तुझी बदनामी जास्त होईल,कारण तू मुलगी आहेस. भीती नाही वाटत का तुला? माझं काय,मी आईला सांगून टाकलंय,लग्न करेन तर माहीशी,नाहीतर एकटा जीव सदाशिव."
"घटस्फोटापेक्षा, ओढून ताणून केलेल्या संसाराची भीती वाटतेय. मी स्वतः कमावते. मी आयुष्यभर एकटी राहू शकते."
  माहीचं गर्वाने बोलणं विराजला खटकलं. पण त्याचा निर्णय झाला होता." तुझ्या लेखी करारावर सह्या करायला मी तयार आहे माही." विराज माहीकडे बघत  म्हणाला.
    माही लग्नाला तयार झाली, हा आनंद मानसीसाठी इतका मोठा होता की ती उत्साहाने तयारीला लागली. लग्न अगदी थाटात झालं.  सप्तपदी चालताना माहीला तिचा हात विराजच्या हातात द्यावा लागला,तेव्हा विराज तिच्याकडे बघून मिश्कीलपणे हसला. तिचा हात त्याने जोरात दाबला,आणि माही त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागली. विराजला मनातल्या मनात हसू आवरत नव्हतं.
    लग्न छान पार पडलं. विराज आणि माहीची जोडी, दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. हनिमूनला कुठे जाणार,हे सगळ्यांनी विचारल्यावर,सध्या खूप काम आहे, रजा नाही असं म्हणून विराजने वेळ मारून नेली.
     रेखा आणि शेखर,माहीवर कौतुकाचा वर्षाव करत होते. रेखामावशी तर सासू वाटतंच नव्हती. विराज आणि माही दोन दिवसांनी कामावर रुजू झाले. माहीच्या रुटीनमधे फार काही फरक पडला नव्हता. फक्त घरातली माणसं बदलली होती. विराजचा हसतमुख,खेळकर स्वभाव ती अनुभवत होती. अतिशय सकारात्मक, मदतीला तत्पर,लोकप्रिय विराज ती बघत होती. त्याने शब्द दिला त्याप्रमाणे, तिच्या बोटालाही त्याने स्पर्श केला नव्हता. त्याच्या स्वभावात दोष तरी काय काढणार? 
    लग्नाला चार महिने होऊन गेले होते. एक दिवस ऑफिसमधून घरी आल्यावर माहीला खूप हसण्याचा आवाज आला. ती किचनमधे आली. टेबलवर रेखा,शेखर,विराज आणि एक अनोळखी तरुण मुलगी गप्पांमध्ये रंगले होते. माहीने तिच्याकडे निरखून बघितलं. नितळ त्वचा,गव्हाळ रंग,केसांचा स्टेपकट, ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक आणि आधुनिक पेहेराव. फुलासारखी टवटवीत दिसत होती. 
"ओह माही ! तुझी ओळख करून देतो. ही माझी सख्खी आते बहीण ऋता. यु एस ला जॉब करतेय. आत्ता काही दिवस भारतात आली आहे. आपल्या लग्नात नव्हती." विराज माहीला बसायला खुर्ची देत म्हणाला.
  माहीने हळूच तिच्या गळ्याकडे बघितलं. मंगळसूत्र तर दिसत नव्हतं. पण हल्ली लग्न झालं तरी काही मुली मंगळसूत्र पण घालत नाहीत. माहीचा हात नकळत तिच्या गळ्याकडे गेला.तिने मंगळसूत्राच्या वाट्या घट्ट धरल्या.
"माही, ऋताचं फ्रेंड सर्कल उद्या गोव्याला जायचा प्लॅन करताहेत. ती आपल्या दोघांना इनव्हाइट करायला आली आहे. पण तुला तर रजा नसेलच न? मी जायचा प्लॅन करतोय."
"ओके,हाय ऋता,ग्लॅड टु मीट यु." माही ऋताला शेकहॅन्ड करत म्हणाली.
"हाय माही, तू आणि विराज आम्हाला जॉईन व्हा. यु विल एन्जॉय." ऋता म्हणाली.
   माहीने हसत मान डोलावली. चहा घेताना ती ऋता आणि विराजकडे बघत होती. दोघेही गप्पांमध्ये इतके मश्गुल झाले होते की माही तिथे आहे,हे विसरून गेले. माहीने सगळ्यांचे कप विसळले आणि ती खोलीत आली. तिला आतल्याआत उमासे येत होते. रडावंसं वाटत होतं पण कारण कळत नव्हतं.
  दुसऱ्या दिवशी सकाळी माही उशीरा उठली. आज ऑफिसला दांडी मारायचं तिने ठरवलं.ती कॉटवर उठून बसली. तिला विराज बॅग भरताना दिसला. 
"विराज, कुठे निघालास?"
"कुठे म्हणजे? गोव्याला. काल बोललो की आपण." विराज कपाटातले कपडे काढत म्हणाला. "मी जाऊन येतो. मला पण चेंज हवा आहे. आणि ऋताची कंपनी फार छान आहे. शी इज अ लव्हेबल पर्सन." विराज माहीकडे पाठमोरा होऊन बॅग भरत होता. माहीला काय वाटलं,कुणास ठाऊक! ती ताडकन कॉटवरून उठली आणि म्हणाली, "मला एकदाही तुला विचारावं असं वाटलं नाही विराज? परस्पर निर्णय घेतला. आणि मी येणार नाही,हे तुम्ही दोघांनी गृहीतच धरलं. मी बायको आहे न तुझी?" माहीला रडू अनावर झालं आणि  विराजला मागून घट्ट मिठी मारून हुंदके देऊ लागली. विराज वळला,त्याने माहीचा चेहरा हातात घेतला आणि तिची चेष्टा करत म्हणाला,"पण तुझ्या कराराला अजून दोन महिने बाकी आहेत. त्याचं काय?"
  विराजची ती खट्याळ नजर बघून माही त्याचे हात स्वतःभोवती लपेटत म्हणाली," माझा करार मी रद्द करतेय. तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही."
  विराज तिला घट्ट कवटाळत म्हणाला,"तुझ्या कराराबरोबर मी पण एक करार केला होता. प्रेमाचा करार. तुला आजन्म साथ देण्याचा."
"विराज बॅग परत भर,माझे पण कपडे बॅगेत टाकायचे आहेत."
"ऑलरेडी टाकले आहेत मॅडम " 
  माही धावत बॅगजवळ गेली. तिने बघितलं, विराजने तिचे चार ड्रेसेस बॅगमध्ये ठेवले होते. ती विराजजवळ आली आणि रडत त्याच्या छातीवर डोकं ठेऊन म्हणाली,"लव्ह यु.".....
             ×××××××××××
  ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...