अहो ऐकलंत का? आम्ही सगळ्या जणी ना काल लक्ष्मी रोडवर गेलो होतो. पूजा ला लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र बघायचं होतं म्हणून ! ऐका ना ! तिथं मी पिछोडी पाहिली. इतकी छान होती ना! खूप दिवसांपासून घ्यायची होती मला .... पण मनासारखी मिळतचं नव्हती. ऐकताय ना? "
आरती मला स्वयंपाकघरातून सांगत होती . एव्हानं माझ्या कपाळावर आठयांनी गर्दी केली होती. पिछोडी म्हणजे कमीत कमी दीड लाखाला दणका!
" आरती, अगं नुकतीच तर दिवाळीची सगळी खरेदी झालीये ! बोनस तर सगळा असाच संपलायं ! घराचा हप्ता, इन्शुरन्सचा प्रीमियम , वाण्याचे बिल अजून चुकवायचयं ! तुला कळतं कसं नाही ? नंतर बघू ... खरंतर तू हे मला विचारायला सुद्धा नको होतंस !" आरतीचा चेहरा खर्रकन उतरला. नाश्ता करताना मी बघत होतो ! म्हणजे खरंच आवडली होती वाटतं पिछोडी ! पण नकोच ! योग्यवेळी बायकांच्या खरेदीला आवर घातलाच पाहिजे . मनातल्या मनात स्वतःलाच बजावत मी उठलो . आज बरीच कामे करायची होती. दिवाळी अगदी तोंडावर आली होती .
बँकेतून पैसे काढायचे होते म्हणून मी नेहमीपेक्षा जरा लवकरच घराबाहेर पडलो . पैसे काढण्याच्या काउंटर समोर मोठी लाईन होती. लाईनीत उभं राहून मी इकडेतिकडे बघितलं . सगळ्याच काऊंटरवर आज तोबा गर्दी होती . कोपऱ्यातून कोणीतरी हात हलवला. मी निरखून पाहिले. नाना पळनीटकर उभे होते. मी ही हात केला. पैसे काढून वळलो तर नाना पुढ्यातच उभे !
" अरे तुला वेळ आहे का थोडा ?" ......
" का हो नाना ?" मी विचारले.
" अरे विशेष काही नाही ... सहजचं . नाहीतर असं करतोस का? माझं घर माहित आहे ना तुला ? इथेच बँकेच्या मागच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ! तिथं जाऊ ."
खरंतर मी घाईत होतो . यांच्याशी बोलत बसलो तर उशीर होणार होता. पण का कोण जाणे मी तयार झालो. त्यांच्या घराचे जिने चढता चढता नकळत माझे मनं भूतकाळात शिरले . नाना याच शाखेत मॅनेजर म्हणून कित्येक वर्ष होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक माणूस ! अर्थातच स्टाफचे अगदी नावडते. कामाच्या बाबतीत नानांना कुठलीही सबब चालत नसे. कित्येकदा स्टाफ गैरहजेरी जास्त असेल तर नाना कॅशीयरच्या काउंटरवर येऊन बसत असतं. अगदी फटकळ बोलणं. त्यापायी त्यांनी अनेकांना दुखावलं होतं. अगदी मला सुद्धा ! एकदा गर्दीच्या वेळी बेअरर चेकचे पैसे, फोटो आयडी नाही म्हणून मला त्यांनी दिले नव्हते .
" तुझी माझी ओळख बँके बाहेर ! इथं नियम म्हणजे नियम." ते माझ्यावर डाफरले होते. खूप दुखावला गेलो होतो मी तेव्हा.
" ये ना !" घराचे कुलूप उघडतं नाना म्हणाले. " बस मी पाणी घेऊन येतो ." नाना पाणी आणायला आत गेले. मी इकडे तिकडे पाहू लागलो. टेबलावर सुरेखा वहिनींचा हार घातलेला हसरा फोटो ठेवला होता. घर अगदी नीटनेटकं ठेवलं होतं .
" घे पाणी घे ... अरे, आज कित्येक महिन्यांनी कोणीतरी घरी आलं आहे . कोण येणार अरे माझ्याकडे ?" ..... जिना चढल्यामुळे आलेला घाम पुसत नाना बोलले.
" अरेच्या राहुल कुठे असतो मग ? " मी आश्चर्याने विचारले. राहुल म्हणजे नानांचा मुलगा.
" तो वेगळा राहतो. त्यालाही आता सहा वर्ष झाली. त्याचं ऑफिस बाणेर ला आहे तिथेच कुठेतरी भाड्याने ब्लॉक घेतला आहे त्यांनं." आम्ही दोघेही गप्प झालो. पाणी पिऊन मी ग्लास टीपॉय वर ठेवला. नाना टेबलावरील सुरेखा वहिनींच्या फोटोकडे एकटक बघत बोलू लागले.
" ही गेली त्याला दहा वर्षे झाली. घरातलं सगळं चैतन्यच घेऊन गेली बघ ! पहिली तीन वर्षे नोकरीमुळे जाणवलं नाही पण रिटायर्ड झालो आणि एकटेपणा अंगावर आला. वर्षाभरात राहुलही त्याच्या बायकोसोबत वेगळा झाला." .........
" त्याला अडवलं का नाहीत तुम्ही नाना ? त्याची गरज याच तर वयात आहे तुम्हाला ." ........ मी पुटपुटलो.
" मी कोण अडवणार त्याला ? तेवढ जवळचं नातं त्याच्याशी कधी जोडलंच नव्हतं मी." नानांनी सुस्कारा टाकला.
" जसं पेराल तसं उगवतं म्हणतात. मी आयुष्यभर शिस्तप्रियतेच्या नावाखाली सगळ्यांच्या मनात फक्त द्वेष पेरला. मग आता त्याची फळे मीच भोगायला नको का ? देवाने सुरेखा सारखी पत्नी मला दिली. प्रेमळ, गृहकृत्यदक्ष ,सगळ्यांशी संबंध जोडून असणारी ...... पण मला तिची महती कधी कळलीच नाही. देवतेसमान असणाऱ्या माझ्या बायकोला दुखावण्याची एकही संधी मी सोडली नाही.
' तुमच्या अशा बोलण्याची आता मला सवय झालिये ' एकदा माझ्या कडून भरपूर बोलणी खाल्ल्यावर ती म्हणाली होती. माझ्या सारखा कपाळ करंटा मीच ! माझ्या भीतीपोटी झालेला आजार तिनं शेवटपर्यंत मला सांगितला नाही. आपल्या आजारपणावर खर्च होणं हे तिला अपराधीपणाचं वाटत होतं. काय मिळवलं मी असं वागून? नकळत मी तिला मृत्यूच्या खाईत ढकललं. तिच्या वयाच्या पन्नाशीत ती गेली. तिची कुठलीच हौस मौज मी पुरवली नाही. ती गेल्यावर तिचा मोठेपणा मला कळला. खरं तर आमचे नातेवाईक, स्नेही आणि मित्रमंडळी ही केवळ तिच्यामुळे आमच्या भोवती होती. पैसा आणि जवळचे नातेसंबंध यांची एकमेकांशी सांगड घालून मी मोठीच गल्लत केली होती. पैसा हे केवळ विनिमयाचे माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग करून नातेसंबंध दृढ करायचे असतात हे मी विसरून गेलो होतो. आता कशाचीच इच्छा उरली नाहीये. डोळे पैलतीरी लागले आहेत. माझी सगळी स्थावर आणि जंगम मालमत्ता मी वृद्धाश्रमाला सुरेखा च्या नावाने दान केली आहे." नाना बोलायचे थांबले. खोलीत भयाण शांतता भरून राहिली. " आरती काय म्हणतीय? बरेच दिवसात मला दिसली नाही. तिच्याशी बोललो की मला सुरेखा ची आठवण येते. मी आठवण काढली होती म्हणून सांग तिला."
नाना शून्यात बघून बोलत होते. भानावर येऊन मी उठलो. नानांना वाकुन नमस्कार केला. म्हणालो,
" नाना दिवाळीत फराळाला या घरी ! आरती फोन करेलच तुम्हाला."
नाना म्हणाले," दहा वर्षे झाली. ही गेल्यापासून फराळ वर्ज्य केलाय मी. दिवाळी फार प्रिय होती तिला !" मी निघालो. नाना दारापर्यंत आले. कसंनुसं हसत त्यांनी मला निरोप दिला. त्यापेक्षा ते रडले असते तर फार बरं झालं असतं .
सुन्न मनाने मी जिना उतरून रस्त्यावर आलो. पैसा आणि नातेसंबंध यातं नानां सारखीच आपणही गल्लत करत आहोत हे लक्षात येऊन मी शरमिंदा झालो. मनातल्या मनात नानांचे आभार मानून मी खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला,
" हॅलो पूजा, मी राजेश बोलतोय. परवा तू आणि आरतीनं सोनाराच्या दुकानात पिछोडी पाहिली होती ना ? मला त्याचे डिटेल्स पाठवतेस का ? आणि हो ! आरतीला बोलू नकोस काहीचं ...... तिला पाडव्याच्या ओवाळणीचं सरप्राइज द्यायचंय मला !"
©मिलिंद अष्टपुत्रे
लेखकाच्या नावाशिवाय पोस्ट शेअर करू नये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा